पत्र क्र ५२
प्रत्येक देशाला स्वतःची संस्कृती, कला, साहित्य, संगीत असतं. युगांडा मध्येही मला या सर्व गोष्टी पावलोपावली भेटल्या. ६५ प्रकारच्या जनजातींचे स्वतःचे संगीत आहे. पण त्यातल्या त्यात बगांडा नावाच्या...
प्रत्येक देशाला स्वतःची संस्कृती, कला, साहित्य, संगीत असतं. युगांडा मध्येही मला या सर्व गोष्टी पावलोपावली भेटल्या. ६५ प्रकारच्या जनजातींचे स्वतःचे संगीत आहे. पण त्यातल्या त्यात बगांडा नावाच्या जमातीचा प्रभाव संगीतावर विशेष आहे. अनेक प्रकारची वाद्यं मला तिथे दिसली. एका संगीताच्या कार्यक्रमात ३ , ४ तास विविध वाद्यांची ओळख करून दिली. चामडे, धातू, तारा अशा विविध वस्तूंपासून बनलेली विविध वाद्ये. ड्रम्स आणि विविध तंतुवाद्ये ह्यांचा सुंदर मिलाफ करून उत्तम संगीत ऐकायला मिळालं. अर्थात जोडीला जोशपूर्ण नृत्य हि होतेच.
गाणं ह्या सगळ्या वाद्यांच्या साथीने म्हटलं जातं. ड्रम्स म्हणजे तर त्यांनी त्यांच्या संस्कृतीचं प्रतीकच मानलेलं आहे. जसे खूप मोठे मोठे ड्रम्स असतात तसे काही वेगवेगळ्या, लहानमोठ्या आकाराचे पण असतात. ड्रम्सच्या छोट्या प्रतिकृती बाजारात विकत मिळतात. त्यावरही जनावरांचे कातडे बांधलेले असते.
आफ्रिकेतील देश त्यांच्या वेगवेगळ्या संगीतासाठी तसेही प्रसिद्धच आहेत. जंगलांच्या प्रदेशा मुळे किंवा शिकारी बाण्यामुळे असेल कदाचित, प्राण्यांची कातडी वापरून बनवलेले ड्रम सगळीकडे दिसतात. जसे संगीत तसेच त्यांची नृत्य कला पण. प्रत्येक जण नाचात निपुण असतो. संगीताच्या तालावर फेर धरुन प्रत्येक जण नाचत असतो. फार काही कठीण हावभाव नाही पण प्रत्येकाने नाच करणे हे जीवनाचा अविभाज्य भाग असल्यासारखे ते मानतात. प्रत्येक जमातींचा स्वतःचा नाच गाण्याचा एक खास प्रकार असतो. ड्रम वाजवणारे सुद्धा तो ड्रम गळ्यात घालून नाचत असतात. त्यांचा नाच म्हणजे पूर्णपणे बेभान होऊन प्रत्येक जण त्यात सहभागी झालेला असतो. संध्याकाळ झाली की प्रत्येक पाड्यावर सगळेजण गोल करून, ड्रम आणि इतर वाद्ये वाजवत, मध्ये पेटवलेल्या शेकोटीभोवती ताल धरून नाचत असतात. एकसारखी वेशभूषा केलेली असते. स्त्रिया एक लुंगी सारखे वस्त्र गुंडाळतात, वरती ब्लॉउज, अनेक मण्यांच्या माळा असा काहीसा पेहेराव करतात. पुरुष फक्त कमरेला वस्त्र गुंडाळतात. अंगावर मण्यांच्या माळा घालतात , वेगवेगळी चित्रे काढतात. मोठमोठे आवाज करत, शरीराची जोशपूर्ण हालचाल करत नाचत असतात. रंगीबेरंगी पेहेराव, मोठा आवाज आणि जोरकस हालचाली असे नृत्य बघायला छान वाटते. कदाचित करमणुकीचा, मनोरंजनाचा हा एवढाच भाग अनेक वर्षे त्यांच्यासाठी उपलब्ध होता म्हणून असेल. मात्र स्वतःची जी काही संस्कृती आहे ती जपण्याचा त्यांचा अट्टाहास मला प्रकर्षाने जाणवला.
जेव्हा असे अशी मजबूत भावना पाठीशी असते तेव्हा ती संस्कृती नक्कीच जपली जाते.
संगीत, नृत्य आणि त्यांची कला. कला पण मला फार सुंदर दिसली. सर्वदूर मी बघितले कि हाती लागलेल्या वस्तूच काहीतरी सुंदर वस्तूत रूपांतर करण्याच्या मागे त्यांचे हात आणि मन असतं. मण्यांचा वापर प्रकर्षाने जाणवला, अर्थात आफ्रिकेत तो तसा सगळीकडे दिसतो. खूप प्रकारचे मणी ते तयार करतात आणि सगळीकडे त्याचा सढळ हस्ते वापर करतात. डोक्यातल्या केशरचनेपासून ते पायातल्या चपलां पर्यंत, सगळीकडे मणी वापरलेले दिसतात. विविध प्रकारच्या वस्तूंपासून मणी तयार करतात. जुन्या पेपर पासून, म्हशींच्या शिंगापासून, काचेपासून, लाकडापासून, अशा अनेक प्रकारच्या मण्यांची निर्मिती ते करतात. प्रत्येक जमातीचे स्वतंत्र असे स्वतःचे कौशल्य त्यामध्ये आहे. या सर्व मण्यां पासून विविध प्रकारच्या वस्तू तयार केलेल्या, फार सुंदर दिसतात. अनेक जमाती तर कपड्यांऐवजी मण्यांचे जाड जाड सर करून गळ्यात घालतात. तसलेच जाड सर अंगावर सगळीकडे बांधतात. डोक्यात मण्यांचे आकडे, माळा घालतात.
एका मोठ्या बाजाराला भेट देण्याची खूप छान संधी मिळाली. तिथे इतक्या विविध कलाकृती बघता आल्या. तिथल्या गावच्या स्त्रिया त्या वस्तू तयार करून तिथे विकत होत्या मण्यांपासून केवळ गळ्यातले कानातले करता येतील , अस आपल्याला वाटतं ,पण तिथे बघितलेल्या विविध वस्तू आणि विविध प्रकारचे मणी खरोखर नेत्रदिपक. पक्षांची पिसं , प्राण्यांच्या कातड्या चे तुकडे, हाडांचे तुकडे, शिंगांचे तुकडे, दगड, विविध प्रकारचे लाकूड, असं काही काही वापरून बनवलेल्या अनेक वस्तू बघून डोळ्यांचं पारणं फिटलं. भले त्यांच्याकडे खूप डिग्र्या नसोत पण ही कला मात्र अतिशय सुंदर होती. सगळ्यात मला आवडल्या त्या केळ्यांच्या झाडापासून तंतू तयार करून त्यापासून बनवलेल्या अतिशय मजबूत पण सुंदर आणि सुबक अशा वस्तू. अगदी बाजारात नेण्याच्या मोठ्या मोठ्या बॅगा सुद्धा त्यापासून बनवलेल्या होत्या. कितीही जड वस्तू त्यात टाकली तरी ती वस्तू पेलण्याची ताकद त्या पिशवीत आहे. खूप विचार करून त्यांनी अशा बॅगा बनवल्या असतील असं वाटत.
आधुनिक जगाशी होत असलेल्या निरंतर संपर्काने अनेक ठिकाणी घडत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बदलांची जाणीव होते. आधीपासून त्यांची बांधकामं ही लाकडाची असत. आणि योग्यच आहे कारण जमाती जंगलांमधून राहत होत्या. पण आधुनिक शहरांमधून घरही आधुनिक पद्धतीने बांधलेली दिसतात. मात्र छोटे घर त्यांना मंजूर नसावे. जंगलातली घरं मात्र लाकडावर बांधून मातीने शिंपलेली, खूप सुबक आणि सुंदर होती. बऱ्याच गोष्टी बदलत आहेत , अनेक नवीन नवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत. तरुण पिढीला चांगले वळण लागावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मेडिकल सुविधा अद्ययावत करण्यामागेही खूप प्रयत्न चालू आहेत. रोटरीतर्फे बांधलेल्या एका हॉस्पिटलला भेट देण्याची पण संधी मिळाली. तसंच तिथे चालू असलेल्या एका मोठ्या रक्तपेढीच्या बांधकामाची प्रगतीही बघता आली. या सर्व गोष्टींसाठी तिथले लोक इतके वर्ष परदेशात जात होते, पण या प्रयत्नांनी नक्कीच त्यांना स्वतःच्या देशांमध्येच सर्व सोयी उपलब्ध होऊ शकतील. काळ बदलला, प्रगती झाली तरी त्यांना त्यांच्या संस्कृतीचा रास्त अभिमान आहे आणि त्यांनी तो जपावा असंच वाटतं
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.