पत्र क्र ५७
अनेक जटील समस्यांना तोंड देऊनही पर्यटकांचा लाडका बनलेला देश म्हणजे मालदीव. पण खरं सांगू का, जेव्हा आपण पर्यटक म्हणून जातो, आपण त्या देशाबद्दल संपूर्ण अनभिज्ञ राहतो. कारण त्यांच्या पासून आपण खूप लांब...
अनेक जटील समस्यांना तोंड देऊनही पर्यटकांचा लाडका बनलेला देश म्हणजे मालदीव. पण खरं सांगू का, जेव्हा आपण पर्यटक म्हणून जातो, आपण त्या देशाबद्दल संपूर्ण अनभिज्ञ राहतो. कारण त्यांच्या पासून आपण खूप लांब असतो. अतिशय सुंदर, नितळ समुद्रकिनाऱ्यावर, एका छोट्याशा बेटावर आपले रिसॉर्ट असते, जिथे फारशी मंडळी नसतात. अतिशय अद्ययावत असे ते रिसॉर्ट असते. तुम्ही त्या बेटावर खूप मजा करता. आणि परत जाता. स्थानिकांशी संबंध येऊच शकत नाही. त्या रिसॉर्ट वर काम करणारे एखाद दोन कामगार वगळता, तुम्ही त्यांच्या संपर्कात येतच नाही. काही टूर कम्पन्या राजधानी माले ची छोटीशी सफर घडवून आणतात. तिथला राष्ट्राध्यक्षांचा राजवाडा, वस्तू संग्रहालय, सुलतान पार्क, आणि वेगवेगळी मार्केट्स, बघायला मिळतात. ते फिश मार्केट किंवा भाजी आणि फळं मार्केट म्हणजे, विविध दिशांनी बोटीवरून माल येतो. तो उतरवून घेतात आणि लिलाव करतात. पण नेहेमीची मोठी आणि ऐसपैस मार्केट्स ज्यांनी बघितलीत त्यांच्या साठी हे अत्यन्त छोट्या प्रमाणा वरचे मार्केट. पण बघायला मजा येते. सकाळी लवकर तिथे खूप कारभार घडतो, नंतर शांतता.
मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे आणि आजही मोठमोठ्या बोटी खोल समुद्रात जाऊन मासेमारी करून येतात. पर्यटन हाही तितकाच किंबहुना जास्त महत्वाचा व्यवसाय. हस्तकला ही काही ठिकाणी बघायला मिळते. स्त्रियांच्या कपड्यांवर अप्रतिम भरतकाम दिसते. शंख आणि प्रवाळ वापरूनही वस्तू बनवतात. पण ह्या सगळ्या वस्तू मला खूप महाग वाटल्या. दुरदुरून पर्यटक येतात त्यांना कदाचित डॉलर मधले हे भाव रास्त वाटतही असतील. पण आपल्या गोव्यात किंवा केरळ मध्ये त्यापेक्षा चांगल्या वस्तू मला दिसल्या होत्या.
राजधानी माले जशी कमी पडू लागली तशी बाजूला समुद्रात भराव घालून, हूलहूमाले जोड शहर म्हणून अस्तित्वात आले. इथे जरा नवीन पद्धतीच्या इमारती बांधल्या आहेत. त्यात काही बहु मजली पण आहेत. ह्या बेटाची सफर पण मस्त होती. माले च्या पुढे, दुसऱ्या दिशेला, एक अतिशय शांत बेट आहे, विलिंगीली . तिथे काहीजण मिळून किनारा वाचवणे, पर्यावरण रक्षण करणे अशा मोहिमांमध्ये आहेत. त्यांनाही भेटलो. जशीजशी लोकसंख्या वाढते तसतसे अनेक प्रश्न भेडसावतात, नुसताच राहण्याचा प्रश्न आपल्या समोर येतो. ह्यात अन्नधान्याची वाढीव मागणीही आलीच. पण खूप मोठ्या प्रमाणावर तयार होणारा कचरा हा सगळ्यात कठीण प्रश्न. गावं तर अतिशय स्वच्छ दिसत होती. सकाळीच सगळा कचरा जमा करून नेतात. एका मोठ्या जहाजावर जमा करतात. ते जहाज दूर समुद्रात जाते आणि सगळा कचरा सागराय स्वाहा . अरेरे, काय हे? त्यांना विचारले, तर म्हणाले कचऱ्याची विल्हेवाट लावायचा हाच एक पर्याय आम्हाला सुचतो. पुढेमागे आम्ही त्याचे कारखाने तयार करू, पण तोवर मात्र आमचा त्राता समुद्रच.
शिक्षण म्हणाल तर, कमीच. बेटांवर शाळा आहेत. प्राथमिक किंवा माध्यमिक स्तरापर्यंत. तीन प्रकारच्या शाळा आहेत, एक कुराण शिकवणाऱ्या, त्यांच्या धिहेव्ही भाषेतून शिकवणाऱ्या आणि इंग्रजीतुन शिकवणाऱ्या. पहिल्या दोन प्रकारच्या शाळा सगळीकडे आहेत. सरकार शिक्षणाकडे खूप लक्ष देत आहे. एकूण सरकारी खर्चाच्या २० टक्के खर्च हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर होतो. त्यामुळेच कि काय साक्षरतेचे प्रमाण जवळपास ९९ टक्के आहे. मात्र उच्च शिक्षणासाठी परदेशीच जावे लागते. बहुतेक मुलं थायलंड मध्ये उच्च शिक्षणासाठी जातात. भारतात पण येतात. अनेक विकासकामे चीनच्या मदतीने सुरु आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी चीनला हि जातात.
आरोग्य सुविधाही जेमतेम. कुठलाही मोठा आजार असो, माणूस जर श्रीमंत असेल तर लगेच भारतात जाईल. अन्यथा उपचाराअभावी मरेल . खूप जणं तिरुअनंतपुरम चा आसरा घेतात उपचारांसाठी. स्थानिक दवाखाने किंवा डॉक्टर कमीच. उच्च शिक्षणाचा अभाव सर्वच क्षेत्रात जाणवतो. आमचे विद्यार्थी असलेले अभियंते , काही भारतातून , काही थायलंड मधून तर काही श्रीलंकेतून शिकून आले होते. युनिव्हर्सिटी अजून व्हायची होती. त्यामुळे फार कमी लोक उच्च शिक्षित सापडतात.
रविवार ते गुरुवार आठवडा. शुक्रवार, शनिवार सुट्टी. म्हणजे अगदी सगळं बंद. शुक्रवार चा नमाज झाला की लोक बाहेर पडतात. बरेचसे जण समुद्रकिनारी बारबेक्यू ची मजा घेतात. सगळा कुटुंब कबिला समुद्रकिनारी गर्दी करून असतो. इतके लोक एवढे दिवस कुठे दडलेले होते असा प्रश्न पडावा. जोवर बायका स्वयंपाक करतात तोवर पुरुष मंडळी मुलांना समुद्रस्नान करून आणतात, कोणी प्रवाळ बघत असतात. कोणी मासे, कोणी किनाऱ्यावरचे खेळ खेळण्यात दंग असतात. संध्याकाळनंतर जेवणखाण उरकून घरी परत. सगळा किनारा जागा होतो काही वेळासाठी. आणि पुन्हा शांत, पुढच्या शुक्रवार पर्यंत. एक मित्र म्हणाला, त्याला समुद्र खूप आवडतो. तो शुक्रवारी जो स्वतःची बोट घेऊन जातो तो सरळ शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळीच येतो. बोटीतच राहतो. संपूर्ण कुटुंब घेऊन जातो. आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे समुद्रावरच्या सर्व साहसी खेळात तो वाकबगार होताच पण त्याची दोन लहान मुले पण खोल समुद्रात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उडी मारण्यात निष्णात झाली होती. तिथेच पकडून मासे खायचे, थोडेफार बोटीवर शिजवायचे आणि साहसी खेळ करायचे.
बरेच जण हिंदी जाणतात. सिनेमांमुळे असेल किंवा वारंवार भारतात जावे लागते म्हणूनही असेल. हिंदी गाणी पण गातात. पर्यटकांना आकर्षित करण्याचे सर्व कसब आहे त्यांच्यात. खोल समुद्रात फिरवून आणण्यासाठी अनेक टूर्स असतात. आणि तो एक खूप छान अनुभव होता. स्पीडबोट नी लांब लांब घेऊन जातात. खूपसे डॉल्फिन्स दिसतात. अनेक प्रकारचे समुद्री जीव दिसू शकतात.
किनाऱ्यावर पांढऱ्या शुभ्र प्रवाळांचा, रंगी बेरंगी शंख शिंपल्यांचा खच पडलेला असतो. किती वेचाल? प्रवाळ तर आणता नाही येत. वाळूही पांढरी शुभ्र! समुद्र अनेक रंग धारण करणारा, कधी निळा तर कधी गडद हिरवा, जसा सूर्य असेल तसा रंग. डोळ्यांचे पारणे फिटेल असे सौंदर्य! सूर्योदय आणि सूर्यास्त तर विशेष सुंदर! आपल्या रंगपेटीत असलेले सर्व रंग जणू काही निसर्ग उधळत असतो. मुद्दाम जाऊन बघण्यासारखे! समोर शांत रत्नाकर, त्याच्या नितळ सुंदर पाण्याचे रंग, रंगीत प्रवाळ, सुळसुळणारे मासे आणि आकाशातील अनोखी रंगपंचमी! केवळ अद्भुत!
अस्तित्वाची कठीण लढाई लढत प्रगती करण्याच्या प्रयत्नात असलेला असा हा आपला शेजारी देश , मालदीव!
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.