पत्र क्र ५३

मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर युगांडा मध्ये अंदाधुंदी माजली. खरं तर असं म्हणतात की त्यांच्याकडे अतिशय प्रगत असं मेडिकल ज्ञान अनेक वर्षापूर्वी होतं. जगात पहिल्यांदा सिझेरियन ऑपरेशन...

कीर्ती वडाळकर
||4 min read

1962 मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर युगांडा मध्ये अंदाधुंदी माजली.

खरं तर असं म्हणतात की त्यांच्याकडे अतिशय प्रगत असं मेडिकल ज्ञान अनेक वर्षापूर्वी होतं. जगात पहिल्यांदा सिझेरियन ऑपरेशन त्यांच्यापैकी एका जमातीने केलं होतं.

अठराव्या शतकात अनेक परकीय आक्रमणे त्यांनी झेलली. देशातील जनता टोळ्यांमधून वसत होती. त्यामुळे एकसंधता अशी नव्हतीच. आजूबाजूच्या देशांमधून अनेक प्रवासी आक्रमण करत आले . नाईल नदीच्या शोधात ब्रिटिश आले. धर्मप्रसाराच्या कार्यासाठी मिशनरी आले. मुसलमान आले. देशात एकसंधता नव्हती त्यामुळे या सर्व आक्रमणांना अर्थातच ते बळी पडले. त्यांची संस्कृती जमाती पुरती मर्यादित असली तरी ती जपायचा ते प्रयत्न करत होते. या सर्व आक्रमणांमध्ये त्यांच्या पुरातन जीवनशैलीचं बरंच नुकसान झालं. तरीही अनेक प्रथा परंपरा आजही ते पाळताना दिसतात. ख्रिश्चन आणि मुसलमान, ख्रिश्चन आणि जमाती, मुसलमान आणि जमाती अशी युद्धे होत राहिली.

तर मी सांगत होते की ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अत्यंत अंदाधुंदी माजली. पहीली सहा सात वर्ष एकमेकांशी भांडण्यात गेली. मग सेने ने बंड करून सगळं राज्य ताब्यात घेतलं. ईडी अमीन हुकूमशहा झाले आणि पुढची काही वर्षे त्यांनी अत्यंत क्रूरपणे राज्य केलं. अनेक हत्या झाल्या, दहशत माजली, गरीब जनता अक्षरश: भरडली गेली. गरिबी, बेकारी ह्यांनी त्रस्त जनता हाणामारी, चोरीमारी वर उतरली. एकूण जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं. जवळ जवळ ९, १० वर्षे असे चालले. सरते शेवटी युगांडा मधून, पळून, परदेशी गेलेल्या लोकांनी, एकी करून, शेजारील टांझानिया च्या मदतीने, हल्ला करून पुन्हा सरकार ताब्यात घेतलं आणि मग जरा स्वातंत्र्याचा श्वास मोकळेपणी त्यांना घेता आला. तोवर देशांमध्ये अनेक

भयंकर घटना घडत होत्या. नेकी आणि सचोटीने व्यापार करणाऱ्या भारतीयांना हाकलवून देण्यात आले होते. एअर फ्रांस च्या, इस्रायली आतंकवाद्यांनी पळवून नेलेल्या विमानाची कथा ही आपल्याला माहीत आहे. एंटेबी विमानतळावर २५० प्रवाशांना दहा दिवस ओलीस ठेवलं होतं .

इदी अमीन या राज्यकर्त्यांनी भरपूर अत्याचार केले.

त्या काळातील वर्णन वाचणं म्हणजे अंगावर काटा येतो. अगदी लहान लहान मुलं सुद्धा दहशत माजवण्याचे काम करत होती. तरुण पिढी खूप चुकीच्या मार्गावर लागलेली होती. शिक्षण, आरोग्यसेवा सगळ्याचाच बट्ट्याबोळ झाला होता. बहात्तर साल नंतर थोडी परिस्थिती आटोक्यात येऊन हळूहळू सुधारू लागली. सध्याचे राज्यकर्ते १९८६

साल पासून आजतागायत सत्तेत आहेत आणि परिस्थिती सुधारण्याचा निरंतर प्रयत्न करत आहेत. राजधानी कंपाला मधे लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे नेहमीचे भेडसावणारे प्रश्न म्हणजे राहण्याची जागा, ट्रॅफिक, गर्दी, असे सगळेच भेडसावू लागले आहेत.

एकूणच स्वातंत्र्यानंतरची सुरुवातीची सगळी वर्ष जवळजवळ फुकट गेली. त्यानंतर ऐंशी

- नव्वदच्या दशकात थोडेफार जनजीवन सुरू झालं. त्यांच्याकडे अजून स्वतःची रेल्वेही नाही. जे श्रीमंत आहेत त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत. गरिबांना मात्र अतिशय खटारा अशा बसेस किंवा काही लोकल टुकटुक नावाच्या रिक्षा आहेत. त्याहीपेक्षा एकटा प्रवासी असेल तर बोडा बोडा म्हणजे दुचाकी सुद्धा मिळतात. एकूणच अंतर्गत प्रवास जरा कठीणच आहे असं मला दिसलं . रेल्वे बद्दल खूप कुतूहल आमच्या मित्र

- मैत्रिणींना होतं आणि, "भारतात आल्यावर पहिले आम्हाला तुमची रेल्वे दाखवा हं " असं त्यांनी अगदी कळकळीने मला सांगितलं होतं. सुरुवातीला यात आश्चर्य वाटलं पण देशातली परिस्थिती बघता त्यांना हे कुतूहल असणं स्वाभाविक होतं. अजूनही वाढणारी लोकसंख्या आणि अज्ञान या दोन मोठ्या शत्रूंशी ते सतत लढत आहेत.

राजधानी कम्पाला लांब लांब पर्यंत पसरलेली आहे. नागरी वस्ती मुख्य शहरापासून दूर आहे आणि त्यामुळे या टोकापासून त्या टोकापर्यंत करावा लागणारा प्रवास, ज्यात नागरीकांचा खूप वेळ वाया जातो. ट्राफिक जॅम ची समस्या खूप मोठी आहे. कुठेही जाताना वेळेचा अंदाज घेऊन निघावे लागते. सकाळी आणि संध्याकाळी कुठे जायचे म्हणजे कंटाळवाणा थांबत थांबत केलेला प्रवास.

अजूनही बरेच ठिकाणी लाकडी घर दिसतात. अगदी राजधानीच्या ठिकाणी सुद्धा. तिथल्या संग्रहालयाला भेट दिली. ईडी अमीन च्या कारकिर्दीतले अनेक प्रसंग गाईड वर्णन करून सांगतो. अगदी त्याच्या गाड्या वगैरे सुद्धा तिथे ठेवल्या आहेत.

अशा सगळ्या कठीण परिस्थितीतून वर येण्यासाठी त्यांचा जोरदार प्रयत्न नक्कीच चालू आहे

आफ्रिकेतल्या देशाबद्दल बोलताना जंगलाचा उल्लेख न करणे म्हणजे त्या देशाबद्दल काहीच न सांगणे असे होईल. युगांडा मध्ये सुद्धा एकूण जंगलाच्या जवळ जवळ १५ टक्के जमीन नॅशनल पार्क्स, गेम रिझर्व्ह वगैरे मध्ये आहे. पूर्वेकडे सवाना टाईप चे जंगल आहे तर बाकी ठिकाणी मोठ्या मोठ्या आणि घनदाट झाडांची जंगले आहेत. आफ्रिकेतले फेमस बिग फाईव म्हणजे गेंडा, हत्ती, चित्ता , सिंह आणि जंगली म्हशी, इथे दिसतातच पण अनेक प्रकारचे पक्षीही येथे आहेत. माऊंटन गोरिला हा प्राणी जो जगातून जवळ जवळ नामशेष झालेला आहे, तिथल्या एका जंगलामध्ये सांभाळला गेला आहे. तिथे गोरिला ट्रेकिंग ला जाऊन, त्या प्राण्यांना अगदी जवळून बघता येते. शिवाय अनेक प्रकारची माकडं , चिंपांजी ह्या जंगलांमधून सांभाळलेली आहेत. बहुतेक प्रवासी लोकांना ह्या जंगलांचे खूप आकर्षण असते. त्यामुळे तिथे उत्तम सुविधा आहेत.

जंगलांप्रमाणे पाणी हि इथे मुबलक. तलाव आणि नदीचा प्रदेश असेच युगांडाला म्हणतात. लेक व्हिक्टोरिया, लेक अल्बर्ट, असे अनेक मोठे मोठे तलाव तर आहेतच शिवाय नाईल नदीचा उगम च इथे होतो. भरपूर पाण्यामुळे पाण्यातील सर्व प्राणी ही इथे दिसतात. मगरी, पाणघोडे खूप आहेत. तसेच पाण्याच्या आजूबाजूला असणारे प्राणीजगत ही खूप दिसते. जंगलांमध्ये भेटी देणं तसं सोपं. अनेक लॉज जंगलांच्या मध्ये बांधलेली आहेत. त्याचं बुकिंग करून जाणं सोप आहे. तिथे सफारी पण करतात. सवाना टाईपच्या जंगलामध्ये सर्व प्राणी लांबलांबून दिसतात. उंच मानेचे जिराफ दुरून बघायला मजा येते. जंगल संपदा खूप आस्थेने जपलेली दिसते तरीही, जंगली भागात राहणाऱ्या जमातींकडून, मांसासाठी जनावरांची अवैध शिकार करण्याचे प्रसंग खूप घडतात. जंगलावर अतिक्रमण करून, आगी लावून शेती साठी जागा बळकावणे ही होते . असे असले तरी पाणी आणि जंगलांचा हा देश प्रगती कारण्यासाठी निरंतर धडपडत आहे.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments