पत्र क्र ७४
ते नवीन वर्ष किती परंपरा पाळत साजरं करतात बाली मध्ये, बघितलं न , मला भेटलेला बालीनीज खूप अभिमानाने सगळं वर्णन करत होता. एकूण तिथे प्रथांमध्ये तो पारंपरिक वेष घालणे एकदम बंधनकारक. रंगीत सरोंग म्हणजे...
... कधीतरी कुठेतरी
ते नवीन वर्ष किती परंपरा पाळत साजरं करतात बाली मध्ये, बघितलं न , मला भेटलेला बालीनीज खूप अभिमानाने सगळं वर्णन करत होता. एकूण तिथे प्रथांमध्ये तो पारंपरिक वेष घालणे एकदम बंधनकारक. रंगीत सरोंग म्हणजे लुंगी, वर पांढरा शर्ट घालतात. स्त्रिया कमरेला एक रंगीत वस्त्र बांधतात तर पुरुष डोक्याला फेट्यासारखे वस्त्र गुंडाळतात. कानावर चाफ्याचे फुल अडकवतात. स्त्रिया काही वेळा डोक्यावर धातूच्या मुकुटासारखे काही तरी घालतात. हाच वेष गावोगावी दिसला.
नवीन वर्षाच्या दहा दिवसांचे जसे मोठे समारंभ असतात, तसेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरही ते असतात. बालीत जन्म घ्यायचा म्हणजे प्रथांना सामोरे जावे लागते. जन्मलेले बाळ म्हणजे १०८ योनीतुन फिरून आलेले आहे आणि ते सगळे आत्मे त्याच्या बरोबर आलेले आहेत. जन्मानंतर १०५ दिवस ते त्या बाळा बरोबर राहतील. त्यानंतर चे प्रत्येक १०५ दिवस महत्वाचे, बाळ सहा वर्षाचे होई पर्यंत. जन्मापासून पहिले १०५ दिवस त्या बाळाच्या पायांचा स्पर्श जमिनीला होता काम नये. त्याला वरच्या वर ठेवले जाते. दिवसातून दोन वेळा पवित्र जल वापरून अंघोळ घातली जाते. कारण त्याला पूर्व जन्माचे वाईट गुण चिकटलेले असतात, ते धुतले गेले पाहिजेत. त्याला सामाजिक ठिकाणी नेत नाहीत. कदाचित बालमृत्यू चे प्रमाण जास्त असल्याने ही प्रथा पडली असावी. तीन महिने पर्यंत बाळ अत्यन्त पवित्र मानले जाते कारण पवित्र आत्मे त्याच्या बरोबर आहेत. जोवर हे आत्मे त्याला सोडून जात नाहीत तोवर ते बाळ म्हणजे स्वर्गातील पूर्वज. मात्र तीन महिन्यांनी एक मोठी पूजा घालतात. तिला न्यामबुटीन म्हणतात. सर्वप्रथम बाळाच्या आई वडिलांना शुद्ध केले जाते. पवित्र जल शिंपडले जाते. मग सर्व आत्म्याची पूजा केली जाते. त्यांना मोठा नैवेद्य दाखवला जातो. मंत्रोच्चारणामध्ये बाळाला पवित्र केले जाते, आणि त्याचे पाय जमिनीला लावले जातात. ह्यानंतर जे घरचे लाडाचे नाव असेल ते ठेवले जाते. ताडाच्या पानावर किंवा आपट्याच्या पानावर काही नावे लिहितात. ती जळत्या यज्ञ कुंडात टाकतात, जे पान कमी जळेल किंवा उशिरा जळेल ते लाडाचे नाव कारण बाकी पुट्टु, न्योमान वगैरे आहेतच. अशीच पूजा दर १०५ दिवसांनी केली जाते. बाळ वर्षाचे झाले की दर सहा महिन्यांनी केली जाते, अगदी सहा वर्षांचा होई पर्यंत! त्यानंतर मात्र ते पोर जीवनाचे टक्के टोणपे खायला तयार झाले असे समजतात. मग त्याला गावचे नृत्य वगैरे कला शिकायला पाठवतात. शाळेत पाठवतात.
पोर वयात आल्यावर एक दात कापण्याचा सोहळा करतात. असा समाज आहे कि दात कापण्याच्या विधीमुळे त्या बाळाचे रूपांतर चांगल्या व्यक्तीत होईल. सर्व वाईट गुण त्याच्या पासून दूर जातील. तो निस्वार्थी आणि निर्व्यसनी बनेल. राग, लोभ, मत्सर सगळे त्याला सोडून जातील. आज्ञाधारक बनेल. आणि बालीनीज लोकात असलेली जबाबदारीची जाणीव त्याच्यात रुजेल. अत्यन्त प्रामाणिक नागरिक बनेल. दात म्हणजे पूर्वजांकडून आलेली गोष्ट आणि त्यामुळे ती पूर्वजांना परत दिली पाहिजे. म्हणून घरात जिथे पूर्वजांची आठवण म्हणून ठेवलेला देव्हारा असतो तिथे त्या दाताचे तुकडे नारळात घालून पुरले जातात. आणि मग मोठी मेजवानी होते. पोराला नवा , सुंदरसा पारंपरिक पोशाख सरोंग, शर्ट वगैरे मिळतो. कठपुतळ्यांचा खेळ ह्या कार्यक्रमात आवर्जून करतात. सगळे जण भेटवस्तू देतात. घरचे लोक मंदिरात मोठा नैवेद्य करतात. शेवटी ते पोर पुजाऱ्याकडे जाऊन पाय पडते आणि चांगली व्यक्ती होण्याचा आशीर्वाद घेऊन येते. मुलींसाठी पण सगळे असेच.
ह्या नंतरची मोठी प्रथा म्हणजे लग्नाची. मुलाकडची मंडळी मुलीकडे जाऊन तिच्या कुटुंबाची ह्या लग्नासाठी परवानगी मागतात. ती मिळाल्यावर, ज्या गावात लग्न असेल ते सगळे गाव तयारीला लागते. ज्या गावचा मुलगा असेल तिथले काही स्त्री पुरुष हातात सुऱ्या घेऊन मुलीच्या गावी येतात. बायका छोट्या सुऱ्या घेतात तर पुरुष जरा मोठ्या. त्यांचे वेष साधेसे असतात कारण ते बांबू कापून देवाला नैवेद्य देण्यासाठी चौथरा बनवणार असतात आणि स्त्रिया नारळाच्या झावळ्या कापून सजावट करणार. मुलीकडच्यांनी ह्या लोकांची खातीर करायची.
प्रत्यक्ष लग्न सोहळा अनेक दिवस चालतो. एक विधी मुलीकडे असा असतो की त्यात तिच्या कडचा एक पुजारी येऊन पूजा करतो आणि तिला समजावून सांगतो की लग्न केल्याने तिला तिच्या आई वडिलांच्या घरावर, संपत्तीवर अधिकार सांगता येणार नाही. ज्या घरात जाईल तिथले मात्र सगळे तिला मिळेल. इथल्या पूर्वजांच्या ऋणातून ती आता मुक्त होईल . पण लग्न म्हणजे खेळ नाही, तिला खूप जबाबदारीने वागले पाहिजे. तिच्या चांगल्या वागण्याने संस्कृती पुढे जाणार असते वगैरे. त्यानंतर तिला हळद, तांदूळ, मोराच्या पिसांची भुकटी आणि इतर जडीबुटींचा लेप लावतात. केस धुवायला धानाचे धांडे भिजवलेले पाणी वापरतात. पवित्र जलाने अंघोळ घालून एका खोलीत बंद करतात, चोवीस तास! तिथे तिने फक्त देवाची प्रार्थना करायची. जे काही तिला पुजाऱ्याने सांगितले त्यावर नीट विचार करायचा. आणि मगच लग्नासाठी तयार व्हायचे. आणि अगदी असेच सगळे विधी मुलाकडे पण. त्यानेही विचार करायचा, त्याला जबाबदारी पेलण्यासाठी काय काय केले पाहिजे, येणाऱ्या मुलीशी चांगलेच वागले पाहिजे, वगैरे सांगितलेले असते.
दुसऱ्या दिवशी मुलाकडचे मुलीकडे येतात. त्या बांबूच्या चौथऱ्यावर देवाला, पूर्वजांना नैवेद्य दाखवतात. मुलीला पिवळे वस्त्र डोक्यावरून घालतात आणि घेऊन जातात. मग मुख्य पूजा मुलाकडे होते. नवीन आलेल्या मुलीचे जंगी स्वागत होते. एका सजवलेल्या ट्रेमधून लोक तिला तांदूळ, साखर आणि कॉफी भेट देतात. काही लोक इतर वस्तू पण देतात. सगळा गाव ह्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहते. त्यांचे यथोचित स्वागत केले जाते. ह्या सगळ्या भेट वस्तू घेऊन सगळे दुसऱ्या दिवशी मुलीकडे जातात. मग सगळे मजेत त्या बघतात आणि मुलीला देतात. झाले बाबा लग्न!
मात्र आयुष्यभर जे काही करायचे ते मृत्यू साठी! सर्व मेहेनत, कमाई सगळे मृत्यूसाठी. कसे ते बघू.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.