पत्र क्र ७०
खूप प्रकारच्या कला प्रकारांचे उत्तम जतन करणारे लोक राहतात ते बेट , बाली. सत्तरच्या दशकात प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेली बालीची अर्थव्यवस्था आता मात्र पर्यटनावर जास्त कमाई करते. पर्यटकांना आकर्षित...
खूप प्रकारच्या कला प्रकारांचे उत्तम जतन करणारे लोक राहतात ते बेट , बाली. सत्तरच्या दशकात प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेली बालीची अर्थव्यवस्था आता मात्र पर्यटनावर जास्त कमाई करते. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी इथे आहेत, काही निसर्गाने दिल्या आहेत, आणि काही त्यांनी प्रयत्नपूर्वक निर्माण केल्या आहेत. म्हणूनच सत्तरच्या दशकात ८०% शेतीवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था आज ८० टक्के पर्यटनावर निर्भर आहे. २००२ आणि २००५ साली झालेल्या आतंकवादी हल्ल्यांनी बाली हादरले आणि पर्यटन व्यवसाय काहीसा प्रभावित झाला. पण आता त्यातून बाहेर आला आहे.
शेतीतून अजूनही बरेच उत्पन्न मिळते. माउंट बाटुर , किंतामणी भागात होणारी अरेबिका कॉफी जगप्रसिद्ध आहे. कॉफी च्या बिया प्रोसेस करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे त्यामुळे कॉफी ची घनता बदलते आणि चव जरा वेगळी लागते. त्यात लिंबू घालून ती छानच लागते. दुधाचा वापर सणासुदीलाच होतो त्यामुळे कॉफीत मात्र लिंबू हा. माउंट बाटुर भागात एका कॉफीच्या शेतात गेलो होतो. छोटी छोटी , घोसात लागलेली पांढरी फुले, लाल लाल फळे, त्या कॉफी शेताचा नजारा फारच सुंदर होता. तिथेच छोटेसे कॉफी शॉप पण होते. ताज्या बिया भाजून कॉफी बनवून देत होते. तो सुवास आसमंतात होता.
तिथले शेतकरी जी शेतीची पद्धत अवलंबतात तिला "सुबक अबीयान" पद्धत म्हणतात. ही पद्धत अति प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ह्यात शेती आणि पाण्याची मंदिरे ह्यांचा सरळ संबंध असतो. ह्या पाण्याच्या मंदिरातील मुख्य पुजारी हे त्या पाणी वाटप पद्धतीचे प्रमुख अधिकारी असतात. ते "त्री हित करण " तत्वाचा अंगीकार करतात. ह्यात मानव, पृथ्वी आणि देवांचा संबंध असतो, असे मानतात . ह्यात देव म्हणजे निसर्ग. जमिनीतून आलेली पिके, मुख्यत्वे धान म्हणजे देवाचा प्रसाद. मानवाच्या कष्टाने आणि भक्तीने देव म्हणजे निसर्ग आणि धरतीमाता प्रसन्न होऊन चांगले पीक देतात अशी धारणा. गावोगावी असलेले पाण्याचे मंदिर तिथल्या लोकांना निसर्गाच्या ह्या अनमोल देणगीची आठवण करून कृतज्ञ राहायला शिकवतात. ही मंदिरं म्हणजे एक प्रकारचे जंगल असते. त्यातून पाणी पुरवठा करतात, म्हणजे त्यात तलाव असतात, मधोमध. त्यासाठी कालवे , छोटे बांध, बोगदे काढून ते पाणी एका मंदिरातून नेतात. तिथून आल्यावर ते पवित्र झाले असे मानतात. गावातील सगळे शेतकरी ते पाणी वाटून घेतात. थोडक्यात काय तर पाण्याची सहकारी योजनाच ती. तिला जरा धर्माची चांगली जोड दिली, आणि पाण्याचा गैरवापर टाळून सगळ्यांना पाणी उपलब्ध झाले. हि परंपरा खूप प्राचीन काळापासून चालत आली आहे. पाऊस पुरेसा पडतो, पाण्याचे साठे उत्तम आहेत आणि योग्य नियोजनामुळे शेती फायद्यात आहे.
पर्यटन व्यवसाय जरी सगळ्यात जास्त उत्पन्न देत असला तरी शेती मध्ये सगळ्यात जास्ती लोक काम करतात, कदाचित म्हणूनच पर्यटन बाधित झाले तरी लोकांना फारसा त्रास होत नसावा.
अनेक वेळा झालेल्या आतंकवादी हल्ल्यांनी पर्यटनावर वाईट परिणाम झाला. बऱ्याच देशांनी तर त्यांच्या नागरिकांना बालीला जाऊ नये असे आदेश दिले होते.
तसे पर्यटन सुरु झाले १९६३ मध्ये त्यावेळच्या अध्यक्षांनी प्रथम बांधलेल्या हॉटेल पासून.
तिथेच आम्ही उतरलो होतो. हे अद्ययावत हॉटेल जसे चालू लागले तसे अजून काही छान हॉटेल्स बांधली गेली. सुंदरसा सानूर भाग. अगदी समुद्रकिनारी बांधलेले ते हॉटेल आणि त्यानंतर थोड्याच अवधीत सुरु झालेला आंतरराष्ट्रीय विमानतळ, ह्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली. इथला आकर्षक परिसर, सुंदर निसर्ग, उच्च दर्जाची हॉटेल्स, आणि प्रेमळ जनता, ह्या पूर्ण गणिताचे फलित म्हणजे बाली ला मिळालेली अनेक पर्यटनाची बक्षिसे.
बालीत रस्ते छान आहेत. रेल्वे नसल्यामुळे सगळे दळणवळण रस्त्यानेच असल्याने असेल कदाचित, रस्त्याचे जाळे चांगले विणले आहे. जनतेला सार्वजनिक वाहन म्हणजे "कुरा कुरा" बस सर्विस. आपणही जाऊ शकतो त्यातून. मात्र जनता, दुचाकी वाहन चालवणे जास्त पसंत करते. त्या कुरा कुरा बसेस आकर्षक रंगांनी आणि चित्रांनी सजलेल्या असतात. एकट्या प्रवाशांसाठी भाड्याने दुचाकीस्वार पण सेवा देतात. टॅक्सी सेवा पण आहेतच. पर्यटकांची आवडती आणि सर्वच दृष्टीने सोयीची सेवा म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी कडून एक गाडी , ड्रायवर आणि गाईड घेणे, फिरणे सुखकर होते.
उत्साही पर्यटक स्वतःच गाडी किंवा दुचाकी भाड्याने घेऊन, स्वतः चालवत फिरू शकतात. ग्रॅब , ब्लु बर्ड वगैरे टॅक्सी सेवा आहेत. एकूण काय फिरणे फारसे कठीण नाही. फक्त तुम्ही जर स्वतः गाडी चालवणार असाल तर तसे लायसन्स तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे. आमची गाडी आणि ड्राइव्हर हॉटेलचे असल्यामुळे, त्यांनी तसा युनिफॉर्म घातलेला असे आणि गाडीवर तसे नाव पण लिहिलेले होते. तरी जागोजागी पोलीस थांबवून चौकशी करत होते. आतंकवादी हल्ल्यांमुळे ते फारच जागरूक झालेले वाटले.
इथले लोक अतिशय मेहेनती आहेत. सकाळचा वेळ शेतीत काम करतात. वर्षभर शेतीत पिके घेतात. जिथे मसाले, फळे, कॉफी वगैरे मळे आहेत, तिथे बारकाईने लक्ष ठेवतात. कोणीही एकच पीक लावत नाही. एकाच शेतीच्या तुकड्यात, एका भागात भात , भाज्या अशी फिरती पिकं घेतात, एका तुकड्यात फळे, मसाले असा मळा लावतात. सकाळी काहीतरी पटकन बनणारे पदार्थ, म्हणजे भाताची पेज, फळं , वगैरे, खाऊन शेतात जातात. घरातली स्त्री सगळ्यांचा दिवसभराचा स्वयंपाक करून जाते, ज्याला जमेल तसे येऊन खावे. फक्त सणासुदीला मोठी आणि सगळ्यांची बरोबर मेजवानी असते. दुपारच्या जेवणाला शक्यतो मंडळी , शेतातील कामे संपवून घरी येण्याचा प्रयत्न करतात. जेवणानंतर ते ज्या गावात राहतात, त्या गावाची जी कला असेल त्यावर काम करतात. खूप सराव आणि नवनिर्मिती ह्यावर भर असतो. आणि संध्याकाळी सामूहिक नृत्य. इतक्या श्रमामुळेच की काय सगळ्या महिला अगदी बारीक आणि सुंदर होत्या. त्यांच्या कलांबद्दल पुढच्या पत्रात बघू
--
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.