पत्र क्र ५

प्रवास करुन इच्छित स्थळी पोचल्यावर घ्यायला कोण येणार ही फ़ार सुंदर उत्सुकता असते. लहानपणी तर ह्या येणाऱ्या व्यक्ति बद्द्ल इतकी आत्मीयता वाटायची. नव्या जागेत कोणीतरी आपले आहे ही भावनाच खुप सुखावह...

कीर्ती वडाळकर
||3 min read

जगाच्या पाठीवर ... कधितरी कुठेतरी पत्र क्र ५ प्रवास करुन इच्छित स्थळी पोचल्यावर घ्यायला कोण येणार ही फ़ार सुंदर उत्सुकता असते. लहानपणी तर ह्या येणाऱ्या व्यक्ति बद्द्ल इतकी आत्मीयता वाटायची. नव्या जागेत कोणीतरी आपले आहे ही भावनाच खुप सुखावह असते. लहान भाची नेहेमी आजोबांचा हात धरुन माझी स्टेशन वर वाट बघत असलेली अजुनही नज़रेसमोर आहे. सगळया गर्दित आपली मावशी कुठे दिसते ते बघत भिरभिरणारे गोल गोल नीरागस डोळे. मीही अगदी दारात उभी राहायची, तिला पटकन दिसावी म्हणुन. आणि मी दिसल्यावर तिचा जोरात आनंदी चित्कार! प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळून जायचा. नंतरच्या काळात अनेक ठिकाणी अनेकांनी स्वागत केले पण हे स्वागत खुप अनोखे असे. बालीच्या देनपसार विमानतळावर उतरलो. ते विमान ज़मीनीवर टेकेपर्यंत ज़मीन दिसतच नाही. मला तर इतके टेंशन आले होते, न जाणो हयाचा नेम चुकला आणि ..... ह्या चिंतेतुन सुटुन सगळे सोपस्कार पूर्ण करुन हाश हुश करतच होतों की अतिशय छान पोशाख घातलेल्या म्हणजे रंगीबेरंगी सरॉंग घातलेल्या , एका प्रसन्न मुलीने, गळयात चाफ़्याच्या फुलांचि माळ घातली. हात जोडले, आणि ,”नमस्ते, आपका बाली में स्वागत” असे चक्क हिंदीत बोलली. सेमिनारसाठी आम्ही पोचलो होतों, आणि उतरताच झालेले स्वागत खुपच मस्त होते. गुवाहाटीविमानतळ पण असाच लक्षात राहीला. बराच मोठा प्रवास करुन पोचलो . वेळही खुप घालवला होता, अगदी दमला होता जीव. पण विजय नावाच्या ड्राइवर ने, खुप प्रेमाने, अदबीने ,”कामाख्या माताकी भूमि में आपका स्वागत है दीदी. माता को मिलने बेटी आयी है” म्हणत एक छानसा पुष्पगुच्छ दिला, हातानी बनवलेला, तिथे फ़ुलणाऱ्या ऑरकिड्सचा. श्रीलंकेत तर भल्या पहाटे पोचलो. बाहेर कितीवेळ थांबावे लागेल याचि जरा धाकधुकच होती. पण नाही , तो आधीच गाड़ी घेउन हजर होता, श्रीलंकन चहाची छोटी पेटी हातात घेउन, फुलाऐवज़ी. आश्चर्य म्हणजे नंतर काही क़ाळाने पुन्हा जाणे झाले तर घ्यायला हाच, मला लगेच ओळखले, मी आश्चर्यचकित!! म्हणाला, “खुप गेस्ट रिसिव केले पण तुमच्यासारख़े , रंगित आणि डेकोरेटिव कूंकु कोणी लावलेले बघितले नाही , म्हणुन तुम्हीं लक्षात राहिलात” रायपुरला एका मोठया सरकारी खात्यात ट्रेनिंग द्यायला गेले होते. सरकारी लोक, कशाला वेळ पाळतिल,असे गृहीत धरुन रमतगमत बाहेर आले, तर ती एकटीच ताटकळत उभी, मला खुप अपराधी वाटले मी माफ़ी मागीतली उशिर केल्याबद्द्ल तर इतकी हळवी झाली ती आणि आमच्यात खुप छान मैत्री झाली. बँगकॉक ला मात्र खुप शोधशोध शोधले, कोणीच दिसेना. शेवटी म्हटल, शांत बसावे . खुर्चीत टेकले. बाजूच्या मुलीकडे बघितले . तीच्या माँड़ीवर एक बोर्ड उलटा ठेउन ती मजेत मैत्रिणीशी गप्पा मारत होती. माझी अस्वस्थता शिगेला पोचली होती. बराच वेळ गेला. मी हेल्पडेस्क ला विनंती केली. त्यांनी फ़ोन लावला . येतेय ह थांबा, म्हणे. आणि तिकडुन माझी शेजारीण , मलाच ओरडत आली, कुठे होतात तुम्हीं? फ़्लाईंट तर कधिचि आली तुमची. आता काय सांगावे हिला? हो चि मिन्ह सिटी ला पोचलो ते रात्री दहा वाजुन गेले होते. एक गोड़ मुलग़ी नावाचा बोर्ड घेउन उभी होती, बापरे इतक़या उशीरा , आणि मुलग़ी आली आहे? असा विचारच करत होतों तर, स्वागतपर तिने चक्क छोटेखानी भाषणच दिले. त्या ग़ावाचीं माहिती दिली. आम्ही निवडलेंले हॉटेल कसे उत्तम आहे. कुठे कुठे आम्ही फ़िरावे वगेरे भाषण संपेपर्यंतगाड़ी आली. चालकही मुलग़ीच होती. दोघीनी भराभर सामान आत ठेवले. अदबीने आम्हाला दार उघड़ले. आम्ही निघालो. ह्या दोघी इतक्या रात्री duty करत आहेत, ते पण हसतमुखाने हयाचे खुप कौतुक वाटले. म्हटल , आम्हाला सोडुन घरी का? म्हणाल्या, नाही हो, अजुन दोन ट्रिप करायच्यात. मी उडालेच. महागाई मुळे सगळयानाच जास्त काम करावे लागते, मुलगा असो की मुलग़ी. त्या दोघी रात्री दोनला घरी पोचत रोज़. दिवसा कॉलेज, एक नोकरी करून हे काम पण करत होत्या. त्या दोघी आजही स्वच्छ आठवतात, आम्हाला उतरवुन , हात हलवत पुन्हा विमानतळाकडे धाव घेणाऱ्या!!

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments