पत्र क्र ६१

गगनचुंबी इमारती , वैशिष्ट्यपूर्ण इमारती, त्याही अतिशय कमी जमीन उपलब्ध असताना बांधणारा देश म्हणजे सिंगापूर. अनेक पर्यटक केवळ ह्या इमारती बघायला येतात. खरेदी हा पण इथल्या भेटीचा एक अजून उद्देश. दोन्ही...

कीर्ती वडाळकर
||4 min read

गगनचुंबी इमारती , वैशिष्ट्यपूर्ण इमारती, त्याही अतिशय कमी जमीन उपलब्ध असताना बांधणारा देश म्हणजे सिंगापूर. अनेक पर्यटक केवळ ह्या इमारती बघायला येतात. खरेदी हा पण इथल्या भेटीचा एक अजून उद्देश. दोन्ही उद्देश अगदी पूर्णपणे सफल होतात. शिवाय फिरणे अगदी मोकळेपणी, स्त्रियांना सुद्धा. त्यामुळेच पर्यटनासाठी लोक नेहेमीच सिगापूर ला प्राधान्य देत आले आहेत. आणि ह्या कसोटीवर हा देश नेहेमीच खरा उतरला आहे.

उत्तम आर्किटेक्चर चा नमुना असलेली कोणती ना कोणती इमारत दर वेळी नव्याने दिसली. जुन्या इमारती सुद्धा खूप काळजीपूर्वक जतन केलेल्या दिसतात. उपलब्ध साधनांचा अत्यन्त काळजीपूर्वक वापर होताना दिसतो.

अनेक इमारती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. खूप गगनचुंबी इमारती असल्या तरी काही अत्यन्त कलात्मक आहेत. तिथले आर्किटेक्चर अनेक पैलू असलेले आहे. अगदी जुन्या प्रकारची घर आणि दुकान एकच असलेल्या इमारती . विक्रेता तिथेच एका भागात राहत असतो, आणि समोर किंवा घराच्या काही भागात दुकान. मोठमोठे मॉल्स असले तरी ह्या दुकानांमधून पण गिऱ्हाईक असतात. मोठ्या मॉल ची छोटी प्रतिकृती म्हणून त्यांच्या कडे बघता येईल. एखादी वस्तू पटकन घ्यायची असेल तर ही दुकाने म्हणजे उत्तम पर्याय. जीवनावश्यक सर्व वस्तू ह्या दुकांनां मधून विक्रीला दिसतात.

काही भागात जुन्या पद्धतीचे बंगले आहेत. त्याना काळी पांढरी घरे म्हणतात. हि जुनी घरे अतिशय श्रीमंत लोकांची आहेत. पूर्वी त्यात ब्रिटिश सरकारी अधिकारी, सेनाधिकारी राहत. त्यांना त्यानी पांढरा रंग दिलेला होता आणि लाकडी तुळया, खांब , दर्शनी भाग काळ्या रंगात रंगवले होते.

त्यानंतर, अजून एक प्रकार म्हणजे ब्रिटिशांनी बांधलेल्या सरकारी इमारती. ह्या टिपिकल युरोपियन पद्धतीच्या इमारती आहेत. आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यातली व्हिक्टोरिया थिएटर आणि कॉन्सर्ट हॉल ची इमारत , १८६२ ला मुख्य बांधकाम झाले आणि त्यात पुढील पन्नास वर्षे भर घालत आज दोन मुख्य इमारती त्यांना जोडणारा हॉल आणि त्यावर मोठे घड्याळाचे टॉवर . ह्या सगळ्या इमारतीचा अनेकविध कार्यक्रमांसाठी उपयोग होतो. कॉन्सर्ट हॉल मध्ये सिंगापूर सिम्फनी ऑर्केस्ट्रा चे कार्यक्रम ऐकायला, बघायला मिळतात. जुनी सुप्रीम कोर्टाची इमारत म्हणजे आजची नॅशनल गॅलरी, सिटी हॉल इमारत पण अतिशय सुंदर इमारती आहेत. नॅशनल म्युझियम ऑफ सिंगापूर ची इमारत पण अत्यंत देखणी आहे. सगळ्यात जुने वस्तू संग्रहालय तिथे आहे. सिंगापूरचा इतिहास तिथे जपला आहे. विविध प्रकारच्या कला आणि संगीताची माहिती देणारे आर्टस् म्युझियम, म्हणजे जुनी पार्लमेंट बिल्डिंग. आधुनिक सिंगापूरचा जनक म्हणून ओळखला जाणारा स्टॅमफर्ड राफेल्स . त्यांनी १८२३ मध्ये बांधलेली सिंगापूर मधली सगळ्यात जुनी इमारत, आज तिथे राफेल्स इन्स्टिटयूट आहे, सगळ्यात जुनी शाळा. तिथल्या उत्तम शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. तीन राष्ट्राध्यक्ष, दोन पंतप्रधान आणि अनेक मंत्री, उचपदस्थ अधिकारी ह्या शाळेने देशाला दिले आहेत. अनेक विद्यार्थी ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज साठी इथून निवडले जातात. आणि उच्च शिक्षण घेऊन देशाला सेवा देतात.

अशा अनेक जुन्या इमारती जतन करून त्यात अशा महत्वाच्या उद्योगांना चालना दिलेली आहे. १९८० साली त्यांनी हेरिटेज इमारती जतन करायला सुरु केले आणि त्याचे उत्तम फलित आपल्या समोर आहे.

फ्रांस मध्ये सर्व प्रथम उत्पन्न झालेले आर्ट डेको आर्किटेक्चर, इथे खूप इमारतींमध्ये बघायला मिळते. साधारण १९३० नंतर बांधलेल्या ह्या इमारती आहेत. आधुनिक साधने वापरून जुन्या कलात्मक रचनेनुसार बांधलेल्या खूप सुंदर दिसणाऱ्या इमारती. भौमितिक आकार वापरून आकर्षक रंगसंगतीच्या गगनचुंबी इमारती सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. ह्यात फोर्ड फॅक्टरी, जुनी ब्रिटिश मलाय ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन ची इमारत , आशिया इन्शुरन्स बिल्डिंग म्हणजे आजची अस्कॉट राफेल्स प्लेस इमारत अशा अनेक इमारती आहेत.

अजून एक वर्ग म्हणजे आजच्या आधुनिक इमारती. हा वर्ग साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आला. जागेचा पूर्ण वापर, कलाकारीवर भर कमी पण सर्व आधुनिक वास्तुकलेचे नमुने. मोठमोठ्या गगनचुंबी इमारतींचे बांधकाम आजही जिकडे तिकडे सुरु असलेले दिसते. ५२ मजली OCBC सेंटर , ४८ मजली

सिंगापूर लॅन्ड टॉवर, ५० मजली DBS बिल्डिंग, CPF इमारत, वन राफेल्स प्लेस, रिपब्लिक प्लाझा अशा अनेक बहुमजली इमारती आहेत.

गोको टॉवर सगळ्यात उंच इमारत आहे. ९६ मजली गोको टॉवर बांधण्यासाठी उच्चतम इमारतीचा २८० मीटर जास्तीत जास्त उंची असण्याचा नियम शिथिल करण्यात आला होता. मात्र २८० मीटर उंचीच्या आणि त्याच्या जवळपासच्या अनेक इमारती आहेतच. आधुनिक आर्किटेक्चर नुसार बाहेरून पण सुंदर दिसतील ह्याची संपूर्ण काळजी घेतलेली आहेच. जगातील सगळ्यात उंच दंडगोलाकार इमारत तेमासेक टॉवर पण इथेच आहे.

धार्मिक स्थळांच्या इमारती हा अजून एक प्रकार इमारतींचा. अनेक धर्माचे लोक इथे राहतात. त्यामुळे प्रत्येक आस्थेच्या सुंदर, जुन्या पण उत्तम जतन केलेल्या अनेक पारंपरिक इमारती म्हणजे त्या त्या धर्माची पूज्य स्थळे , इथे बघायला मिळतात. चिनी मंदिरे, हिंदू मंदिरे, गुरुद्वारा, ज्यूंचे सिनॅगॉग , कॅथॉलिक, प्रोटेस्टंट, ऑर्थोडॉक्स चर्चेस, सुन्नी, शिया मशिदी सगळे गुण्यागोविंदाने नांदतात. ह्यातली काही खूप जुनी प्रार्थना स्थळे नॅशनल मॉन्यूमेन्ट्स ऑफ सिंगापूरच्या यादीत आहेत. ह्यात अनेक चर्च, मशिदींबरोबर श्री मरीअम्मान मंदिर पण आहे.

अजून एक विभाग म्हणजे सार्वजनिक उपयोगितेच्या इमारती तशाच गृहसंकुलांच्या सरकारी इमारती. १९३० साली सिंगापूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ने सुरु केलेले सार्वजनिक गृह संकुलांची योजना आजही आहे नाव फक्त बदलेले आहे, हौसिंग अँड डेव्हलपमेंट बोर्ड! ह्यात मध्यम वर्गासाठी स्वतःच्या मालकीची घरे आहेत, तसेच कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी अल्प भाड्याची घरे पण आहेत. मालकीची घरे बोर्ड ९९ वर्षांच्या लीजवर देते. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येसाठी हा पर्याय उपलब्ध करून देणे खरंच उपयोगी आहे.

इमारतींचा आणखी एक वर्ग आधुनिक सुंदर इमारतींचा. बघू न त्या बद्दल ही .....

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments