पत्र क्र ४१
रस्त्यावर आपण भयानक असा ट्रॅफिक जॅम बघतो. त्याचं कारण असं काही नाही, प्रत्येकाला पुढे जायची घाई हेच असतं. आमचा परदेशी मित्र होता एकदा बरोबर, आणि ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो. त्याला इतके टेन्शन आले, तो...
फिरतांना प्रकर्षाने जाणवतो तो आजूबाजूचा परिसर आणि अनेक ठिकाणचे रस्ते. हल्ली रस्ते हा जरी विनोदाचा विषय झालेला असला तरी अनेक ठिकाणचे रस्ते प्रेमळ भासतात. अगदी, "ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा"! भारतामध्ये सुद्धा खूप सुंदर रस्ते लक्षात राहिलेले आहेत. दिल्लीहून निघून अमृतसर कडे जाताना नॅशनल हायवे नंबर वन, दोन्ही बाजूला उंच उंच निलगिरीची झाडं आणि सुंदर परिसर, केरळमध्ये तर सगळ्या डोंगरांमधून फिरताना रस्त्याच्या दुतर्फा असणारे वनं आणि शेतं यामुळे प्रत्येक रस्ता लक्षात राहतो.
समुद्राच्या बाजूने जाणारा रस्ता तर कधी संपूच नये असं वाटतं. मग तो कर्नाटक मधला रस्ता असो कि गोव्यातला किंवा द्वारकेपासून सोमनाथ पर्यंत पोचवणारा! समुद्राची अखंड साथ आणि लांबच लांब जाणारा रस्ता ! भारतात कुठेही फिरताना रस्त्या बरोबर खड्डे तर असतातच पण ते फारसे लक्षात न राहता रस्ता लक्षात राहतो, असं मला वाटतं . मध्यप्रदेशात सुद्धा रस्त्याच्या आजूबाजूला डोलणारे गव्हाचे शेत आणि तारां वरून गिरक्या घेत येऊन बसणारे सुंदर रंगाचे नीलपंख खूप सुंदर भासतात . मध्यप्रदेशात फिरताना एकदा खूप फळझाडं असलेला भाग लागला आणि तिथे दुतर्फा ते फळ विक्री करत होते. तो रस्ता इतका छान वाटला कारण ताजी ताजी फळे खाऊन तिथला सफर खुपच छान कटला. काश्मीर मध्ये सुद्धा ताजी सफरचंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला विकायला पोरं उभी असतात आणि तो रस्ता त्यामुळेच लक्षात राहतो. गोरी गोरी, गुलाबी गालांची ती मुले बघून, थांबून फळं घ्यायची ईच्छा होतेच . काश्मीर मध्ये अनेक ठिकाणी उघडा बोडका हिमालय साथ करतो, पण तरीही तो रस्ता अतिशय सुंदर भासतो. अरुणाचलमध्ये तर सरळ रस्ता असा नव्हताच.
सुंदर सा हिमालयीन साथ, खूप जंगल, मधून मधूनच येणारे छोटे छोटे पाडे , कुठेतरी तिच्या शेतातलं सामान विकणारी बाई आणि अनेक ठिकाणी सोबत करणारे सैनिक. काश्मीर मध्येपण अनेक ठिकाणी मीलटरी चा ताफा भेटतो. अरुणाचल चे रस्ते त्यासाठीच लक्षात राहिले. पहिल्याच दिवशी जेव्हा बोमडीला मध्ये थांबलो, काही मुंबईचे लोक भेटले. तीन दिवस ते तिथे थांबलेले होते. पुढचा सगळा रस्ता बंद असल्यामुळे त्यांना पुढे जाता येत नव्हतं. हिमालया मध्ये रस्ते केव्हाही बंद पडू शकतात कारण भूस्खलन खूप होतं. आणि मग ते सगळं साफ करून रस्ता उघडण्यासाठी तीन
- चार दिवस तर जातातच. आम्ही तर तवांगच्या रस्त्यावर होतो. त्या मंडळींनी सांगितलं की चार दिवस तर आमचे फुकट गेले, इथे किती दिवस राहायचं? आता उद्या आम्ही परत जाऊ. तुम्ही शहाणे असाल तर परत चला. म्हटलं बघूया रस्ता जर साथ देत असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही. ती लोकं सकाळी परत गेली. आम्ही जरा गावात फिरून वगैरे आलो आणि काही लोक म्हणाले की पुढचा साधारण
70 किलोमीटरचा रस्ता उघडला आहे.
56 किलोमीटर वर दिरांग नावाचं गाव आहे, तेही सुंदर आहे, बगीचे आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. चला
56 किलोमीटर अजून तर जाऊया, म्हणून आम्ही हळूहळू दिरांगपर्यंत पोहोचलो. त्या दिवशी तिथेच थांबलो. संध्याकाळी बाजारात फिरत असताना काही सैनिक तिथे होते. त्यातले दोघं आमचं मराठी ऐकून आमच्यापर्यंत आले त्यांना फार आनंद झाला, ते सोलापूरचे होते. आमच्याशी गप्पा मारताना त्यांना कळलं की आम्ही तवांग पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय पण रस्ता बंद असल्यामुळे अजून पुढची काही खात्री आम्हाला नाही. ते म्हणाले, "अजिबात चिंता करू नका. उद्या सकाळी पहिली मिलिटरी ची गाडी जेव्हा निघेल , तेव्हा आमच्या बरोबर तुम्ही निघा. आम्ही रस्त्याचे काम करण्यासाठीच येथे आलो आहोत." खरंच, सकाळी त्यांच्या बरोबर, त्यांच्या ताफ्या मागोमाग, आमची ही गाडी निघाली. रस्त्याच खूपच नुकसान झालेलं होतं. ते जेव्हा रस्त्याचे काम करत होते, तेव्हा आम्ही तिथल शहीद स्मारक आणि इतर जागा बघितल्या. तोवर एक गाडी निघेल एवढा रस्ता तयार झाला आणि मिल्ट्री च्या ताफ्या बरोबर आम्ही पण निघालो.
उत्तराखंडमध्ये जवळजवळ पंधराशे किलोमीटर पेक्षा जास्ती रस्ता पार केला. अनेक वेळा तर दूरदूर पर्यंत कोणीही सोबत नसायचं. ना समोरून कोणी येत असायचं. हिमालयातला रस्ता तो, त्यामुळे सरळ रस्ता असा कुठे नव्हताच. घाटातला वळणावळणाचा, सुंदर रस्ता. कुठे दूरवर बर्फाच्छादित शिखरे , तर कुठे रस्त्याच्या बाजूलाच बर्फ पडलेला! मस्त रस्ता होता तो .
राजस्थानात सुद्धा रस्त्याने फिरताना छान अनुभव येतात. जोधपूर च्या पुढे जिथे वाळवंट सुरू होतं तिथून रस्ता हा केव्हा वाळू नि आच्छादित होऊन जाईल हे सांगता येत नाही. असं त्या लोकांनी सांगितलं. एकूणच भारतात रस्त्याने फिरताना अनेक चांगले अनुभव येतात, जनजीवन जवळून बघायला मिळत.
पण सगळ्यात मजा असते ती रस्त्यावरून जाणाऱ्या आपल्या लोकांची. कुठलाही नियम हा पाळायचा नसतोच, अशी सगळ्यांची धारणा असते. कुठेतरी ॲम्बुलन्स केविलवाणा प्रयत्न करत असते पुढे जाण्याचा, तर कुठेतरी रस्त्यावर आपण भयानक असा ट्रॅफिक जॅम बघतो. त्याचं कारण असं काही नाही, प्रत्येकाला पुढे जायची घाई हेच असतं. आमचा परदेशी मित्र होता एकदा बरोबर, आणि ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो. त्याला इतके टेन्शन आले, तो गाडीत अक्षरशः उभा राह्यला होता, आणि घाबरून गेला होता, कसे निघणार ह्यातून आपण? ड्रायव्हर इकडून तिकडून गाडी घेई कि हा अजूनच टेन्शन मध्ये. शेवटी त्याला ड्रायवर ने, डोळे मिटून बसायला सांगितले. घरी येईपर्यंत तो घाबरून गप्प बसला होता.
उत्तर प्रदेशात तर एकदा मज्जा अशी झाली, लांबून एक गाडी दिसत होती उलटी , म्हणजे आपल्याच बाजूने चालली होती असे वाटत होते, पण हालत मात्र उलट्या दिशेने होती. आता कळेना की आपण आपला वेग कसा ठेवायचा आहे. आपण पुढे जायचं आहे का बाजूनी जायचा आहे? लक्षात आलं, ती व्यक्ती उलट्या दिशेने गाडी चालवत होती, जायचं दुसऱ्या दिशेला होतं आणि गाडीचे तोंड पण भलतीकडेच केलेलं होतं. हे सगळे आपणच फक्त करू शकतो . मात्र त्यामुळे फायदा असा होतो की गाडीत बसणारे प्रवासी हे कंपल्सरी जागेच राहतात आणि नकळत आजूबाजूच्या निसर्गाचा, गावांचा रसास्वाद घेतात.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.