पत्र क्र ५४

मालदीवज ! एखाद्याला नाव जरी सांगितले तरी ,"आहा, किती सुंदर "! अशीच प्रतिक्रिया येणार. अगदी ती व्यक्ती तिथे जाऊन आली नसली तरी. कारण आपण मित्र मैत्रिणींकडून , अनेक फोटोंमधून आधीच मालदीव ला भेट दिलेली...

कीर्ती वडाळकर
||3 min read

मालदीवज ! एखाद्याला नाव जरी सांगितले तरी ,"आहा, किती सुंदर "! अशीच प्रतिक्रिया येणार. अगदी ती व्यक्ती तिथे जाऊन आली नसली तरी. कारण आपण मित्र मैत्रिणींकडून , अनेक फोटोंमधून आधीच मालदीव ला भेट दिलेली असते. अनेक बेटांचा समूह म्हणजे मालदीव. संस्कृत आणि सिंहीली भाषेत ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे अनेक बेटांची माळ. जगातील, समुद्रसपाटी पासून अत्यन्त कमी उंचीवरचा देश. अगदी दिड मीटर वरचा. सगळ्यात जास्त उंची साडेसात मीटर . पुरातन काळात भारताचा भाग असलेला देश. पण नंतर वेगळा झाला. भारतातून तामिळ लोक तिथे सर्वप्रथम गेले असे मानतात. त्या नंतर श्रीलंकेतून सिंहीली लोक आले. त्याच्या मिश्र संस्कृतीतून देशाची किंवा त्या द्वीपांची संस्कृती उदयाला आली. घरे नारळाच्या झावळ्या, बांबू, पाने अशा नाशवन्त वस्तूंची बांधली जी हवामानामुळे नष्ट झाली. प्रवाळांचा वापर केलेला होता. पण त्यावेळच्या टोळी प्रमुखांनी फारसे दगडी महाल वगैरे न बांधल्याने त्या काळचे पुरावे सापडणे कठीण आहे. काही तामिळ साहित्यात मात्र ह्या राष्ट्राचा, तिथे गेलेल्या तामिळ आणि सिंहीली लोकांचा संदर्भ सापडतो.

त्यानंतर आला बुद्धिस्ट काळ. भला थोरला १४०० वर्षांचा. इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून ते १२ व्या शतकापर्यंत. राजा अशोकाने हा परिसर ताब्यात घेतला आणि ह्या भागाची प्रगती होऊ लागली. संस्कृती खऱ्या अर्थाने आकार घेऊ लागली. भाषा, लिपी, बांधकामे, प्रशासनाच्या पद्धती, प्रथा , परंपरा, सगळे ह्याच काळात खूप विकसित झाले. त्यातल्या अनेक गोष्टी आजही वापरात आहेत. अनेक ताम्रपट, स्तूपांचे अवशेष तिथे मिळाले आहेत. आणि इतिहासकार मानतात कि हा काळ त्या देशाचा सुवर्ण काळ होता.

साधारण बाराव्या शतकात मोघल आले आणि संपूर्ण देश मुसलमान झाला, तो आजतागायत. काही प्रवासी अरब व्यापार करण्यासाठी ह्या देशात पोहचले. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाने आणि व्यवहाराने शेवटचा बुद्ध राजा धोवेमी अतिशय प्रभावित झाला, आणि बुद्ध धर्म सोडून, मुसलमान झाला. राजा चे नाव मग, "जमीन आणि समुद्राचा सुलतान, बारा हजार बेटांचा मालक, मालदीवज चा सुलतान" असे झाले. भारताच्या जवळ असल्यामुळे, मध्य पूर्वेकडून येणाऱ्या व्यापाऱ्यांना इथे तळ ठोकणे सोपे जाऊ लागले.

एक मजेदार गोष्ट कळली, त्या काळात बंगाल मध्ये कवड्यांचा वापर चलन म्हणून होत असे आणि त्या कवड्या मालदीवज पुरवत असे. कवड्यांशिवाय काथ्याचाही व्यापार होत असे. अनेक व्यापारी कवड्या बंगाल ला विकण्यासाठी येत, आणि मालदीव मध्ये तळ ठोकत.

सोळाव्या शतकात गोव्याहून पोर्तुगीज आले. ख्रिश्चन धर्म प्रसार हा त्यांचा मुख्य उद्देश होता. पण तो सफल होऊ शकला नाही. मोठा उठाव झाला. आणि पंधरा वर्षातच पोर्तुगीजांना आपला गाशा गुंडाळावा लागला. २६, २७ सप्टेंबरला हा उठाव झाला त्यामुळे आजही हे दिवस राष्ट्रीय महत्वाचे दिवस म्हणून पाळले जातात.

सतराव्या शतकात डच श्रीलंकेत आले. तिथून त्यांनी मालदीवज मध्ये जम बसवायचा प्रयत्न केला. पण ह्या शतकाच्या शेवटी ब्रिटिश आले आणि त्यांनी डचांना डच्चू दिला. हळूहळू मालदीव च्या प्रशासनात शिरकाव केला, आणि अनेक वर्षे राज्य केलं .

१९५३ मध्ये ब्रिटिशांनी सुलताना ला बरखास्त केले. राज्याला प्रजासत्ताक घोषित केले. मोहम्मद अमीन डीडी ह्यांचे राज्य आले. त्यांनी बऱ्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, त्यात महिलांना शिक्षण देणे पण होते. हीच गोष्ट परंपरा वादि लोकांना आवडली नाही. दगडांनी ठेचून डीडी ला संपवले गेले. पुन्हा सुलतान आले. ब्रिटिश तर होतेच. परत एकदा प्रजासत्ताक करण्यात आले. पण ब्रिटिशांना देशाबाहेर घालवण्यावरून बंड झाले.

सरते शेवटी २६ जुलै १९६५ ला देश स्वतंत्र झाला. पुन्हा सल्तनत आली. आणि अनेक स्थित्यंतरे आणि बंड म्हणजे त्यांचा नित्यक्रम झाला. तिथले एक जण गमतीत म्हणाले कि पंतप्रधान कधी बदलेल हे कोणालाच ठाऊक नसते, त्यामुळे सकाळचा पेपर बघूनच आम्ही माहिती करून घेतो, आज कोण सत्ताधीश आहे. ह्यात गमतीचा भाग सोडून द्या, पण सत्तेची स्थित्यंतरे किती जास्ती असावीत, ह्याचा ह्यातून अंदाज येतो.

हिंद महासागरातील अनेक बेटांचा समूह म्हणजे मालदीव. अनेक नागरी स्थित्यंतरांना सामोरे जाऊन आजही जग भरातील अनेक प्रवाशांना आकर्षित करतो. अनेक बेटांवर उत्तम अशा सुविधा प्रवाशांसाठी तयार केल्या आहेत. सुंदर, नितळ आणि स्वच्छ समुद्र म्हणजे इथली खासियत. आरस्पानी सौंदर्य! अथांग अशा त्या रत्नाकराच्या तळाचा वेध घेता येईल असे पारदर्शक पाणी. खूप ठिकाणी अनेक रंगीबेरंगी मासे एकसाथ पोहत असतात. मुंबई सारखेच दमट हवामान असले तरी हवेत बराचसा गारवा जाणवतो. पण दिवसभरात तापमानात खूप फरक होतो. त्यांनी सांगितले आमच्याकडे दोनच ऋतू, हिवाळा आणि पावसाळा. पाऊस सतत आणि केव्हाही पडतो. पण पाण्याचा निचरा करण्याची सिस्टिम उत्तम आहे. कुठेही पाणी साचत नाही. दिवसात ऊन, पाऊस, थंडी असे सगळेच अनुभवायला मिळते.

जागतिक तापमान बदलामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. हा सगळ्यात मोठा धोका मालदीवला आहे. तो देश त्यासाठी चिंतीत आहेच पण जमेल तसे प्रयत्न करत आहे. मात्र वाढती लोकसंख्या हा खूप मोठा प्रश्न त्याच्या पुढे आहे.

अत्यंत शांत, स्वच्छ, उथळ असा किनारा पर्यटकांना आकर्षित न केला तरच नवल.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments