पत्र क्र ६५
जगभरच्या पर्यटकांचे अजून एक आवडते ठिकाण म्हणजे बाली, इंडोनेशियन बेट समूहातील एक बेट . "आम्ही हिंदू आहोत" असे अत्यन्त अभिमानाने सांगणारे निसर्गसुंदर बेट , बाली. विमानतळ आणि मुख्य शहरापासून बऱ्यापैकी...
जगभरच्या पर्यटकांचे अजून एक आवडते ठिकाण म्हणजे बाली, इंडोनेशियन बेट समूहातील एक बेट . "आम्ही हिंदू आहोत" असे अत्यन्त अभिमानाने सांगणारे निसर्गसुंदर बेट , बाली.
विमानतळ आणि मुख्य शहरापासून बऱ्यापैकी लांब अशा सप्ततारांकित हॉटेल मध्ये आम्ही उतरलो होतो, आमचा सेमिनारही तिथेच होता. अतिशय सुंदर हॉटेल होते ते. शहरापासून लांब आहोत म्हणून आमची खूप खातीर ते करत होते. आम्हाला रिकामा वेळ बराच होता, अधे मध्ये. त्यामुळे आधीच आम्ही एक गाडी, तिचा अतिशय उत्साही असा ड्राइवर, आणि ज्याचे बोलणे जराशाच कष्टाने समजू शकेल असा एक गाईड पाहून ठेवला होता. पहिल्याच दिवशी त्याचे नाव विचारले आणि बऱ्याच प्रयत्नांनी कळले , न्योमान . मी न्योमान असे जरा पाठांतर करेपर्यंत तो म्हणाला, ड्रायव्हरचे नाव पण न्योमान आहे. म्हणाला," आम्ही दोघे कुटुंबातले तिसरे मूल न, म्हणून न्योमान." "अरेच्चा, त्याचा काय संबंध?" तर, कुटुंबातील पहिले मूल म्हणजे पुटु, दुसरे मार्था किंवा माड दा , तिसरे न्योमान , चौथे काटेट , पाचवे परत पुटु! पण पाचवे मूल झाले कि मोठा समारंभ करायचा आणि विधिवत त्याचे नाव पुटु ठेवायचे. एवढ्यावर नाही संपले नाव. ह्या सोबत एक हिंदू नाव. म्हणजे पुटु देव , मार्था किंवा माड दा गुरु, न्योमान सत्यवान, काटेट देवी. त्यात तो मुलगा असेल तर ई पुटु देव , मुलगी असेल तर नी पुटु देव किंवा नी पुटु देवी. आता ह्यात अजून वाढ होते हा, म्हणजे मित्र मैत्रिणी किंवा घरचे काहीतरी प्रेमाचे टोपण नाव देतात. नी पुटु देवी स्वरदिका, झाले बाबा पूर्ण नाव ! मग उल्लेख करताना,"तुम्ही नी पुटु देवी स्वरदिका बद्दल बोलताय कि नी पुटु देवी विद्यरता बद्दल बोलताय?" असे फरक करतात. मजाच आहे. मला आपल्याकडचे नामकरण आठवले. त्या बाळाचे नाव काय ठेवावे ह्यावर किती चर्चा आणि प्रसंगी अगदी संगीत मानापमान सुद्धा!
एकूणच अनेक प्रथा परंपरा ते कसोशीने पाळताना दिसले. त्यात त्यांना खूप अभिमान आणि आनंद आहे असे पण जाणवले.
पहिल्याच दिवशी बाहेर फिरायला जाताना अनेक ठिकाणी, सुंदर, कोरीव, दगडी कंपाऊंड च्या आत तशीच दगडी सुंदर कोरीव छोटी छोटी घरे दिसली. काही बंद तर काही बऱ्यापैकी उघडी. मी गाईड ला विचारले. ती तिथली घरे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती. बऱ्यापैकी मोठ्या जमिनीच्या तुकड्यावर बांधलेली. जुन्या बालीनीज आर्किटेक्चर मध्ये , अनेक छोट्या छोट्या , कोरीव घरांचा, उतरत्या शाकारलेल्या छपरांचा समूह बांधतात. एक छोटे घर म्हणजे एक खोली एवढे, अशा अनेक घरांचा समूह. एक बैठकीची खोली, एक स्वयंपाकघर, हि दोन्ही साधारण उघडी सर्व बाजूंनी. बाकी जी बंद होती ती शयनगृहे. आणि ह्या सगळ्यांना एकमेकात जोडायला, कोणी दगडी रस्ता करतं , कोणी त्या दगडी रस्त्या खालून पाणी खेळवून मासे वगैरे सोडतं , कोणी बगीचा करून त्यातून रस्ता काढून जोडतात, अनेक तऱ्हा. इतके सुंदर दृश्य होते ते. मला ती कल्पना खूपच आवडली. कलाकारी आणि कोरीव काम मात्र जिथे तिथे भरलेले.
तिथल्या एका मित्राकडून ह्या घरांची अधिक माहिती घ्यायचे ठरवले. आणि बाली चे लोक प्रथा परंपरांना किती महत्व देतात ते कळले. त्यांचे घर बांधण्याचे असे एक शास्त्र आहे. त्यात सगळ्यात महत्वाचा आहे निसर्ग. घर बांधताना नैसर्गिक वस्तूतूनच बांधायचे. म्हणजे, बांबू, नारळाच्या झावळ्या, दगड, सागवान, मातीच्या विटा वगैरे. छत उतरतेच हवे. घराला मोठ्या मोठ्या खिडक्या हव्यातच. घरात भरपूर नैसर्गिक उजेड आणि वारा खेळता राहिला पाहिजे. आवारात सुंदरसा बगीचा ही हवाच. कारण निसर्ग देवता प्रसन्न राहिली पाहिजे. बगिच्यात एक पाण्याचे टाके, छोटासा तलाव, काहीतरी हवेच, त्यात कमळ आणि मासे पण हवेत. ह्या सगळ्याला ते धार्मिक कथा पण जोडून सांगतात. जसे, वरुण देव प्रसन्न राहायला, घराला खिडक्या हव्यात, सूर्याची आराधना करण्यासाठी घरात उजेड यायला हवा. ते पाण्याचे टाके किंवा तलाव आणि त्याकाठी बसण्याची व्यवस्था हवीच कारण घरातील व्यक्तींना तिथे बसून देवाचे ध्यान करता यायला हवे. घराचा जोता मजबूत हवा, साधारणपणे दगडात बांधलेला. कारण इमारतीचा पाया मजबूत असेल तरच त्यातील रहिवासी उंच भरारी घेऊ शकतो, असा समज आहे. तुमचे घर म्हणजे तुमचा आत्मा, निसर्ग आणि देव ह्यांचा त्रिवेणी संगम साधायची जागा आहे. त्यानुसार तुम्ही घराचे विविध भाग बांधले पाहिजेत. ते करताना डोंगर आणि समुद्र ह्यातील एक विशिष्ट्य कोन अभ्यासला जातो. घरात बैठकीची खोली प्रवेशद्वारा समोरच , आणि सर्व दिशांनी उघडी हवी. तशीच कथा स्वयंपाकघराची. कारण तिथे अग्निदेव वास करणार आहे. घराला एक देवघर हवे, ज्यात पूर्वजांच्या आठवणी जतन करून ठेवलेल्या असतात. आणि घराला एक खूप उंच अशी दगडी कम्पाऊंड वॉल हवीच बरंका , त्यामुळे त्या घरातील लोकांचे बाहेरच्या दुष्ट शक्तींपासून रक्षण होईल. हे पारंपरिक घर. हल्ली शहरांमधून बहुमजली इमारती दिसतात. काळानुसार बदल त्यांनी पण केला आहे. मात्र तिथले जे हाडाचे बालीनीज लोक आहेत त्यांचे मन ह्या पारंपरिक घरातच रमते. गावागावांमधून फिरताना अशीच घरे दिसली. बहुमजली घरे फक्त शहरात. त्यांचे पापभिरू मन त्या जुन्या पद्धतीच्या घरातच रमते. त्या घरा भोवती इतकी सुंदर बाग करतात न ते, कि खरंच वाटते निसर्ग देव त्यांच्यावर म्हणूनच प्रसन्न राहत असेल.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.