पत्र क्र ६
लांब गाड़ी लावा, ड्राइवर कडे सगळ सामान ठेवा अगदी फ़ोनपण नाही चालत. बरोबर फ़क्त विसाचे कागद बस बाकी काही नाही. Security इतकी की मला भितीच वाटली. आत बरेच काउंटर आहेत. पण रांग खुप वेळ लावावी लागतें....
जगाच्या पाठीवर .... कधितरी कुठेतरी पत्र क्र ६ परदेशी ज़ायचे म्हणजे सगळयात मोठे काम म्हणजे विसा मिळवणे. काही देशात पोचल्यावर , विमानतळावरच विसा मिळु शक़तो, तर काही देशात मात्र तो आधी घ्यावा लागतों हे सर्वश्रुतआहेच. तुम्हीं कशासाठी जात आहात त्याप्रमाणे विसा चे सोपस्कार बदलतात. आणि व्यवसायासाठी कींवा सेमिनार साठी जात असाल आणि पुढचीं व्यक्ति बहुतेकदा ते काम करते. श्रीलंकेचा विसा असच त्या पार्टी ने दिला, पोचल्यावर कळल, भारतीय लोकांना तिथेच आणि लगेच विसा मिळतो, इतके हसलो त्यावर. खुप वर्षापूर्वी , हे डिजिटल प्रकरण नव्हते तेव्हा, ते एजेंट लोक , विसा घरी आणुन देत. मग ठीक होते. पण सगळे बदल झाले आणि आता स्वतः जावे लागतें. मुंबईच्या गर्दीत धावपळ करुन नेमुन दिलेल्या वेळेवर पोचणे म्हणजे दिव्य कर्म. मला तर शिक्षाच बाटते. तिथे बाहेर रांगेत रहा, हे तपासा, ते दाखवा. आत हे चालत नाही, ते नेऊ शकत नाही. म्हणजे कोणाला तरी बरोबर नेणे आले. मग इमारतीच्या ह्या टोकाहुन आत तर पार त्या टोकाहुन बाहेर. मग बरोबरच्या बाहेर सोडलेल्या व्यक्ति चा शोध घ्या. तारेवरची कसरतच. आतपण फ़ोटो चीं अजीब तऱ्हा . कान दाखवा, अरे देवा . चश्मा काढ़ा, ईथेच बघा, केस बांधा, अरे काय हे. आत वातावरण एकदम तणावपूर्ण असते. कुणाला खुप इमर्जन्सी असते, कुणी मजेत असतात, कुणी उगाच इकड़े तिकडे प्रश्न विचारत फिरत असतात. काउंटर वरचे शक्य तेवढे निर्विकार असतात. मला सगळी गम्मत बघायला फ़ार आवड़ते. ज़ेव्हा परदेशी पोचतो आणि तिथे विसा घ्यायचा असतो तेव्हा तर खुप मज्जा. आपले नाव काय उच्चारले जाइल हयाचि खात्री नाही. त्यातल्यात्यात श्रीलंका, मालदीव चीं परिस्थिति बरी होती, ती लोक थोड़ीफ़ार भारतीय नावें जाणतात पण युगांडा आणि इथियोपिया मधे कळेचना काही कोणाचे नाव घेतले जात आहे ते. युगांडा मधे तर मज़ा झाली . कोणाचेच नाव त्या काउंटर वरच्या स्त्री ला उच्चारता येइना. मग एक ऑफिसर स्त्री आली मदतिला. मला आत बोलवले. रोटरी चे पाहुणे आहोत म्हटल्यावर खुप ख़ुश झाली, मी पण रोटरीत आहे, माझ्या देशात तुमचे स्वागत, आणि सगळया ग्रुपचा विसा झाला पटकन. बाहेर लोक विचारात पडले, हिने आत जाउन नक्की काय केले? बरोबर चे एक सीनियर म्हणाले सुद्धा, भांडली बिंडली नाहीस न ग ? तेवढ्यात ती परत आली आणि माझ्याकडे बघुन खुप छान हसली आणि मी सुटले. हनोई ला विसा चे पेपर देउन बराच वेळ झाला, अजुन का पासपोर्ट देत नाहीत? कळत नव्हते. काहीतरी अनाउंस तर करत होते, आणि मला शंका आली . तेवढ्यात माझा फ़ोटो स्क्रीन वर दिसला. मी पोचले तिथे, तर माझ्या नावाचा तो जो काही उच्चार करत होता ते ऐकुन दादा पाया पड़ु का? असे विचारावेसे वाटले सगळयात कठीण अमेरिकी विसा मिळवण . पार कुठेतरी लांब गाड़ी लावा, ड्राइवर कडे सगळ सामान ठेवा अगदी फ़ोनपण नाही चालत. बरोबर फ़क्त विसाचे कागद बस बाकी काही नाही. Security इतकी की मला भितीच वाटली. आत बरेच काउंटर आहेत. पण रांग खुप वेळ लावावी लागतें. पुढच्या बाई शी गप्पा मारत होते, म्हणाली मी पाचव्यादा आलेय , दर खेपेला काहीतरी कारणाने विसा रिजेक्ट होतों. मला टेंशन, आपले काय होइल? पण आश्चर्य. त्या ऑफिसर ने विचारले,”तुमचा मुलगा Stanford मधे शिक़तो?” आम्ही ,”हो” “म्हणजे तो खुपच हुशार असेल हो, नक्की जा त्याच्या graduation ला” काही सेकंदाचा तो बहुचर्चित इंटर्व्यू पार पड्ला आणि विसा मिळाला पण. कोणालाही खरे वाटेना. पण ते निदान लगेच सांगतात तरी, ब्रिटन चा विसा मात्र वेळ पण घेतो आणि विसा मिळाला आहे का नाही हे गुलदसत्यातच राहते शेवटपर्यंत. हे विसा म्हणजे आपल्याला जड़ जातात कारण , “माहित नाही का मी कोण आहे? माझे काम लवकर झाले पाहीजे” हे सांगणे तिथे निकामी असते. परदेशी जाताना विसा लागणे समजू शकतो पण आपल्याच देशात, ईशान्येकड़च्या भागात फिरण्यासाठी innerline permit घ्यावे लागले तेव्हा मात्र फ़ार वाईट वाटले होते. आम्हाला तर ऑफ़ीस तर्फे काम करुन मिळाले होते पण तिथे बरेच जण होते २,३ दिवस अडकून पड़लेले.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.