पत्र क्र ५९

आग्नेय आशियातील अलीकडचा अतिशय महत्वाचा देश म्हणजे सिंगापूर. ९ ऑगस्ट १९६५ ला स्वतंत्र झालेला. गेल्या पंचावन्न वर्षात त्यांनी अगदी सोने केले त्या देशाचे. जेव्हा हा देश स्वतंत्र झाला तेव्हा, ती सिंगापूर...

कीर्ती वडाळकर
||4 min read

जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र ५९ आग्नेय आशियातील अलीकडचा अतिशय महत्वाचा देश म्हणजे सिंगापूर. ९ ऑगस्ट १९६५ ला स्वतंत्र झालेला. गेल्या पंचावन्न वर्षात त्यांनी अगदी सोने केले त्या देशाचे. जेव्हा हा देश स्वतंत्र झाला तेव्हा, ती सिंगापूर नदी अत्यंत प्रदूषित आणि घाण होती. तीरावर सगळ्या झोपड्या होत्या. बघण्यासारखे काहीच नव्हते. हे आज सांगूनही खरे वाटणार नाही इतकं सगळं बदललं आहे. ती नदी तर अगदी सुंदर आहे आज. आजूबाजूचा परिसर ही तितकाच छान आहे. अगदी पहिल्यांदा या देशाचे दर्शन झाले आणि तो देश मनोमन आवडला. स्वच्छता, शिस्त, आखीवरेखीव शहर, बगीचे सगळंच आकर्षक वाटले. मला आठवतं , पंचवीस वर्षांपूर्वी त्यांच्या कडे गाडयांना टोल भरण्यासाठी स्टिकर लावलेले होते. एखाद्या चालकानी कुठला नियम मोडला तर दंडाची रक्कम हि त्यातूनच वसूल होत असे. कुठेही थांबावे लागत नसे. गाड्या पण अद्ययावत. रस्त्यावर अर्थातच गर्दी असे, ती आजही आहेच पण त्या गर्दीलाही शिस्त आहे. सर्वच देशाचे नागरिक तिथे गुण्यागोविंदाने राहतात. अनेक प्रकारची राहण्याची हॉटेल्स इथे आहेत. बस , टॅक्सी सेवा चांगली आहे. हल्ली भूमिगत रेल्वेसेवा पण खूप छान आहे. मोक्याच्या ठिकाणी उतरून आपल्या ईच्छित स्थळी चालत जाता येते. पर्यटकांच्या दृष्टीने ह्या सोयी खूपच उत्तम आहेत. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरायला जाणे त्याने सोपे जाते. एका ट्रिप मध्ये तर आम्हाला हॉटेल जवळच सेमिनार चे ठिकाण होते. पण नुकत्याच कार्यरत झालेल्या त्या भूमिगत रेल्वेचा अनुभव तर घ्यायलाच हवा न? अतिशय मस्त! चांगी विमानतळ तर एक खूप मोठा, अतिशय गजबजलेला विमानतळ आहे.जगातला जास्तीत जास्त प्रवासी आणि सामान वाहतूक करणारा सगळ्यात व्यस्त विमानतळ. जगभरात सगळीकडे इथून विमाने जातात. सर्वोत्तम विमानतळ म्हणून अनेक वर्षे स्वतःचे स्थान अव्वल ठेवणारा चांगी विमानतळ खरोखर खूप चांगला आहे. चार प्रवासी टर्मिनल्स आणि त्यांना जोडणारा ज्वेल चांगी मॉल, बांधकाम आणि सजावटीचे उत्तम नमुने. आतमध्ये फुलांची आणि रंगीत झाडांची मांडणी इतकी कलात्मक केलेली असते कि मुद्दाम जाऊन बघावी. सर्व प्रकारच्या वस्तूंची दुकाने, विविध देशांचे पदार्थ विकणारी अनेक हॉटेल्स, आराम करण्यासाठी शांत हॉल्स आणि वेळ पडल्यास थोडा वेळ राहण्याची पण सोय. एरव्ही आपण कमीतकमी वेळ विमानतळात घालवावा लागेल असे नियोजन करतो पण चांगी साठी मात्र तसे नक्कीच करू नये. उत्तम विमानतळाचे अनेक पुरस्कार चांगीला मिळतात. सिंगापूर एयरलाईन्स अतिशय अद्ययावत आणि चांगली विमानसेवा आहे. आणि जगभरात शंभरपेक्षा जास्ती ठिकाणी त्यांची सेवा आहे. सिंगापूर चा व्हिसा ऑनलाईन मिळतो. त्यामुळे विमानतळातून बाहेर पडणे अगदी सोपे होते. एकदा आम्ही सिंगापूर मार्गे जात होतो. विमान सिंगापूर एअर लाईन्स चे असल्याने ते तिथे बदलायचे होते. दोन विमानात बराच काळ होता. एक सिंगापूर प्रेमी मित्र पण होता सोबत. काही काळ तो तिथे राहिला पण होता. सहज म्हणाला, "आधी न जर दोन विमानांमध्ये जास्ती वेळ असेल तर हे लोक प्रवाशांना फिरवून आणत ." चला चौकशी करू, आणि खरंच की ! ती सेवा चालू होती. अचानक पणे आम्ही पुन्हा एकदा सिंगापूर फिरून आलो. अर्थात ह्या घटनेला बराच काळ झाला, तेव्हा नवीन चांगी विमानतळ आणि तो ज्वेल चांगी नव्हते बनलेले, मग पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असा काहीतरी डाव टाकलाच पाहिजे न? सिंगापूर म्हणजे खरेदी हे गणित अगदी पक्के बसलेय लोकांच्या डोक्यात. खूप चांगल्या प्रतीच्या वस्तू तिथून खरेदी करता येतात. अगदी आधी पासून शॉपर्स चा स्वर्ग म्हणून हा देश ओळखला जायचा. अजून मॉल संस्कृती आपल्याकडे यायची होती पण त्या काळामध्ये त्यांच्याकडे अनेक मॉल्स होते. सिमलिम स्क्वेअर मध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेण्यासाठी लोक धावत असत. सगळ्यात कौतुक त्यावेळेचं होतं की तिथले मुस्तफा मार्केट 24 तास चालू असतं. अगदी रात्रीच्या कुठल्याही प्रहरी तुम्ही गेलात तरी सगळ्या वस्तू तुम्ही तिथे विकत घेऊ शकता. प्रामुख्याने तिथल्या मोठ्या मोठ्या मॉल्स साठी हा देश सुरुवातीपासूनच प्रसिद्ध आहे. अतिशय सुंदर चकचकीत असे हे मॉल. किती ठिकाणी तुम्ही भेट द्याल तेवढं कमीच. जगभरातील नावाजलेले ब्रँड इथे मिळतात. खूप प्रकारच्या वस्तू. आणि लांबच लांब मॉल्स. फिरा आणि खरेदी करत रहा. डिसेंबर जानेवारी त्यांचे खास महिने. इतकी सुंदर सजावट करतात, दिवे, फुलं , लहान वस्तू, काय न काय. ३१ डिसेंबर १९९९ ला आम्ही तिथे होतो. सन २००० चे स्वागत करायला शहरभर नुसता सोहळा सजला होता. आम्हीपण खूप फिरलो त्यात. प्रत्येक हॉटेल नी मोठी पार्टी ठेवली होती. आणि जल्लोष होता नुसता. एवढ्या रात्री आम्हाला फिरवायला आमचा गाडीवान हजर झाला, आम्हाला आश्चर्य वाटलं, पण तो म्हणाला, "जास्ती पैसे देऊन मी हे काम घेतले आहे, मला माझी जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. नाहीतर तुम्ही पुन्हा माझ्या देशाचे नाव घेणार नाही आणि तुमच्या मित्र मंडळींनाही इथे येण्यापासून परावृत्त कराल." नवीन शतकाचे स्वागत करण्याची पार्टी करण्यापेक्षा त्याला त्याची जबाबदारी महत्वाची वाटली. जगभरातील पर्यटक जर खरेदीच्या उद्देशाने येत असतील तर त्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त. पण ग्राहक संरक्षक लेमन कायदा खूप कडक आहे. एकदा असेच एका दुकानातून काही वस्तू घेतली. पुढे गेलो, तीच वस्तू दुसऱ्या दुकानात निम्म्या किमतीत! आम्हाला धक्काच बसला. आता काय करावे? पण त्या दुसऱ्या दुकानदारानेच तिथल्या पोलीस कडे जाण्यास सांगितले. पोलीस सोबत आला आणि त्या पहिल्या दुकानदाराने वस्तू परत घेत पूर्ण पैसे परत दिले. लेमन कायद्या अंतर्गत जर ग्राहकांची कुठल्याही प्रकारे फसवणूक झाली तर ग्राहक न्याय मागू शकतो. आणि तिथे कायद्याचे पालन करणे अनिवार्य असल्याने असेल दुकानदार पण सांभाळून वागत असावेत. पहिल्या भेटी मध्ये सिंगापूर नदी, मरीना तलाव आणि आजूबाजूचा परिसर जसा बघितला तसा तो आजही लक्षात आहे. पण त्यात आजच्या घडीला खूप बदल झालेला आहे . अनेक नवीन नवीन उंचच उंच इमारती झाल्या आहेत. मात्र पहिल्यांदा बघितलेला, तो तोंडातून पाणी बाहेर टाकणारा मर लायन आजही तसाच आहे आहे.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments