पत्र क्र ४८
कम्बोडिया हा अत्यंत भयानक परिस्थितीतून होरपळून निघालेला देश लोकांनी खूप सावरून नेला. तिथे लक्षात राहते ती तिथली स्वच्छता. मी गाईड ला शाळेतल्या अभ्यासक्रमाविषयी विचारले. तिने सांगितले, शाळेतल्या...
कम्बोडिया हा अत्यंत भयानक परिस्थितीतून होरपळून निघालेला देश लोकांनी खूप सावरून नेला. तिथे लक्षात राहते ती तिथली स्वच्छता. मी गाईड ला शाळेतल्या अभ्यासक्रमाविषयी विचारले. तिने सांगितले, शाळेतल्या अभ्यासक्रमांमध्ये मुलांना इतक्या बारीक
- सारीक गोष्टी शिकवतात की घरात काच फुटली तर ती कचऱ्यात टाकू नका कारण कचरावेचक व्यक्तीला त्यानी दुखापत होऊ शकते , असे सुद्धा शिकवले जाते . हे मला हे फारच कौतुकास्पद वाटलं . थोडीफार शेती , पर्यावरण रक्षण वगैरे पण असते अभ्यासक्रमात.
अनेक छोट्या छोट्या खेड्यांमधून वसलेला हा देश. खरतर त्यांची आरोग्य व्यवस्था सुद्धा फारशी प्रगत नाही . अर्थात इतक्या छोट्या खेड्यांमधून आधुनिक आरोग्यसेवा पोहोचल्या असतील अशी अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. तरीही तिथले राजे आणि तिथलं सरकार जनतेला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी झटत असतात. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या देशाचा एक चांगलं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून चांगलाच विकास केला . त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे उत्तम रस्ते, खूप चांगलं कम्युनिकेशन नेटवर्क आणि अनेक जागा ज्या पर्यटकांना आवडू शकतात त्या जागांचा संपूर्ण विकास . खरंतर अतिशय गरिबीने ग्रासलेला हा देश पण गरीबीमुळे किंवा झोपडपट्टी मुळे येणारा एक बकाल लूक या देशाला दिसला नाही किंवा त्यांनी तो आपल्याला दिसेल अशी सोय ठेवली नाही. काहीही असो येणाऱ्या व्यक्तीला देशाबद्दल चांगल्याच स्मृती राहतात.
खेड्यांमधून, बांबूच्या आधारावर उंच घरे आहेत. म्हणजे परिसरात पाऊस खूप किंवा नदीचे पात्र जवळ असल्याने जमिनीत पाणी खूप. ती घरे पण ऐसपैस आणि स्वच्छ. नदीच्या पात्रात बोटींवर असणारी घरे मात्र छोटीशीच आणि आटोपशीर. हिरवळ खूप, जांभळ्या रंगाचे वाइल्ड पिटुनिया सगळीकडे दिसतात.
त्यांची बस सेवाही त्यांनी खूप आधुनिक केलेली आहे. एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी त्या बसचा वापर करताना पर्यटकांना अतिशय उत्तम अशी सुविधा ते देतात. सरकारी बस सेवा ती , तिनी जायचं या विचाराने थोडेसे धास्तावलो होतो. सुरवातीलाच बस स्टेशन नी पहिला धक्का दिला. अगदी एखाद्या छोट्या गावचा विमानतळ असावा अशा सोयी. छोटीशीच इमारत होती, पण आनंदी. बऱ्याच मुली तिथे पडेल ते सगळे काम करत होत्या, अगदी सामान बसमध्ये ठेवायला मदत पण करत होत्या. सगळं अगदी वक्तशीर चालू होते.
ती बस ही अत्याधुनिक होती, जी तुम्हाला युरोप किंवा अमेरिकेमध्ये दिसते तशी. त्यात वॉश रूम , हाय स्पीड वायफाय ,आरामदायक खुर्च्या, सगळी बस सुद्धा खूप सुंदर. प्रत्येक पर्यटकाला सुरुवातीलाच , प्रवासासाठी म्हणून एक छोटासा गिफ्ट पॅक दिला. त्यात पाण्याची बाटली, थोडासा खाऊ , शीत पेय, असं होतं. निघायच्या ठिकाणीच त्या सेविकेने सांगितलं की रस्त्यात आपली बस अमुक ठिकाणी थांबणार आहे, तुम्हाला कोणाला काही लागलं तर सांगा. बस आपण कुठेही थांबवू शकतो फक्त लक्षात ठेवा की आपल्या बसचे जीपीएस ट्रॅकिंग होत आहे, त्यामुळे ठरलेल्या रूट शिवाय ही बस कुठेही जाणार नाही. रस्ते खूपच चांगले होते आणि आजूबाजूच्या परिसराचा त्यामुळे इतका चांगला आनंद घेता आला. ठरलेल्या वेळेच्या थोडे आधीच ती बस इच्छित स्थळी पोचलो. आता खरतर धास्ती वाटत होती की घ्यायला येणारा माणूस आला असेल का? पण तोही वेळेच्या आधीच येऊन उभा होता. म्हणजे बसला असलेले जीपीएस खरंच कार्यरत होते. खूप व्यवस्थित सेवा ते पर्यटकांना देतात असं लक्षात आलं.
देशात बरीच स्वस्ताई वाटली. छानसे फाईव्ह स्टार हॉटेल पण फार महाग नव्हते. सगळी सोय अतिशय उत्तम.
siem reap ला पोचलो तो रात्र झाली होती. मात्र शहर जागे होते. भर वस्तीतले हॉटेल. थोड्याच अंतरावर बाजार. नदीचा कालवा पण शहरातून जाणारा. हस्त कारागिरीची अनेक दुकाने. अनेक देशांचे पर्यटक फिरताना दिसत होते. इथे खरी गर्दी होती ती अंगकोर ची मंदिरे बघायला आलेल्यांची. प्राचीन वस्तू संग्रहालय आणि हस्त कौशल्याच्या वस्तू बनवणारे
अनेक छोटे मोठे कारखाने पण बघण्या जोगे. मिकॉन्ग नदीच्या पात्रातली सैर आणि डोंगरावरचे देऊळ. इथेही खूप ग्रामीण भागातून फिरलो. त्या देशाबद्दल जे आधी वाचले होते , त्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढण्यासाठी लोक बराच प्रयत्न करत आहेत. मुली स्वतःला सांभाळत शिकत आहेत. लोककला आणि लोक नृत्य ह्यातून अनेक जण पैसे कमवतात. पण अंगकोर ची मंदिरे त्यांची खरी तारणहार. कारण ती बघायला लांबलांबून लोक येतात. अनेक ठिकाणी भारत सरकारच्या मदतीने वास्तू जतन केल्या जात आहेत ते बघून अभिमान वाटला . त्यांनी खूप ठिकाणी, भारतीय म्हणून आम्हाला अतिशय आदराने वागवले. अनेक मुलं टुरिस्ट गाईड बनतात. तुमच्या बरोबर अंगकोर मंदिरात येतात. आमचा गाईड बिचारा त्याच्या परीने आम्हाला रामायण समजावत होता. मला गंमतच वाटली. तिथे गाईड हे सरकारी कॉलेज मधून पास झालेलेच असावे लागतात . गाईड होण्यासाठी परीक्षा असतात. त्या व्यवस्थित पास केल्यावर ओळखपत्र मिळते. मात्र अभ्यासक्रमात जे सांगितले ते आणि तेवढेच सांगावे लागते, पदरचे काहीही घुसवायचे नाही त्यात. प्रत्येकाची कथन करण्याची शैली तेवढी वेगळी असू शकते. हे मला अतिशय महत्वाचे वाटले.
बाजार खूप आकर्षक आणि रंगीबेरंगी होते. जुने नवे असे वेगवेगळे बाजार होते. बहुतेक ठिकाणी विक्रेत्या स्त्रिया होत्या. भाव करणे कार्यक्रम जोरात चालू होता. पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती च्या फांद्या दोऱ्यासारख्या वापरून त्या विणून केलेल्या अनेक वस्तू विक्रीस होत्या. नारळाच्या करवंटीपासून केलेल्या वस्तू होत्या. अनेक प्रकार. इथे तसाही भाव कमीच वाटत होता पण तरीही घासाघीस करून अजून कमी होत होता.
पर्यटक जातील अशा सर्व जागा त्यांनी उत्तम विकसित केल्या आहेत. जे कोणी भेट देतील त्यांना त्यातून पूर्ण समाधान नक्कीच मिळत असते. स्वच्छ परिसर, सर्व सोयी, माहिती चे फलक, तत्पर सेवा.
एकूणच, देशाचे निसर्ग सौंदर्य, अंगकोर ची मंदिरे, ह्या सगळ्याचा त्यांनी पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी पुरेपूर आणि चांगला वापर केलेला आहे. अर्थातच त्यातून त्यांचीही प्रगती होते आहे.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.