पत्र क्र ६८

बाली ची संस्कृती अति प्राचीन काळापासून आहे. अनेक ठिकाणी उत्खननात कोरीव मंदिरे सापडली आहेत. संस्कृती जतन कोणी ह्यांच्या कडूनच शिकावे. पाश्चात्य संस्कृतीचे कितीही हल्ले झाले तरी त्यांची प्राचीन...

कीर्ती वडाळकर
||4 min read

बाली ची संस्कृती अति प्राचीन काळापासून आहे. अनेक ठिकाणी उत्खननात कोरीव मंदिरे सापडली आहेत. संस्कृती जतन कोणी ह्यांच्या कडूनच शिकावे. पाश्चात्य संस्कृतीचे कितीही हल्ले झाले तरी त्यांची प्राचीन संस्कृती त्यांना प्राणप्रिय आहे. खरं तर हजारोंच्या संख्येने येणारे पर्यटक ह्यांच्या मनात चलबिचल करून जातच असतील न?

उत्खननात अनेक गोष्टी सापडल्या आहेत. अति प्राचीन काळात तिथे शैव पंथाचे लोक होते. नंतर बुद्ध लोक पण आले. अनेक हिंदू राजे इथे होते. प्राचीन काळात बाली द्वीप असे ह्या बेटाचे नाव होते. राजांनी परदेशच्या हिंदू मुलींची लग्न केल्या मुळे इथे हिंदू संस्कृती आणि धर्म जास्त रुजला, असं मानण्यात येत. भारत आणि हिंदू धर्म ह्यांचा तेव्हाच्या जनतेवर खूप प्रभाव होता असे, उत्खननात सापडलेल्या अनेक गोष्टींवरून सिद्ध होतं .

छोट्या छोट्या हिंदू राजांच्या राज्यांमधून त्यांची कला आणि संस्कृती फुलत होती. इसवी सन १९०० च्या आसपास डच आले. अर्थात त्याआधी ही काही खलाशी प्रवासी आले होते. त्यांच्या, "सुंदा आयलँड " च्या वर्णनानुसार, त्यांनी नक्कीच बालीला भेट दिली असे मानण्यात येते. न्योमान ने खूप अभिमानाने सांगितले ," काही पोर्तुगीज लोक आमच्या बुकीट पेनिन्सुला भागात आले आणि राहू लागले. आम्ही त्याच्या आग्रहाखातर त्यांचा धर्म न स्वीकारता, त्यांना आमच्या देवाचे सेवक म्हणून ठेऊन घेतले." मात्र व्यापार करण्याच्या हेतूने डच दाखल झाले. डच इस्ट इंडिया कम्पनी स्थापन झाली. सुरुवात व्यापार म्हणून झाली , मग हळूहळू राजे लोकांशी संघर्ष होऊ लागला. राजांनी सत्ता डचांना देण्यासाठी दबाव येऊ लागला. राजाचे अनेक निष्ठावंत एक होऊन लढू लागले, बलाढ्य डच सेनेपुढे त्यांचा निभाव लागेना, तेव्हा शरणागती पत्करण्यापेक्षा त्यांनी सार्वजनिक आत्महत्या केल्या, त्याला तिथे पुपुटान म्हणतात. १९०६ आणि १९०८ अशा दोन वर्षी दोन मोठे पुपुटान झाले. मग डचांनी खूप मोठे आक्रमण केले. ते राजे संपले आणि डच राजवट सुरु झाली.देनपसार मध्ये एक भव्य पुपुटांन स्मारक आहे. दुसऱ्या महायुद्धात जपान च्या शरणागती नंतर बाली मध्ये, ई गुस्ति नगूराह राय ह्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सेना स्थापन झाली. मोठा उठाव झाला. २९ डिसेम्बर १९४९ ला हे बेट स्वतंत्र झाले आणि रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया चा एक भाग बनले.

स्वातंत्र्य मिळाले म्हणून सगळं सोपं आणि सुखकर झाले असे नाही. बालीतील ज्वालामुखी, माऊंट अगुंग वर असलेला किंतामणी , कितीदा तरी जागृत होतो. १९६३ साली झालेल्या भयानक उद्रेकाने,जीवीत आणि वित्त हानी खूप झाली. हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. खूप लोक विस्थापित झाले. अधून मधून त्या किंतामणी ची धुसफूस चालूच असते. नंतरच्या काळातही बॉम्बस्फोटांनी बाली हादरले. अनेक पर्यटक त्या स्फोटात मृत्युमुखी पडले. ह्या सगळ्याचा परिणाम, अर्थातच बालीतल्या पर्यटनावर झाला. आणि अर्थव्यवस्था कोलमडून पडू लागली.

मी तो किंतामणी बघायला गेले होते . रस्ता फारच सुंदर होता. आजूबाजूला खूप दाट जंगल, उंच डोंगराचा घाट चढत गाडी वळणे घेत जाते. दरीतले दृश्य खूप विहंगम. पायऱ्या पायऱ्यांची भात शेती, नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने स्वच्छ धुतली गेली होती त्यामुळे कोवळ्या उन्हात छान चमकत होती. किंतामणी चा परिसर आता पर्यटन स्थळ केलेले आहे. अनेक किलोमीटर दूर तो ज्वालामुखी आहे. डोंगरावर आपण असतो. एक सरळ रस्ता, त्याच्या एका बाजूला सगळी दुकानं, हॉटेल्स, दुसऱ्या बाजूला खोल दरी. ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेली. दगडांचे अनेक रंग तिथे बघायला मिळाले. दरीत एक सुंदरसा तलाव आहे. त्यात गरम पाण्याचे झरे आहेत. तो ही ज्वालामुखी मुळे तयार झालेला आहे.

एखाद्या लोकप्रिय पर्यटन स्थळाला भेट देतो तेव्हा येणारा अनुभव इथे पण येतोच. तुम्ही गाडीतून जेमतेम बाहेर पडत असता, सगळे विक्रेते गराडा घालतात. तुमचा एकूण पेहेराव वगैरे बघून वस्तूंचा भाव सांगतात. मग तुम्ही भाव करा, घासाघीस करा आणि एकदाची ती वस्तू तुमच्या गळ्यात पाडून घ्या. खूप कठीण काम. माझा हाच अनुभव. मी पण जेमतेम बाहेर आले होते गाडीतून, इतक्या विक्रेत्यांनी मला गराडा घातला. खूप मोठा गोंगाट सुरु झाला, इतक्या प्रकारच्या वस्तू ते लोक विकत होते, कोणी टी शर्ट, कोणी लाकडी पेन्सिली, कोणी रुमाल, कोणी लाकडी वस्तू, तर कोणी बांबूच्या वस्तू. टिपेच्या सुरात सगळे एकदम गळ घालत होते. जमावाची भीती मला पहिल्यांदा वाटली. सगळं ब्रम्हांड आठवलं. यातून मी सही सलामत बाहेर पडेन कि नाही अशी भीती वाटायला लागली. आणि नेमकी मी तिथे गाईड आणि ड्राईव्हर बरोबर एकटी गेले होते. किंतामणी बघण्याची उत्सुकता मलाच जास्त होती. बापरे! आता काय होणार पुढे. छे ! असं घाबरून कसं चालेल? आपला दादरचा प्लॅटफॉर्म आठवा. चला जोरात मुसंडी मारू. कुठून बळ आलं कळेना, पण मी २५ ,३० विक्रेत्यांच्या गराड्यातून, त्यांना अक्षरश: ढकलून, जीव मुठीत धरून बाहेर आले. तोवर गाईड पण आला मदतीला, तो ड्रायव्हरला गाडी पार्क करायला मदत करत होता. २, ३मिनिटेच झाली असतील, पण तो काळ खूप मोठा जाणवला. जमावाच्या गराड्याचा अनुभव आला. चांगल्या थंड हवेत मला घाम फुटला. पर्स वगैरे ठिकाणी आहे न ह्याची खात्री केली आधी. गाईड खूप गयावया करत माफी मागत होता. त्यालाही जरा ओरडले, "तुला जर इथे असे होते हे माहित होते तर मला आधी का उतरवलेस ? " वगैरे. मान्य आहे ते गरीब लोक आहेत, पण पर्यटकांवर असा हल्ला? जरा दम खाऊन न्योमान नी दाखवलेल्या हॉटेलमध्ये गेले. तिथून किंतामणी नीट बघितला. अजूनही धडधड होत होते, न जाणो काही झाले असते तर?

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments