पत्र क्र ६०

एवढ्या छोट्याशा जमिनीवर वसलेला देश सिंगापूर. पण तिथे बऱ्याच नद्या आहेत. काय? आश्चर्य वाटलं न?१७ तलाव आणि ३२ नद्या आहेत तिथे. सगळ्यात लांब नदी कलांग नावाची फक्त १० किलोमीटर लांबीची! आपल्याला बरीचशी...

कीर्ती वडाळकर
||4 min read

एवढ्या छोट्याशा जमिनीवर वसलेला देश सिंगापूर. पण तिथे बऱ्याच नद्या आहेत. काय? आश्चर्य वाटलं न?१७ तलाव आणि ३२ नद्या आहेत तिथे. सगळ्यात लांब नदी कलांग नावाची फक्त १० किलोमीटर लांबीची! आपल्याला बरीचशी भेटते ती सिंगापूर नदी. तिच्या काही भागांना वेगवेगळी नावे आहेत. पण हि नदी सुद्धा अतिशय छोटी आहे. बाकी नद्यांची लांबी किती असेल बघा मग. वेगवेगळ्या ठिकाणी वाहणाऱ्या ह्या नद्या , पण त्यांचा शहर सौंदर्यीकरणात उत्तम वापर केला आहे. खूप स्वच्छ पाणी , नदीच्या काठाने किंवा काठावर बांधलेले आखीव रेखीव बगीचे, त्यातून चालण्यासाठी, काही ठिकाणी सायकली चालवण्यासाठी सोयी, लहान मुलांना खेळण्याच्या सोयी, ह्या काठावरून त्या काठावर जायला जागोजागी बांधलेले सुंदरसे पूल, संध्याकाळच्या वेळी लाईट चा खेळ, कितीतरी गोष्टी. नुसता पर्यटकांचाच विचार न करता रहिवाशांची सोय पण बघितली आहे. अगदी पहिल्या ट्रिप मध्ये, मला आठवतं , त्या सिंगापूर नदीवर बम बोट राईड असे. डिझेल चा धूर ओकणारी ती पुरातन बोट. त्या गाईडला मात्र फार अभिमान होता, आम्ही कसे जुने जपले आहे ते बघा म्हणे. त्या बोटीतून नदीची सैर करून आणत . अनेक वर्ष त्या बोटी होत्या. पण अलीकडे दिसल्या नाहीत. पर्यावरण रक्षणासाठी आता धूर काढणाऱ्या बोटी जाऊन नवीन अद्ययावत बोटी आल्या आहेत.

पूर्वीपासून ह्या नद्यांना सिंगापूरच्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. जसा इथला विमानतळ महत्वाचा तसेच इथले बंदर . जगात इथून वस्तू पाठवतात. अतिशय महत्वाचे असे हे सिंगापूर बंदर, त्याची मोक्याची जागा आणि कितीही आकारात आणि मापात वस्तू हाताळायची आणि सुखरूप पुढे पाठवायची क्षमता असलेला . सिंगापूरच्या मुख्य उद्योगात ह्या कार्गो ट्रान्सपोर्ट चा उल्लेख होतो. शहरात असलेल्या अनेक गोडाउन्स मधून माल पाठवायला ह्या नद्यांची खूप मदत होई . आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणूनही . साधारण संध्याकाळच्या वेळची ट्रिप घेतल्यास लाईटचा मस्त खेळ पण बघता येतो. त्यासाठी बऱ्याच ठिकाणी बोटींचे धक्के केले आहेत. आणि आजूबाजूचा परिसर सुशोभित केला आहे. बऱ्याच नद्यांचे पात्र, जमीन बनवण्याच्या प्रयत्नात बदलले आहे. पावसाचे पाणी साचून आजूबाजूच्या परिसरात पूर येऊ नये ह्याचा पूर्णपणे विचार केलेला आहे. मोठ्या मोठ्या गगनचुंबी इमारती आणि आर्किटेक्चर चे उत्तम नमुने बघायला येताना ह्या नद्यांचा अजिबात विसर पडू नये.

इथली शिक्षण पद्धती अतिशय प्रगत आणि जगभरात मान्यता प्राप्त आहे. प्राथमिक शिक्षण मोफत आहे. सगळं शिक्षण इंग्रजीतून देतात पण इतर तीन अधिकारीक भाषांपैकी म्हणजे तमिळ, मँडरिन आणि मलाय, पैकी एक शिकणे अनिवार्य आहे. माध्यमिक स्तरावर मुलांना पुढे काय करायचे आहे त्यानुसार तीन विभाग केले आहेत, शैक्षणिक, व्यापारी आणि व्यावसायिक. ज्यांना शैक्षणिक क्षेत्रात जायचे आहे त्यांना पुढे पाच ते सहा वर्षे अजून शिकावे लागते. बाकी दोन विभागांना युनिव्हर्सिटीत जाण्याआधी तीन वर्षांचा अधिक कोर्स करावा लागतो. १९८० साली तेव्हाच्या दोन युनिव्हर्सिटी, म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि नानयांग युनिव्हर्सिटी, एक करून नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर बनली , आज ती जगभरात प्रसिद्ध आहे. ह्या युनिव्हर्सिटी चा जगात अकरावा आणि आशिया खंडात पहिला क्रमांक आहे.

आरोग्य सुविधा अति उत्तम आहेत. खूप हॉस्पिटल्स आणि खाजगी दवाखाने आहेत. कौन्सिल ऑफ सोशल सर्विस तर्फे ज्येष्ठ नागरिक, आजारी आणि बेरोजगार ह्यांची काळजी घेतली जाते.

सांस्कृतिक क्षेत्र जास्त श्रीमंत आहे कारण भारतीय, चिनी, इंडोनेशियन, मलेशियन आणि पाश्चिमात्य अशा सर्व संस्कृतींचा त्यात मिलाफ आहे. त्यामुळे जवळपास वर्षभर कुठला ना कुठला सण चालू असतो. त्या त्या देशाच्या पद्धतीप्रमाणे, इतरांना ही सामावून घेत तो साजरा होत असतो. म्हणूनच उत्सवाचे वातावरण सतत असते. कला, संगीत, नृत्य, नाटक ह्या मधेही असाच सर्व संस्कृतींचा मिलाप दिसतो. हॉंगकॉंग, तैवान आणि अमेरिकन सिनेमांबरोबर आपले हिंदी आणि तामिळ सिनेमेही अत्यन्त लोकप्रिय आहेत. तसेच, चिनी, भारतीय, इंग्लिश आणि मलाय वर्तमानपत्रं ही वाचकांना बौद्धिक खाद्य पुरवतात. पण प्रिंट मीडिया वर सरकारचा अंकुश आहे. रेडियो आणि टीव्ही सिंगापूर ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन च्या अखत्यारीत येतात.

वर्षानुवर्षे सिंगापूर मध्ये एकच राजकीय पक्ष सत्तेत येतो, पीपल्स ऍक्शन पार्टी . विरोधात अगदी ५,६ जण निवडून येतात. एकूण ८९ जागांपैकी कायम ८० पेक्षा जास्ती जागा सत्ताधारी पक्षाला मिळतात. देशाची आर्थिक प्रगती करणे हेच मुख्य धोरण ठेऊन सरकार काम करते. पाणी ,जमीन आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून शेजारील राष्ट्रांशी असलेल्या कुरबुरी त्यांनी संपवत आणल्या आहेत. जसे स्वतःच्या देशाचा त्यांनी विचार केला तसाच क्षेत्र विकासासाठी ASEAN ची स्थापना करून आशियातील इतर देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत.

गेल्या वेळी जेव्हा आम्ही तिथे होतो तेव्हा तिथल्या विविध संस्कृतींचे छान दर्शन झाले. संध्याकाळी चालत निघालो. रस्त्यात एक मंदिर लागले. सहज डोकावलो. दक्षिण भारतीय पद्धतीचे ते मंदिर होते हे गोपुरावरून कळलेच. आत मोठा सोहळा चालू होता. खूप वाद्य वाजत होती. देव सजले होते. भाविक ही सुंदर तयारी करून आले होते. बालाजी मंदिर होते ते आणि बालाजीचा विवाह सोहळा चालू होता. अगदी छान उत्सवी वातावरण होते. देवांना बाहेर आणून, पालखीतून मिरवत होते. संपूर्ण परिसर भारावून गेला होता. तेवढ्यात माझे लक्ष दोन परदेशी मुलींकडे गेले. अतिशय सुंदर असे, जरीचे दाक्षिणात्य पोशाख केलेल्या त्या मुली सुंदरच दिसत होत्या. सगळा सोहळा त्यांनी खूप भक्तीभावाने बघितला. आणखी काही परदेशी स्त्रिया पण दाक्षिणात्य पद्धतीचे पोशाख करून आलेल्या होत्या. काही जणी छान जरीच्या साड्या नेसलेल्या होत्या. काही तर खूपसे गजरे पण माळून आल्या होत्या. फुले तिथे खूप दिसत होती. मी विचारल्यावर कळले, भारतातून मागवली होती, ह्या पूजेसाठी खास.

आपले सोहळे , रंगीत कपडे सगळ्या जगात एक आनंदाचा विषय असतो.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments