पत्र क्र ६९
जेमतेम ६००० वर्ग किलोमीटर क्षेत्रात वसलेले बेट बाली. जावा बेटाच्या अगदी जवळ, बालीची अरुंद खाडी दोन बेटांना विभाजित करते. डोंगर आणि समुद्र दोन्ही गोष्टी विपुल. २००० मीटरपेक्षा उंच डोंगर इथे आहेत....
जेमतेम ६००० वर्ग किलोमीटर क्षेत्रात वसलेले बेट बाली. जावा बेटाच्या अगदी जवळ, बालीची अरुंद खाडी दोन बेटांना विभाजित करते. डोंगर आणि समुद्र दोन्ही गोष्टी विपुल. २००० मीटरपेक्षा उंच डोंगर इथे आहेत. त्यातलाच जागृत ज्वालामुखी असलेला माउंट अगुंग, सगळ्यात उंच शिखर . ह्या ज्वालामुखीने जसा त्रास दिला आहे तसाच ह्याच्यामूळे फायदाही झालेला आहे. अतिशय सुपीक जमीन आणि ह्या डोंगराच्या उंचीमुळे पडणारा मुबलक पाऊस ह्यामुळे शेती पिकवणे सहज शक्य होते. उत्तम पीक मिळते. डोंगर उतारावर भातशेती, कॉफी, विविध भाज्या, फळे ह्यांचे पीक उत्तम होते.
पहिल्याच दिवशी, हॉटेलनी वेलकम बास्केट मध्ये, ठेवलेल्या फळांमध्ये एक वेगळेच फळ दिसले. बाहेरून अगदी सापाच्या कातडीवर असलेले खवले होते . बाप रे, आपण नको हात लावायला. पण चौकस बुद्धी स्वस्थ बसू देई ना. मग जाऊन शोध काढलाच. सालक किंवा स्नेक स्किन फ्रुट असे नाव. इंडोनेशियात मुबलक प्रमाणात होते. अलीकडे मलेशियात आणि इतर काही ठिकाणी पण लागवड केलेली आहे. साल काढल्यावर, आत पांढरा गर असलेल्या , जरा फणसाच्या गऱ्यासारख्या दिसणाऱ्या बिया. रसाळ. आणि चवीला मस्त. पाम सारखे झाड असते. ताडगोळे किंवा नारळ जसे घडातून लागतात अगदी तसेच झाडावर लागते. मी आमच्या गाईडला त्याचे झाड दाखवायला लावले. डोंगर उतारावर एके ठिकाणी सुंदर मळा होता. बाहेर बोर्ड होता,"spices garden ". मी आत जायची मागणी केली गाईड कडे. तिथे पर्यटकांचे अर्थातच स्वागत होते. आत सगळीकडे खूप दाट झाडी होती. डोंगर उतारावर तांदूळ, भाज्यांचे मळे होते. खूपशी फळझाडे होती. सालक ची पण मोठी लागवड होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मसाल्याच्या पदार्थांची अनेक झाडे होती. इथे उतरल्यापासून मी सगळीकडे मसाल्या च्या झाडांची चौकशी करत होते, पण सांगेह च्या जायफळाच्या झाडा व्यतिरिक्त कुठेही मसाले सापडेनात. विक्रीलाही नाही. आम्ही spices garden मध्ये फिरायला सुरवात केली आणि मालक धावत आला. "तुम्ही भारतीय आहेत का?" म्हटलं ,"हो" तो फारच खुश झाला. तो साईबाबांचा भक्त होता. त्यांच्या दर्शनार्थ हैद्राबाद , पुट्टपर्थी वगैरे अनेकदा येऊन गेला होता. मला बघून खूपच आनंदला. मला म्हणे" तुम्हाला हवी ती, हवी तितकी फळं स्वतः तोडून घेऊन जा. आमच्या कडचे सालक तुम्हाला आवडतील. मसाले पण घ्या." मला पण खूप बरे वाटले. अर्थातच मी काही फळे तोडली नाहीत. बालीत पोचल्या पासून जेवणातील बेचव पदार्थ फार त्रास देत होते. मी ह्या मळेवाल्याला विचारले, " लहान पणी पासून आम्ही शिकत आलो आहोत कि इंडोनेशिया म्हणजे मसाल्याची बेटं . पण इथे स्वयंपाकात कुठेही मसाला घातलेला दिसला नाही. मसाल्याचे पदार्थ, स्वस्त मिळत पण नाहीत. असं का?" त्यांनी सांगितले, " अहो इथली जमीन आणि एकूण वातावरण सर्वच पिकांना साजेसे आहे. डोंगर उतार, थंड हवा, पुरेसा पाऊस, छानसे ऊन हे पिकांच्या वाढीला मदत करतात. तसेच मसाल्याच्या पदार्थांचे आहे. इथे त्यांची लागवड खूप आहे. पण इथल्या शाकाहारी पदार्थांमध्ये त्यांचा वापर कमी होतो , मांसाहार मुख्य आहार आहे, त्यात असतो थोडा वापर. आम्ही मसाले सगळे निर्यात करतो. परदेशी बाजारात ह्या वस्तूंना आम्हाला भाव चांगला मिळतो. "
त्यांच्या बागेत अनेक झाडे बघायला मिळाली, लवंग, दालचिनी, मिरी, वेलदोडे, सालक म्हणजे स्नेक स्किन फ्रूटची खूप मजा घेता आली तिथे. झाडावरची ताजी फळे खाण्यात काही औरच आनंद असतो. बालीची आठवण म्हणून मला त्याने काही मसाले भेट दिले, मी काही विकत घेतले. त्यात काबुली चण्यासारखा दिसणारा, पण चवीला अतिशय उग्र असा वेलदोडा होता. लवंग दालचिनी मात्र खूप चविष्ट होते. मी हि माझ्याकडच्या काही वस्तू त्याला भेट दिल्या. त्यात आपला वेलदोडा पण दिला. बरोबर नेलेली लाडू चिवड्याची पाकिटं मी दिली. तो म्हणाला," भारतात तुम्ही किती व्हरायटी जेवता. सगळे पदार्थ चविष्ट असतात. " मग मीही जरा मसाल्यांचे पदार्थ आम्ही कसे वापरतो, वगैरे लेक्चर दिले.
खरंच, तिथे गेल्यापासून जेवणाचे जे काही हाल झाले न . शाकाहारी पदार्थ अगदी तुरळक. आणि त्यात मसाले कुठेच नव्हते. माझ्यासाठी म्हणून ते प्रयत्नपूर्वक शाकाहारी पदार्थ करत होते पण तेल कुठले होते कळेना, भयंकर वास यायचा. ते फार भारी हॉटेल होते म्हणून असे आहे कि काय? अशी शंका आली, पण बाहेर ही तीच गत , हॉटेल मध्ये शिरल्यावरच तो वास यायचा. ती लोक दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ फक्त सणासुदीला खातात, कारण गाय फार पवित्र मानतात. जेवणात भात आणि मांसाहारी पदार्थ. नैवेद्याला मांस चालते. रोज एक, दुध आणि तांदूळ पिठाचा गोडसर पदार्थ नैवेद्यात असतोच. मांसाहारी पदार्थात थोडेफार मसाले वापरत होते. त्यांची चवही छान होती , असं खाणारे सांगत होते. एका जेवणाच्या वेळी, मला तिथला मुख्य शेफ म्हणाला, आज खास तुमच्यासाठी खूप स्पेशल पदार्थ केले आहेत. नारळ आणि तांदुळाचे पीठ वापरून केलेले अनेक सुंदर पदार्थ होते, उकडलेले , तळलेले, बिस्किटासारखे भाजलेले. छान होते. भाज्या आणि फळे मात्र खूप मदतीला आले.
डोंगरावरच्या अनेक सुंदर ठिकाणांप्रमाणे समुद्रकिनाराही खूप सुंदर आहे. पर्यटक इथे त्यासाठीच जास्त करून येतात. बेटाच्या दक्षिण दिशेला असलेले किनारे सुंदर पांढऱ्या वाळूचे आहेत तर उत्तर दिशेला काळपट वाळू आहे. उत्तर दिशेचे समुद्रकिनारे पर्यटनासाठी विकसित करण्याचे बरेच प्रयत्न झाले, पण तानाह लॉट ही एकच जागा अधिक लोकप्रिय झाली.
अनेक ठिकाणी सुंदर कोरल रिफ आहेत. स्वतःची वेगळीच इकोसिस्टिम तिथे असते. अनेक प्रकारचे पक्षी , प्राणी, जलचर आहेत. मात्र खेदाची बाब म्हणजे बालीनीज वाघ नामशेष झाला आहे.
ऑक्टोबर ते एप्रिल हे पावसाचे महिने. सर्वच भागात चांगला पाऊस पडतो. इतर वेळी हवामान मध्यम असते. खूप उंचावरच्या ठिकाणी हवा थंड असते. पाऊस अधून मधून पडत असतो. सुसह्य हवामानामुळेच पर्यटकांना जास्त आवडणारा प्रदेश आहे हा.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.