पत्र क्र ४४
आज एका छोट्या देशाबद्दल सांगणार आहे, व्हिएतनाम . नाव घेतलं तरी फारसं काही आपल्याला माहित नसतं किंवा अगदी थोडी माहिती आपल्या जवळ असते. साधारणपणे आपण कुठे जायचं म्हटलं की युरोप, ब्रिटन, अमेरिका ,...
आज एका छोट्या देशाबद्दल सांगणार आहे, व्हिएतनाम . नाव घेतलं तरी फारसं काही आपल्याला माहित नसतं किंवा अगदी थोडी माहिती आपल्या जवळ असते. साधारणपणे आपण कुठे जायचं म्हटलं की युरोप, ब्रिटन, अमेरिका , ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड , सिंगापूर , मलेशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये केनिया, किंवा कधीतरी टांझानिया. आपण शक्यतो छान छान आणि नावाजलेल्या देशांनाच जातो. बरोबरच आहे, आधी ज्यांनी चांगला अनुभव घेतलेला आहे, त्यांचे ऐकूनच आपणहि मार्ग आखावा. उगाच एवढा पैसा खर्च करून, ते वीसा चे दिव्य पार करून, इतक्या लांब जायचं आणि काहीतरी भलतंच तिथे असायचं. त्यापेक्षा पुढच्यास ठेच मागचा शहाणा या नीती प्रमाणे, नावाजलेल्या देशांना जाणच कधीपण सोयीच. मी व्हिएतनाम ला जातेय म्हटल्यावर सगळ्यांनी थोडी टिंगलच केली होती. तिथे कुत्रे मांजर खातात, साप मारून बर्गर बनवतात, बदकं सोलून देतात, वगैरे मौलिक माहिती सगळ्यांनी तत्परतेने पुरवली होती.
व्हिएतनाम या देशाला १९७५/७६ साली
स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे जेमतेम पंचेचाळीस वर्षं झालीत. खरे तर स्वातंत्र्य त्यांना खुप आधीच मिळालं होतं. म्हणजे १९४५ मध्ये त्यांनी स्वतःला फ्रेंचांपासून स्वतंत्र घोषित केले होते. पण फ्रेंचांची धुसफूस चालूच होती. १९५४ मध्ये युद्ध होऊन देशाचे दोन भाग पडले, चीन आणि रशिया ने पाठिंबा दिलेला म्हणजे communist विचारसरणीचा उत्तर व्हिएतनाम तर अमेरिकेने पाठिंबा दिलेला दक्षिण व्हिएतनाम. अनेक झटापटी झाल्या.
हो ची मिन्ह यांनी त्या देशाला एकसंध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तो देश एकसंध झाला सुद्धा पण हो चि मिन्ह यांच्या पश्चात.
हनोईला आजही त्यांनी हो चि मिन्ह यांचे पार्थिव जपून ठेवले आहे, एक राष्ट्रीय स्मारक म्हणून आलेल्या प्रत्येक पर्यटकाला तिथे जायची ते लोक गळ् घालतात. ते सगळे स्मारक त्यांनी खूप चांगलं सांभाळलं आहे. हो चि मिन्ह ह्यांचे साधेसे बांबूचे घर, त्यांचा बगीचा वगैरे उत्तम रीतीने जतन केले आहे. संपूर्ण सुरक्षा तिथे पाळली जाते. प्रत्येक पर्यटकाने चांगले आणि पूर्ण देह झाकणारे कपडे घालावेत अशा सूचना दिल्या जातात. तुमचे गैरवर्तन हे "अंकल हों" चा अपमान मानून तुम्हाला शिक्षा होऊ शकते.
१९७५ ला ,युद्धात उत्तर व्हिएतनाम चा विजय झाला आणि त्या देशाने स्वतःला सोशॅलिस्ट रिपब्लिक घोषित केले.
अनेक दशके चाललेल्या युद्धात जनता होरपळून निघाली होती. आज आपल्याला जरी
अतिशय सुंदर भासत असला तरी ह्या देशाने खूप सोसले आहे.
चांगला समृद्ध शेती व्यवसाय कारण भरपूर पाणी, चांगली हवा आणि प्रदूषण कमी. पण थोडक्यात मला जे त्या देशाबद्दल जाणवलं ते मी सांगते .
आजही अतिशय कठीण परिस्थितीत लोक जगतात. त्यांना आवडत असेल ती कला जपतात. भरपूर महागाई असल्यामुळे एकाच्या पगारात किंवा एका पगारात सुद्धा भागत नाही. कारण पगार जास्त मिळत नाही. दोनशे डॉलर
महिन्याला, या संख्येच्या वर जर तुमचा पगार गेला तर भरपूर टॅक्स भरावा लागतो. आणि हा पैसा फारच कमी पडतो. घरं तर इतकी छोटी छोटी दिसली की काड्यापेट्या एकमेकांवर रचून बांधलीत की काय अशी शंका यावी. इतक्या छोट्या घरांमध्ये ही लोक कशी राहत असतील, हा आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो.
जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा अतिशय कष्टाचे असे दिवस त्या लोकांनी काढले. हो ची मिन्ह सिटी जवळ एक जागा उदारहरण म्हणून आपल्याला दाखवतात, कसे अतिशय कष्टाने लोक राहत होते. त्यांनी जमिनीखाली बोगदे खणून त्यात मोठी मोठी गावं वसवली होती. अतिशय आश्चर्याची अशी ही गोष्ट आहे . ते बोगदे आतून अतिशय व्यवस्थित रित्या जोडलेले होते. वरतून यत्किंचीतही शंका येणार नाही की खाली काय आहे , पण इतक्या कमी जागेत राहून त्यांनी स्वातंत्र्यलढा पार पाडला.
एजंट ऑरेंज नावाचं केमिकल तिथल्या शेतांवर फवारून सगळ्या लोकसंख्येला एक शाप मिळाला . आणि त्याचे परिणाम जनता आज हि भोगत आहे. जसा जपानमध्ये अणू बॉम्ब पडल्यावर आजही त्यांच्या पिढ्या त्या अणुबॉम्ब चे परिणाम भोगत आहेत तसंच या एजंट ऑरेंजचे. आजही अनेक मुलं या एजंट ऑरेंज च्या परिणामांमुळे अंध, अपंग आणि अशक्त जन्माला येत आहेत .
देश म्हणजे देशातील माणसं! अतिशय कष्टाळू, शिस्तबद्ध आणि स्वच्छता प्रिय! कुठेही तुम्हाला कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत. त्याचं कारण सरकारी यंत्रणा लगेच त्यांना शिक्षा करते आणि ती शिक्षा खूप मोठी असते . त्यामुळे अगदी शाळेपासूनच मुलांना हे सगळे धडे दिले जातात.
हनोईच्या सुंदर तलावाभोवती संध्याकाळी फिरत होतो. काही मुलं घोळक्याने आली आणि म्हणाली की तुमच्याशी आम्ही थोड बोलू शकतो का? मला जरा आश्चर्य वाटलं, की माझ्याशी यांना काय बोलायचं असेल? म्हटलं जरूर बोला, काय बोलायचय? तुम्ही कुठल्या देशातून आलात? तुम्ही इथे किती दिवस राहणार? कुठे कुठे फिरणार? तुमच्या देशात काय आहे? तुम्ही हे जे कपडे घातलेत ते आमच्या इथे असे घालत नाही, त्याला काय म्हणतात ? तुम्ही कपाळावर काय रेखलेय? असे वेगवेगळे खूप प्रश्न त्यांनी विचारले. बराच वेळ संवाद झाल्यावर, मी त्यांना विचारलं की "तुम्हाला असं माझ्याशीच बोलायची इच्छा का झाली?" त्यांनी सांगितलं, "आम्ही असे रोज या तलावावर येतो. त्या तिथे पलीकडे बसलेल्या आमच्या सगळ्यांच्या आई आहेत. त्या त्यांचा संध्याकाळचा व्यायाम करतात. आम्ही पर्यटकांशी गप्पा मारतो, त्याचं कारण आम्हाला आमची इंग्रजी भाषा सुधारायची आहे. पुढे जाऊन जेव्हा आम्ही कुठल्या धंद्यात पडू किंवा कुठे कामाला जाऊ तेव्हा ही शिकलेली इंग्रजी भाषा आम्हाला कामी येईल. आम्हाला शाळेत असे शिकवतात की जितकं तुम्ही जास्त इतरांशी बोलाल, तितकी तुमची भाषा सुधारली जाते."
खरं तर इतकी लहान मुलं होती ती .
मला त्यांचं खरंच खूप कौतुक वाटले. शाळेपासूनच मुलांना इतके चांगले धडे देणे, खरंच कौतुकास्पद आहे. हे कुतूहल म्हणून मी त्यांच्या शाळेचा अभ्यासक्रम पण विचारला. आणि त्यात त्यांना शेती पिकवायला शिकवण्या पासून इतिहास, स्वच्छता, शिस्त, कला, देशप्रेम असे अनेक विषय होते. पुढची पिढी घडवण्यासाठी खरंच खूप विचारपूर्वक प्रयत्न करावे लागतात नं ........
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.