पत्र क्र ७३

उण्यापुऱ्या ४५ लाख लोकांचा देश बाली. मुख्य धर्म हिंदू. अनेक प्रथा परंपरा पाळण्यात अग्रेसर! पण मला भेटलेले बालीनीज लोक छान होते. अगदी पापभिरू. त्यांच्या सगळ्या प्रथा जाणून घेणे पण कठीण. बारीक सारीक...

कीर्ती वडाळकर
||4 min read

उण्यापुऱ्या ४५ लाख लोकांचा देश बाली. मुख्य धर्म हिंदू. अनेक प्रथा परंपरा पाळण्यात अग्रेसर! पण मला भेटलेले बालीनीज लोक छान होते. अगदी पापभिरू. त्यांच्या सगळ्या प्रथा जाणून घेणे पण कठीण. बारीक सारीक गोष्टीत प्रथेचा आधार घेणारे. दारावरच्या देव्हाऱ्या पासून ते अगदी घरातल्या स्वयंपाक घरापर्यंत, गावाची कला पुढे नेण्यापासून तर नृत्याच्या कार्यक्रमापर्यंत, धान्य पिकवण्यापासून ते जेवण करण्यापर्यंत, सगळीकडे वेगवेगळ्या प्रथा आठवणीने आणि अभिमानाने पाळणारे. गावागावांमधून मजेत राहणारे बालीनीज लोक. ह्या प्रथा परंपरांच्या पालनानेच समृद्ध झालेली बालीची संस्कृती. तिथल्या निसर्गाचा आनंद घेता घेता ह्या संस्कृतीचा ही मान राखावा.

साधारण मार्च मध्ये, हिंदू शक म्हणजे नवीन वर्ष चालू होते. असे मानतात कि नवीन वर्षाच्या दहा दिवस आधी सर्व पूर्वज पृथ्वीला भेट देतात आणि इथे वास करतात. त्यामुळे हे दहा दिवस खूप महत्वाचे मानतात. प्रत्यक्ष नवीन वर्ष दिवसापूर्वी, ४ दिवसआधी ,सगळे गावकरी सुंदर पारंपरिक रंगीत सरोंग आणि पांढरा कुर्ता किंवा शर्ट घालून, छानशी तयारी करून "सागर पुरा", म्हणजे समुद्रावरच्या मंदिरात जमतात. मग समुद्राच्या पाण्याने ते मंदिर, तिथल्या प्रतिमा आणि त्यातील वस्तू धुवून काढतात. तिथे "जलनिधी पूजा" करतात. आणि समुद्राचे पवित्र पाणी एका सुंदर सजवलेल्या घटातून घरी आणतात. ह्या प्रथेला मेलास्ती म्हणतात.

त्यानंतर चा महत्वाचा दिवस म्हणजे नव वर्षाची पूर्वसंध्या. सगळा गाव जमून आपल्या तर्फे काहीतरी नैवेद्य घेऊन येतो. त्याला ते देवासाठी दिलेली वस्तू मानतात मग ह्यात गाई, बैल, कोंबड्या, बकऱ्या, शेतात पिकलेले धान्य काहीही असू शकते. ते गावच्या देवळाजवळ मोठा समारंभ असतो त्यात देतात. सगळे पूर्वज ह्या सोहळ्याला उपस्थित आहेत असे मानण्यात येते. त्यांच्या नावे दिलेले ते दानच म्हणा न एक प्रकारचे. गावाचा प्रमुख ते सगळे गावकऱ्यांत नंतर वाटून देतो.

प्रत्येक घरात आधी पूजा होते. नारळाच्या झावळ्या अंगणाच्या प्रवेशद्वाराशी जाळल्या जातात. घरची मंडळी घरातील भांडी, ताटल्या वगैरे बांबूच्या सुंदर सजवलेल्या काठीने जोरात वाजवतात. तोवर मिरवणुकीची वेळ होते. सूर्यास्ताच्या थोडे आधी सगळे समुद्राच्या दिशेने निघतात. छान पारंपरिक पोशाख, म्हणजे रंगीत सरोंग आणि पांढरा शर्ट आणि दागदागिने, डोक्याला आकर्षक फेटा, कानावर चाफ्याचे फुल असा पेहेराव करून गावकरी निघतात. तरुण आणि लहान मुले मुली हातात मशाली घेऊन मिरवणुकीत सामील होतात. ह्या मिरवणुकीच्या शेवटी

"ओगो ओगो " असतो. "ओगो ओगो " म्हणजे कागदाच्या लगद्या पासून, किंवा बांबू पासून बनलेली आणि सजवलेली प्रतिमा. ह्यात सुंदर कापड वापरतात आकर्षक रंगसंगती करतात. साधारण पूर्ण गावाचा एकच ओगो ओगो असतो. त्याची मिरवणूक काढतात. ती गावातील सर्व गल्ल्यांतून फिरवतात. बांबूच्या घंटा वाजवत ती मिरवणूक समुद्रकिनारी जाते. नंतर गावच्या स्मशान भूमीत ओगो ओगो चे दहन करतात. काही गावांमध्ये ती प्रतिमा एका मुख्य ठिकाणी महिनाभर ठेवली जाते. काही प्रतिमा तर इतक्या छान असतात कि त्या वस्तू संग्रहालये विकत घेऊन जातात. काही ठिकाणी त्यांची स्पर्धा असते, उत्तम बनलेल्या प्रतिमेला बक्षीस असते. ह्यात वर्षभराची रोगराई, वाईट गोष्टी जळून खाक होतात अशी मान्यता आहे. काही ठिकाणी ह्याला "भूत यज्ञ " म्हणतात. विदर्भात मारबत काढतात अगदी त्याचीच आठवण आली . ह्या दहन विधी नंतर मोठी मेजवानी असते. त्यापूर्वी गावाचे सामूहिक नृत्य असते. सगळा जलसा नुसता.

प्रत्यक्ष नववर्ष दिन म्हणजे न्येपी. हा दिवस अतिशय वेगळा असतो. ह्या दिवशी "अमती गेंनी" म्हणजे कुठल्याही प्रकारचा अग्नी नाही जाळायचा. अगदी घरातले दिवे पण नाही लावायचे. सगळीकडे अंधार असला पाहिजे, घराचे पडदे बंद करून घ्यायचे. "अमती कार्य" म्हणजे काहीही काम करायचे नाही. "अमती लेलुंगनम " म्हणजे कुठेही प्रवास नाही करायचा. "अमती लेलांगुआन" म्हणजे स्वतःचे कुठल्याही प्रकारे मनोरंजन करायचे नाही. पूर्णवेळ "ब्रत " किंवा "योग्" पाळायचे. सकाळी सहाला सुरु झालेले न्येपी चोवीस तास चालते. ह्या काळात सगळीकडे शुकशुकाट असतो. प्रत्येकानी ह्यातील सर्व प्रथा पाळल्याचं पाहिजेत, मग तो कुठल्याही धर्माचा असो. तुम्ही पर्यटक म्हणून आला असाल तर तुमच्या हॉटेल वर गपचूप बसून राहायचे. बाहेर , रस्त्यावर, समुद्रकिनारी कोणीही दिसता कामा नये. सगळे अतिशय शांत असते. गावागावातून पूर्ण शांतता असतेच पण आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा चोवीस तास बंद असतो. सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले असतात. सगळीकडे ह्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे कि नाही ते बघायला "न्येपी पोलीस" असतात. जगभरात नवीन वर्षाचे स्वागत दिव्यांची रोषणाई, आणि मोठे आवाज करत करतात, पण इथे मात्र दृश्य अगदी वेगळे असते. हे चोवीस तास, उपास राखून प्रत्येकाने ध्यान धारणा करायची, देवाची पूजा करायची. वर्षभरात आपले कोणाशी भांडण झाले असल्यास त्या व्यक्तीला माफ करायचे. एकूण काय पूर्ण दिवस स्वतः साठी आणि देवासाठी द्यायचा. ह्यामुळे मानवाचे देवाशी आणि निसर्गाशी संधान साधले जाते असा समज आहे. शांततेमुळे पृथ्वीवर आलेल्या पूर्वजांचे समाधान होते आणि ते स्वर्गात परत जातात.

संपूर्ण शांत असे चोवीस तास संपल्यावर, सगळे कुटुंब, नातेवाईक , मित्रमंडळी एकत्र येतात. कोणाचे काही मतभेद झाले असतील तर माफी मागितली जाते. पुढचे येणारे वर्ष चांगले जावे म्हणून सगळे प्रार्थना करतात. छानशी मेजवानी करतात. ह्याला "नगेंबक अग्नी" म्हणतात.

आणि शेवट "धर्म शांती " ची पूजा करतात. ह्यात सगळे जण एकत्र जमून विविध शांती मंत्र आणि श्लोक म्हणतात. आणि नवीन वर्ष स्वागताची सर्व कार्ये पार पडतात.

ह्या दिवसात पूर्वज येतात, आणि तुमची सगळी प्रगती बघून खुश होऊन परत जातात, अशी समजूत आहे.

काही ठिकाणी तर आदल्या दिवशी प्रत्येक गावकऱ्यांकडून यथाशक्ती वर्गणी गोळा केली जाते. ओगो ओगो जाळल्या नंतर हे सर्व पैसे हवेत उंच उडवतात, मोठा घंटानाद करतात. ज्याला मिळतील त्याने ते पैसे उचलायचे. पूर्वजांना देण्यासाठी ते पैसे तसे हवेत फेकायचे म्हणे. हाही एक मोठा कार्यक्रम असतो. हि सगळी माहिती मी हॉटेल मध्ये भेटलेल्या एका बालीनीज संस्कृतीच्या, अभ्यासकाकडून घेतली. इतकी मजा आली मला ते सगळं ऐकायला.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments