पत्र क्र ६६

हिंदू धर्म, प्रथा परंपरा कसोशीने पाळणारा , इंडोनेशियातील पर्यटक प्रिय भाग , बाली. पर्यटक म्हणून जाताना कदाचित ह्या प्रथा लक्षात येणार नाहीत. कारण लोक जास्त करून तिथल्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घ्यायला...

कीर्ती वडाळकर
||4 min read

हिंदू धर्म, प्रथा परंपरा कसोशीने पाळणारा , इंडोनेशियातील पर्यटक प्रिय भाग , बाली. पर्यटक म्हणून जाताना कदाचित ह्या प्रथा लक्षात येणार नाहीत. कारण लोक जास्त करून तिथल्या समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घ्यायला जातात. पण ह्या बेटावर अजूनही अनेक वैशिष्ट्ये आहेत, जी कदाचित दुर्लक्षित राहतात.

हिंदू मंदिरांमधून भेट देणे हा एक असाच अनुभव.

सांगेह गावाजवळ एक सतराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले शिव मंदिर आहे. इतक्या वर्षात अर्थातच जीर्ण झाले आहे, ते त्या मंदिराचा जीर्णोद्धार सतत करत असतात. पण मूळ सांगाड्याला आणि कलेला धक्का लावत नाहीत त्यामुळे मंदिर अजूनही तो जुना वारसा जपताना दिसते. मंदिराच्या आजूबाजूला साधारण १५ एकराच्या परिसरात

जायफळाची उंच उंच झाडे आहेत. त्यात मकाक जातीची बालीनीज माकडे अनेक आहेत. त्या भागाला मंकी फॉरेस्ट च म्हणतात. जागा अतिशय छान आहे. खूपशी दुकाने आहेत. तिथे तिकीट काढल्यावर तिथली एक मुलगी बरोबर आली, तुमचे रक्षण करायला म्हणे. ही बारीकशी मुलगी आपले कसे काय रक्षण करणार बुवा? ह्या विचारात असताना समोरच माकडे दिसली. काही लोकांच्या अंगाखांद्यावर खेळत असलेली. कोणी त्यांना चणे दाणे देत होते. कुठे तरी फोटोसेशन चालू होते त्या माकडांबरोबर. अरे देवा . बरोबर आलेल्या मुलीजवळ काठी होती म्हणून घाबरून ती माकडे येणार नाहीत असे सांगितले.

समोरच सुंदर असे मंदिर होते. त्यात मधोमध गरुडाची मोठी दगडी मूर्ती होती. पण प्रवेशद्वारापाशीच आम्हाला थांबायला सांगण्यात आले. पुरातन शिव मंदिर बघायला मिळणार म्हणून आम्ही जोशात होतो , अचानक हे काय? तर म्हणे ,"तुम्ही डिसेन्ट कपडे घातलेले नाहीत" , आम्ही चक्रावलोच. "डिसेन्ट कपडे कसे असतात ग?" तर म्हणे ,"सरोंग , त्यावर लांब हाताचा शर्ट, कमरेला बांधलेला स्कार्फ, असा, तुम्ही घातलेले कपडे भारतीय आहेत. आमच्याकडे आमचे पारंपरिक कपडे घालूनच आमच्या मंदिरात प्रवेश असतो." जरा खट्टूच झालो आम्ही, पण त्यांचे धार्मिक नियम ते अतिशय कसोशीने पाळतात. आपण कशाला ते मोडा? तेवढ्यात काही मुली, अर्थातच रंगीत सरोंग घातलेल्या, आत निघाल्या. देवाला वाहायला , हातात स्वतः विणलेली बांबूची टोपली, त्यात फुलं , उदबत्त्या, फळं , नैवेद्य, वगैरे. कुठल्याही पूजेत जरा उग्र वासाची उदबत्ती असणं जरुरीचं असतं .

मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेली घंटा अतिशय सुंदर होती. तीन पोकळ, जाड बांबू उंच टांगलेले होते, एक बांबू खाली ठेवला होता, तो घेऊन त्या बांबूंवरून आडवा फिरवायचा कि अति मंजुळ नाद घुमे. खूप शांत आणि सोज्वळ ध्वनी. तिथेच एका उंच झाडावर खूपशी वटवाघळं लटकत होती. माकडे आणि वटवाघूळ अतिशय पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. बरोबरच्या त्या गाईड मुलीने फार भक्तिभावाने ती वटवाघळं दाखवली.

खूपसे शांत असे ते ठिकाण होते पण माकडांच्या चिरकण्याने अधून मधून शांततेचा भंग होई . कोणी चणे दाणे दिले कि भरपूर मोठा जत्था तिकडे चिरकत धावे. जरा धिटुकली अशी ती माकडे, केव्हाही तुमच्या पुढ्यात उडी मारून येतात आणि तुम्हाला कळायच्या आत तुमच्या अंगाखांद्यावर चढून बसतात. तिथे खूपसे पर्यटक भेट देत असल्यामुळे अनेक दुकाने पण आहेत. दुकानांमधून त्यांचे कलाकुसरीचे मांडलेले नमुने बघण्यासारखे असतात. तिथे बनणाऱ्या वस्तू विक्रीसाठी दिसत होत्या. आणि चणे दाणे मात्र सगळीकडेच विकत होते. न जाणो तुमचे प्राणी प्रेम आलेच उफाळून तर? लगेच समोर चणे दाणे उपलब्ध नकोत का?

आपल्या आणि त्यांच्या संस्कृतीत खूपसे साम्य मला जाणवले. आपण जसे मानतो कि पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तोलून धरलेली आहे तशीच समजूत त्यांच्या कडे पण आहे. असेच एक मंदिर बघायला गेलो, अशी समजूत आहे कि ते मंदिर अत्यन्त विषारी अशा नागाच्या फण्यावर आहे, आत साप आहेत

. समुद्रकिनारी, डोंगराच्या कडेकपारीत बांधलेलं आहे ते. तानाह लॉट असे त्या जागेचे नाव. अतिशय सुंदर जागा. तिथल्या भाषेत तानाह लॉट म्हणजे जमीन आणि समुद्र. "दांग ह्यांग निरर्थ " नावाच्या एका शिवभक्त हिंदू प्रवाशाने हे मंदिर सोळाव्या शतकात बांधले. प्रवास करता करता तो प्रवासी ह्या ठिकाणी पोचला. हि जागा त्याला खूप आवडली म्हणून रात्री तिथेच राहिला. सकाळी काही कोळ्यांनी त्याला बघितले आणि ते त्याच्या तेजाने भारावून गेले. मग त्यांनी खूपशा भेट वस्तू दिल्या. तेव्हा त्या प्रवाशाने सांगितले कि हि जागा पवित्र आहे, इथे मंदिर बांधा. कालांतराने तिथे त्या प्रवाशाचे मंदिर पण बांधले गेले. समुद्र देव, इंद्र आणि शिव अशी मंदिरं तिथे आहेत. अशाच प्रकारची सात मंदिरं त्या समुद्र किनाऱ्यालगत बांधलेली आहेत.

समुद्राच्या माऱ्याने आणि वाऱ्याने डोंगराची झीज होऊन सुंदरसे आकार तयार झाले आहेत. त्यामधून सूर्यास्ताचे दृश्य अत्यन्त मनोहारी दिसते. इंद्राचे मंदिर म्हणून जरा उत्सुकता होती. एका खडकावर असलेले ते मंदिर अर्थातच फक्त सरोंग घातलेल्यांनाच प्रवेश. तसेच बाजूच्या खडकावर असलेले नाग मंदिर. दहा, पंधरा डॉलर लाच देऊन आत जाऊ देतात असे आमचा न्योमान म्हणाला. पण देवाच्या दारी कशाला भ्रष्टाचार बाबा? आजूबाजूचे सुंदर दृश्य पण मनाला छान शांती देत होते, तो समुद्राआड बुडणारा सोन्याचा गोळा, उसळणाऱ्या लाटा , हळूहळू पसरणारा अंधार, मनःशांती द्यायला पुरेसा होता. अर्थात इतर ठिकाणी होती तशी अनेक दुकानं इथे सुद्धा होतीच. मक्याची उकडलेली कणसे पण मिळत होती. बरीचशी छोटी मोठी हॉटेल्स सूर्यास्ताचे दृश्य बघायला बोलवत होती, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता घेता सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments