पत्र क्र ३८
स्वयंपाकाला बसवेल. तो फक्त हसला. "चल ग जरा मज्जा आहे" याला कसली मजा दिसते कळेना. माणूस नावाचा प्राणी कुठेही नव्हता. नेहमीचे अमेरिकन रेवन सुरुवातीला दिसले. रेबन म्हणजे आपल्या कावळ्याचा मोठा भाऊ,...
जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र ३८ ग्रँड कॅनियनला गेलो तेव्हा एक अतिशय सुंदर जागा सापडली . खरतर हाय वे पासून खूप लांब होती आणि जगाच्या पाठीवर खरंच कुठेतरी होती. त्या भागात सगळे वाळवंट , खुरटी झुडपं, जमीनहि फार सुपीक दिसतच नव्हती. काटेरी झुडपे मात्र खूप होती. अशाच जंगलाच्या ठिकाणी आज आपल्याला राहायचंय, असं जेव्हा मुलांनी सांगितलं तेव्हा थोडं मन धास्तावले. लांब लांब पर्यंत कुठलीही राहण्याची जागा दिसत नव्हती. हा उगीचच आपली थट्टा तर नाही करत आहे न, असा कुठेतरी मनात विचार आला . वाळवंटातलं जंगल म्हणजे काय हे तिथे अगदी पदोपदी दिसत होतं. हायवे सोडताना मुलानी गाडीत गॅस भरून घेतला,, गाडी नीट चेक करून घेतली, खाण्याचे काही पदार्थ घ्यायला लावले. भाजी , ब्रेड, थोड दुध! " अरे तू काय स्वयंपाक करायला लावणार का बाबा जिथे कुठे नेतोय तिथे?" मला जरा भीतीच वाटली. पोराच काही सांगता येत नाही. फिरायला नेतोय तुला सांगुन कुठेतरी स्वयंपाकाला बसवेल. तो फक्त हसला. "चल ग जरा मज्जा आहे" याला कसली मजा दिसते कळेना. माणूस नावाचा प्राणी कुठेही नव्हता. नेहमीचे अमेरिकन रेवन सुरुवातीला दिसले. रेबन म्हणजे आपल्या कावळ्याचा मोठा भाऊ, आकाराने मोठा म्हणून. आणि खूप पक्षी दिसायला लागले. सुरुवातीला रस्ता चांगला होता पण दूरदूरपर्यंत कुठेही हॉटेल दिसत नव्हतं. एखाद दुसरं घर होतं नाही म्हणायला. अमेरिकन घरं ती . नुसती अवाढव्य. त्यातून जंगलातील म्हणजे त्यांच्या फार्म कींवा रांच मधली. ती तर मोठी असणारच. हा आता गाडी थांबवेल , हा तेव्हा गाडी थांबवेल, असं वाटत गाडी आपली पुढेच चालली. आजूबाजूला काही दिसेना. मग त्यानी मला एक गूगल लोकेशन दाखवली. फार लांब एका स्पॉटवर आल्यावर त्याने कोणाला तरी फोन केला. पुढच्या व्यक्तीला सांगितलं," तू सांगितलेल्या ठिकाणापर्यंत आम्ही आलोय आणि आजूबाजूला काही नाहीये" त्या पुढच्या व्यक्ती ने सांगितल, "तिथेच उभे राहा, मी घ्यायला येतोय". मन इतकं धास्तावलेले होतं. आजूबाजूला बरच जंगल होतं. तेवढ्यात दोन-तीन ससे , चांगले मोठ्या आकाराचे, रस्ता क्रॉस करून गेले. रस्ता कसला हो ,ती काही डांबरी सडक नव्हती, पण गाड्या जाऊ शकत होत्या. स्वतःच्या फोरविल मधून तो आम्हाला घ्यायला आला. त्याच्या मागोमाग आम्ही निघालो. एका ठिकाणी गेट मधून आत गेलो. त्याने गाडी पार्क करायला सांगितली, तो सगळा भाग त्याचा होता . त्याच्या गाडीने वर पर्यंत तो घेऊन गेला. त्या कठीण रस्त्यावर आमची गाडी चढणे कठीण होते. आजूबाजूला केवळ जंगल त्यात त्याने स्वतः खपून बांधलेले तीन बंगले. एक आम्हाला दिला राहायला. अतिशय सुंदर सजवलेला . त्याने स्वतः तो पेंट केला होता. विविध चित्रांनी रंगवला होता. आतलं सगळं फर्निचर स्वतः खपुन तयार केलं होतं. तो आयटी इंजिनिअर होता. शहरात मोठ्या पोस्टवर मोठ्या कंपनीत होता. बायकोही आयटी इंजिनियर. दोघं गलेलठ्ठ पगार कमवत होते. अमेरिकेच्या जीवन मानाप्रमाणे दर शुक्रवार शनिवार फिरायला जात होते. रविवारी पुढच्या आठवड्याची तजवीज करून मजेत दिवस चालले होते. पण निसर्गात रमणारा तो, तिला म्हणाला आपण इथे नाही राहूया. अशा ठिकाणी जाऊ की जिथे माणूसच नसेल. हा पैसा नसेल. तो कमवायची चढाओढ नसेल. काहीच नाही. फक्त निसर्ग, आपण आणि खूपशी मन:शांती ! आणि दोघांनी ही जागा विकत घेऊन तिथे ती तीन घर बांधली. सगळ्या ऐहिक सुखापासून त्याला लांब जायचं होतं आणि शांततेत जगायचं होतं. वर्क फ्रॉम होम मुळे ती दोघं काम करत होती . पण त्याहीपेक्षा जास्तीत जास्त वेळ निसर्गात घालवत होती. तो म्हणाला नकली मित्रांचे सगळे पाश सोडून इथे निसर्गात राहायला खूप मजा येते. तेवढ्यात ," तो बघा , समोरच्या झाडावर तुम्हाला माउंटन लायन दिसेल" असे म्हणाला . आणि हा एक नवीन प्राणी तिथे बघायला मिळाला. म्हणाला, "वेगवेगळे प्राणी पक्षी इथे आहेत . त्याहीपेक्षा रात्री अंगणात बसून बघा, खूप छान वाटते . सगळे आकाश, सगळ्या चांदण्या आपल्यासाठीच आहेत याचा भास होतो आणि आपण जगातले सगळ्यात श्रीमंत आहोत अशी आपल्याला खात्री पटते." सगळं सोडून इतक्या लांबवर हा आला आणि ते इतकं सुंदर विश्व स्वतःचं त्यांनी निर्माण केलं याचं खरंच खूप कौतुक वाटलं. त्याला विचारलं," माणसांची आठवण येत नाही का?" म्हणाला, " आई वडील गेले. बाकी कुटुंबात कोणीच नाही. मग शहरात तरी कोण होते? इथे तुमच्यासारखे पर्यटक येतात कधीतरी. त्यांना आवडत असेल तर बोलतो आणि नाहीतर आम्ही दोघे आहोत ना एकमेकांना. इतकी शांतता आयुष्यात आम्हाला पहिल्यांदाच मिळाली . तुम्हीही मनःशांती जरुर अनुभवा. " त्याच्याकडे हॉटेल म्हणजे फक्त राहण्याची सोय होती. छान सजवलेले स्वयंपाक घर होतं. तुम्हाला हवं तर तुम्ही तिथे शिजवून घेऊ शकता. तो काही देणार नव्हता. म्हणजे जेव्हा ते बुक केलं तेव्हाच त्याने तसं सांगितलं होतं आणि म्हणूनच मुलानी त्या वस्तू सगळ्या जमा करून आणल्या होत्या. त्याच्या त्या सुसज्ज स्वयंपाक घरात मस्त सॅंडविचेस करून त्यालाही बोलावलं, रात्रीच्या जेवणाला. थोडे आपले पदार्थ पण दिले त्याना . त्याला इतका आनंद झाला. त्याची बायको कॉल वर होती पण थोड्या वेळाने आली. आणि आमची संध्याकाळ खूप मजेत गेली. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे रात्र सुद्धा! चंद्र, चांदण्या सगळे सगळे फक्त आमच्यासाठी होते. नीरव शांतता म्हणजे काय ती आम्ही तिथे अनुभवली . मात्र त्यांनी जे सांगितलं ते ही लक्षात ठेवलं की फार तुम्ही रात्री बाहेर थांबू नका कारण हिंस्त्र श्वापद , माउंटेन लायन्स किंवा अस्वल सुद्धा या बाजूला फिरतात, तेवढी मात्र काळजी घ्या. थंडीपण खूप होती. मात्र शेकोटी वगैरे पेटवायला परवानगी नव्हती. पहाट पण तेवढीच सुंदर होती. सूर्य आमच्यासाठीच उगवत होता. खूप से पक्षी किलबिलाट करत होते. प्रचंड थंडी होती . सगळे जंगल खूप रम्य भासत होते. ती जागा अगदी हवीहवीशी वाटत होती .
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.