पत्र क्र ४३
नुकतीच दिवाळी संपली. नेहमी प्रमाणे आपण ती चांगलीच साजरी केली. प्रत्येकाच्या घरी त्यातले सगळे दिवस हे एका ठराविक पद्धतीने साजरे होतात. आम्हीही तसेच करतो. पण त्या निमित्ताने आज काही वेगवेगळ्या ठिकाणी...
नुकतीच दिवाळी संपली. नेहमी प्रमाणे आपण ती चांगलीच साजरी केली. प्रत्येकाच्या घरी त्यातले सगळे दिवस हे एका ठराविक पद्धतीने साजरे होतात. आम्हीही तसेच करतो. पण त्या निमित्ताने आज काही वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झालेल्या दिवाळीची आवर्जून आठवण झाली. एक वर्षी ओरिसा मध्ये फिरत होतो. अतिशय सुंदर, सुबक, रंगवलेली खेड्यातली घरं ! सारवलेले आणि त्यावर वेगवेगळ्या रंगांनी विविध आकृती रंगवलेल्या. दिवाळीनिमित्त ही सगळी शोभा अतिशय सुंदर भासत होती. विविध भागात दिवाळीनिमित्त अशीच रंगरंगोटी बघायला मिळते.
भारतात अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या पद्धतीने दिवाळी साजरी होते पण ती जर परदेशी साजरी केली तर जरा वेगळाच काही आनंद त्यात मिळतो.
जेव्हा खेड्यापाड्यांमध्ये जाऊन आपण फिरतो तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने किती सुंदर पद्धतीने घर आणि सगळा परिसर सजवलेला असतो ते दिसतं. दिवाळी हा केवळ दिव्यांचा उत्सव न राहता विविध रंगांचा उत्सव होऊन जातो. संध्याकाळ तर सुंदर असतेच कारण लक्ष दीप उजळत असतात.
एक वर्षी ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी विमान प्रवास करायची संधी मिळाली . लक्षात राहण्यासारखा प्रवास होता तो. अतिशय छान सजलेला विमानतळ . सगळीकडे दिवाळीनिमित्त रोषणाई, आकाशकंदील, रांगोळ्या आणि सर्व प्रवाशांचे
प्रेमानी स्वागत होत होते. जे नेहमी रागारागात तुमच्याकडे बघत असतात असे सुरक्षारक्षक सुद्धा खूप प्रेमाने बघत होते असं मला जाणवले. विमानातली वागणूक पण छानच होती, अर्थात ती नेहमीच असते पण दिवाळीनिमित्त सुंदर भेटवस्तू प्रत्येकाला दिल्या. अशा आपण अनेक वस्तू विकत घेऊ पण जर कोणी छोटीशी जरी वस्तू आपल्याला भेट दिली तरी ती आपल्याला फारच आवडते. विमानाने आकाशात झेप घेतली आणि खालचा अपूर्व सोहळा काय वर्णावा? सुंदर दिव्यांची आरास! खरंच लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ! त्यात उंच उंच आकाशाचा वेध घेणारे फटाक्यातले बाण , कुठे छोटासा अनार , कुठे छोटासे भुईचक्र आणि उंचावरून ते इतकं मजेदार आणि सुंदर दिसत होतं.
नेहमी अंधाराच्या वेळेला जेव्हा विमानाने जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा शहरातल्या दिव्यांची रोषणाई छानच दिसते पण ही जी रोषणाई होती ती अपूर्व, अभूतपूर्व दिसत होती. संपूर्ण मुंबा नगरी लखलखत होती. त्यानंतर अनेक वेळेला मुद्दाम दिवाळीच्या दिवशी विमान प्रवास केला, केवळ ही सुंदर रोषणाई बघण्यासाठी .
एकदा मला आठवतं हिमालयात आम्ही दिवाळीनंतर गेलो होतो. थंडीची छान सुरुवात होती. अनेक सैनिक बांधव तिथे भेटले. हवा थंड होती पण आपल्या बांधवांच्या भेटीचा उबदारपणा त्यात होता. सगळा परिसर सुंदर नटलेला होता.
एक वर्षी युगांडा चे मित्र दिवाळी बघण्यासाठी म्हणून इथे आले होते. आठ दिवस चाललेली दिवाळीची ती तयारी बघून मैत्रीण म्हणाली, "किती काम करता ग तुम्ही सगळ्याजणी? मला तर हा सगळा विचार सुद्धा झेपणार नाही. काय काय पदार्थ बनवलेस तू? किती खपून हे सगळं तुम्ही तयार करता? त्या पदार्थाची पूर्व तयारी आणि प्रत्यक्ष कृती, सगळं प्लॅन करणं पण थकवेल मला.
आकाशकंदील पण किती मस्त आहे. " रांगोळ्या, आकाशकंदील, दिवे सगळं बघून इतके हरखून गेले होते ते सगळे जण. त्यांना बाजारात फिरायला नेले. फिरताना तर ते म्हणाले ,"दरवर्षी दिवाळीत भारताला भेट दिलीच पाहिजे, इतकं सगळं सुंदर भासत आहे इथे. "
बाजारात अनेक प्रकारच्या कपड्यांची , वस्तूंची, खरेदी ही त्यांनी केली. खूप पणत्या विकत घेऊन , रंगवून घेऊन गेले. आकाश कंदील सुद्धा घरी कसा करायचा, ते करायला शिकले आणि म्हणाले तिकडे जाऊन आम्ही हे सगळं ख्रिसमस साठी नक्की वापरू. आपल्या सगळ्या पदार्थांची तयारी, घराची सजावट आणि बाजाराचा पलटलेला नूर बघून ते सगळे खूप खुश झाले. मात्र , " इतके कष्ट आम्हाला झेपणार नाहीत, किंबहुना आम्ही ते करायच्या भानगडीतही पडणार नाही" हे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. भारतीय लोक खूप काम करतात आणि खूप कष्ट करतात असा समज करून, दिवाळी साजरी करून, ते परत गेले. त्यात अनेक प्रकारचे किल्ले बांधलेले जेव्हा दाखवले
त्यांना त्याचं खूपच आश्चर्य वाटलं. किल्ले बांधणी हे काही तरी त्यांच्यासाठी नवीन होतं . लहान मुलांनी, मोठ्यांच्या मदतीने किती सुंदर बांधकाम केलं आहे, ते त्यांना ते जाणवलं अर्थात खरंच आहे म्हणा ते.
अजून एक लक्षात राहिलेली दिवाळी म्हणजे हलॉंग बे वर साजरी केलेली दिवाळी! अनेक प्रकारचे, अनेक देशातले नागरीक त्या क्रूज वर होते. खरंतर "क्रूज" शब्दाला शोभेल अस मोठं जहाज नव्हतं ते. अत्यन्त आलिशान अशा , साधारण पंधरा खोल्या असाव्यात राहण्यासाठी. १४
देशांचे तरी वेगवेगळे लोक त्याच्यात होते. दिवाळीचा दिवस असणार होता म्हणून आम्ही बरोबर काही मिठाया वगैरे घेतल्या होत्या . आम्ही जरा छान कपडे वगैरे घालून संध्याकाळच्या पार्टीसाठी तयार झालो. जेव्हा डेक वर गेलो तेव्हा बघितलं, आमच्यापेक्षा इतर लोकांना आमच्या दिवाळीची जास्ती काळजी होती. आम्ही जायच्या आधीच त्यांनी डेक सुंदर सजवला होता. अनेक दिव्यांची रोषणाई तिथे केलेली होती. मेणबत्त्या पेटवल्या होत्या आणि आम्ही वर पोचल्याबरोबर सगळ्यांनी एका सुरात ,"हॅपी दिवाली" म्हणत आम्हाला अभिवादन केले. इतके भारावून गेलो होतो आम्ही . टोंकीन च्या गल्फ मध्ये, अनेक लहान मोठ्या खडकांच्या सान्निध्यात, पाण्याने वेढलेल्या त्या जहाजावर, कोणी इतकं प्रेमानी आपल्याला अभिवादन करेल असे स्वप्नात पण वाटले नव्हते. मग सगळ्यांना दिवाळीचे महत्त्व, भारतातील दिवाळी कशी असते वगैरे माहिती सांगितली. एकदा तरी दिवाळीत भारताला भेट द्या असे सांगितले. बरोबर आणलेल्या मिठाया दिल्या . संपूर्ण संध्याकाळ खूप सुंदर गेली. अशी ही एक दिवाळी!
अजून एक दिवाळी लंडन मधली. इंग्लंड मध्ये अनेक भारतीय आहेत आणि त्यामुळे दिवाळी हा सण त्यांच्यासाठी नवीन नाही. अनेक भारतीय दुकानांमधून अनारशा पासून सगळे फराळाचे पदार्थ दिसत होते विकायला. भाऊ राहतो त्या भागामध्ये तर एक मंदिर सुद्धा आहे. तिथे दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. सगळे भारतीय लोक एकत्र येऊन मेजवानी देतात. मोठ्या मोठ्या ऑफिसमधून, मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत असलेले सगळे लोक तिथे अक्षरशः पडेल ते काम करतात, स्वयंपाकात मदत, टेबल खुर्च्या लावण्यात मदत, कितीतरी कामे ते मजेत करतात. आलेल्या लोकांबरोबर उत्तम अशा त्या मेजवानी ची मजा घेतात. संध्याकाळी सगळे मिळून लक्ष्मीपूजन करून फटाके उडवतात. सर्व भागात दिव्यांची रोषणाई करतात. हा कार्यक्रम खूप नेत्रदीपक असतो. लांबलांबून तो बघायला लोक जमलेले दिसत होते. आम्ही गेलो होतो तेव्हा
पावसाची बारीक
- बारीक भुरभुर सुरू होती. सुंदर थंडीची सुरुवात होती . ह्या सगळ्यातून दिव्यांची रोषणाई आणि सुंदर सुंदर फटाक्यांची अतिषबाजी बघायला खूप छान वाटलं. सगळ्यात महत्त्वाचं मला जे जाणवलं ते अनेक देशांचे लोकसुद्धा त्या दिवाळीचा आनंद घ्यायला जमले होते म्हणजे दिवाळी केवळ भारतीय लोकांपुरती न उरता खऱ्या अर्थाने ग्लोबल झाली होती.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.