पत्र क्र ५८
"जीवन मे एक बार आना सिंगापूर", असं काहीसं जुनं गाणं होतं. मी मात्र एक बार नाही चांगली चार बार सिंगापूरला जाऊन आली. पहिली आठवण मला सिंगापूरची खूप चांगली आहे कारण भारताबाहेर परदेशी ठेवलेलं पहिलं पाऊल...
जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र ५८ "जीवन मे एक बार आना सिंगापूर", असं काहीसं जुनं गाणं होतं. मी मात्र एक बार नाही चांगली चार बार सिंगापूरला जाऊन आली. पहिली आठवण मला सिंगापूरची खूप चांगली आहे कारण भारताबाहेर परदेशी ठेवलेलं पहिलं पाऊल सिंगापूर ला होतं. तेव्हा अजून सिंगापूर फारसं विकसित झालेलं नव्हतं . अर्थात तरीही ते आपल्यापेक्षा खूपच पुढे होतं हे नक्की. सुंदरसा चांगी विमानतळ. तिथला तो जाडजाड गालिचा, आजही लक्षात आहे आणि भारतीयांवर विशेष लक्ष ठेवणारे तिथले पोलीस. कारण भारतीय लोक कुठेही बसून खातात म्हणे, आणि आमच्या एअरपोर्ट मध्ये कचरा करतात, असं त्या स्त्री पोलिसाने मला सांगितलं. अतिशय स्वच्छ, सुंदर, नीटनेटका आणि ऑर्किडच्या खूप मोठ्या मोठ्या अरेंजमेंट केलेला तो विमानतळ आजही लक्षात आहे. ऑर्किड त्यांचे राष्ट्रीय फुल आहे न. आज त्या विमानतळाचे स्वरूप भव्य आहे. अनेक टर्मिनल्स, आणि जगात कुठेही पोचणारी विमाने! अगदी सुरुवातीला जेव्हा तिथे गेलो तेव्हा जे सिंगापूर पाहिलं त्यात आजपर्यंत खूप बदल झालेला आहे. एखादा छोटा देश इतकी प्रगती करू शकतो याचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे सिंगापूर. पंचवीस वर्षे पूर्वी पर्यंत प्यायचं पाणी सुद्धा बाहेरून विकत घेणारा सिंगापूर आता त्या प्यायच्या पाण्या मध्ये आत्मनिर्भर आहे. बाजूच्या मलेशिया मधून पाईपलाईन टाकून पाणी आणण्याचे काम काही वर्षांपर्यंत त्यांनी केलं आता मात्र पावसाचे पाणी साचवून आणि समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरण्यायोग्य करण्याचा मोठा उद्योग त्यांचा आहे. सर्वच बाबतीत जगाच्या पुढे विचार करणारा हा देश मला खरोखर खूप आवडतो. सर्व भागांमध्ये देशोदेशीचे नागरिक तिथे मजेत फिरताना दिसतात. अतिशय कमी भूभागावर वसलेला हा देश आकर्षक आहे आणि दरवेळेला तिथे काहीतरी नवीन केलेलं दिसतं. साहजिकच आहे म्हणा, पर्यटनावर जर खूप जास्त भर दिलेला आहे तर पर्यटकांना सतत काहीतरी नवीन देत राहणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच त्याच गोष्टी बघायला पैसा खर्च करून लांबलांबून पर्यटक येणार नाहीत. अतिशय छोटासा असा हा देश सिंगापूर! देश आणि देशाची राजधानी दोन्ही एकच. असं म्हणतात अनेक वर्षांपूर्वी भारतातून तामिळी लोक तिथे गेले आणि त्यांच्या कष्टाने या देशाच्या प्रगतीमध्ये खूप साथ दिली. आजही सिंगापूरमध्ये ज्या चार आधिकारिक भाषा आहेत त्यात इंग्लिश, मलाय, मँडरिन सोबत तामिळ पण आहे. अनेक रहिवासी भारतीय आपल्याला तिथे भेटतात. आपुलकीने आपली चौकशी करतात. त्यांची माहिती सांगतात. छोटासा लिटील इंडीया भाग पण छान आहे. तिथे मिळणारे तामिळ जेवण प्रसिद्ध आहे. सुरवातीला केळीच्या पानावर वाढत असत ते. भारतीय पदार्थ खाऊन बरेच दिवस झाले असतील तर हा ब्रेक अगदी स्वागतार्ह. अनेक तामिळ ,भारतीय हॉटेल्स इथे आहेत. तसेच भारतीय वस्तू विकणारी दुकाने पण आहेत. बरेच नागरिक भारतीय वंशाचे आहेत आणि अनेक दशके सिंगापूरमध्ये राहात आहेत. त्यांची चांगली सोय होत असेल. एक मुख्य बेट आणि सोबत 60 पेक्षा जास्ती छोटी छोटी बेटे म्हणजे या देशाचा भूभाग. बराचसा भूभाग हा समुद्रात भराव घालून तयार केलेला आहे. त्यावरूनच अनेक राष्ट्रांशी त्यांचे वाद होतात. पर्यावरणास हानी पोहचते पण ह्या राष्ट्रा कडून इतर अनेक बाबतीत पर्यावरण रक्षणाचे खूप प्रयत्न केले जातात. समुद्रातला सगळ्यात मोठा सोलर प्लॅन्ट त्यांनी उभारला आहे. आणि येत्या चार वर्षात सोलर पॉवरचा वापर ते चौपट करणार आहेत. जगातील दोन नंबरचा सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असलेला हा देश. लोकसंख्येची घनता जास्त असणे ओघानी आलेच, भूमी कमी आणि माणसे जास्त . आणि त्यामुळे गगनचुंबी इमारतीच खूप. राहण्यासाठी घरे आणणार कुठून नाहीतर? अठराशे अठरा च्या सुमारास ब्रिटिशांनी या बेटावर पहिले तळ ठोकला आणि राष्ट्रनिर्मिती ला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धात 1942 मध्ये सिंगापूर हे जपानच्या ताब्यात होतं. 1945 ला जपान नी शरणागती पत्करली आणि पुन्हा सिंगापूर ब्रिटिशांकडे आलं. 1959 मध्ये ब्रिटिशांनी मलेशियाचे, जे चार देश एकत्र करून नवं राष्ट्र तयार केले त्यात एक सिंगापूर पण होतं. मात्र अनेक गोष्टींवर एकवाक्यता न झाल्यामुळे सिंगापूर वेगळं झालं आणि एक स्वतंत्र राष्ट्र उदयाला आलं . सुरुवातीला अनेक संकटांचा सामना या देशाला करावा लागला. अंतर्गत कलह आणि नैसर्गिक साधन सामग्रीची कमतरता असल्यामुळे खरं तर अतिशय कठीण परिस्थिती होती. जमीन , पिण्याचे पाणी काहीच नव्हते. त्यातूनही इतक्या कमी काळामध्ये आज अतिशय प्रगत असा हा देश निर्माण झाला. ईथे राहणे अतिशय सोपे आहे, गुन्ह्यांचा रेट कमी आहे, स्त्रियांनापण राहण्यासाठी सुरक्षित आहे. जरा महाग पण अत्यंत प्रगत. तिथले शिक्षण, आरोग्य सुविधा, सर्वच अतिशय प्रगत. आयुर्मान सुद्धा खूप जास्ती. एकूणच पूर्णपणे उत्तम असा हा देश. त्याच्या नावाची कथा पण रोचक. सिंगा म्हणजे लायन, सिंह . सगळे सिंहासारखे निधड्या छातीचे लोक इथे राहतात, सिंहासारखे प्राप्त परिस्थितीला हात देऊन विजयी होणारे लोक येथे राहतात वगैरे, वगैरे आपल्याला ते अभिमानाने सांगतात. आधी त्याचं नाव होतं सिंह पुरा. त्या काळात तिथे पोहोचलेल्या तामिळ आणि मलाय लोकांच्या भाषेतून सुद्धा, सिंगा किंवा सिंह याचा अर्थ एकच आणि म्हणून त्याला सिंगापूर असं नाव पडलं, असं सांगतात . नावात काय आहे म्हणायला गेलं तरी देशात मात्र नक्कीच खूप काही आहे. जे बघण्यासारखं म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप जास्ती आहे.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.