पत्र क्र ४७

असाच अजून एक आवडलेला देश कंबोडिया. आधी अनेक लेख आणि पुस्तकांतून अत्यन्त विदारक परिस्थितीत भेटलेला देश . तिथली गरिबी, बेकारी, वेश्याव्यवसाय, बाल शोषण, काय न काय. ते सगळं वाचून खरं तर ह्या देशाच्या...

कीर्ती वडाळकर
||4 min read

असाच अजून एक आवडलेला देश कंबोडिया. आधी अनेक लेख आणि पुस्तकांतून अत्यन्त विदारक परिस्थितीत भेटलेला देश . तिथली गरिबी, बेकारी, वेश्याव्यवसाय, बाल शोषण, काय न काय. ते सगळं वाचून खरं तर ह्या देशाच्या नावावर मी काट च मारली होती. कशाला काही तरी बघायचंय आपल्याला?

इसवी सनापूर्वी ८०० पेक्षा अधिक वर्ष आधी, हा भाग भारतीय होता असे म्हणतात. हिंदू राजा जयवर्मन ने ख्मेर शासन सुरु करून दिले आणि त्यांनी अनेक वर्षे राज्य केले. मग फ्रेंच , जपानी आणि परत फ्रेंच अशा वेगवेगळ्या सत्तांनी तो देश काबीज केला. आधी कंपूचीया , मग कम्बोज आणि आता कम्बोडिया. आधी अनेक वर्षे हिंदू आता ९७% जनता बुद्ध. फ्रेंच १९५३ मध्ये राजाच्या हवाली देश करून निघून गेले. पण बाजूच्या व्हिएतनाम मध्ये युद्ध चालू झाले ,स्वतःला निष्पक्ष जाहीर करून सुद्धा हा देश त्या युद्धात भरडला गेला. १९७० मध्ये नागरी युद्ध झाले. आणि भलतेच घडत गेले. बाजूच्या राष्ट्रांनी स्वतः चे महत्व वाढवण्यासाठी ह्या देशात अनागोंदी वाढू दिली. ख्मेर रूज आणि पोल पॉट ह्या क्रूरकर्म्यांनी जनतेचा प्रचंड छळ मांडला. हजारोंनी कत्तली केल्या. शेवटी व्हिएतनाम नी मदत करून ह्या दोन क्रूरकर्म्यांचा अंत केला. १९९० पर्यंत हि भयाची सावली होती. १९९२-९३ ला संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्ती करून निवडणुका घेऊन राज्य प्रस्तापित केले. पण राजा हि अजून आहे आणि आजही ते राष्ट्र, "किंगडम ऑफ कम्बोडिया" ह्या नावाने ओळखले जाते.

हे सगळं सांगायचा उद्देश हा कि किती कठीण परिस्थितीतून गेलेले राष्ट्र आहे ते कळेल. मग त्यातून आलेल्या गरिबीचे दुष्परिणाम म्हणून चोरीमारी, लूटमार, वेश्याव्यवसाय, लहान मुलांचे शोषण हे आले. म्हणजे मी वाचलेले खरेच होते. भयानक इतिहास ! आणि स्वातंत्र्य मिळून दोनच दशके झालीत. अशा देशात जायचे म्हणजे जरा धाकधूकच वाटत होती. साधारणपणे, पर्यटक siem reap ला जातात, अंगकोर चे पुरातन मंदिरं बघतात आणि परत. आम्ही मात्र राजधानी Pnom Penh आणि बराच परिसर बघणार होतो.

व्हिएतनाम हुन मिकाँग नदीतील अतिशय रम्य प्रवास करून Pnom Penh च्या किनारी लागलो तेव्हाच सगळीकडे चालू असलेले भव्य बांधकाम नजरेस पडले. आखीव रेखीव असे शहर. स्वच्छ . बरीच दुकानं , मोठं मोठे बाजार आहेत. चलन रियल, एक डॉलर ला ४००० पेक्षा थोडे जास्ती रियल मिळणार. राजधानीचे शहर खूपच देखणे. चालत बघा किंवा गाडीने फिरा .

भारतीय लोक बरेच आहेत. भारतीय हॉटेल्स पण आहेत. तामिळनाडूतून काही वर्षांपूर्वी तिथे पोचलेल्या एका माणसाने सुरु केलेल्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो. त्यालाही खूप आनंद झाला. बाजारात अनेक हस्तकौशल्याच्या वस्तू होत्या. मोती होते. जडाव , मौल्यवान खडे पण होते. कितीही मोठ्या दुकानात गेलात तरी सांगितलेल्या दराच्या निम्म्या आकड्या पासून भाव करायला सुरु करायचे असे हॉटेल मधल्या सेविकेने सांगितले. आपण आधीच मागे मग अशा खरेदीतून.

एका प्रसिद्ध पॅगोडात गेलो. तिथे परदेशी नागरिकांना प्रवेश फी होती. म्हटलं, "मी कुठे परदेशी आहे? तुमच्या सारखीच तर दिसते न ? " ती हसली, " नाही ग तू भारतीय दिसतेस " हसूच आलं.

सगळा परिसर सुंदर ठेवलेला . खुप बहरलेली , उंच उंच बुचाची झाडे, अनंत फुले उधळत होती. त्याचा सुवास आसमंतात दरवळत होता. राजवाडा तर सुंदर असणारच, पण तिथे राजातर्फे छोटी भेट म्हणून बाटलीत पिण्याचे पाणी, आणि एक चॉकलेट देतात, मजा वाटली. स्कॉटलंड च्या बालमोराल कॅसल मध्ये राणीतर्फे कॉफी आणि केक वगैरे देतात ते आठवले.

राजधानीचा आखीव रेखीव बाज सोडून जरा लांब एका ठिकाणी आज जायचे आहे, लवकर निघू या असा गाईड चा निरोप आला. जातानाच तिने सगळा इतिहास सांगितला पोल पॉट चे क्रूर वर्तन वर्णन करून सांगितले. म्हणाली," जिथे जातोय ती जागा एक छळ छावणी होती, आता स्मारक आहे. " तिथे पोचे पर्यंत, स्मारक म्हणजे एखादा स्तूप वगैरे बांधला असेल अशी कल्पना केली होती. भव्य परिसर, बगीचे. त्यातून सगळा इतिहास ऐकत पुढे जातो. प्रत्येक ठिकाणची कत्तल करायची अघोरी पद्धत अगदी सविस्तर विषद केली गाईड ने. आणि मधोमध एक चार मजली टॉवर , त्यात फक्त हाडं आणि कवट्या! काचेतून दिसणारे! पोटात ढवळुनच येते ते बघून. ज्या लोकांना तिथे मारून पुरून टाकले होते, त्याच्या अस्थी त्या. अलीकडेच उत्खनन करून काढल्या आणि त्या काचेच्या आत ठेवल्या. हजारो कवट्या सापडल्यात आणि अजूनही उत्खनन चालू आहे त्यातून कवट्या निघतच आहेत. किती हाल अपेष्टातून वर येतोय हा देश?

तशीच अजून एक जागा दाखवायला ती घेऊन गेली. ती शाळा होती, पण पोल पॉट ने तिची छळ छावणी केली होती. आता त्यांनी तिथे स्मारक केले आहे. किती लोक तिथे मारले गेले वगैरे सांगतात. सगळं भयानक ऐकत ऐकत आपण बाहेर येतो तेव्हा एका झाडाखाली एक वृद्ध , साधारण ८० -८२ वर्षांचा , बसलेला असतो, तिथे आपल्याला नेतात. हे आजोबा स्वतः त्या छळातून गेलेले आहेत. ते शाळेत शिक्षक होते. पण क्रूरकर्मा पोल पॉट जनतेनी शिक्षण घेण्याच्या विरुद्ध होता. त्यामुळे शिक्षकांना त्याने सर्व प्रथम नष्ट करण्याचे आदेश दिले. त्यात हे आजोबा पकडले गेले. त्यांचा ही भयानक छळ झाला. ज्या दिवशी त्यांना मारून टाकणार होते त्याच दिवशी पोल पॉट चे पतन झाले, आणि इतके हाल सहन करूनही हे आजोबा जिवंत राहिले. अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले त्यांना सुटकेनंतर. त्यांनी लिहिलेल्या आत्मकथनाची तिथे विक्री होत होती. मिळणारे सर्व उत्पन्न ते त्यांच्या सारख्या पीडित व्यक्तींच्या कुटुंबांना देतात. कारण ते एकटेच आहेत. त्यांची कथा ऐकून अंगावर काटा येतो. मी लगेच ते पुस्तक विकत घेतले. तेवढाच त्या अनामिक कुटुंबाला आधार....

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments