पत्र क्र ४२

गाई म्हशी रस्ता क्रॉस करत असतात, एखादा कुत्राच धावतो इकडून तिकडे, माणसे तर कायम जीवावर उदारच झालेली असतात, गाडीवाले पण कुठून कुठे कसे समोर येतील ह्याचा नेम नसतो. पण त्यामुळेच रस्त्या बरोबर...

कीर्ती वडाळकर
||4 min read

परदेशात एकूणच शिस्त जास्त दिसते. आपली माणसं तिथे जाऊन ती अगदी कसोशीने पाळताना पण दिसतात . सर्वच ठिकाणचे रस्ते म्हणजे लोण्यासारखे अगदी मऊ . तुमच्या पोटातलं पाणी सुद्धा हलणार नाही, इतके गुळगुळीत. सगळीकडेच असा अनुभव आला. युरोपमध्ये अनेक रस्त्याने फिरलो. खरोखर कुठेही धक्का लागला नाही. आमचा ड्रायव्हर गमतीने म्हणायचं मी ड्रायव्हर नसून पायलट आहे, मला पायलट म्हणत चला, इतक्या अलगद पणे मी तुम्हाला प्रवास घडवणार आहे. सगळ्या भटकंतीमध्ये त्याने गाडी सुद्धा उत्तम चालवली, तीही थोडी थोडकी नाही तर चक्क तीन साडे तीन हजार मैल ! पहिल्याच दिवशी मात्र जरा टेन्शन दिलं होतं, असं सांगून कि त्याचं वय बहात्तर वर्ष आहे आणि केवळ आनंद म्हणून तो गाड्या चालवतो .

एकदा नॉटिंगहॅम हुन लंडन कडे येताना बराच आधी पासून सिग्नल आला, अमुक

- तमुक रस्ता बंद आहे. अरे देवा! आता काय करणार? सहा लेनच्या त्या रस्त्यामध्ये दोनच लेन चालू होत्या, का कळेना. बाजूच्या चारही मधून ना कोणी येत होतं ना जात होतं. कंटाळून शेवटी भावाला म्हटलं, "घाल गाडी तिकडे, रिकामा तर दिसत आहे रस्ता". तो म्हणाला, "मी जर तिकडे गाडी घातली तर समोरून अक्षरशः माझी उचलबांगडी केली जाईल, गाडी सकट!" आणि "हि डावीकडची लेन काय रे? तिच्यात घाल." म्हणाला, "नाही, तिला ॲम्बुलन्स साठी ठेवली आहे." म्हंटलं," मागेपुढे लांब लांब पर्यंत मला कुठेही तुमची ती अँब्युलन्स दिसत नाही, कशाला रस्ता मोकळा सोडत आहे?" म्हणाला, "नियम आहे, तो पाळावाच लागतो."

अमेरिकेत मुला बरोबर फिरताना जवळ जवळ चार साडेचार हजार मैल रस्ता पार केला. खूप ठिकाणी इतका सरळ सरळ रस्ता! आजूबाजूला शेतांना सुद्धा कुंपण घातलेलं. कोणी क्रॉसपण करू शकत नाही.

सरळ सरळ लांब पर्यंत दिसणारा रस्ता! मागचा माणूस, ओव्हरटेक करायला सुद्धा, खूप लांबून जणूकाही परवानगी मागूनच पुढे जातो. मोठ्या मोठ्या शहरांमधून नाही म्हणायला ट्रॅफिक जाम अनुभवला, पण तो तिथेच सुटत होता किंवा त्याची कारणं वेगळी होती. कोणीही हॉर्नचा वापर जास्ती करत नाही. हे लक्षात आलं. एकदा तर वैतागून मुलाला म्हटलं, "त्या गाडीवाल्या कंपनीकडे जाऊन हॉर्नचे पैसे परत माग बरं, वाजवायचा नाही काही नाही, तर हवाय कशाला?"

तिथेही फिरताना लक्षात आलं की लोक नियम पाळतात. ॲम्बुलन्सचा प्रसंग तिथेही आला. गाडीतल्या सिस्टिम वरून सिग्नल आला, ॲम्बुलन्स येतेय , बाजूला व्हा." वेगात धावणाऱ्या सर्व गाड्या, भराभरा रस्त्याच्या कडेने थांबल्या. एवढा मोठा रस्ता होता तो , मला वाटतं जवळजवळ सहा लेन एका बाजूला असाव्यात , तरीपण एका अम्बुलन्स साठी सगळ्या गाड्या, दोन्ही दिशेच्या, थांबल्या. काही वेळ गेला आणि मग अनाउन्स झालं तुम्ही जाऊ शकता. तुमची ॲम्बुलन्स? ती मात्र दिसली नाही. न दिसणाऱ्या त्या ॲम्बुलन्स साठी सगळी माणसं थांबली होती. ते जगणं महत्त्वाचं त्यांच्या दृष्टीने .

आफ्रिकेत सुद्धा असंच . खरंतर ते देश किती मागासलेले आहेत असं आपल्याला वाटत, पण लांब लांब पर्यंत रस्ता अतिशय चांगला , सरळ सरळ आणि सुंदर असा रस्ता! कंपाला सिटीमध्ये सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिक जाम होतो. का तर मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या छोट्या छोट्या रस्त्यांमधून, अनेक गाड्या येत असतात. अगदी एक छोटी गाडी जरी क्रॉस करायला आली तरी सगळा ट्रॅफिक थांबून तिला पुढे जाऊ देतात . पण त्यामुळे हा ट्रॅफिक जाम वाढत जातो. आम्ही एंटेबी ला उतरलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. मित्रांनी सांगितलं," आपण इथे जवळच जेवण करू, दीड

- दोन तास थांबू, आणि रात्री नऊ वाजले की परत जाऊ. तोवर सगळे रस्ते मोकळे होतील" सकाळी आणि संध्याकाळी मुले शाळेत जात असतात किंवा शाळेतून घरी परतत असतात, म्हणून जॅम होतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरा लांब रहा , असा अलिखित नियमच होता, जेणेकरून मुलं लवकर घरी पोहचू शकतील.

अमेरिकेतला प्रसिद्ध असा हायवे वन! ऐकलं होतं त्याबद्दल खूप. सुंदर! समुद्राच्या बाजूने जाणारा आणि सरळ सरळ. आणि एक भयानक रस्ता हायवे

50! तिथे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा, रस्त्याच्या सुरुवातीलाच, ते तुम्हाला सांगतात, रस्ता वाळवंटातला आहे, लांब लांब पर्यंत मनुष्यप्राणी दिसणार नाही . फ्युएल सुद्धा मिळणार नाही. आधीच विचार करा. पण आम्ही जाणार होतो आणि त्यामुळे खूपशी उत्सुकताही ताणली गेली होती इतका सुंदर असा तो रस्ता आहे पण खरच

निर्जन! कुठेही हॉटेल नाही, थांबायला जागा नाही, गॅस स्

‍ टेशन नाही, लांब लांब पर्यंत जाणारी तुमची एकटी गाडी. फारशी प्रवासी मंडळी इकडे फिरकत नाहीत. पण एक वेगळा अनुभव या रस्त्यावर नक्कीच प्रवास करून मिळाला.

अमेरिकेतला सगळ्यात जास्ती एकाट रस्ता म्हणून हायवे ५० प्रसिद्ध आहे. ते आजूबाजूला वाळवंट , मध्ये मध्ये येणारे खुप डोंगर, लांब लांब पर्यंत नागरी संस्कृती चे थोडही अस्तित्व जाणवत नाही. मात्र एकदा सफर करायला नक्कीच हरकत नाही.

परदेशातल्या रस्त्यांवर एकच गोष्ट होते, फारसे काही घडत नाही. त्यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना झोप यायला लागते. भारतात मात्र आपण चांगलेच अलर्ट राहतो कारण रस्त्यावर अनेक surprises येतात, कुठेतरी गाई म्हशी रस्ता क्रॉस करत असतात, एखादा कुत्राच धावतो इकडून तिकडे, माणसे तर कायम जीवावर उदारच झालेली असतात, गाडीवाले पण कुठून कुठे कसे समोर येतील ह्याचा नेम नसतो. पण त्यामुळेच रस्त्या बरोबर आजूबाजूच्या परिसराचा पण आनंद घेतला जातो. रस्त्याला खड्डे पडतात हे तिकडे कुठेच जाणवत नाही.

एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली ती म्हणजे रस्त्यांची नावं , कुठेही व्यक्तीचे नाव रस्त्याला नव्हते. कुठे नंबर तर कुठे फळांची , फुलांची किंवा प्राण्यांची नावे, रोज स्ट्रीट, वॉलनट स्ट्रीट , वूल्फ स्ट्रीट वगैरे लक्षात ठेवायला पण सोपं .

--

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments