पत्र क्र ६२

तर आपण सिंगापूर मधल्या वैशिष्ट्यपूर्ण इमारतींबद्दल बोलत होतो. विमानातूनच अनेक इमारतींचा महासागर दिसतो. विमानतळावरून आपल्या इच्छित स्थळी जाताना त्या सगळ्या इमारती सर्व बाजुंनी जणू घेराव घालतात...

कीर्ती वडाळकर
||4 min read

तर आपण सिंगापूर मधल्या वैशिष्ट्यपूर्ण इमारतींबद्दल बोलत होतो. विमानातूनच अनेक इमारतींचा महासागर दिसतो. विमानतळावरून आपल्या इच्छित स्थळी जाताना त्या सगळ्या इमारती सर्व बाजुंनी जणू घेराव घालतात आपल्याला.

अनेक जण इथे सुंदर आर्किटेक्चर चा अभ्यास करायला येतात. आपणही जेव्हा फिरतो तेव्हा नकळत ह्या इमारती आपल्याला भुरळ घालतात, अगदी भले आपण आर्किटेक्चर चे विद्यार्थी नसू. विविध प्रकारच्या , आकाराच्या, अनेकविध उपयोगांत येणाऱ्या, कितीतरी इमारती आपल्याला आकर्षून घेतात .

गेल्या पंचवीस वर्षात इथे अनेक प्रकारच्या इमारती उभ्या झाल्या. जगभरातल्या उत्तम वास्तुशास्त्रज्ञानीं ह्या इमारतींच्या बांधकामात आपले कौशल्य वापरलेले आहे. मला तर दर वेळी ह्या इमारतींची माहिती घ्यायला खूप आवडते.

ऑर्चर्ड रोड हा सिंगापूरचा अतिशय व्यस्त रस्ता. दिवसा मॉल्स मधून खरेदी करत फिरणारे किंवा ऑफिसेस मधून काम करणारे ह्यांची लगबग असतेच पण रात्रीही दिव्यांच्या रंगारंग प्रकाशात खूप लोक फिरत असतात. ह्या रस्त्यावर अनेक आकारांच्या सुंदर इमारती आहेत. एका वर्षी चिनी नवीन वर्ष जवळ आले होते. गोल गोल लाल सोनेरी आकाशदिव्यांनी सगळा रस्ता सुंदर सजला होता. खरेदी आणि खाद्य पदार्थांची लयलूट होती सगळी. ह्या रस्त्यावरच्या इमारती त्या मानाने बऱ्याच जुन्या आहेत. पण अलीकडे बांधलेली आयन ऑर्चर्ड मॉल हि नवीन इमारत अतिशय आकर्षक आहे.

अगदी अलीकडच्या काळात तर वेगवेगळे रूप देऊन इमारती बांधल्या आहेत. असेच फिरताना एक वेगळाच आकार दिसला. कमळाच्या पाकळ्या वाटाव्यात प्रथमदर्शनी. अजून बांधकाम चालू होते. आणि गेल्या ट्रिप मध्ये तो आकार पूर्णत्वास गेलेला बघायला मिळाला. कमळाच्या आकारात बांधलेले आर्टस् अँड सायन्स संग्रहालय! एक बाजूच्या पाकळ्या पूर्ण आणि दुसऱ्या बाजूच्या पाकळ्या अर्धवट, सुंदरच दिसते. आजूबाजूला पाणी खेळवून त्यातही कमळ लावलेय, चंद्रमुखी आणि सूर्यमुखी सुद्धा. केव्हाही जा, अनेक कमळं फुललेली दिसतीलच. आमचे हॉटेल जवळच होते, त्यामुळे त्या इमारतीचा आणि बगिच्याचा पूर्ण आनंद घेता आला. आतले संग्रहालय सुद्धा बघण्यासारखे आहेच.

मरिना बे नावाचा हा सगळा भाग सुंदरच केला आहे. नदीच्या एका बाजूला एस्प्लनेड थिएटर आहे. तिथले एक फळ, डुरियन च्या आकाराचे. हे फळ आपल्या फणसाचा भाऊ. त्या भागात खूप पिकते. पण त्याच्या उग्र वासामुळे अनेक ठिकाणी निषिद्ध असते. त्याचा आकार ह्या थिएटर्स ना दिला आहे. अल्युमिनियम चे असंख्य पत्रे जोडून फळाचे बाहेरचे खवले तयार केले आहेत. त्याच्या बाहेर सुंदर बगीचा. नदीकाठी फिरण्यासाठी रस्ता, नदीतून फिरण्यासाठी बोटीचे धक्के, छोटी मोठी हॉटेल्स असा सगळा गजबजलेला परिसर. एस्प्लनेड कडून आर्टस् अँड सायन्स संग्रहालयाकडे जाणारा रस्ता म्हणजे बांधकामाचा

अजून एक सुंदर नमुना. हेलिक्स ब्रिज. स्टील च्या असंख्य सळया एकमेकींत गुंफून तयार केलेला. त्यातून चालताना इतकी मजा येते. लहानपणी वेलींच्या मांडवातून धुमाकूळ घालायचो त्याची आठवण झाली.

हेलिक्स ब्रिज वरून नदी पार करून पलीकडे पोचल्यावर ते प्रसिद्ध मरिना बे सँड्स . आमचा सेमिनार तिथल्या मोठ्या एक्झिबिशन सेंटर मधेच होता. चांगले पाच दिवस. बाहेर इतक्या सुंदर गोष्टी असताना आत भाषणे ऐकत बसणे म्हणजे सहनशक्तीची परीक्षाच होती.

सगळंच भव्य. ते मोठ्ठ हॉटेल, गच्ची वरचा पोहण्याचा तलाव, एक्झिबिशन सेंटर, चालून चालून पायाचे तुकडे पडतील तरी सगळं बघून होणार नाही. तीन उंच इमारतींना गच्चीवर एका बोटींनी जोडले आहे. नदीतून तीन इमारती बोट उंच धरून उभ्या आहेत असा भास व्हावा. लांबूनही दिसते ते. त्यातच तो मोठा मॉल, जगभरातील सर्व महत्वाचे ब्रँड तिथे खरेदी करता येतात. त्या मॉल च्या मधून एक कालवा काढलाय. व्हेनिस चा आभास निर्माण केला आहे. त्यातून ते गोंडोले इकडून तिकडे जात असतात पर्यटकांना घेऊन. नावाडी व्हेनिस चा ड्रेस घातलेला असतो आणि पर्यटकांसाठी गाणेही म्हणत असतो. अगदी लास वेगास च्या वेनेशन मॉल ची प्रतिकृती! म्हणून चौकशी केली तर कळलं त्याच कम्पनीचा हा मॉल आहे. आणि तसाच सगळ्यात मोठा कॅसिनो पण तिथे आहे. अर्थात त्यात आत जायला शंभर डॉलर चे तिकीट काढावे लागते.

जाऊ देत, कॅसिनो नको, तिथून पुढे चालत राहू , छोटे पूल ओलांडू आणि गार्डन बाय द बे मध्ये पोहोचू. वा! काय नजारा आहे! मोठे मोठे स्टीलचे वृक्ष तयार केले आहेत. त्या वर सोलर पॅनेल्स बसवलेत. खूपशा वेली चढवल्या आहेत. आजूबाजूला अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. ऑर्किड्स चे स्पेशल दालन केले आहे. अनंत फुले सगळीकडे फुललेली दिसतात. पाण्याचे नियोजन उत्तम रीतीने करत हे भव्य बगीचे फुलवले आहेत. दिवसभराचा वेळ कमी पडावा.

आमचे राहणे तिथेच असल्यामुळे त्या परिसरात खूप फिरणे झाले. पहिल्याच दिवशी, संध्याकाळी फिरत होतो. जरा अंधार पडू लागला आणि लोक पटापट नदीकिनारी जागा पकडून बसू लागले. हे काय असावे? तर थोड्याच वेळात कारंजे आणि लाईट्स चा असा काही नेत्रदीपक खेळ सुरु झाला कि दिवसभराचा शीण विसरून आम्हीपण त्यांच्यात सामील झालो.

मधमाशांच्या पोळ्याच्या आकारातील हाईव्ह इमारत बघायला गेलो. आजूबाजूला खूप मोठा बगीचा. गोलाकार बांधकाम. इमारतीत स्कुल ऑफ आर्ट डिझाईन अँड मीडिया आहे. प्रत्येक गोलाकार खोलीत वर्ग भरतात .

राहण्याच्या काही वेगळ्या आकाराच्या इमारती बघायला मिळतात. लहान मुलांच्या खेळण्यातले ब्लॉक्स आडवे तिरपे रचून साधारण षट्कोन तयार केल्यावर दिसेल तसेच इंटरलेस इमारतीकडे बघताना वाटते. आजूबाजूला भरपूर बगीचे आहेत म्हणजे रहिवाशांना अगदी बंद राहायला लागू नये.

अजून एक विशेष इमारत म्हणजे स्काय हॅबिटाट . ३८ मजली दोन मोठ्या इमारती मध्ये मध्ये सुंदरशा पुलांनी जोडलेल्या आहेत. त्या पुलांचा उपयोग बगीचे, पोहण्याचा तलाव अशा साठी केला आहे म्हणजे रहिवाशाना सर्व सोयी मिळू शकतील. इमारतीचा आकार खाली आधी चौकोनी आणि वर निमुळता होत जाणारा आहे. प्रत्येक घराला छोटी गच्ची आहे आणि त्यात थोडीफार झाडे लावली आहेत. राहण्याचा उत्तम अनुभव.

इतक्या विविध इमारती तिथे आहेत न कि कोणाबद्दल सांगावे आणि कोणाला वगळावे हाच प्रश्न आहे.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments