पत्र क्र ५१
आफ्रिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर, डोक्यावर अनंत वेण्या घातलेल्या , त्यात मणी अडकवलेल्या , अनेक स्त्रिया येतात. रंगीबेरंगी केस केलेल्या अनेक मैत्रिणी युगांडा मध्ये भेटल्या. यांचे केस म्हणजे आपल्या...
आफ्रिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर, डोक्यावर अनंत वेण्या घातलेल्या , त्यात मणी अडकवलेल्या , अनेक स्त्रिया येतात. रंगीबेरंगी केस केलेल्या अनेक मैत्रिणी युगांडा मध्ये भेटल्या. यांचे केस म्हणजे आपल्या दृष्टीने एक कुतूहलाचा विषय नक्कीच असतो. माझ्या मैत्रिणींचे पण असेच रंगीबेरंगी केस आणि वेगवेगळ्या अनंत वेण्या घातलेल्या होत्या. मैत्रिणीच्या लहान मुलीनी एक दिवस मला म्हटलं की तुलाही मी काही "फॅशन" करून देते. मला जरा आश्चर्य वाटलं आणि टेन्शन पण आलं. आता हि माझं नक्की काय करणार? बराच वेळ माझ्या केसांशी झटापट करून, तिने बारीक बारीक वेण्या घालायचा प्रयत्न केला. पण तिला काही जमेना कारण मऊ आणि सरळ असलेले माझे केस कुठल्याच बारीक वेणीत वळले जाईनात. त्यांचे केस थोडे राठ आणि खूप कुरळे असतात , त्यामुळे त्यांना एकमेकात गुंफून त्यांच्या बारीक
- बारीक वेण्या घालणं सहज शक्य असतं. अनेक जणी फॅशन म्हणून त्याच्यात मणी अडकवतात, दोरे विणतात. पण त्या रंगीत केसांचं रहस्य काही मला उलगडेना . काही जणींचे तर अगदी गडद केशरी, निळे, हिरवे, असे सुद्धा रंग होते. शेवटी न राहवून मैत्रिणीला विचारल्यावर तिने सांगितलं कि ते सगळे खोटे असतात . दोऱ्या सारखे केस हे लोक अक्षरश: केसात चिकटवतात आणि त्याच्यामध्ये मणी किंवा इतर काही त्यांना डेकोरेशन करायचे ते करतात. हे सगळं करायला इतका वेळ लागतो, हे रोज रोज करायला कसं जमणार? तर त्यांनी सांगितलं की ते रोज रोज करण्याचे कामच नाही. कारण त्यात पैसा आणि वेळ दोन्ही बरेच खर्च होतात . मग म्हणाली, एकदा केलं कि ते आम्ही महिना
- दोन महिने तसेच डोक्यावर ठेवतो. केस धुवायचे कसे? तर म्हणाली, त्याच्या सकट आम्ही डोक्यावरून पाणी घेतो. हे असे दोरे लावून खूप लांब लांब वेण्या घातलेल्या मुली पण मी बघितल्या. आपल्याकडे पूर्वी केसांना असे जोड देण्याची पद्धत होती पण यांचे जोड काही वेगळेच आहेत. मैत्रिणीच्या मुलीनी मला सांगितलं की तुझे ऑलरेडी लांब केस आहे तर त्याला मी हे दोरी पण जोडू शकत नाही आणि तुझ्या केसांची वेणी पण घालू शकत नाही त्यामुळे इतक्या छान फॅशन पासून तू वंचित राहणार आहे. तिला फारच वाईट वाटलं आणि मला हायसं !
प्रत्येक देशाच्या पेहरावात सुद्धा बदल असतोच आणि तो तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत जातो. यांचेही पेहराव त्यांच्या देशातील वातावरणाला साजेसे आहेत. हल्ली मात्र जागतिकीकरणाच्या फेऱ्यात तेही अडकलेले दिसतात आणि त्यांचे मुळातले पातळ कॉटनचे किंवा चामड्याचे पेहेराव जाऊन आता जागतिक फॅशनला साजेसे कपडे घालताना ते दिसतात. भारताबद्दल त्यांच्याही काही कल्पना आहेत. माझ्या बरोबरच्या दोन मैत्रिणी या सुटसुटीत म्हणून किंवा फॅशन म्हणून जीन्स घालून फिरत होत्या. मी मात्र कटाक्षाने ,भारतीय रंगीबेरंगी कपडे घातलेले होते. तिथल्या एकीने येऊन मला विचारलं या बाकी दोघीजणी कुठल्या देशातल्या आहेत ? म्हटलं, अगं माझ्या बरोबरच आल्यात, भारतीयच आहेत. म्हणाली, नाही भारतीय स्त्रिया छान छान सुंदर अशा साड्या नेसतात आणि त्यांचे कपडे खूप रंगीबेरंगी असतात, असं आम्हाला माहित आहे . त्यांच्या कपड्यांबद्दल आम्हाला खूप आकर्षण नेहमीच वाटत आलं आहे . असे कपडे आम्हाला फक्त तुझेच दिसले, म्हणून विचारलं, की या दोघी भारतीय नाहीत का? मी तत्परतेने त्यांना सांगितलं की तुम्ही सुद्धा असेच रंगीत कपडे आणि साड्या नेसत जा कारण आपल्या देशाची प्रतिमा आपल्या हातात आहे .
अनेक ठिकाणी फिरताना तिथल्या बाजारपेठा बघायला मजा आली. सकाळीच त्यांच्या शेतात पिकलेला थोडा फार माल ते बाजारात आणून विकतात. बाजार मात्र खूप छान ताज्या भाज्या आणि फळांनी बहरलेला होता. अनेक प्रकारची फळं, चांगली रसरशीत. लिंब पण छोट्या पासून ते ईडलिंबू पर्यंत. वेगवेगळ्या प्रकारची संत्री वर्गातील फळं पण . तो बाजार बघायला सुद्धा छान वाटत होता. सर्व भाज्या अतिशय ताज्या आणि रसरशीत. गावांच्या ठिकाणी आठवडी बाजार असतो आणि त्यात जीवन उपयोगी अनेक वस्तूही विकताना मला दिसल्या. मात्र गावाकडची परिस्थिती भयानक वाटली. लोकांकडे फारशी रोकड नसावी. त्यामुळे अजूनही वस्तूंच्या बदल्यात वस्तू देण्याचा व्यवहार काही ठिकाणी मला दिसला. अर्थात ती तिथल्या रहिवाशांची सोय असावी, असं वाटलं.
काही मोठ्या युनिव्हर्सिटीला भेट देण्याची संधी मिळाली. त्यातली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी म्हणजे मॅकरेरे युनिव्हर्सिटी, कंपाला शहरात आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेऊन शिकायला मिळणं अतिशय मोठा सन्मान समजला जातो . आणि ज्याला तिथे ॲडमिशन मिळते तो नक्कीच हुशार मुलगा असेल असं गृहीत धरतात. तिथे अनेक प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तिथली चांगली आणि जुनी युनिव्हर्सिटी म्हणून ती प्रसिद्ध आहे.
अनेक जणांनी गरीबीमुळे अजून उच्च शिक्षणाकडे मुलांना पाठवलेलं दिसत नाही. पण रोटरीचा एक अतिशय स्तुत्य उपक्रम तिथे मला सापडला. नशा आणि वाईट कामांच्या नादी लागलेल्या तरुण पिढीला त्यातून बाहेर काढून त्यांना चांगल्या रस्त्यावर आणण्याचे मोठे काम चालू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य विकास वर्ग घेतले जातात.
त्यांना अनेक प्रकारचे वेगवेगळे उद्योग कसे करायचे ते शिकवले जाते. त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना त्या उद्योगांची निवड करून दिली जाते. अशाच एका ग्रुप नी मोटर मेकॅनिक चा कोर्स करून मोठं गॅरेज टाकलय. काही मुले उत्तम वस्त्र विणतात. काही कपडे शिवून देतात. एका ग्रुपनी केळ्याच्या झाडाच्या तंतूपासून अनेक सुंदर सुंदर वस्तू तयार करण्याचा प्रशिक्षण घेतले आहे. त्या वस्तू ते इतके सुंदर करतात. त्यांच्यातल्या उपजत कलाकाराला ह्यातून वाव मिळाला आणि त्या संधीचे त्यांनी नक्कीच सोने केले आहे. तरुणांना नुसतेच व्यसनमुक्त करून भागणार नाही त्यांना योग्य मार्ग पण दाखवावा लागतो.
With thanks and regards. For STADD Engineers Mumbai Kirty Hemant Vadalkar ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- Authorized Dealers for STAADPro, ProSTEEL, RAM, STAADfoundation,STAADbeava software products since 1995. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.