पत्र क्र ४९

आफ्रिकेत जायचे म्हणजे काही ठराविक देश आपल्या डोळ्यापुढे येतात, दक्षिण आफ्रिका, केनिया, कधीतरी टांझानिया आणि झिम्बाब्वे. मॉरिशस, सेशेल्स हे आफ्रिका खण्डात येतात हे आपल्याला जड जाते मानायला. मीही ह्या...

कीर्ती वडाळकर
||4 min read

आफ्रिकेत जायचे म्हणजे काही ठराविक देश आपल्या डोळ्यापुढे येतात, दक्षिण आफ्रिका, केनिया, कधीतरी टांझानिया आणि झिम्बाब्वे. मॉरिशस, सेशेल्स हे आफ्रिका खण्डात येतात हे आपल्याला जड जाते मानायला. मीही ह्या समजूतींना अपवाद नव्हते. जेव्हा मी रोटरी तर्फे युगांडा ला जातेय असं सांगितलं तेव्हा सर्व मित्र मंडळींनी वेड्यात काढले, अगं , हा कुठला देश? नाव तरी ऐकलं आहे का? मेलं जाऊन जाऊन कुठे जायचं? अगं , माणसं नाही जात तिथे, वगैरे वगैरे फार मौलिक आणि मजेदार सूचना आल्या. खरंच मी पण ते नाव जरा उडत उडत च ऐकलं होतं . शिवाय आपल्या मनाला काळ्या रंगाचे एक अनाहूत वावडे असते ते वेगळेच.

जाण्याची तयारी सुरु झाली. व्हिसा तर तिथे गेल्यावरच मिळणार होता, ती औपचारिकता आणि हेलपाटा वाचला. मात्र यलो फिवर चे इंजेक्शन घ्यायचे होते. ते एकाच ठिकाणी मिळते. तिथे तेव्हा, दिवसाला फक्त काहीच इंजेक्शन द्यायचे. तर पहाटे जाऊन नंबर लावावा लागे . सकाळी ७ ला तिथे पोचलो, तर आमच्या आधीच २०, २५ माणसे पोचली होती. नऊ वाजेपर्यंत त्याची संख्या खूप झाली. आमच्या पुढे पण माणसे वाढली कारण काही जणांनी एकाला पुढे पाठवून नम्बर लावला होता आणि सगळा ग्रुप मागाहून आला. आता अजून संख्या वाढली तर आपला नंबर लागेल का? धाकधूक सुरु. ते टोकन तर मिळाले, आणि टोचून घ्यायला दुपार झाली. हे एक दिव्य पार केल्यावर युगांडा ट्रिप निश्चित झाली.

नाईल नदीमुळे अतिशय समृद्ध केलेला हा परिसर. विमानातूनच सगळीकडे खूप पाणी आणि हिरवी हिरवी जंगले दिसतात. संध्याकाळची वेळ. त्यामुळे सूर्यास्त ह्या पार्श्वभूमीवर खूप सुंदर दिसला.

मुंबईच्या तुलनेत एन्टेबी जरा लहान विमानतळ. व्हिसा , इमिग्रेशन वगैरे करून बाहेर आलो. तिथले मित्र वाट बघतच होते. अगदी प्रेमळ मंडळी सगळी.

युगांडा आफ्रिकेतला एक छोटासा देश. सर्व बाजूंनी देशच आहेत स्वतः चा किनाराच नाही. त्यामुळे वस्तू मागवणे खूप महाग, कारण दूर कुठे तरी वस्तू बंदरात उतरवून, त्या शेजारी देशांच्या मेहेरबानीने , ट्र्क ने आणाव्या लागतात. तिथे मल्टि नॅशनल कपंन्यांनी काही कारखाने काढलेत, पण कच्चा माल आयात करावा लागतो आणि त्याची किंमत खूप वाढते. तिथे एक औषधाचा कारखाना बघायला गेलो तर त्यांचा कच्चा माल चक्क नागपूरहून येत होता.

फारसे कारखाने नाहीत त्यामुळे शेतीप्रधान देश. स्वतःची रेल्वे पण नाही तिथे. रस्ते मात्र छान आहेत, काही ठिकाणी अगदी सरळ रेषेत आहेत. बऱ्याच ठिकाणी, विविध प्रकारची बांधकामे चालू दिसली, पण बहुतेक ठिकाणी ती चीन च्या सौजन्याने.

देशात अनेक जनजाती , वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळी जीवनशैली असलेल्या आहेत. स्वयंपाक अतिशय सोपा. तो घरातल्या स्त्रिया किंवा मुलींनीच करायचा, पुरुष मंडळी तिकडे फिरकत नाहीत. काही जनजाती कसावा नामक कंदाचे पीठ करून त्याची उकड करतात. काही माटोके म्हणजे कच्ची केळी शिजवतात. ह्याशिवाय रताळे, बटाटे, सुरणसारखे कंद, मका ही आहेतच मुख्य प्रवाहात. वाटाणे , बीन्स, पण असतात जोडीला. उकडी सारखे एकत्र शिजवून त्यात भाज्या, मांस टाकतात. सोप्पे काम. भात ही आहे. शेंगदाण्याचे कूट घालून रस्सा करतात. मासे आणि मांस घातल्याशिवाय जेवण पूर्ण होणे शक्य नाही असे त्यांना वाटते. एक किंवा दोनच पदार्थ शिजवतात. सोबत फळे, सॅलड असते. आणि कुठली तरी दारू. आपल्याला फळांचा रस, कारण जेवताना पाणी पिणे निषिद्ध मानतात. रस मात्र खूप विविध फळांचे मिळतात, त्यातही पॅशन फ्रुट फार लोकप्रिय. अननस, पपई, संत्री पण . मुळात जमीन अतिशय सुपीक आणि पाणी

मुबलक. त्यामुळे मुख्य शहराचा काही भाग सोडल्यास सगळे स्वतःच्या जमिनीत स्वतःचा शिधा पिकवतात.

कम्पाला ह्या राजधानीच्या शहरात अनेक मोठमोठे मॉल्स आहेत. तिथे सगळ्या वस्तू मिळतात. भारतीय नागरिक पण खूप असल्यामुळे आपल्या अनेक वस्तू मिळतात. आणि भारतीय पदार्थ विकणारे अनेक हॉटेल्स पण आहेत. सुंदरसा भारतीय पेहेराव आणि सजावट केलेली हि हॉटेल्स सगळ्यांना आकर्षित करतात. आम्हीपण जाऊन आलो काही हॉटेल्स मधून. आपली मंडळी, भारतीय लोक आलेत बघून भारावून जातात सगळीकडेच.

काही भारतीय पदार्थ करू का? असे मी जेव्हा मित्राला विचारले तेव्हा तो फारच खुश झाला आणि एका मॉल मध्ये घेऊन गेला. एक पूर्ण विभाग भारतीय वस्तूंचा होता. त्यात मला हिंग सोडून सगळे दिसले. एखाद्या भारतीय भागातच आलोय कि काय असे वाटावे, इतके पदार्थ आणि वस्तू. सगळे मसाले, लोणची, पापड, पिठं , मीठ, तेल तूप, सगळं. तेवढा हिंग का नव्हता कळेना. तिथून मनसोक्त खरेदी करून किती विविध पदार्थ बनवून दिले मी त्या लोकांना. त्यांनाही आश्चर्यच वाटले. पुढचे काही दिवस त्यामुळे उकड आणि भाज्या न खाता विविध पदार्थ करून खाण्यात मजेत गेले. "जाऊ तिथे खाऊ " हेच खरं .

अनेक भारतीय तिथे राहतात. बऱ्याच जणांना भेटायचा योगही आला. कम्पाला मध्ये असलेल्या इंडियन असोसिएशन ने तर मोठा कार्यक्रम आमच्या स्वागतासाठी ठेवला होता. क्रेन बँक ही युगांडा ची मोठी खाजगी बँक होती, २०१७ मध्ये ती बँक ऑफ युगांडा ने घेतली. १९६५ पासून ती बँक कार्यरत होती. ती बँक आणि इतर

अनेक उद्योगांच्या मालकांच्या घरी रात्री जेवायला बोलावले होते. घर कसले ते? सव्वा लाख चौरस फुटाचे मोठे अलिशान बांधकाम. त्यांच्या विविध उद्योगात, बांधकाम, शिक्षण संस्था, हॉटेल्स, गुलाबांची आणि विविध फुलांची शेतीपण आहे. युगांडाच्या अर्थव्यवस्थेचा अतिशय महत्वाचा भाग असलेल्या ह्या सर्व कम्पन्यांचे मालक, युगांडातील अतिशय धनाढ्य व्यक्ती, श्री सुधीर रुपारेलिया , भारतीय वंशाचे, गुजराथी आहेत. आणि आजही भारताशी संपर्क जोडून आहेत. अशा व्यक्तीने, जेवणाआधी , अगदी अगत्याने आम्हाला बोलावून, स्वतःच्या घरातील एक स्पेशल भाग दाखविला, wine cellar! बघावे तिकडे उंची वाईनच्या हजारो बाटल्या! सर्व भिंतींवर कप्पे करून

प्रत्येक बाटली छान सजवून ठेवलेली , देशोदेशी जाऊन जमवलेल्या त्या अनेक बाटल्या. काही खूप जुन्या, काही अलीकडे संग्रहात दाखल झालेल्या. जी हवी ती काढा म्हणे, मी स्वतः तुम्हाला फोडून देतो. जे पिणारे होते त्यांनी मजा केली. स्वतः सुधीर रुपारेलिया मात्र त्यातले काहीही पित नव्हते, मग कशासाठी हा खटाटोप होता कोण जाणे. बापरे! त्या तेवढ्या ऐवजाची किती किंमत असेल न?

- With thanks and regards. For STADD Engineers Mumbai Kirty Hemant Vadalkar ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- Authorized Dealers for STAADPro, ProSTEEL, RAM, STAADfoundation,STAADbeava software products since 1995. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments