पत्र क्र ६३

मी काही अजून त्या सिंगापूरातून बाहेर यायला तयार नाही. सुंदर आठवणी येऊच देत नाहीत न बाहेर. इतका छोटासा देश, आपल्याला वाटावे एकदा जाऊ या, चार पाच दिवसात सगळा देश बघून टाकू या. पुन्हा यायलाच नको. पण तसे...

कीर्ती वडाळकर
||4 min read

मी काही अजून त्या सिंगापूरातून बाहेर यायला तयार नाही. सुंदर आठवणी येऊच देत नाहीत न बाहेर. इतका छोटासा देश, आपल्याला वाटावे एकदा जाऊ या, चार पाच दिवसात सगळा देश बघून टाकू या. पुन्हा यायलाच नको. पण तसे होत नाही. सतत काहीतरी, पर्यटकांना आकर्षित करणारे देऊन, सिंगापूरची प्रत्येक ट्रिप नवीनच वाटते. कारण पर्यटन हा एक प्रमुख व्यवसाय आहे न.

खरं तर नैसर्गिकरित्या तयार झालेले टुरिस्ट स्पॉट्स इथे फारसे नाहीत. जे काही आहे ते तयार केलेलं आहे. पण त्यात हि सहजता जाणवते. अर्थात त्यासाठी बराच प्रयत्न केलेला आहे.

कुठल्याही टूरबरोबर गेलात तर जुराँग बर्ड पार्क नक्की दाखवणार. आम्हीही आमच्या एका ट्रिप मध्ये गेलोच न. अगदी नैसर्गिक वाटावी अशी रचना. बरेचसे पक्षी. रंगीबेरंगी फडफड आणि मंजुळ किलबिल. पन्नास एकर पेक्षाही कमी जागेवर वसलेले जुराँग पार्क तसे बरेच जुने आहे. अनेक प्रकारचे पक्षी आपल्याला तिथे बघता येतात. झाडं आणि पाण्याचा असा काही खेळ केलाय की सगळे अगदी नैसर्गिक वाटावे. आमचा मुलगा तेव्हा लहान होता, त्याला सांगून ही खरे वाटेना की हे सगळे बनवलेले आहे. जगातील दुसऱ्या नंबरचे मोठे बर्ड पार्क आहे ते. अनेक प्रकारचे नामशेष होत असलेले पक्षी तिथे आहेत. पर्यटकांना अनेक सुविधाही आहेत, मोनोरेल , छोटी बस फिरण्यासाठी आहेत. त्या पांढऱ्या ब्रिजवर चढून , ते रंगीत मकाव अंगावर घेऊन फोटो काढणारे अनेक जण असतात. ते मकाव पण असले कोडगे झालेत न कि एकदा अंगावर बसले कि लवकर उडतच नाहीत. मुलगा हटूनच बसला, आता हा उडत नाही आहे माझ्या हातावरून तर घरी घेऊन जाऊ. आता काय करावे? तिथले कर्मचारी मोठ्या मोठ्या पक्षांचा एक छानसा शो पण करून दाखवतात. त्यांनी हाक मारल्यावर धावत येणारे पेलिकन्स, डौलात चालत येणारे फ्लेमिंगोज, उडत येऊन गोंधळ करणारे मकाव, पिसारा फुलवून दाखवणारे मोर, असे कितीतरी पक्षी येऊन पर्यटकांचे मनोरंजन करून जातात. त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते.

असाच सिंगापूर झू. अतिशय मेहेनतीने केलेला. जगातील उत्तम प्राणिसंग्रहालयातील एक. खूपसे प्राणी आणि तयार केलेले जंगल! प्राणी अगदी तुमच्या बाजूला असतात. इथे पिंजरे जवळपास नाहीतच. त्यामुळे तो प्राणी अगदी समोर दिसतो. बऱ्याच प्रकारचे स्पेशल एक्झिबिट्स आहेत, आफ्रिकन प्राणी, आशियातले प्राणी,अमेझॉन मधले प्राणी, वगैरे. प्रत्येक नदीच्या नावाने माहिती देत जगातल्या काही महत्वाच्या नद्यांची माहिती आणि रिव्हर सफारीच्या नावाने एक छोटीशी बोटसफर आणि पाण्यातील प्राण्यांची माहिती सगळंच आकर्षक. तिथे गंगेची माहिती बघून मन भरून येते. फिरायला ट्राम, मुलांसाठी खेळण्याच्या जागा, सगळं विचार करून बनवले आहे. तिथे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत मिळत नाहीत तर सगळीकडे वॉटर फॉऊंटन आहेत, तुमच्या जवळची रिकामी बाटली कितीही वेळा भरून घ्या, प्लास्टिकचा कचरा कमी करा!

एका ट्रिप मध्ये नाईट सफारी ला गेलो. दिलेल्या वेळेत तुम्ही गेटवर पोचायला हवे. बघतो तर इतकी गर्दी! आता काय? पण गर्दीतच जीवन जगणाऱ्या मुंबईकरांना कसली भीती? आपण तर संध्याकाळी दादरला फास्टट्रेन मध्ये चढतो. चला तर मग, करत घुसलोच, नाहीतर गेट वरूनच परत यावे लागले असते आणि तिकीट फुकट गेले असते. आज आठवलं कि हसू येतं त्या आगावूपणाचं. त्या सिंगापूर झू च्या दुसऱ्या भागात ट्राम ने अंधारात फिरवतात. गाईड रसभरीत आणि प्रसंगी जरा भीती निर्माण करणारे वर्णन करत असतो. बारीक प्रकाशाची तिरीप टाकून, फिरणारे, बसलेले प्राणी दाखवतात. तुम्ही पायी पण फिरू शकता. म्हणजे त्या झू पासून किती कल्पकतेने पर्यटकांचे मनोरंजन करतात, आणि अर्थातच पैसे कमवतात, कारण हे सगळे भल्या थोरल्या किमतीत असते.

एकदा आमच्या हॉटेल च्या स्वागतिकेने सांगितले आज संध्याकाळी तुम्हाला ," Under water world " बघायला जायचे आहे. नाव जरा दमदार वाटले. आपण पाण्याखाली जाणार तर. संध्याकाळी निघायच्या आधी तिला विचारायला गेले कि बाई कुठला तो स्विमिंग ड्रेस घालायचा का? तिच्या चेहेऱ्यावरून तिची विकेट पडलेली वाटली. मी काही चुकीचं विचारलं कि काय? पण पाण्याखाली जाताना काय घालावे असा काही ड्रेस कोड असला तर? तेवढ्यात ड्राइवर आला, चला चला , वेळेत निघायला हवे. तिथे पोचेपर्यंत मी टेन्शन मध्ये. आणि ते बघितल्यावर हसावे का रडावे कळेना. ते एक मत्स्यालय होते. अर्थात कल्पकता इथेही होतीच. आपण एका काचेच्या बोगद्यातून जात असतो. सगळीकडे पाणी आणि जलचर आपल्या आजूबाजूला विहरत असतात, तुम्ही खाली आणि तुमच्या डोक्यावर जलचर. हे अंडर वॉटर होय. आता त्या स्वागतिकेला तोंड कसे दाखवायचे? स्विमिंग ड्रेस घालायचा का म्हणे!!

सेंटोसावरचा लेझरशोहि इतका नेत्रदीपक असतो.

एकदा जवळच होती म्हणून जेम्स गॅलरी बघायला गेलो. बापरे! त्या रत्नांपासून किती कलाकुसरीचे नमुने? मोठमोठे वॉलपीस तर केवळ अप्रतिम. ह्या रत्नांपासून दागिने बनवतात हे फक्त माहित होते तोवर . इतक्या नेत्रदीपक वस्तू बनवलेल्या मी पहिल्यांदाच बघितल्या. तिथे, हि कलाकारी करताना तुटलेले छोटे मोठे तुकडे एकत्रित असे मिळतात. ते घेतले आठवण म्हणून. विविध रत्नांनी साकारलेला मोठ्ठा मोर आजही माझ्या नजरेसमोर आहे.

सिंगापूर आणि खरेदी म्हणजे समानार्थी शब्द. मी हि घेतलेय काहीबाही. ते सगळे मॉल्स आहेतच आकर्षक . खरं सांगू का, परदेशी खरेदी करणे मला जरा अगम्य वाटते. ते चित्रविचित्र आणि महागडे कपडे आपण इथे घालू शकत नाही. बरं सौंदर्य प्रसाधने घ्यायची तर एकेक वस्तू शोधण्यापेक्षा जे सेट मिळतात ते घ्यावे, तर त्यातही सगळे रंग असतात म्हणजे काळ्या रंगाचे लिपस्टिक किंवा नेलपेंटहि असते. आता त्याचा आपल्याला काय उपयोग? ते लोक हलोवीनमध्ये लावतात असले रंग. हा, काही ब्रॅण्ड्सच्या वस्तू चांगल्या मिळतात त्या घ्यायला हरकत नाही. एकदा तर एका मॉलमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंचे वेगळे दालन सापडले , त्यात अनेक आकर्षक वस्तू होत्या.

तर असे हे माझे आवडते सिंगापूर! --

With thanks and regards. For STADD Engineers Mumbai Kirty Hemant Vadalkar ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- Authorized Dealers for STAADPro, ProSTEEL, RAM, STAADfoundation,STAADbeava software products since 1995. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments