पत्र क्र ३९

नजरेला, जाईन तिथे हिरवा रंग नेहमीच आकर्षून घेतो. अहो हिरवा रंग म्हणजे झाडं . खूप आवड असल्यामुळे अगदी बारकाईने सगळी झाडं बघितली जातात. इतक्या ठिकाणचे मोठे मोठे वृक्ष आणि सुंदर झाडं आजही लक्षात आहेत. ...

कीर्ती वडाळकर
||4 min read

नजरेला, जाईन तिथे हिरवा रंग नेहमीच आकर्षून घेतो. अहो हिरवा रंग म्हणजे झाडं . खूप आवड असल्यामुळे अगदी बारकाईने सगळी झाडं बघितली जातात. इतक्या ठिकाणचे मोठे मोठे वृक्ष आणि सुंदर झाडं आजही लक्षात आहेत.

तिरुपतीला गेलो असताना, पहाटेलाच दर्शन करून येताना, तो मोहक वास आला आणि नजर त्या झाडाला शोधायला लागली . कळेना वास कुठून येतोय कारण नेहमीच झाड दिसत नव्हतं . आणि युरेका! इतके प्रचंड मोठे मोठे सोनचाफ्याचे वृक्ष, खूप फुलं अंगाखांद्यावर खेळवणारे! त्यांचा सुवास आसमंतात भरून गेला होता . अशीच सुंदर मोठी मोठी सोनचाफ्याची झाडं काझीरंगाच्या जंगलात पण भेटीला आली. पहाटेची सफारी करून आलो. निवांत सकाळ होती. चला फेरफटका मारून येऊ, तर पुन्हा तोच परिचित सुवास. या वेळी न चुकता मी वर बघितलं आणि तसेच मोठे मोठे वृक्ष, अनंत फुलं अंगाखांद्यावर खेळवत होते. सकाळ असल्यामुळे सूर्यप्रकाशात खरोखर सोन्याचीच भासत होती ती फुलं .

भितरकणिका ला पहाटेच बाहेर आले . बघते तर काय? एक एक करत टप टप बकुळीची फुलं तो मोठा वृक्ष माझ्या अंगावर उधळत होता. इतकं छान वाटलं. खरतर तिथे पोचायला जो खडतर प्रवास केला होता, त्या प्रवासानंतर ही पहाट खूप सुंदर भासत होती. त्या जंगलामध्ये तो खूप जुना, अतिशय मोठा बुंधा असलेला, बकुळ वृक्ष , अनंत फुलं उधळत होता. किती वेचु नी किती नाही?

केरळ मध्ये असेच फिरत होतो. ड्रायव्हर म्हणाला, "आपण आता थोड्याच वेळात माझ्या गावाहून जाणार आहोत". मग त्याची चौकशी केली, "काय असतं तुझ्या गावी? घर आहे का? आजूबाजूला काय आहे?" तर म्हणाला, " शेती आहे ना , थांबू या का थोडा वेळ? " ," का नको ?" डोंगर उतारावर त्याची चक्क वेलचीची शेती होती. प्रथमच वेलची चे झाड बघत होतो. त्याला लागलेल्या छान छान वेलची चे घोस आणि छोटी छोटी फुलं! बांध्याच्या कडेने असलेली मोठी लवंगाची झाडे पण प्रथमच पाहत होतो. त्यांना लागलेले ते लवंगाचे घोस! हरखूनच गेलो बघून .

कोकणात एका झाडावर बघितले, खूप चेंडू लागले होते. कळेना काय नक्की लागले आहे. चेंडूची खूप झाडे बघितली. शेवटी एका ठिकाणी थांबून विचारलं, "हे कसलं झाड आहे?" त्यांनी एक चेंडू खाली काढला. तो खूप काळजीपूर्वक मधोमध चिरायचा प्रयत्न केला. आत मध्ये लालबुंद जायपत्री च्या आवरणात होते जायफळ . इतकं सुंदर आवरण असल्यावर आत मधले फळ चांगले असेलच. मजा म्हणजे बाहेरचं जायफळाचं फळ खाऊन पोटाला फार त्रास होतो, असं त्यांनी आम्हाला सांगितलं . जायफळ खाऊन पोट सुधारतं आणि बाहेरचं खाऊन दुखत , बिघडतं मजाच आहे.

नारळी -

पोफळीच्या सुंदर बागा तर सगळ्यांनाच आकर्षून घेतात. पण नारळीच्या बुंध्याच्या आधाराने , हिरवे हिरवे मिरी चे लोंगर लटकलेले बघून छोटे छोटे आकाश कंदील आहेत का काय असा भास होतो. सगळीच मसाल्याची झाडं खूपच छान असतात.

केरळ मध्ये चहाच्या बागेत बघितलेला नाग पण अजून आठवतो. आसामच्या चहाच्या बागाही सुंदर. ती चमचाभर भुकटी आणि त्याचा कपभर चहा बनवण्यासाठी किती खटाटोप असतो!

अरकु रॅलीमध्ये व्हॅलीमध्ये कॉफीची झाडं पण खूप बघितली . त्या बियांपासून बनवलेली ती ताजी कॉफी म्हणजे खरोखर स्वर्गीय चवीची होती.

केरळमध्ये एक जाणवलं, कुठलंही जमिनीचा तुकडा उघड बोडका सोडत नाहीत . कसलं तरी झाड ते लावतातच आणि मसाल्याची तर शेतीच करतात. मला कूर्ग ला सुद्धा अशीच मसाल्याची शेती बघून वाटलं, तिथलं वातावरणच त्यांना मदत करत असेल का वाढायला?

कास पठारावर अनेक फुलं बघतांना सगळ्यांनाच आवडतं . अगदी सुरुवातीला जेव्हा हे कास पठार कोणालाही फारसं माहित नव्हतं, तेव्हा एका, भुरभुर पावसाने भिजलेल्या , भल्या पहाटे, तो सगळा भाग पिंजून काढायला, खूप छान वाटलं होतं . किती अनंत प्रकारची फुलं त्यात बघितली आणि कितीतरी प्रकारची झाडं त्यात भेटली. नंतर मात्र जेव्हा तो सगळा भाग कमर्शियल झाला, तेव्हाहि गेलो. फुलं तीच, छोटी झाडं तीच मात्र त्या क्षेत्राचं नैसर्गिकपण कमी झाल्यासारखं वाटलं.

हिमालयात कितीतरी झाडं वेगवेगळी भेटतात. पाईन चे सुंदर कोन उचलून आणायला आणि मग त्यातून वेगवेगळी रचना करायला फार आवडते. त्याहीपेक्षा कितीहि जुने झाले तरी ते कोन पाण्यात घातल्यावर मिटतात आणि उन्हात ठेवल्यावर पुन्हा उघडतात, ही मजा अगदी लहान मुलांसारखी आनंद देऊन जाते. उंच उंच निलगिरी ची झाडं रस्त्याच्या दुतर्फा दिल्लीहून जाताना भेटली . काश्मीरचे चार चिनार असोत किंवा कलकत्त्याचा तो जुना वटवृक्ष, अनेक झाडं आपल्याला प्रवासात भेटत असतात. केरळ किंवा कर्नाटक मध्ये डोंगर हिरवे दिसतात. खूप प्रकारची झाडं बघायला मिळतात . सुंदर बगीचे तर सगळ्यांनाच आकर्षून घेतात पण जंगलात असलेली झाडंही तेवढीच सुंदर दिसतात. छत्तीसगडमध्ये अचानक भेटलेले चारोळीचे वृक्ष. आधी त्याचे फळ तिथल्या हॉटेलवाल्यांनी आणून देऊ का विचारलं . सुरुवातीला तो ,"चार के फल " म्हणाला , कळलच नाही हे काय नक्की. आणि जेव्हा तो घेऊन आला तेव्हा कळलं की चार के फल म्हणजे आपली चारोळीच आहे.

भितरकणिका मध्ये फिरतांना , नारळाच्या झाडाखाली शहाळे पडलेले दिसले. मी उचलून बघितलं तर त्याला एका बाजूनी मस्त भोक करून ,आतलं सगळं खाल्लेलं होतं. तिथल्या गाईडने सांगितलं, "ही खारुताई आणि माकड शहाळ्याचा असा फज्जा उडवतात". माझं शहरी मन जागृत झालं. मी म्हटलं ," किती शहाळी फुकट गेली आहेत . तुम्ही या प्राण्यांचं काहीतरी करा म्हणजे तुम्हाला ती मिळतील." त्यांनी सांगितलं, "जंगलाची संपत्ती ही प्राण्यांची असते ती त्यांनीच वापरायला पाहिजे. ती फळ त्यांनाच मिळायला हवीत आम्ही कोणती घेणार?"

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments