पत्र क्र ४६

देशाची खरी ओळख त्यांच्या खेड्यांमधून होते असं म्हणतात. शहरात सुद्धा देश वसतो पण खरी ओळख खेड्यांमधूनच. विएतनाम मध्ये हनोई आणि हो ची मिन्ह सिटी ही दोन मोठी शहरं वगळता बाकी देश मला खेड्यातच वाटला....

कीर्ती वडाळकर
||4 min read

देशाची खरी ओळख त्यांच्या खेड्यांमधून होते असं म्हणतात. शहरात सुद्धा देश वसतो पण खरी ओळख खेड्यांमधूनच.

विएतनाम मध्ये हनोई आणि हो ची मिन्ह सिटी ही दोन मोठी शहरं वगळता बाकी देश मला खेड्यातच वाटला. शहरांमधून लोकसंख्या जास्त आहे पण खेड्यांमधूनही ती तेवढीच जास्ती वसलेली आहे. उत्तम प्रकारे पर्यटनाचा विकास करून, त्या भागात पर्यटकांना पोचवून ,बरीच प्रगती खेड्यापाड्यांमध्येही झालेली दिसते.

अतिशय दुर्गम अशा खेड्यांमधून आम्ही फिरलो. जाणवलं की सर्वप्रथम पर्यटन हा व्यवसाय त्यांनी पूर्णपणे अंगीकारलेला आहे. त्यांना पर्यटकांचे महत्त्व कळलेलं आहे. पर्यटकांसाठी लागणाऱ्या सर्व सुखसोयी ते उपलब्ध करून देतात. अनेक प्रकारचे चांगले हॉटेल्स खेड्यांमधून आहेत.

अगदी टिपिकल असं एक खेडं होतं, जिथे मोत्यांची शेती करतात. खरंतर शेतकरी खेडूत दिसणारे, आपल्याला दिसू नयेत आणि फक्त चांगलं तेवढं पर्यटकांना दिसावं अशी पूर्ण सोय त्यांनी केलेली. अनेक ठिकाणी मोत्यांसाठी क्षेत्र राखीव दिसत होती. मात्र पर्यटकांना समोरच्या एका छान बांधलेल्या अशा मोठ्या भव्य गॅलरीत सगळे दाखवून माहिती देत होते.

आणखीन एका खेड्यात गेलो होतो. मिकॉन्ग नदीच्या पात्राजवळ वसलेलं ते खेडं , विविध जातीची फळझाडे ,फुलंझाडे, खूपशी शेती, अतिशय हिरवेगार.

शेतामधून जाणारा रस्ता. तिथे त्या गावचे लोक तिथल्या चिकू, पाम, नारळवगैरे फळांपासून साखर तयार करून त्यापासून कॅंडी बनवत होते. ती सगळी कृती करून दाखवून, त्या गावची गाणी म्हणून, तिथले नाच दाखवून पर्यटकांचं मनोरंजन करत होते. खेड्यापाड्यांमध्ये जीवनशैलीही दाखवतात. घरात नेतात. बसकी घरं, पाऊस खूप होत असावा त्यामुळे उतरत्या छपरांची. अनेक प्रकारचे प्राणी तिथे होते. खरंच साप मारून त्याचा बर्गर बनवून ते खात होते. वास्तविक शेती खूप सुपीक वाटली. नदीच्या पात्रामुळे पाण्याची कुठेही कमतरता नव्हती. सर्व फळे अतिशय उत्तम होती चवीला. जी काही झाडाला लागली होती ती अतिशय सशक्त दिसत होती , भरघोस पीक आलेले दिसत होते. वेगवेगळ्या प्रकारची फळे तिथे खायला मिळाली. भल्यामोठ्या आकाराचे पांढरे आणि गुलाबी ड्रॅगन फ्रुट,लिचीच्यासारखे रामबुटान, चिकू, मेलॉन , पपनस, पपई, अननस, डुरियन,फणस, कितीतरी प्रकारच्या फळांचे मळे होते.

खूप दाट झाडी, मीकाँग नदीचे कालवे, त्यात घरे, तरी प्रत्येक गावाचा एक स्वतःचा असा चेहरा होता. प्रत्येक गावाला एक पॅगोडा होता. निवांत असं जीवनही होतं . जरी ९०

टक्के जनता बुद्ध असली तरी सरकारने कुठलाही धर्म मानलेला नाही. पापभीरू धर्मभीरु अशी शांत निवांत जनता खेड्यांमधून राहताना दिसली.

अनेक प्रकारचे छोटे मोठे उद्योग ते करतात.

सगळ्यात महत्त्वाचं, छोट्या -

छोट्या कालव्यांमधून , छोट्या बोटींमधून तुम्हाला फिरवून आणण्याचा जो प्रकार होता तो अतिशय छान होता. ताडानारळी च्या बोगद्यामधून वाहणारे नदीचे छोटे

- छोटे कालवे ,त्यातून बोटीतून फिरणारे आपण! खूप सुंदर प्रकार आहे तो.

शिवाय छोट्या छोट्या कलाकुसरीच्या वस्तू पण सगळीकडे विक्रीला दिसतात . मात्र गरिबी सगळीकडे आहे छोट्या खेड्यांमधून. तिथे आतिथ्य, आदर खूप जाणवला. आलेल्या माणसांचं कौतुक करावं ते त्यांनीच.

एका खेड्यामध्ये जेवायला गेलो होतो. आम्ही शाकाहारी आहे म्हटल्यावर त्यांच्या परसातली छान ताजी भाजी काढून , त्यांच्या पद्धतीचा खूप रुचकर स्वयंपाक केला होता. बागेतल्या मेलॉन चा

ताजा ताजा रस त्यांनी काढून दिला. सर्व शेतामधून फिरवलं. इतक्या प्रकारच्या भाज्या तिथे पिकवल्या होत्या. त्या सगळ्या चिरून त्यांच्या पद्धतीचा भात आणि अर्थातच नूडल्स, शेवटी गोड म्हणून बगीच्यातले अतिशय गोड आंबे चिरून दिले. हिवाळ्यामध्ये आंबे खाण्याचा हा वेगळाच आनंद होता.

अजून काही खेड्यांमधून जेव्हा फिरलो तेव्हा तिथल्या बऱ्याचशा छोट्या छोट्या कारखान्यांमधून पण गेलो. एका ठिकाणी नूडल्स बनवण्याचा घरगुती व्यवसाय होता. मोठ्या प्रमाणावर ते तो व्यवसाय करत होते. तिथला एक फेमस ब्रँडसुद्धा त्यांच्याकडून नूडल्स विकत घेत होता. ते करायची त्यांची पद्धत जरा वेगळी होती आणि ती सगळी त्यांनी खूप छान समजावून सांगितली. आम्हाला प्रत्येकाला नुडल्स बनवायलापण लावल्या. शेवटी मशीन मधून पोळी आत सोडून, चिरलेल्या नूडल्स खाली वाकून शिताफीने झेलायच्या . त्यांनी आम्हाला ते शिकवले.

सकाळच्या वेळात शेती करून दुपारी, जोडधंदा म्हणून हे व्यवसाय करतात .

एका खेड्यात सायकलवरून आम्ही फिरत होतो. एक खूप जुना वृक्ष या गावी आहे . असं म्हणतात त्या वृक्षामुळे गावात कुठलीच रोगराई येत नाही. तो वृक्ष त्या गावचा रखवाला आहे. तोच बघायला आम्ही जात होतो. खेड्यापाड्यांमध्ये सायकलीने फिरायला छान वाटत होतं. तिथल्या जीवनाचा पूर्णपणे अंदाज येत होता. शहरापासून इतक्या दूर असलेल्या त्या बेटात रस्ते असे नव्हतेच. मात्र छोटे छोटे साकव नदीच्या पात्रावर त्यांनी बांधलेले होते. त्या पुरातन वृक्षापाशी गेलो. तिथे अनेक श्वापदांच्या प्रतिकृती केलेल्या होत्या. वाघ सुद्धा होते. एका मोठ्या टेबलवर त्या दिवसाची पूजा कोणीतरी घातलेली होती. त्याबद्दल जी माहिती मिळाली ती खूपच मनोरंजक होती. ज्या कुणाला आपल्या पूर्वजांना खुश करण्यासाठी पूजा करायची असेल त्यांनी ती पूजा करायची असते. पूर्वजांना आवडणारे सर्व पदार्थ मांडायचे नैवेद्य म्हणून. एका टेबलवर चार बदक सोलून ठेवली होती. उकडलेली अंडी होती , सोललेल्या कोंबड्या होत्या , दारूसुद्धा ठेवली होती. मोठी उदबत्ती लावली होती आणि ती संपायची वाट बघत लोक बसले होते. उदबत्ती संपली की तिथे असणाऱ्या सगळ्यांना ज्या ठेवलेल्या वस्तू आहेत त्या वाटायच्या. गंमत वाटली. घरांच्या, दुकानांच्या बाहेर, शहरातून सुद्धा, सुंदर देव्हारे ठेवलेले दिसतात. त्यापुढे छान

- छान नैवेद्य ठेवलेले असतात. मोठ्या मोठ्या उदबत्त्या ही जळत असतात. त्या संपेपर्यंत सगळे वाट बघतात आणि मग नैवेद्य वाटून घेतात. पण झाडापाशी दिलेला दारूसकट चा नैवेद्य गमतीदार वाटला. जनता पाप , पुण्य, पूर्वज, राक्षस, भूतखेत या सगळ्यांवर विश्वास ठेवणारी आहे ,मात्र त्यांच्या त्यांच्या विश्वात ते सुखी आहेत.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments