पत्र क्र ७१
हस्तकला आणि सुंदर वस्तू म्हटलं कि मी विरघळलीच समजा. आणि बालीत तर किती प्रकारच्या कला!! सगळी जनता कुठल्या न कुठल्या प्रकारची हस्तकला अवगत असलेली आहे. अति प्राचीन काळात सर्व कलाकृती फक्त देवाला...
हस्तकला आणि सुंदर वस्तू म्हटलं कि मी विरघळलीच समजा. आणि बालीत तर किती प्रकारच्या कला!! सगळी जनता कुठल्या न कुठल्या प्रकारची हस्तकला अवगत असलेली आहे. अति प्राचीन काळात सर्व कलाकृती फक्त देवाला वाहण्यासाठी असत. असे मानण्यात येते कि, तुमची कला हि तुमच्या तर्फे देवाला वाहिलेली आदरांजली आहे, तुम्ही जितके उत्तम कलाकार तितकी तुमची भक्ती श्रेष्ठ. अगदी पूर्वी , सगळ्या कलाकृतींमधून रामायण , महाभारत आणि इतर पुराणातील कथांचं दृश्य असे, असं आमचा गाईड न्योमान म्हणाला. खरं तर मला आजही ते सगळीकडे तसेच वाटत होते. काही ठिकाणी वेगवेगळी दृश्य होती म्हणा, तशी आधी करत नसत. १९२० मध्ये काही पाश्चिमात्य कलाकार आले आणि त्यांनी वेगवेगळी दृश्ये कलाकृतींमधून वापरायला शिकवले.
कोरणे आणि रंगवणे ह्या दोन कला सगळीकडे वापरून सुंदर कलाकृती तयार करतात. सगळ्यात एकच कॉमन धागा, वापरलेली सर्व साधने नैसर्गिकच. रंग नैसर्गिक, मुळात ज्या वस्तूवर रंगवायचे ती किंवा जी वस्तू कोरायची ती पण नैसर्गिक.
दगडावर कोरीव काम, लाकडावर कोरीव काम, बांबू चा उपयोग करून अनेक वस्तू, नारळाच्या कवट्या वापरून अनेक वस्तू, झाडांची पाने वापरून वस्तू, चांदीचे दागिने, कापडावर पेंटिंग, कापडाचे बाटीक सारखे प्रकार, लाकडी वस्तू, कितीतरी प्रकार. त्यातही, उबूड चे पेंटिंग, सानूर चे पेंटिंग, केलीकी चे पेंटिंग, बाटुआन चे पेंटिंग सगळे वेगळे.
अख्खे गाव एक कला जोपासतो. त्या गावांमधून खूप फिरलो. डोळ्याचे पारणे फिटेल अशा वस्तू.
प्रत्येक गावाची आपली अशी वेगळी कला. कोणी पेंटिंग करत होते. तिथल्या प्रत्येक गावातल्या एक दोन घरांमध्ये जाऊन मी सगळी माहिती घेतली. पेंटिंग करणाऱ्या घरांमधून तर काय सुंदर पसारा! एका कोपऱ्यात भाज्या बिज्या वापरून रंग बनवला जातोय, एकीकडे कापडाचे प्रोसेसिंग होते आहे, एकीकडे अर्धवट झालेले, काम चालू असलेले पेंटिंग, ब्रश, रंग, वा वा , मला अगदी हरवून गेल्या सारखे झाले. चित्रांचे विषय म्हणजे रामायण, मुख्यत्वे. बाटिक बनवणाऱ्या गावात पण थोडाफार असाच सिन. सगळी रंगपंचमी नुसती! इतकं छान वाटत होतं . अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे त्या पेंटिंग मध्ये वाकबगार . मला जरा हेवाच वाटला त्यांचा.
एका गावात सिल्क विणत होते. त्याची सगळी कृती, तो धागा बनवण्यापासून ते कापड वीणेपर्यंत आणि मग त्यावर रंगकाम, सगळे तिथे एका घरात चालू होते. अर्थात अशीच क्रिया गावातल्या प्रत्येक घरात घडत होती. त्याचे स्कार्फ विणत होते, तागे पण होते. नेत्रसुख!
एका गावात दगडी कोरीव मूर्ती बनवत होते. दुसरीकडे लाकडी कोरीव काम. अगदी छोट्या आकारापासून अति प्रचंड आकाराच्या मूर्ती. ते जागोजागी दिसणारे शिल्प इथूनच बनून जात होते. चौकाचौकांत, विमानतळावर, एखाद्या महत्वाच्या ठिकाणी, हॉटेल मध्ये, घराच्या भिंती, खांब, कुठेही दिसणारे कोरीव शिल्प, इथे बनत होते. सगळा गाव अगदी कोरीव वाटत होता. किती बघू न किती नको. तिथली एक जण विकत घे न, म्हणू लागली. कर्म माझं! अगं , एवढी जड वस्तू? नेऊ कशी बाई?
एकूणच तिथे काही खरेदी करायची म्हणजे जिवावरचे काम. ते एक भली मोठी रक्कम सांगणार, इतके हंड्रेड थाऊजंड रुपिया अन तितके हंड्रेड थाऊजंड रुपिया. शून्याची खैरात नुसती. सुरवातीला तर मला खूप लक्ष देऊन ऐकावे लागायचे , ही नक्की किती आकडा सांगतेय. मग मनात त्याचे गणित करून त्याला साधारण दोनशे नी भागायचं मग जवळपास ती किंमत कळायची. हे राम! मग त्यावर घासाघीस करायची. किती मेहेनत?
एका गावाची कला म्हणजे सोन्याचांदीचे दागिने. सगळीकडे अत्यन्त सुबक घडवलेल्या वस्तू. तिथेही काही घरांमधून फिरलो. काय बारीक कोरीव घडण सगळी! सोन्या चांदीच्या तारा काढून त्या वळून दागिने, इतर वस्तू आकार घेत होत्या. आपल्या मीनाकारी सारखी काहीतरी रंग भरण्याची कृती पण काही दागिन्यांमध्ये करत होते. शुभ्र पांढरी चांदी , चकचकते पिवळे सोने आणि त्यात ते रंग. सुंदर दिसत होत्या वस्तू.
बांबूच्या वस्तू बनवणाऱ्या गावात तर काय करू न काय नको अशी अवस्था? एका बांबूच्या किती विविध वस्तू! आणि त्या सगळ्यांवर सुंदर रंगकाम. बांबूचे विविध आकाराचे छोटे दिवे, टेबल, खुर्च्या, पडदे, कपाटं , रॅक, विविध आकाराच्या टोपल्या, शोभेच्या वस्तू, सगळीकडे पसरलेल्या होत्या. बांबूचा तास काढून त्यापासून मोठ्या मोठ्या मूर्ती बनवलेल्या होत्या. नारळाची कवटी तासून, त्यावर रंगकाम करून, त्याला अर्धे कापलेले बांबू गोलाकार लटकावून, मध्ये एक बांबूची चकती असलेली दोरी सोडून सुंदर घंटा तयार केलेल्या होत्या. इतका मधुर नाद करत होत्या त्या. अनेक घंटा तर फक्त लहान मोठे बांबू एकत्र बांधून केलेल्या होत्या. त्या बांबूंची बांधणी एका विशिष्ट प्रकारे केलेली होती, जेणे करून त्यात वारा जाऊन हलण्या मुळे नाद उत्पन्न होईल. पहिल्या दिवशी पासून ती वस्तू माझे लक्ष वेधून घेत होती. पण तो भावाचा घोळ. शेवटी न राहवून केलीच ती सर्कस आणि घेतली एक घंटा पदरात पडून. आणि ती नाजूक वस्तू अगदी सांभाळून आणली घरापर्यंत.
त्या आनंदात जरा पुढे आलो. आणि ज्या गावात आलो तिथले दृश्य काय वर्णावे? ते गाव पतंग बनवत होते. चमकलात न? हो पतंगच बनवत होते, पण विविध आकाराचे. मुख्यत्वे गरुडाच्या आकाराचे, पण बोटी, फुलपाखरे, फुले, ड्रॅगन , अळी , साप , कोंबडी, पक्षी, मासे, मगर, असलेही आकार होते. हाताने बनवलेला पातळ कागद किंवा तलमसे कापड , त्यावर मनोहारी रंगकाम! आकाशात उडत पण होत्या काही पतंगी. मला तोवर फक्त चौकोनी पतंगी माहित होत्या, त्यांच्या विविध नावांसकट.
उबूड गावात तिथल्या राजाचे "घर" बघायला गेलो. तिथे आता हॉटेल आहे. अगदी टिपिकल बालीनीज स्टाईलचे घर ! तिथली कलाकुसर डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. छोटी छोटी घरे, मधूनच वाहणारे पाण्याचे पाट , रंगीत मासे, अधून मधून बगीचा, कोरीव साकव , खरंच काय मजा असेल नाही त्या राजाची?
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.