पत्र क्र ५०

युगांडा, आफ्रिकेतला एक छोटासा देश. सुशेगात! ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान! शांत आणि थंड माणसे. म्हणजे, आपण खूप शिकावं, धडपड करावी, पैसा कमवावा, अशी धारणाच नाही. अलीकडे शिक्षणाचे...

कीर्ती वडाळकर
||4 min read

युगांडा, आफ्रिकेतला एक छोटासा देश. सुशेगात!

ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान!

शांत आणि थंड माणसे. म्हणजे, आपण खूप शिकावं, धडपड करावी, पैसा कमवावा, अशी धारणाच नाही. अलीकडे शिक्षणाचे महत्व वाढतंय आणि साक्षरतेचे प्रमाण तर भरपूर आहे. पूर्ण देशात ३४ युनिव्हर्सिटी आहेत. प्राथमिक शिक्षण घेतलेले असले तरी उच्च शिक्षणाकडे कल कमीच आहे लोकांचा. कदाचित कुटुंबात पैसा कमी आणि माणसे जास्त हे कारण असावे.

देशामध्ये अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत जनता आहे. श्रीमंत जनता कम्पाला , एंटेबी अशा शहरां मधून प्रामुख्याने दिसते. अतिशय छान मोठमोठ्या घरां मधून ते राहतात. पण त्यांनी खेड्यांशी नाळ तोडलेली नाही. प्रत्येक जण शनिवार रविवारी खेड्यातील नातेवाईकांना भेटायला जात असलेला बघितला. अति उच्चभ्रू वर्गातील लोक गरीब जनतेला मदत करताना दिसले.

गरीब भागांमध्ये रोगराई उदंड. जिंजा गावाच्या जवळ एका खेड्यावर रोटरी तर्फे मोठा मेडिकल कॅम्प होता. तिथे बघितले जनता विविध रोगांनी ग्रस्त आहे आणि तरीही मजेत आहे. तिथल्या गावात समाजसेवा करणारी रुबी खूप चिंतेत होती कारण लोकांना कुठल्याच रोगाचे गांभीर्य नव्हते. कुपोषण तर भयानक. वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न खूप मोठा आहे.

मेडिकल कॅम्प मध्ये जाणवले कि अनेक प्रकारचे रोग त्यांच्या पाचवीला पुजलेले आहेत. लहान लहान मुली त्यांच्या कडेवर लहान बाळ घेऊन आलेल्या होत्या. रुबी नी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे. मुली स्वतः लहान आहेत पण त्यांना बाळ झालेली आहेत. आणि ती किती व्हावी या संख्येला काहीच अटकाव नाही. त्यांचे वडील कोण ते पण माहित नाही. अशा परिस्थितीमध्ये तिचं स्वतःचंच भविष्य काही ती घडवत नाही, ती त्या लहान मुलांसाठी काय जगणार? आणि मुळात ती स्वतःच एक लहान मूल आहे ती काय त्या छोट्या मुलांना सांभाळणार? त्यामुळे आई आणि पोरे सगळेच अशक्त. थोडे वयाने मोठे होते त्यांच्यामध्ये टीबी, एड्स सारखे भयानक रोग होते. मुळात शेतात पहिले कष्ट करायचे किंवा जंगलातून झाड तोडून आणायचे, बाजूने जाणाऱ्या नाईल नदीतून मासेमारी करायची आणि आयुष्य काढायचे. ह्या पलीकडे काही माहीतच नाही. टोळ्यांमधून राहायचे आणि अक्षरश: जंगली जनावरांसारखे जगायचे.

बारा वर्षाची पोरं झाली की श्रीमंत लोक त्यांना घराबाहेर ठेवतात. बोर्डिंग मध्ये ते राहतात. त्यांची अति उच्चभ्रू जीवनशैली, संध्याकाळी पब मध्ये जावे, नाचगाणे, दारूकाम. शनिवार रविवार तर त्या मुलांचे फक्त उनाडण्यातच जातात. काही वर्षापर्यंत आई

- वडील पैसे पाठवून शिकवतात पण साधारण

18 वर्षाचे झाल्यावर मात्र त्यांना स्वतःचा खर्च स्वतः करावा लागतो. माझी मैत्रीण मला म्हणाली, " तुझ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च तू करते आहेस याबद्दल मला तुझे फार आभार मानावेसे वाटतात . " मी तिला सांगितलं ,"भारतीय पालक हे शेवटच्या क्षणापर्यंत फक्त स्वतःच्या मुलांचाच विचार करत असतात." याचं तिला फारच आश्चर्य वाटलं. कारण त्यांच्याकडे अशी पद्धतच नाही. हल्ली काही श्रीमंत पालक मुलांना शिकवण्याचा अट्टाहास करतात, परदेशी वगैरे पाठवून चांगले शिक्षण घ्यायला लावतात.

मुळात अनेक लग्न होतात. अनेक मुलं होतात. लग्न करताना मुलाने मुलीला हुंडा द्यायचा असतो . तो हुंडा म्हणजे म्हशी, बकऱ्या, घरातल्या वस्तू अशा स्वरूपात द्यायचा असतो. फार कोणी श्रीमंत असतील ते कदाचित छोटसं घर वगैरे बांधून देतात. पण मुख्य मुद्दा हा म्हशी किंवा तत्सम पाळीव प्राणी देण्याचा. माझी मैत्रिण दिसायला त्यांच्या समाजात फार सुंदर होती , त्यामुळे तिच्यासाठी तिच्या नवऱ्याने चांगल्या दोनशे

म्हशी दिलेल्या होत्या . आणि ते त्याचे दुसरे लग्न होते. पहिल्या बायकोने अधिक म्हशी मिळाल्या म्हणून दोन मुले ह्याला देऊन दुसरा घरठाव केला होता. हा सरकारात खूप उच्च पदावर कार्यरत आहे. ऐकून पण मला हसू आलं. सगळ्यात मजा तर मुलांची, म्हटलं तर कुणाचंच कोणी नाही आणि म्हटलं तर सगळ्यांचेच सगळे आहेत . किती ते कन्फ्युजन! ही माझी पहिली आई आणि हि माझी दुसरी आई. मुले एकमेकांमध्ये मजेत राहत असतात . दुसऱ्या मैत्रिणीने तिच्या कुटुंबाचे वर्णन ऐकवून मला गार केले होते. "मला ७ बहिणी आणि १० भाऊ आहेत. मी ४२ वर्षांची आणि सगळ्यात लहान बहीण बारा! मोठ्या बहिणीची ४ लग्ने झाली, तिला १२ मुले आहेत. दुसरीची तीनच लग्ने झालीत, पण १५ मुले आहेत..." मला पुढे ऐकवेना. आणि ह्या सगळ्याचे गणित काही झेपेना. हुंडा म्हणून मिळणाऱ्या वस्तूंच्या लालचेने मुली पण अनेक लग्ने करतात.

जास्तीत जास्त जनता खेड्यातून वसते. खेड्यातून म्हणण्यापेक्षा जंगलातील वस्त्यांतून जगते म्हणणे जास्त योग्य. अनेक जनजाती आहेत. प्रत्येक जनजाती ला स्वतः चे नियम, भाषा , देव आणि संस्कृती आहे. १९२० च्या दरम्यान मिशनरी तिथे आले. आता बरेचसे लोक ख्रिश्चन आहेत. मग दोन रीती पाळल्या जातात, एक त्यांच्या जमातीची आणि एक ख्रिश्चन धर्माची. लग्न पण दोन पद्धतीने करतात, चर्चमध्ये करून झाले तरी हुंड्यात ठरलेल्या सर्व वस्तू देऊन होईपर्यंत जमातीच्या पद्धतीने लग्न होत नाही. सर्व व्यवहार पूर्ण झाला कि जमातीचा मुखिया लग्न मान्य करतो आणि बोकड कापून, दारू पिऊन सगळे जण तो समारंभ साजरा करतात. सुरवातीला स्थानिक टोळीवाल्यांनी ह्या मिशनरींना खूप विरोध केला. अगदी जिवंत जाळलेसुद्धा, त्याचे एक स्मारकहि आज बांधलेले आहे.

सकाळी थोडे शेतात काम करावे, मासेमारी करावी, पकडलेले मासे घरी देऊन बायकांनी शिजवावे. जेवण झाले कि आराम करावा. संध्याकाळी गावातील मंडळी जमून फेर धरून , ड्रम वाजवून गाणे , नाच. संपला दिवस.

तिथल्या सरकारात काम करणाऱ्या काही उच्चंपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर बैठक होती. त्यांनी पण लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे असे सांगितले खरे, पण त्यांची स्वतःची हि अगदी तशीच जीवनशैली आहे. कोणी कोणाला सांगावे?

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments