पत्र क्र ३६
आपल्या समीकरणात बसत नाही. मात्र अस्वल सुद्धा तेवढेच भयानक आहेत , हे तिथे गेल्यावर कळलं. खूप ठिकाणी अस्वला नी केलेले नुकसान बघायला मिळालं. पण लोकांकडून त्या प्राण्यांना हानी किंवा इजा पोचव ली जात...
जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्रमांक 3६ हिंस्त्र श्वापद म्हंटलं की आशिया आणि आफ्रिका खंडाच्या जंगलां मधून आपल्याला वाघ, सिंह, चित्ते ,हत्ती अशी ठराविक श्वापदं माहित आहेत. वाघ म्हटलं की भारताकडेच सगळेजण बघतात पण इतरही काही देशां मधून तो दिसतो. कुठे कुठे नामशेष पण झाला आहे. अर्थात जंगलातून मुक्तपणे संचार करणारा वाघ आणि प्राणी संग्रहालयातला दीनवाणा दिसणारा वाघ ह्यात खूप फरक आहे. बँकॉकच्या सफारीमध्ये, लोधे झालेल्या त्या वाघांना ती मुलगी जेव्हा मटणाचे तुकडे फेकते तेव्हा खरंतर त्या वाघांची दया येते. राजाला आपण कोण भीक देणार ? असं कुठेतरी वाटून जातं. इंडोनेशिया मध्ये सुद्धा वाघ आहेत किंवा श्रीलंके मधले हत्ती असेच हिंस्त्र . आफ्रिका खंडामध्ये सुद्धा आपल्याला एकाहून एक भयानक असे प्राणी बघायला मिळतात . पण ह्या सगळ्या कल्पना युरोप आणि अमेरिकेच्या हिंस्त्र शब्दाच्या जरा पलीकडे आहेत. युरोप आणि अमेरिकेच्या देशांमधे जेव्हा आपण जंगलात फिरतो तेव्हा असे हिंस्त्र प्राणी आपल्याला दिसत नाहीत. अर्थात तिथले प्राणी हि जंगली आहेत, हिंस्त्र आहेत आणि त्यांना वाचवण्याचा तेही लोक आटोकाट प्रयत्न करत आहेत. सांटा क्रुज किनाऱ्यावर सील ह्या प्राण्याची देखभाल करण्याच सेंटर आहे. काही वर्षांपूर्वी सुरु झालेले. अनेक देवमासे किनाऱ्यावर दिसतात. हे जंगली प्राणी आहेत हे जरा आपल्या भारतीय मनाला पटत नाही. मला गम्मत आठवते , योसेमिटी नॅशनल पार्क मधे फिरत होतो. मुज नावाचा हरणा सारखा दिसणारा प्राणी , अगदी थोड्या अंतरावर होता. हे प्राणी तिथे अनेक दिसतात . शांत वाटतात. तो त्याचा त्याचा चरण्यात मग्न होता आणि एक भारतीय स्त्री , त्याला मागे ठेवून सेल्फी काढायच्या प्रयत्नात होती. तिच्यापासून फार कमी अंतरावर तो प्राणी होता. आणि हे चित्र बघून तिथल्या गार्ड नी जी काही मोठ्यामोठ्याने आरडाओरड केली म्हणून सांगु . ती स्त्री पण घाबरली. त्याने तिला लांब व्हायला सांगितलं . आणि असले बेजबाबदार वर्तन न करण्याबद्दल खडसावले. आम्ही सगळे हे दृश्य पाहत होतो . तिला विचारलं, तेव्हा ती म्हणाली की कसला मेला एका हरणाच्या मागे आम्हाला ओरडतो ,अरे आमच्या भारतात, रणथंभोर ला आम्ही वाघाबरोबर सुद्धा सेल्फी काढलेली आहे. हसावं का रडावं असा प्रसंग. तिथे योसेमिटी च्या जंगलात अस्वल भरपूर आहेत. रात्री त्या हॉटेलच्या मालकांने आम्हाला सांगितलं की तुमच्या गाडीमध्ये कुठलाही खाद्यपदार्थ ठेवू नका. त्याच्या वासावर अस्वल येऊन , तुमची गाडी फोडून, तो खाद्यपदार्थ फस्त करेल. जरा भितीदायक प्रकार वाटला हा. पण अस्वल म्हणजे जंगली श्वापद असतं , हे कुठेतरी आपल्या समीकरणात बसत नाही. मात्र अस्वल सुद्धा तेवढेच भयानक आहेत , हे तिथे गेल्यावर कळलं. खूप ठिकाणी अस्वला नी केलेले नुकसान बघायला मिळालं. पण लोकांकडून त्या प्राण्यांना हानी किंवा इजा पोचव ली जात नाही. आपल्याकडे मात्र वाघाला सुद्धा आपण घाबरत नाही आणि सेल्फी काढण्यात वाघ दिसला की आपण अगदी गुंग होऊन जातो. तिथे हे प्रकार मात्र लोकांना करू देत नाहीत. अस्वले खूप असली तरी , योसेमिटी च्या जंगलात तुम्ही दूर-दूर ट्रेकला गेलात तरच ती समोरून दिसतात. अन्यथा रात्रीच्या वेळी त्यांचा संचार असतो आणि फार काही आपल्याला त्यांचा त्रास होत नसावा, असं मला वाटत. यलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये अजून वेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळाले. मोठमोठे रानगवे, ज्यांच्यापासून तिथे स्वतःला लांब ठेवा असं सांगितलं जातं. तिथेही योसेमिटीसारखाच प्रसंग झाला. लोक त्यांच्याबरोबर फोटो काढायचा प्रयत्न करत होते. यावेळी मला आनंद झाला की सेल्फी काढणारे ते लोक भारतीय नव्हते आणि गार्डने त्यांना चांगलेच खडसावले. गवा हासुद्धा प्राणी भयानक असू शकतो हे तिथे बघितलं. हिवाळा वाढला की त्यांच्या अंगावरची फर वाढत जाते आणि उन्हाळ्यामध्ये मात्र ती फर सगळी गळून पडते, झडून जाते. मोठ्या मोठ्या कळपा मधून फिरणारे हे प्राणी आकाराने म्हशी पेक्षा मोठे आणि डोके केव्हा फिरेल याची गॅरंटी नसल्यामुळे त्यांच्या पासून लांब राहिलेलंच बरं. अचानक हल्ला करून ते येऊ शकतात आणि म्हणून तिथे तुम्हाला सतत सांगितलं जातं की तुम्ही त्यांच्यापासून लांब राहा . जंगलात अनेक वेळा फिरलो पण अस्वलं समोरून दिसली नव्हती आणि हा एक वेगळा अनुभव यलोस्टोन नॅशनल पार्क नी दिला . लेमुर valley कडे आम्ही जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लांबलांबून गाड्या थांबलेल्या दिसत होत्या. काही कळेना काय झाले. आमची गाडी पहिली थांबवली होती गार्डने. आणि आम्ही एकमेकांकडे जरा साशंक नजरेने बघितलं. आपल्याकडे सगळे कागदपत्र व्यवस्थित आहेत आणि आपण कुठेही स्पीड लिमिट मोडला नव्हता असं सगळं एकमेकांकडे बघून आम्ही आश्वासन दिलं आणि मग गार्डला विचारलं काय झालं. त्याने सांगितलं, शांत राहा आणि उजवीकडे बघत राहा. एक अस्वल आई आपल्या तीन छोट्या बच्चाना रस्ता क्रॉस करुन देण्याच्या प्रयत्नात होती. एक जण पलीकडे नेला की तिकडची दोन जण हरवायची . बिचारीने शोधून काढली आणि त्यातल्या एकाला पलीकडे न्यायचा प्रयत्न केला. तोवर पलीकडे गेलेला परत आला होता. म्हणजे पलिकडे एकच आणि या बाजूला मात्र दोघंही, अशी आधीची तिची स्थिती कायम होती. अनेक वेळा तिने प्रयत्न केला आणि तिचा हा प्रयत्न बघण्यात आमचा चांगला तास दीड तास कसा गेला कळलाच नाही. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की दोन्ही बाजूच्या गाड्या शांतपणे उभ्या होत्या . गाडीतून कोणीही बाहेर आलं नाही , जोरजोराने कर्कश्य हॉर्न वाजवले नाहीत. आणि हा सगळा तिचा खटाटोप जेव्हा आवरला आणि ती नजरेच्या टप्प्या आड गेली, तेव्हा त्या गार्डने जाऊ दिलं . संध्याकाळी परतीच्या वाटेवर सुद्धा पुन्हा गाड्या थांबवल्या. खरंतर या वेळेला अस्वल आणि त्याचे बच्चे हे बाजूच्या डोंगरावर होते पण फार जवळ आले होते आणि जर त्यांना रस्ता क्रॉस करायची इच्छा झाली तर गाड्या चालू असायला नकोत म्हणून तिथे गाड्या थांबल्या होत्या. अर्धा-पाऊण तास अस्वलाने तिथे ही आमची करमणूक केली. त्यानंतर खूप मोठा , अगदी शम्भर दीडशे ग़व्यांचा कळप , रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न होता. आणि तोही इतका मोठा कळप पूर्णपणे क्रॉस करेपर्यंत एका बाजूला सगळी वाहतूक थांबवून धरलेली होती . प्राणी अशा जंगलांमध्ये फारच व्हीआयपी झालेत असे मला वाटायला लागले.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.