पत्र क्र ३७

एन्ट्री करायचे आहे का, तेही विचारले . पण त्या सगळ्याला तिने नाही म्हटलं. मी चकित झाले, "तुम्ही असं कसं एवढ्या महत्त्वाच्या वस्तू देऊ शकता?" त्याच्यावर तिचे उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली," जी माणसं...

कीर्ती वडाळकर
||4 min read

जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्रमांक 37 आर्चेस नॅशनल पार्क हुन सॉल्ट लेक सिटी कडे जात असताना एक मोठा बोर्ड लक्ष वेधून घेतो. "बेअर रिव्हर बर्ड रेफ्युज " . बोर्ड वाचून एकदम डोळे लुक लुकले . "नक्की हे काय आहे रे ?" असं मुलाला विचारलं . त्यालाही माहीत नव्हतं. आम्ही सॉल्ट लेक सिटी ला पोचायच्या घाईत होतो. त्यामुळे प्रवास पुढे चालू ठेवला. मात्र परतीच्या वाटेवर हे काय आहे , हे नक्की आपण बघूया , असे ठरवूनच पुढे निघालो. मुक्कामी जाऊन, गुगल वर सगळी माहिती घेतली आणि मजा वाटली. परतीच्या वाटेवर आपण नक्की तिथे जाऊ असं ठरवलं. लांबूनच जेव्हा तो बोर्ड दिसला तेव्हा, कुठून कसं जायचं हे बघत, त्यांच्या ऑफिस पर्यंत पोहोचलो. छान इन्फॉर्मेशन सेंटर तिथे बांधलेले आहे. पण एकही गाडी दिसत नव्हती. आत गेलो आणि काय माहिती मिळू शकते याचा जरा अंदाज घेतला . फारशी माणस नव्हती. एखाद टिपिकल इन्फॉर्मेशन सेंटर असावं असंच ते होतं. म्हणजे एका बाजूला विक्रीचा काऊंटर, एका बाजूला रिसेप्शन, एक म्युझियम आणि एखाद-दुसरा हॉल. रिसेप्शन वर एक म्हाताऱ्या आज्जी बसल्या होत्या. मला वाटलं कदाचित फिरून फिरून दमले असतील आणि म्हणून येथे येऊन टेकले आहेत. विचाराव कोणाला अशा संभ्रमात आम्ही होतो, तेव्हा त्याआजी नी स्वतःहूनच हाक मारली, "काय हवाय तुम्हाला? मी काही मदत करू का? " खरंतर एक मिनिट असं वाटलं की त्या आपल्याला काय सांगतील? त्याही तर आपल्यासारख्याच टूरिस्ट वाटत आहेत. पण त्यांनी एवढ्या आपुलकीने चौकशी केली म्हटल्यावर मी विचारले,"इथे नक्की काय आहे? आणि हे बेअर रिव्हर बर्ड रेफ्युज म्हणजे काय, हे बघायला आम्ही आलोय" ती म्हणाली," फार छान ! तुम्ही आलात याचा मला खूप आनंद झाला. मी तुम्हाला सगळी माहिती सांगते ." जरा संभ्रमातच आम्ही ऐकायला लागलो. आजीच्या लक्षात आलं, तिने सांगितलं," हो! माझं वय 82 वर्ष आहे. मी ह्या बाजूच्या गावात राहते. मी पक्षी प्रेमी आहे. माझ्यासारख्याच काही पक्षीप्रेमींनी मिळून हा प्रकल्प सांभाळलेला आहे." "पक्षीप्रेमी असा प्रकल्प कसा काय सांभाळू शकतात?" असं तिला जेव्हा विचारलं, तेव्हा ती म्हणाली ,"नदीच्या पात्रात, बाजूच्या पाणथळ जागेमध्ये अनेक पक्षी येत होते. काही इथलेच तर काही स्थलांतरीत. आजूबाजूलाच आम्ही राहतो. स्वखुषीने आम्ही आमची बरीच जागा या प्रकल्पासाठी दिली. इतकच नाही तर हा प्रकल्प चालवण्यासाठी आम्ही बरेच जण इथे स्वयंसेवक म्हणून काम करतो. अनेक प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे दिसतात . हे सगळे पक्षी वैभव जपण्यासाठी आम्ही हा खटाटोप केला आहे." मला तिच्याबद्दल फारच ग्रेट वाटून गेलं. तिने मला विचारले, " तुम्हाला आमच्या या जागेबद्दल माहिती कशी मिळाली ?" मी तिला रस्त्यावरच्या बोर्ड बद्दल सांगितलं. तिला फार आनंद झाला. पक्षी निरीक्षण करण्यासाठी लागणारे दुर्बिण, तक्ते, वगैरे साहित्य तिने आम्हाला देऊ केले. मी तत्परतेने तिला त्याचे भाडे विचारले, किंवा कुठेतरी एन्ट्री करायचे आहे का, तेही विचारले . पण त्या सगळ्याला तिने नाही म्हटलं. मी चकित झाले, "तुम्ही असं कसं एवढ्या महत्त्वाच्या वस्तू देऊ शकता?" त्याच्यावर तिचे उत्तर खूप छान होतं. ती म्हणाली," जी माणसं इथे वाकडी वाट करून येतील , ती केवळ पक्षीप्रेमी असणार. ती कशाला एवढ्या तेवढ्या वस्तूंसाठी आम्हाला फसवणार? आणि मला खात्री आहे की बाकी लोक जसे सांभाळून या वस्तू वापरतात तसेच तुम्हीही त्या वापराल. आणि नाहीच दिले परत, तर जाऊ दे, विसरुन जाऊ आणि नवीन घेऊ ". तिच्याबद्दल अजूनच आपुलकी वाटायला लागली. तिथून निघून खूप भाग बघायचा होता. खूप पक्षी बघायचे होते. इतकी सुंदर ती जागा आहे त्या लोकांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जे वैभव त्यांनी जपले ते खरोखर खूप कौतुकास्पद आहे. आम्ही जेव्हा त्या सगळ्या भागातून फिरायला निघालो, पूर्ण दिवस तिथे कसा गेला कळलं नाही. इतका पक्षीमय दिवस दुसरा कुठला असेल? खूप प्रकारचे, खूप आकाराचे, रंगांचे आणि आवाजांचे पक्षी बघितले. त्यांनी सुरुवातीलाच माहिती दिली होती कुठल्या प्रकारचा पक्षी इथे तुम्हाला आज दिसणारे, तो कुठे दिसेल, तो कसा असेल , वगैरे . त्यांनी दिलेल्या माहितीपत्रकात सुद्धा त्याचा फोटो आणि त्याच्या बद्दलची माहिती होती. त्या माहितीपत्रकाशी जुळवत पक्षी बघण्याला खरंच खूप मजा आली. मध्ये मध्ये सगळा गवताळ प्रदेश. बाजूला नदी, सगळी पाणथळ जागा आणि मधूनच जाणारा रस्ता. त्यावर फक्त तुमची एक गाडी असते. कारण फार कमी पर्यटक त्या जागेला भेट देतात. खूप सुंदर आणि खूप प्रकारचे पक्षी बघून तो दिवस सार्थकी लागला असंच वाटतं. त्या लोकांचे प्रयत्न तर प्रशंसनीय आहेतच पण त्यांनी जे काही त्या पक्षांसाठी केले आहे ते बघून त्या माणसांबद्दल खूप आपुलकी निर्माण झाली, प्रचंड आदर वाटून गेला. फेरफटका मारून झाल्यानंतर त्यांनी एक फिल्म पण दाखवली आणि सगळी तिथल्या भागाची माहिती, पक्षांची माहिती वगैरे दिली. त्या आजीशी बोलायला खूप मजा आली होती. तिने आपल्या भागातल्या पक्ष्यांची माहिती मला विचारली. आमच्या खूप गप्पा झाल्या. वाट वाकडी करून इथे आल्याबद्दल खूपच बरे वाटले. आजही ती जागा, ती आजी अगदी जशीच्या तशी डोळ्यापुढे आहे.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments