पत्र क्र ६७
असेच भटकताना, न्योमान म्हणाला, "चला आज तीर्ता इम्पूल ला जाऊ, म्हणजे होली स्प्रिंग्स." भाषेत पण किती साम्य, आपण तीर्थ म्हटलं असतं ते तीर्ता म्हणतात. इथे इंद्र, शिव, देवी वगैरे मंदिरे आहेत. मी...
असेच भटकताना, न्योमान म्हणाला, "चला आज तीर्ता इम्पूल ला जाऊ, म्हणजे होली स्प्रिंग्स." भाषेत पण किती साम्य, आपण तीर्थ म्हटलं असतं ते तीर्ता म्हणतात. इथे इंद्र, शिव, देवी वगैरे मंदिरे आहेत.
मी म्हंटलं, "अरे आत जर जाऊ देत नाहीत तर नुसते बाहेरून बघण्यात काय मजा? ते पण इतक्या लांब जाऊन?" पण न्योमान म्हणाला, "नाही इथे आज आत जाऊ देतील कारण आज तिथे मोठा फेस्टिवल आहे."
"बरं, तर चला मग " दोन अडीच तासाचा बाली दर्शन करत जाणारा रस्ता. दुतर्फा अनेक छोटी छोटी खेडी, सुंदरशी घरे आणि खूप झाडे पार करत आम्ही तीर्ता इम्पूल ला पोचलो. डोंगराच्या मधोमध मोठा विस्तीर्ण परिसर. बरीच हलचल दिसत होती. रंगी बेरंगी सरोंग , शर्ट आणि कमरेला स्कार्फ असा पोशाख आणि सुंदर दागिने घातलेल्या स्त्रिया , तसेच सरोंग , शर्ट घालून कानावर चाफ्याचे फुल अडकवून पुरुष मंडळी आलेली होती. वातावरणात भक्ती वास करत होती.
या देवळातली पद्धत जरा वेगळी होती. तोकड्या कपड्यात फिरणाऱ्या परदेशी लोकांना ते प्रवेशद्वारावरच अंगभर कपडे घालून देत होते. त्यासाठी तिथे एक दगडी, कोरीव खांबांची, उतरत्या छपराची खोली होती. रांगेने सगळे तिच्या आत जात. माझा नंबर आला. मला म्हणाले, "तुमचा ड्रेसतर होली आहे, पण ड्रेस मध्ये कुठेही लाल किंवा निळ्या रंगाचे काही नाही. त्यामुळे हा निळा स्कार्फ तुम्ही कंबरेवर बांधा."मंदिरात जाताना निळे किंवा लाल काहीतरी हवेच ते पवित्र रंग आहेत. मी तो निळा स्कार्फ कमरेवर बांधला. बाकी लोकांना सरोंग वगैरे सगळा जामानिमा करून देत होते.
त्यांना म्हटलं, "हे सगळे कपडे तुम्ही लोकांना इथे का पुरवत आहात ?" तर म्हणाले, "आपल्या जागेचे पावित्र्य आपणच नको का राखायला? मग त्यांच्याजवळ नसतील कपडे तर आपण द्यावेत." मलाही पटलं त्यामुळे आतली जागा तरी बघता येईल आलेल्या लोकांना.
मंदिराचा परिसर विस्तीर्ण होता. छोट्या छोट्या बांबूच्या, शाकारलेल्या, उतरत्या छपराच्या, आणि कोरीव दगडी खांबांच्या सुशोभित झोपड्या होत्या. पारंपारिक वेषातले स्त्री पुरुष मुलं-मुली हातात सुंदर विणलेल्या बांबूच्या टोपल्या घेऊन इकडे तिकडे जात होते. त्या टोपलीमध्ये फुलं, फळ, खाद्यपदार्थ ठेवलेले होते. प्रवेश करताच दोन छोटी तळी होती. त्यात सुंदरसे केशरी मासे विहरत होते. पुढे एक तलाव होता. या पाण्यात बरेच जण डुंबत होते. कोणी हात पाय धूत होते, कोणी डोक्यावर पाणी घेत होते. एका बाजूनी, मोठ्या दगडी भिंती पलीकडून, मोठे मोठे सुंदर कोरीव पाईप आणले होते. कुठे माशाचे तोंड, कुठे गरुडाच तोंड कोरलेलं होतं. त्यातून हे पाणी पडत होतं. आणि त्या पाण्यात सगळेजण हात पाय धुणे, डुबकी लावणे, डोळे धुणे, करत होते. पाणी अतिशय स्वच्छ होतं.
तिथून आम्ही आत गेलो. पुढे मुख्य मंदिर इंद्राचे होतं. आजूबाजूला एक विस्तीर्ण स्वच्छ असा जलाशय होता. त्याच्या मधोमध खूप बुडबुडे येत होते. हेच ते होली स्प्रिंग. इथे जमिनीतून वर पाणी येणारा जिवंत झरा आहे. त्यातून सतत पाणी येत असतं. हेच पाणी पुढे बाहेर नेऊन लोकांसाठी तळ्यात सोडल आहे. असं म्हणतात या पाण्यामध्ये खूप औषधी गुण आहेत, आणि त्यामुळे बरेचसे रोग बरे होतात आणि म्हणून लोक त्या पाण्यामध्ये डुंबत होते.
या स्प्रिंग ची कथा अतिशय मनोरंजक आहे. अनंत वर्षांपूर्वी बालीमध्ये एक राक्षस प्रचंड धुमाकूळ घालत होता. लोक फार त्रासलेले होते. मग त्यांनी इंद्राची आराधना केली, तपश्चर्या केली. इंद्र प्रसन्न झाले आणि त्याने
लोकांच्या मागणीप्रमाणे त्या राक्षसाचा वध केला. जनता तर त्या राक्षसाच्या त्रासातून मुक्त झाली पण ह्या सगळ्यांमध्ये इंद्राला एक प्रश्न भेडसावू लागला. राक्षसा बरोबरच्या धुमश्चक्री मध्ये त्या राक्षसाचा वध करताना त्याचे रक्त इंद्राच्या हाताला लागले होते. आता हे शापीत रक्त धुण्यासाठी पाणी हवे होते. पण राक्षसाचे ते दूषित आणि शापित रक्त कुठल्याही पाण्याने धुऊन चालणार नव्हते कारण ते सगळे पाणी दूषित किंवा शापित झाले असते. मग इंद्रानी जमिनीत बाण मारला आणि तिथे पाण्याचा झरा फुटला. त्या पाण्यात इंद्राने हात धुतले आणि राक्षसाच्या रक्ताचे दोष त्याच्यातून नाहीसे झाले. तोच हा झरा ,आजही वाहत आहे. होली स्प्रिंग मधून येणाऱ्या पाण्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत म्हणूनच इंद्राचे हात स्वच्छ झाले आणि काही रोग जडला नाही. तसेच आपले दोष धुण्यासाठी किंवा ते कधीच न येण्यासाठी लोक त्यात डुंबत होते, हात-पाय धूत होते.
देवळात समारंभाची तयारी चालू होती. सर्वत्र तोरण, फुलं सजवलेली होती. रंगीबेरंगी सरोंग घालून हातात बांबूच्या विविध आकाराच्या टोपल्यातुन आणलेला फुलं, नैवेद्य पुढ्यात घेऊन, स्त्री-पुरुष हात जोडून बसले होते. माईक वरून मंत्रपठण चालू होते. सर्व सुशोभित झोपडीवजा मंदिरं डोळ्यात भरत होती. येणाऱ्यांना मात्र त्या मंदिराच्या आत, गाभाऱ्यात प्रवेश नाही. तसंही आत कुठे मूर्ती दिसत नव्हती. न्योमान म्हणाला, "आमच्या मूर्ती आम्ही सगळ्यांना दाखवत नाही, आणि आज या सोहळ्यासाठी जेव्हा आम्ही पर्यटकांना आत प्रवेश दिला , तेव्हा त्या मूर्ती आम्ही गर्भगृहात हलवल्या" हात्तिच्या !
होली स्प्रिंगच्या आवारामध्ये खूप दुकानं होती. इतर ठिकाणं सारख्याच त्या विक्रेत्या स्त्रिया इथेही गळ घालत होत्या. बाजूच्याच एका टेकडीवर सुकर्णो हाऊस आहे. तिथल्या जुन्या राष्ट्राध्यक्षांचे एक निवासस्थान. कदाचित सुट्टी च्या काळात ते वापरत असावेत. होली स्प्रिंग बघून निघालो. जिथून बाहेर पडत होतो, तिथे त्यांनी दिलेले सर्व कपडे त्यांना परत करून परदेशी मंडळी खुशीत बाहेर पडत होती. मंदिराचा सगळा परिसर खूप सुंदर होता. गवताने शाकारलेली छपरे, सुंदर कोरीव दगडी खांब, त्याच्यावर सुंदर कमानी, उत्तम कोरीव काम सगळीकडेच दिसत होते . मोठा ड्रॅगन, अनेक प्राणी, गरुड, असं सगळं तिथे खूप सुंदर कोरलेलं होतं . दाट झाडांमधून डोकावणाऱ्या झोपडीवजा मंदिरांचं सौंदर्य नजरेत भरत होतं. सगळं वातावरण भक्तिमय होतं . इथले देव जरा जास्तच श्रीमंत आहेत कि काय असं वाटून गेलं
--
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.