पत्र क्र ५५
नितळ सुंदर पाण्याचा समुद्र किनारा लाभलेला मालदीव ! पाचूची बेटे! अनेक बेटांचा समूह म्हणजे एक देश. विमानातूनच प्रत्यय येतो, कि पाचूची बेटे नाव का पडले असेल. निळ्या हिरव्या अथांग सागरात कुठे कुठे...
नितळ सुंदर पाण्याचा समुद्र किनारा लाभलेला मालदीव ! पाचूची बेटे! अनेक बेटांचा समूह म्हणजे एक देश. विमानातूनच प्रत्यय येतो, कि पाचूची बेटे नाव का पडले असेल. निळ्या हिरव्या अथांग सागरात कुठे कुठे विखुरलेली छोटी छोटी बेटे. त्यांच्या भोवती पाण्याचं असं काही कवच तयार झालेलं दिसतं कि खरंच पाचूची अंगठी वाटावी. सूर्यप्रकाशाचा महिमा! सर्व भूमी समुद्रात. बरेच ठिकाणी भूमी , समुद्रात भराव घालूनच , तयार केलेली. बेटं तर इतकी लहान की , तासाभरात दोन फेऱ्या मारू शकू . राजधानी माले पण तशीच. आमची राहण्याची जागा मधोमध होती शहराच्या, तर दहा मिनिटात इकडचे टोक किंवा दहा मिनिटात तिकडचे टोक! अर्ध्या तासात पूर्ण गावाला फेरा मारून झाला. आणि हे राजधानीचे शहर!
साधारणपणे पर्यटक, माले च्या वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वी तिथल्याच एखाद्या रिसॉर्ट वर बुकिंग करतात. हे आवश्यक आहे. कारण बुकिंग दाखवून व्हिसा मिळतो, तिथे पोचल्यावर. व्हिसा घेऊन बाहेर आले कि रिसॉर्ट चा माणूस बोट किंवा सीप्लेन घेऊन वाट बघत असतो. त्यात बसून तुमच्या रिसॉर्ट कडे नेतो. तिथे तुम्ही बुक केल्या दिवसापर्यंत राहू शकता आणि मग परत वेलाना विमानतळ. तिथल्या जनजीवनाची फारशी ओळख होण्याचा प्रसंग येत नाही. आम्ही मात्र सरकारचे पाहुणे म्हणून गेलो होतो, तिथल्या अभियंत्यांना ट्रेनिंग द्यायला. राजधानीच्या शहरात चांगले ८ दिवस राहणार होतो. शिवाय दोन दिवस वर पण ठेवले होते. आधीच बऱ्याच इमेल मधून आमच्या सूचना आणि त्यांच्या पण सूचना देऊन झाल्या होत्या. त्यांच्या सूचनांमध्ये प्रामुख्याने पूर्ण कपडे घाला, हि होती. आता हे काय नवीन? आणि थोडे अपमानास्पद पण असे वाटले.
उतरलो तेव्हा बारा वाजले होते दुपारचे. घ्यायला येणारी सरकारात चांगल्या हुद्द्यावर कार्यरत होती. तिने पण सुरुवातीच्या फॉर्मलीटी पार पाडल्यावर पुन्हा,"कपडे डिसेन्ट घालावे लागतील तुम्हाला" असे सांगितले. मी जरा चिडूनच तिला विचारले," तुला नक्की काय म्हणायचे आहे? आम्ही काय वाईट कपडे घालतो का?" तशी माझी माफी मागून म्हणाली," मॅडम, आमच्या धर्मामुळे आम्हाला खांदे, पाय दाखवणे चालत नाही. इथे सगळे समुद्र पर्यटनाला येतात. त्यामुळे कमीतकमी कपड्यात फिरत असतात. म्हणून त्यांना त्यांच्या रिसॉर्ट हुन सरळ परत जायला सांगतात. राजधानीत फिरताना पूर्ण कपडे घालणे बंधनकारक आहे. नाहीतर पोलीस सरळ आत टाकतात. नियम कडक आहेत. " मी सांगितले," माझे कपडे नक्कीच डिसेन्ट असतील. पण बुरखा घ्यायला सांगू नकोस, तो मी मुळीच घालणार नाही." ती म्हणाली," बुरखा नाही घातला तरी चालते पण खांदे आणि पाय झाकलेले हवेत"
अशा सूचना ऐकून मगच आमचा राजधानीकडे प्रवास सुरु झाला.
आजूबाजूला बघितल्यावर लक्षात आले, बायका बुरखा घालूनच फिरत होत्या, पण चेहरा झाकलेला नव्हता. आम्हाला फिरायला भरपूर वेळ होता. एक सरकारी व्यक्ती सोबत असायची. कधी तरी आम्ही पण फिरलो. जवळपासच्या नागरी वस्तींना पण भेटी दिल्या. बस नी जावे तसे बोटींनी जात येते. काही ठिकाणी सरकारची स्पिडबोट होती आमच्यासाठी. मात्र सामान्य जनांची बोट पण छान होती. अगदी थोड्या पैशात ह्या बेटावरून त्या बेटावर. बरेच जण घरून सायकल, मोटर सायकल घेऊन त्या बोटीवर चढत होते. पुढच्या थांब्यावर आपले वाहन आपल्या हाती आहेच. बेटावर चालत जायला सोय चांगली आहे. मात्र रस्ते अत्यंत अरुंद. कारण इथे जागा आहे कुठे? जी काही थोडी उपलब्ध आहे त्यात घरे, कचेऱ्या सगळं मावलं पाहिजे न? अरुंद रस्त्यांमुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक करून शिस्त पाळली जाते.
धर्मादेशामुळे दारू मिळत नाही. म्हणजे तुम्ही बाहेरून पण आणू शकत नाही. विमानतळावरच काढून घेण्यात येईल. मात्र व्यसनांपासून दूर राहील तो माणूस कसला? रिसॉर्ट वर दारू मिळू शकते. इतका सुंदर समुद्र समोर असताना कशाला हवीय खरं तर दारू? पण जरी दारू मिळत नसली तरी सिगरेट मिळते न. जागोजागी मोठमोठे घोळके करून लोक धूर ओकत असतात. त्यात महिलाही मागे नाहीत हं. मात्र बंदिस्त ठिकाणी, सार्वजनिक वाहतुकीमध्ये, सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढणे मना आहे. त्यासाठी नेमुन दिलेल्या जागा आहेत.
वेळेचं गणित जरा विचित्र. आम्हाला ह्या वेळी नमाज पढायचा आहे, त्यावेळी पढायचा आहे, ह्यात ट्रेनिंग घ्यावे केव्हा? तर म्हणाले, तुम्हाला चालत असेल तर दुपारून सुरु करून रात्री पर्यंत घेऊ. मग दुपारी तीन पर्यंत चा वेळ पूर्णपणे फिरण्यात घालवला.
बाहेर निघालो की तिथला सेवक तत्परतेने पाण्याच्या बाटल्या आणून द्यायचा. ह्या सांभाळून न्या म्हणायचा . कारण अगदी त्या ancient mariner सारखे, " water water everywhere, nor a drop to drink " अशी परिस्थिती आहे. त्यांना पिण्याचे पाणी भारताकडून आणावे लागते. किंवा समुद्राच्या पाण्यातून क्षार काढून पिण्याचे पाणी तयार केले जाते. तशाच एका कारखान्याला भेट पण दिली. काही बेटांवर पावसाचे पाणी साचवतात आणि त्याचा वापर करतात. पाऊस तर भरपूर आणि केव्हाही पडतो.
आंघोळीचा पण म्हणूनच मोठा प्रश्न. समुद्रस्नान करतात पण पूर्ण कपडे घालून. स्त्रिया तर बुरखा घालून पाण्यात जातात. त्यामुळेच पर्यटकांना का लांबच्या बेटावर रिसॉर्ट मधेच राहता येते, त्याचा खुलासा झाला. ह्या मोठमोठया रिसॉर्ट्स नी स्वतः ची पाण्याची सिस्टिम बांधलेली असते. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचवणे आणि भारताकडून पाणी विकत आणणे, असे दोन्ही करतात. त्यामुळेच हे रिसॉर्ट्स बऱ्यापैकी महाग असतात.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.