पत्र क्र ५६
जिथे देशाच्या अस्तित्वाचीच लढाई आहे, असा सुंदरसा प्रदेश, मालदीव. पर्यटक म्हणून आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा अस्तित्वाची हि लढाई कदाचित आपल्याला कळणार ही नाही. कारण आपण सरळ एखाद्या सुंदरशा बेटावर च...
जिथे देशाच्या अस्तित्वाचीच लढाई आहे, असा सुंदरसा प्रदेश, मालदीव. पर्यटक म्हणून आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा अस्तित्वाची हि लढाई कदाचित आपल्याला कळणार ही नाही. कारण आपण सरळ एखाद्या सुंदरशा बेटावर च जाणार न. जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी सतत वाढते आहे, आणि ही बेटे पाण्याखाली जाण्याची खूप भीती आहेच पण वाढत्या लोकसंख्येमुळे घरांचा आणि इतर सुविधांचा गंभीर प्रश्न तयार झाला आहे. अन्न , वस्त्र, निवारा, पेयजल, अशा सर्वच सुविधा पुरवणे कठीण आहे.
२६ अटोलस मधून विभागलेल्या जवळजवळ बारा हजार, लहान लहान बेटांचा समूह. समुद्रात जरी ८२० किलोमीटर पर्यंत पसरला असला तरी देशाचा भूभाग केवळ ३०० चौरस किलोमीटर आहे. इतक्या मोठ्या पसाऱ्याचा कदाचित एकमेव देश असेल जगात. बेटाच्या आसपास अनेक सुंदर सुंदर प्रवाळ आहेत. अनेक ठिकाणी ती जिवंत आहेत, म्हणजे ती नैसर्गिक रित्या वाढतात. त्याचा फायदा बेटाला असा होतो कि त्यात पाणी अडकून सरोवर तयार होते. आणि बेटावर धडकणाऱ्या लाटांचा प्रभाव थोडा कमी होतो. ओहोटीच्या वेळी अशा प्रवाळांच्या सरोवरांना भेट देणे म्हणजे एक अभूतपूर्व अनुभव. एरव्ही, विशिष्ट चष्मे लावून, पाण्याखाली जाऊन दिसणारे प्रवाळ, अगदी उघड्या डोळ्यांना दिसतात. उथळशा पाण्यात फिरत प्रवाळ बघता येते. नितळ स्वच्छ पाणी , त्यात रंगीबेरंगी प्रवाळ आणि सुळसुळ करत जाणारे अनेक मासे. मस्त वाटते बघायला.
काही बेटांवर शेती करतात. पण कायद्याने कोणीही जमीन विकत घेऊ शकत नाही. तांदूळ हे मुख्य अन्न . ते बऱ्यापैकी पिकते. जोडीला बाजरी, मकाही होतो. बरीच फळे ही पिकतात. अननस, रामफळ, निरफणस , नारळ, ऊस, आंबा, पपई, कलिंगड, ड्रॅगन फ्रुट, पॅशन फ्रुट अशी अनेक प्रकारची फळे होतात. भाज्यांमध्ये लाल भोपळा, बटाटे, रताळे, पडवळ, पुदिना, आलं, मिरची, वांगी, पालक, अशा अनेक भाज्या होतात. पण लोकसंख्येच्या प्रमाणात त्या कमीच पडतात. मसाले मात्र भारत किंवा श्रीलंकेतून येतात. त्यांच्या पदार्थात, मुख्यत्वे, भात , नारळ आणि मासे. बाकी भाज्या वगैरे खातात. सर्व पदार्थ मसालेदार असतात. मालदीव ला येऊन, मासे नाही खाल्ले तर काय उपयोग? असे अनेक जण म्हणत होते. पहिल्यांदाच त्यांना आम्ही शाकाहारी आहोत असे सांगितले तरी जेवणाच्या टेबलवर अनेक माशांचे पदार्थ सजवलेले. मी आठवण द्यायला गेले तर म्हणे हीच आमची भाजी! मग सांगितले आम्ही कि आम्ही हे नाही खात. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. "अहो आम्ही तर मासे खाण्याशिवाय कोणी जगू शकतो अशी कल्पना पण करू शकत नाही." म्हणे. धावपळ करून , एक बंगाली खानसामा शोधून आणला मग त्यांनी. मालदीव्हियन पद्धतीच्या , उत्तम चवीच्या भाज्या तो बनवत होता. मधल्या वेळेत, ते खूप छान असे त्यांचे पदार्थ मांडत. त्यातही अर्थात तांदूळ, भाज्या आणि नारळ मुख्य. काही गोड , काही तिखट. आपल्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसारखे पण बरेच पदार्थ होते. चहा, कॉफी मुबलक. श्रीलंकेतून येणारी. ट्यूना मासा मालदीव चा प्रसिद्ध. जेवणानंतर पान खाणे पण अनिवार्य. विविध प्रकारच्या आणि चवीच्या सुपाऱ्या ठेवलेल्या असायच्या. थोडक्यात सांगायचे तर त्यांची खाद्य संस्कृती भारताच्या खाद्य संस्कृती च्या जवळची वाटली. रिसॉर्ट्स मध्ये पाश्चात्य पद्धतीचे जेवण मिळू शकते. अनेक परदेशी पर्यटक येतात त्यामुळे ही सुविधा तर हवीच न?
वस्त्र परंपरा धर्माशी निगडित. पुरुष लुंगी आणि शर्ट, पण महिला मात्र लांब पायघोळ झगा , किंवा परकर आणि शर्ट, असे विविध प्रकारचे कपडे घालतात. डोक्याला स्कार्फ बांधणे अनिवार्य. म्हणजे ऑफिस मध्ये येणाऱ्या महिला पण असेच कपडे घालून येत. काही जमाती काळा बुरखा घालतात, पण बाकी बायका नाही. त्यांनी रंगीत कपडे घातलेले पण बघितले. त्यांचे स्वतःचे बरेच कापड बनवण्याचे कारखाने आहेत असं कळलं, पण तिथे जाता आलं नाही. तिथल्या जरी सगळ्या बेटांवर मानवी वस्ती नसली, तरी जिथे आहे तिथे सगळीच कडे बाहेरील माणसे जाऊ शकतात असे नाही. त्या त्या बेटावरच्या रीती वेगळ्या! म्हणूनच काही ठिकाणी सरकारी माणूस असायचा बरोबर.
सगळ्यात मोठी समस्या घरांची. एक पुरुष चार लग्न करू शकतो, पण त्याच्या सर्व बायका वेगळ्या राहायला हव्यात. राजधानी माले आधीच खूप दाट लोकवस्तीचा सामना करत आहे. इतकी छोटी छोटी घरे आहेत तिथे. चार चार मजले बांधलेत, पण खोल्या चिंचोळ्या. जमीन सगळी सरकारी मालकीची. त्यावर घर बांधून राहणे स्वस्त नाही. सरकारी नियम कडक आहेत. राजधानी माले मध्ये काही प्रोजेक्ट्स टाटा हाऊसिंग तर्फे चालू होते.
सरकारी अधिकाऱ्यांनी एक दिवस आम्हाला त्यांची काही बांधकामं बघायला , एका बेटावर नेलं. तिथे समुद्रात भराव घालून जमीन तयार करण्याचे काम चालू होते. काही ठिकाणी बांधकामे ही आकार घेत होती. पण समुद्रात घातला जाणारा भराव बघून मी विचारलं, " तुम्ही पर्यावरणाचा विचार का नाही करत? इतका जास्त समुद्र जर तुम्ही बुजवला, तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात न? आधीच पर्यावरणाच्या झालेल्या अपिरिमित हानी मुळे तुमचाच देश धोक्यात आहे." त्यावर ते म्हणाले, " बरोबर आहे तुमचं म्हणणं मॅडम, पण सगळ्यात आधी माणूस जगला पाहिजे मग बाकी गोष्टींचा विचार करू न ? चार चार लग्न केलीत कि एका व्यक्तीला निदान १२, १३ मुलं होतात. भविष्याचा विचार केला तर राहतील कुठे इतकी कुटुंबे? आमच्या कडे जे काही आहे तो हा समुद्रच. मग जिथे उथळ भाग असतो तिथे भराव घालून आम्ही जमीन तयार करतो आणि घरे बांधतो. " खरंच आहे, अत्यंत जटिल असा हा प्रश्न कसा सुटणार?
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.