पत्र क्र ६४

पु लं चे पूर्वरंग वाचणाऱ्या प्रत्येकाला "बाली" ला नक्कीच जावेसे वाटते. आम्हाला ह्या छानशा बाली बेटावर चांगले आठ दिवस घालवता आले. इंडोनेशियन बेट समूहांपैकी एक म्हणजे बाली. जावा, सुमात्रा, बोर्नियो,...

कीर्ती वडाळकर
||4 min read

पु लं चे पूर्वरंग वाचणाऱ्या प्रत्येकाला "बाली" ला नक्कीच जावेसे वाटते. आम्हाला ह्या छानशा बाली बेटावर चांगले आठ दिवस घालवता आले.

इंडोनेशियन बेट समूहांपैकी एक म्हणजे बाली. जावा, सुमात्रा, बोर्नियो, सुलावेसी, लेसर सुंदा किंवा बाली , मालुकू आणि पापुआ न्यू गिनी अशा बेट समूहातील एक म्हणजे बाली. राजधानी चे शहर देनपसार. सांस्कृतिक उलाढालीचे शहर उबूड. बाकी सर्व मुसलमान बेटांमध्ये हे तेवढे एक ९५ टक्के हिंदू लोकसंख्येचे बेट . नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आणि सांस्कृतिक वारसा उत्तम रीतीने जतन करणारे, अनेक कलांचे जतन करून वाढ करणारे आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले बाली. पर्यटन हा मुख्य व्यवसाय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ८० टक्के आवक हि पर्यटकांकडूनच होते. असं म्हणतात की अति प्राचीन काळात इथे पशुपता , भैरव, शिव सिद्धांत, वैष्णव, बोध, ब्रम्ह, ऋषी, शूरा आणि गणपती अशा नऊ देवांचे राज्य होते आणि त्याप्रमाणे जमाती स्थापन झाल्या होत्या.

अति प्राचीन काळापासून इथली सिंचन पद्धती फार विकसित होती आणि आजही ते त्याबद्दल आपल्याला अभिमानाने सांगतात.

विमानाच्या खिडकीतून अतिशय विहंगम दृश्य दिसते, हिरवे डोंगर आणि निळाशार समुद्र ढगांच्या पार्श्वभूमीवर खूप सुंदर दिसतात . तेवढ्यात आमच्या विमानात उद्घोषणा झाली कि आता आपण ज्वालामुखी वरून जाणार आहोत, तो जर जागृत असेल तर दिसेल. आम्ही खूप उत्कंठेने बाहेर बघत होतो. अर्थात तो ज्वालामुखी काही जागृत नव्हता, पण कधी काळी नक्की असावा. आजूबाजूचे दृश्य अत्यन्त विहंगम होते. बालीला पोचायला दिवसाचे विमानच का घ्यावे त्याचा खुलासा ते सगळे सुंदर दृश्य बघून होतो.

"विमान आता देनपसारच्या गुस्ति नगूराह राय विमानतळावर उतरेल" अशी उद्घोषणा झाली. मी आनंदाने बाहेर बघत होते. पण कुठेही जमीन दिसेना. सर्वदूर फक्त समुद्र! आणि विमान तर अतिशय खाली आले होते. बापरे! समुद्रावर उतरवत आहे कि काय विमान? ते सेक्युरिटी चे सगळे नियम आठवायला लागले. जॅकेट कुठे आहे, कसे घालायचे वगैरे. आता विमान खाली टेकणार तेवढ्यात धरती माता दिसली बाबा एकदाची. मला आपले उगाच सगळ्या बाबतीत टेन्शन येत असते.पण बाकी लोकही अक्षरश: हुश्श करत आहेत असे मला जाणवले. समुद्रातच भराव घालून तयार केलेला देनपसार विमानतळ. गुस्ति नगूराह राय आंतरराष्ट्रीय विमानतळ असे त्याचे नाव, १९४६ च्या डचांशी झालेल्या युद्धातील हे युद्ध वीर. अतिशय व्यस्त असा हा विमानतळ. जगभरातले पर्यटक ह्या विमानतळाचा वापर करतात त्यामुळे अद्ययावत आहेच. आधी जरा लहान असलेला पण अलीकडे प्रशस्त झालेला हा विमानतळ. बालीनीज आर्किटेक्चर चा उत्तम नमुना म्हणजे ह्याची इमारत. जिकडे तिकडे सुंदर दगडी मूर्ती , दीपमाळा, गोपुरासारखे दगडी कोरीव शिल्प, आपली नजर वेधून घेतात. सरोंग घातलेल्या सुंदर बालीनीज मुली इकडे तिकडे फिरत असतात.

इमिग्रेशन , कस्टम वगैरे नेहेमीचे सोपस्कार झाले आणि जरा बाहेर आलो तिथल्या मोठ्या हॉल मध्ये. हाशहुश करून इकडे तिकडे बघतोय तोवर एक सरोंग सुंदरी आली आणि चाफ्याचे हार गळ्यात घालून नमस्कार म्हणून हसली. तिच्या बरोबरच तरुण कानावर चाफ्याचे फुल अडकवून होता. एक मोठी लुंगी, त्यावर एक गुडघ्यापर्यंत छोटी लुंगी, आणि त्यावर चक्क थ्री पीस सुटातला कोट, असला पेहेराव. ती तरुणी एक छानसा सरोंग म्हणजे लुंगीच म्हणा न किंवा घट्ट सा परकर, त्यावर एक शर्ट घालून होती. हातात चाफ्याचे हार, काजळ, भांगात कुंकू, अशा वेषात होती. दोघांचे ही पेहेराव रंगीबेरंगी आणि फुलांच्या प्रिंटचे, आकर्षक होते. आमच्या हॉटेल नी आम्हाला घ्यायला पाठवले होते त्यांना. इतके छान स्वागत झाल्यावर आम्ही भारावूनच गेलो होतो.

आनंदाने तिच्या गाडीत जाऊन बसलो. देनपसारच्या गर्दीतून गाडी निघाली. आमचे हॉटेल गावापासून बरेच लांब होते. त्यामुळे सगळे देनपसार दर्शन करत निघालो. रस्ते फारसे गजबजलेले नव्हते कारण वेळ सकाळी अकरा ची होती. रस्त्यात मध्ये मध्ये लागणारे चौक माझ्या खास लक्षात राहिले. तिथे भव्य अशा सुंदर कोरीव मूर्ती चौकाचौकात उभ्या होत्या. सगळे चौक अति प्रशस्त. साधारण पांढऱ्या रंगाच्या त्या मूर्ती कोरीव कामाचा उत्तम नमुना होत्या. आणि प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे ह्या सर्व मूर्ती रामायणातील विविध प्रसंगाच्या होत्या. राम आणि रामायण आमचेच आहे असे त्या मुलीने ठासून सांगितले. असाच तो राम थायलंडचा हि आहे असे तिथल्या मुलीने पण सांगितले होते मला. हसूच आले मला. ती म्हणाली,"बाली मध्ये जीवन राम मय आहे. आमच्या श्वासात रामच आहे असे आम्हाला सांगितले जाते." असू दे बाई, राम तुझा काय माझा काय, त्यावर कुठे वाद?

बाहेर बघितले तर सुंदर बंगले असलेली अनेक गावे मागे पडत होती. प्रत्येक बंगल्याच्या बाहेर अतिशय कोरीव भिंत, प्रवेशद्वार सुद्धा दगडी कोरीव खांबात बसवलेले. एक गोष्ट प्रत्येक घराबाहेर लक्ष वेधून घेत होती, ती म्हणजे सुंदरसा देव्हारा. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच अतिशय छानसा कोरीव देव्हारा लावलेला होता, अगदी प्रत्येक घरात. त्यात कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त कितीही, मोठ्या उदबत्त्या जळत होत्या. फळं , मिठाई असा काहीतरी नैवेद्य पण दिसत होता. देव म्हणजे एखादे कोरीव शिल्प पण चेहेरा जरा उग्र वाटला . तिला विचारलेच शेवटी कि हे काय आहे. तिने आधी त्या एका देव्हाऱ्याला भक्तिभावाने नमस्कार केला मग म्हणाली,"घरातील लोक सुरक्षित राहावेत म्हणून हा देव्हारा असतो." म्हटलं, "मग तो घरात का नाही?" तर म्हणाली," बाहेरच्या राक्षसी प्रवृत्ती घरात न आल्या तरच घरातील व्यक्ती सुखरूप राहतील न? म्हणून त्यांना प्रवेशद्वारावरच थोपवून , तिथेच त्यांची पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि ती उदबत्ती तिच्या धुरात सर्व वाईट गोष्टी नष्ट करते. राक्षसांची पूजा केली आणि त्यांना खुश ठेवले तर काही वाईट होत नाही ". खरंच, दुर्जनम प्रथमम वंदे! ह्याचा प्रत्यय आला.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments