पत्र क्र ७२
सकाळी शेतात काम, दुपारी आपल्या गावची कला आणि संध्याकाळी सामूहिक नृत्य, असा गावोगावचा दिनक्रम . अगदी लहानपणी पासून बालकांना नृत्य शिकवले जाते. चालता येण्या अगोदर हाताच्या हालचाली शिकवून बालकात नृत्य...
सकाळी शेतात काम, दुपारी आपल्या गावची कला आणि संध्याकाळी सामूहिक नृत्य, असा गावोगावचा दिनक्रम . अगदी लहानपणी पासून बालकांना नृत्य शिकवले जाते. चालता येण्या अगोदर हाताच्या हालचाली शिकवून बालकात नृत्य भिनवले जाते. आणि पुढे ६,७ वर्षाचे झाल्यावर अधिकृतपणे नृत्य शिकवायला सुरुवात करतात.
अनेक नृत्य प्रकार बालीत आहेत. अर्थात इथेही सगळं धर्मासाठी आणि देवाला अर्पण असते. कथा पुराणातील असतात. आणि तो नृत्याविष्कार दर वेळी देवाच्या चरणी अर्पण केलेला असतो. अत्यंत आकर्षक, रंगीत कपडे, खूपसे दागदागिने, डोळ्यांचा आणि चेहेऱ्याचा विशेष मेकप, असे एकदम रंगारंग दृश्य असते त्यांचे नाच बघणे म्हणजे, बांबू, लाकूड आणि तांबं ह्यांचा वापर करून वाद्य बनवतात. त्या संगीतावर नृत्य करतात. काही नृत्यांमध्ये धातूची भांडी , त्यावर एका काडीने आपटून नाद करत नृत्य करत होते. त्यांचं संगीत अतिशय कर्णमधुर आहे. मुळात ते बांबू वापरून बनवलेले वाद्य इतका मधुर ध्वनी निर्माण करतात. त्यात, लाकूड आणि धातू पण वापरलेले वाद्य असेच नादमधुर होते. एकूण नृत्य प्रकार दर्शनीय तर आहेच पण श्रवणीय सुद्धा आहे.
बऱ्याच प्रकारची नृत्ये करतात. बारोंग, बारीस , सेन्द्रवासी , कोंडोन्ग, लेगॉंग, केचक, जांगेर , पेंडेंट, तेनुन आणि टोपेंग अशी काहीशी नावे आहेत. प्रत्येक नाच प्रकार एका विशिष्ट उद्देशाने केला जातो. मुळात नाच करणे ह्या मागे, पवित्र आत्म्यांना वंदन करणे, अपवित्र आत्म्यांना दूर करणे आणि केवळ मनोरंजन असे तीन उद्देश आहेत. मग बारोंग नाच पवित्र आत्म्यांना खुश करण्यासाठी, बारीस हा राम रावण युद्धासाठीचा, कोंडोन्ग, लेगॉंग मनोरंजनासाठी, केचक रामायणातील माकडांचा , जांगेर बसून केलेला, असे नेत्रदीपक प्रकार आहेत. सेंद्रवासी पक्षांचा नाच आहे तर पेंडेंट फक्त मंदिरात करण्याचा नाच आहे. तेनुन हा बायकांनी करायचा नाच आहे. अनेक जणी नेत्रदीपक हालचाली करत वेगवेगळे आकार तयार करतात, मागे पुढे जात सुंदरशा रचना करतात . आणि भले मोठे, रंगीत मुखवटे धारण करून केलेला नाच म्हणजे टोपेंग. अनेक वर्ष पर्यंत नृत्य प्रकार फक्त मंदिरात, देवाच्या पुढ्यातच सादर केले जात. पण बदलत्या काळात आता ते काही खाजगी ठिकाणी पण सादर केले जातात.
आमच्या हॉटेलनी रोज आमच्यासाठी एक नृत्याचा कार्यक्रम ठेवला असे. रात्रीच्या जेवणापूर्वी हा कार्यक्रम असे. मग त्या नर्तकांबरोबर गप्पा करत जेवण असे. त्यासाठी त्यांच्या सुंदर बगिचात एक दगडी कोरीव कमानीचे अँफी थिएटर केलेले होते. मधोमध एक मोठी दीपमाळ होती, चांगली सहा सात फूट उंचीची. तिच्यात पेटवलेल्या वातींचा तेवढा उजेड असायचा. तो सगळा परिसर मस्त होता, आणि नृत्याच्या कार्यक्रमाने आम्ही असे काही भारावून जात होतो. सगळीच नृत्ये सुंदर होती.
एकदा रामायणाचा विषय होता. तसा बहुतेकदा तो विषय रामायणच असायचा म्हणा. आणि नृत्य प्रकार होता केचक. सुरुवात गणेश पूजनाने झाली. मग सर्व मुख्य पात्रांना उभे करून काहीतरी पूजा करण्यात आली. मग सीताहरणा पासून सुरुवात झाली. मग रावणावर आक्रमण, युद्ध, रावणाचा पराभव, आणि राम राज्याभिषेकाने शेवट. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण वगैरे मुख्य पात्र सगळ्यांपेक्षा जरा जास्ती सजलेली, पोशाख खूप उठावदार आणि दागिने जरा ठळक होते. म्हणजे सगळ्यांमध्ये वेगळी आणि उठून दिसत होती. आणि बाकी सगळे एक गडद रंगाची लुंगी गुंडाळून , चेहऱ्यावर काळ्या कभिन्न मेकप मध्ये होते. आवर्जून लक्षात राहिले ते प्रत्येकाच्या कानाला लावलेले चाफ्याचे फुल. हे लोक, तोंडाने, "चक चक .. चक चक ... चक ..." असा आवाज करीत नाद आणि सूर निर्माण करत होते. त्यावर सगळे नृत्य करत होते. कुठलेही वाद्य, संगीत, साथीला नाही. तरी त्याची कमतरता अजिबात जाणवत नव्हती. सीते बरोबर एक दासी पण सतत होती बरं का. सीतेचा पोशाख , मेकप विशेष आकर्षक होता. राणी असल्यामुळे असेल कदाचित , तिला मागे लांबलचक , रंगीत , सोनेरी जरीने सजवलेला असा एक शेपटा होता. खूप दागिने आणि रत्नजडित मुगुट पण होता. चेहेऱ्यावर खूप मेकप. एकूण सीता अशी कशी वनवासाला गेली असावी बाँ ? असा प्रश्न पडावा. सर्व मुख्य पात्रांच्या मुगुटात एक उदबत्ती जळत होती. कारण ते देवाच्या भूमिकेत होते न.
हा वेगळा असा नृत्याचा कार्यक्रम फारच सुंदर झाला होता, अगदी संपूच नये असे वाटायचे त्यांचे सगळे नृत्य प्रकार. पण ती लोकं बिचारी फार थकून जात. ह्या केचक नृत्याने तर आम्ही फारच भारावून गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर मी दगडी कमानीच्या मागे रंगपटात गेले. तिथे सगळ्यांसमोर मुख्य पात्रांना बसवून एक ज्येष्ठ व्यक्ती काही तरी "पाणी उतरवत" होती. हाताने ते पाणी त्या पात्रांच्या भोवती ओवाळून तोंडाने काही तरी जोरात म्हणत होता. मग धूप घेऊन ओवाळलं आणि जोरात आवाज करत बाजूच्या झाडीत ते टाकून दिले. मग रावणाचा नंबर आला. आणि रावणासाठी त्या व्यक्तीने अशी काही क्रिया केली म्हणून सांगू. ओरडत आधी पाणी उतरवले. मग धूप खूप जोरात ओवाळला . नंतर हातात फुले घेऊन ती ओवाळली. हे करणं गरजेचे आहे म्हणे , कारण ते पात्र "त्या" वाईट भूमिकेत असताना "त्या" भूमिकेतील पात्राचे वाईट गुण ह्याच्यात उतरू नयेत, म्हणून हि आवश्यक प्रक्रिया. ही क्रिया झाल्यावर रावणाच्या पात्राने त्या ज्येष्ठ व्यक्तीला नमस्कार केला. मग बाकी सगळ्यांनी पण केला. त्या व्यक्तीने पुन्हा दुसऱ्या एका भांड्यातले पाणी सगळ्यांवर शिंपडले. आणि मग देवाच्या भूमिकेतल्या पात्रांनी मुगुटातील उदबत्त्या काढून बाजूला असलेल्या गणपती समोर नेऊन लावल्या. आणि मग आमच्यात मिसळायला आले. म्हणजे सुरुवातीच्या पूजेने त्यांच्यात ती ती पात्रं संचारली. शेवटच्या पूजेने त्या पात्राचा संचार काढून टाकून नटाला परत मानव बनवण्यात आले. आणि तुमचा नृत्य कार्यक्रम कुठेही असला तरी ह्या क्रिया झाल्याच पाहिजेत. परंपरा पाळाव्यात तर त्या बालीनीज लोकांनीच!
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.