पत्र क्र ४५

तर आपण व्हिएतनाम बद्दल बोलत होतो. उण्यापुऱ्या चार दशकाच्या स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी प्रथम पर्यटनाला जास्ती महत्व दिले. जेव्हा परदेशी पर्यटक येतात तेव्हा त्या त्या देशात परदेशी चलन येते आणि...

कीर्ती वडाळकर
||4 min read

तर आपण व्हिएतनाम बद्दल बोलत होतो. उण्यापुऱ्या चार दशकाच्या स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी प्रथम पर्यटनाला जास्ती महत्व दिले. जेव्हा परदेशी पर्यटक येतात तेव्हा त्या त्या देशात परदेशी चलन येते आणि अनेक उद्योगांना चालना मिळते. अनेक तरुण मुलं मुली टुरिस्ट गाईड म्हणून काम करताना दिसले. पर्यटकांना विमानतळावरून त्यांच्या हॉटेलवर पोचवणे वगैरे पार्ट टाइम काम करण्यासाठी त्यांना खूप सोपं जातं . एकदा असेच जेव्हा सफरीवर बाहेर पडलो तेव्हा गाडी मधल्या टुरिस्ट गाईड बरोबर एक मुलगा होता. त्याने विचारलं, "मी तुमच्याबरोबर बसू का?" मी म्हटलं , "नक्की बस" हनोई च्या अनुभवावरून हा नक्कीच शिकायला आलाय अशी खूणगाठ मनाशी बांधली. मग त्यांनी अनेक गोष्टी विचारल्या, जसं हि मुलगी तुम्हाला जी माहिती देते आहे ती तुम्हाला कळते आहे का? किंवा अमुक

- तमुक जागा ही तुम्हाला आवडली का? मी म्हटलं , "हो माहिती तर कळते आहे." प्रत्येक देशातली जशी भाषा उच्चारायची पद्धत वेगळी असते त्याप्रमाणे इथेही ती खूपच वेगळी होती. माहिती ऐकणं म्हणजे कानावर आघातच होते. पहिल्याच दिवशी लक्षात आलं होतं . शब्दातला शेवटचा उच्चार ते करतच नाहीत. जसं, "धि हाऊ अंक हो" आता कळेना म्हणजे काय? तर, "धिस हाऊस इज अंकल होज "

अरे देवा! सुरुवातीलाच हा फरक मी ध्यानात घेतला . त्यामुळे तिथून पुढे तो जे काही बोलत होता ते अगदी लक्ष देऊन ऐकून समजून घेत होते. बरोबर एक पाकिस्तानी पण होता. दोन स्विस स्त्रिया होत्या. तीन फिलीपिनोस होते. त्यातले फिलिपिनो जरा मजेदार होते. बाकी कोणालाही तो काय म्हणतोय ते कळेना. त्या स्विस स्त्रिया माझ्याकडे येऊन म्हणाल्या, "तुला जे काही कळलं ते आम्हाला पण सांग". पाकिस्तानीनी तर हद्दच केली, मला म्हणाला," कशाला हा एवढी बकवास करतोय? काहीहि कळत नाहीये"

असं बोलायची त्यांची पद्धत आहे, कदाचित त्यांच्या भाषेमध्ये असे शेवटचे शब्द उच्चारत नसतील आणि म्हणून तसंच ते इंग्रजीमध्ये ही बोलत असावेत.

सगळीकडे एक गोष्ट लक्षात आली की लोक सायकलवर बसून खूप प्रवास करतात. तेव्हा मी त्यांना विचारलं की, "तुम्ही इतके सायकली कसे काय वापरतात?" यावर त्यांची दोन उत्तर होती, एक म्हणजे सायकलीमुळे आम्ही फिट राहू शकतो आणि दुसरं म्हणजे आम्ही पैसेही वाचवू शकतो आणि नकळत आमच्याकडून कार्बन फूटप्रिंट कमी राहतो." एवढा विचार त्यांनी केला आहे, खरंच खूप कौतुकास्पद आहे. शहरात दुचाकी वाहने पण खूप आहेत.

गवताची त्रिकोणी टोपी डोक्यावर घालतात. शेतात त्यामुळे ऊन पावसापासून

रक्षण होते. रंगीबेरंगी कपडे पण घालतात. बायका ओ दाई नावाचा ड्रेस घालतात, एक लांब कुर्ता आणि खाली पॅन्ट. अनेक जमाती तिथे आहेत आणि प्रत्येक जमातीचा पेहेराव, पद्धती वेगवेळ्या आहेत.

आपल्यासारखाच लोकसंख्येचा प्रश्न त्यांनाही भेडसावतो. खूप जास्ती लोकसंख्या ही अतिशय दुर्गम अशा भागांमधून राहते. ते मुख्यत्वे शेती करतात, तांदूळ, फळं, भाज्या, कॉफी, पिकवतात. तरीही त्यांनी त्यांच्या देशाला एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून खूप सुधारला आहे. प्रत्येक ठिकाणी तिथली कला दाखवायला नेतात. बाजारात नेतात. कलाकारी अप्रतिम आहे, अंड्यांच्या कवचापासून पेंटिंग्ज, बांबूच्या वस्तू, नारळाच्या कवटीच्या वस्तू अनेक गोष्टी. आवर्जून ते तुम्हाला बनवताना बघायला लावतात. तुम्ही घ्यायला प्रेरित झालेच पाहिजे. चलन म्हणजे डाँग, फारच पडेल आहे, एक डॉलर ला तेवीस हजार डाँग मिळत होते. पण सगळीकडे डॉलरही घेतात. गावागावामधून फिरताना तिथली कला संस्कृती दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ तयार केलेले बघितले. तुम्हाला ते गाणी म्हणून दाखवतील. नाच करून दाखवतील. त्यांच्याकडे बनणारे पदार्थ दाखवतील, तुम्हला करून बघायला लावतील आणि अर्थातच तुम्ही विकत घ्यायला प्रेरित व्हाल. पण कोणीही गळ घालत नव्हते वस्तू विकत घेण्यासाठी.

त्यांचे प्रत्येक ठिकाणी जे काही कोऑर्डिनेशन होतं ते इतकं पर्फेक्ट होतं की कुठल्याही आलेल्या पर्यटकाला कसलीच चिंता राहू नये. सगळ्यात मला त्या लोकांची सचोटी फार भावली. जाताजाता तिथल्या शेवटच्या दिवशी आलेला अनुभव. आम्हाला पहाटेच उठून एका खेड्यात जायचे होते. तिथे सिल्क तयार करून त्यापासून अनेक वस्तू विणतात. गाईडने सांगितलं तुमचं सामान सगळं बांधून ठेवा. ते तुमच्या बोटीवर चढवले जाईल. पण त्या आधी आपण ह्या गावी जाऊन येऊ. बोट सात वाजता ची होती . आम्ही पहाटे पाच वाजताच त्या गावी निघालो. तेव्हा आमचं सामान एका सायकल रिक्षा मध्ये टाकायला त्यांनी सांगितलं. तो सायकल रिक्षावाला क्षणात ते सगळं सामान घेऊन कुठे गेला कळलच नाही. आमचा गाईड म्हणाला ,"तुम्ही चिंता करू नका. तो बरोबर तुम्हाला भेटेल. तुमचे सामान सुखरूप असेल " आम्ही आधी एक बेट बघायला गेलो. जिथे सिल्क विणलं जातं . एका दुसऱ्या बेटावर पण गेलो. तिथे माशांची शेती करत होते. असे दोन्ही बेट बघून निघालो, तेव्हा सात वाजले होते. मी गाईड कडे बघितलं. आता ती बोट सुटली तर? तो म्हणाला, "काही काळजी करू नका. चला" मिकॉन्ग नदी च्या मोठ्या पात्राच्या मधोमध एक स्पीडबोट आमची वाट पाहत होती. छोट्या बोटीतुन आम्ही तिथे गेलो. मी गाईडला विचारलं,"अरे बाबा पण त्या सामानाचं काय झालं? ते कुठे आहे? " म्हणाला, "तुम्ही पोहोचाल तेव्हा तुम्हाला तुमचं सामान मिळेल, ते ऑलरेडी या बोटीत टाकलेल आहे" विश्वास बसे ना. असा विचार केला जाऊ देत, त्या सामानात काय तर फक्त कपडेच होते ना , घेऊन गेला असेल तो रिक्षावाला तर जाऊ दे. आपण पुढच्या शहरात जाऊन सगळे कपडे विकत घेऊन टाकू, पण डोक्याला फार त्रास करून घ्यायचा नाही. मात्र खरंच जेव्हा आम्ही आमच्या इच्छित स्थळी उतरलो तेव्हा आमचं सगळं सामान तिथे आमच्या बरोबरीनेच पोचल होत.

गरिबी त्यांच्याही पाचवीला पुजलेली आहे पण कष्ट करून पैसा कमवण्याची त्यांची वृत्ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. कोणीही भीक मागताना दिसला नाही. इतक्या उशिरा स्वतंत्र होऊन आणि युद्धाच्या आगीत होरपळून निघून सुद्धा येणाऱ्या पर्यटकांसाठी एक अगदी "टुरिस्ट फ्रेंडली डेस्टिनेशन" त्यांनी तयार केलं आहे. नक्कीच त्यातून भरपूर परकीय चलनही ते कमवत आहेत.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments