पत्र क्र ३५
नाईल नदी विक्टोरिया लेक मधून निघते तेव्हा तिला विक्टोरिया नाईल म्हणतात . पुढे ती वाहत जात अल्बर्ट लेक मधून निघणाऱ्या अल्बर्ट नाईल या नदीला मिळते. युगांडा मधली हि नाईल मग पुढे सुदानच्या दिशेने वाहत...
जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र ३५ नाईल नदी विक्टोरिया लेक मधून निघते तेव्हा तिला विक्टोरिया नाईल म्हणतात . पुढे ती वाहत जात अल्बर्ट लेक मधून निघणाऱ्या अल्बर्ट नाईल या नदीला मिळते. युगांडा मधली हि नाईल मग पुढे सुदानच्या दिशेने वाहत जाते. अल्बर्ट नाईल मध्ये मिसळण्या पूर्वी मर्चिसन पार्कमध्ये तिचं अत्यंत मनोहारी रूप बघायला मिळतं . नदीच्या समृद्ध परिसरामध्ये खूप सुंदर जंगल आहे आणि त्याच बरोबर अनेक प्राणी आणि पक्षी पण. ही जागा मला विशेष करून आवडली आणि लक्षात राहीली. मर्चिसन पार्क सुरू व्हायच्या आधी, गेटवरच अनेक पक्षी. तिथे नुकत्याच पडून गेलेल्या पावसानी केलेल्या छोट्या छोट्या डबक्यांमध्ये आंघोळ करणाऱ्या पक्षांनीच स्वागत केलं . गेटमधून आत आल्यावर आजूबाजूला किती बघू आणि किती नको अशी परिस्थिती. इतकी विपुल वनसंपदा आणि त्यातून दिसणारे अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी. आमचा मित्र आम्हाला तिथे घेऊन गेला होता. तो म्हणाला ,"मी बहुतेकदा चार महिन्यानंतर या जागी येतो कारण ही जागा अतिशय शांत आहे म्हणून मला आवडते. बाकी फारसे प्राणी मला इथे दिसलेले आठवत नाहीत" असं तो सांगत होता आणि दूरवर दहा-बारा मोठमोठे जिराफ चालताना दिसले. मला तर एवढा आनंद झाला कारण जंगली भागात प्रथमच मी जिराफ बघत होते. उंच उंच मान , उन्हात चमकणारा पिवळा रंग , त्यावर ते तपकिरी आकार, आणि लांबूनही दिसू शकतील असे हे प्राणी बराच वेळ सोबत होते. मित्र म्हणाला, " हो जिराफ इथे खूप आहेत." थोड्यावेळाने खूप मोठा जंगली हत्तींचा तांडा रस्ता क्रॉस करून गेला. त्यापुढेही हॉटेलवर पोहोचेपर्यंत अनेक पक्षी दिसले. तिथून नदी वरची सफर करायला घेऊन जातात . त्यात अनेक मगरी , पाणघोडे आणि विविध पक्षी दिसतात. आम्ही गेलो त्या काळात सर्व प्राण्यांची पिल्ले झालेली होती. एका ठिकाणी तर मगरीची असंख्य पिल्ल पाण्यात वळवळत होती. अगदी फूटभर लांब. नुकतीच जन्माला आलेली असावीत. नावाड्याने तिथवर नेलं खरं पण जवळच महाकाय मगरी पण होत्या. थोड पुढे पाणघोड्यांची पिल्ले पण दिसली. इतक्या महाकाय प्राण्याची छोटी छोटी पिल्ले बघायला खूप मजा येत होती. समोरच नदीकाठावर हत्तींचा मोठा तांडा, आणि त्यात सुद्धा बरीचशी छोटी-छोटी पिल्लं . हत्ती त्यांना इतके सांभाळून घेऊन जात होते पाणी पिण्यासाठी , मगरींपासून वाचवत. थोडे पुढे गेल्यावर खंड्या पक्षांची खूप घरटी होती. त्यातून असंख्य छोट्या छोट्या पिल्लांचा किलबिलाट ऐकू येत होता आणि अशीच तिथे झाडांवर अनेक वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी होती . सर्व जीव एकमेकांच्या मदतीने एकमेकांच्या सहवासात राहत होते . जीवो जीवस्य जीवनम् हा मंत्र अगदी शब्दशः खरे ठरवत होते. परतीच्या वाटेवर सुद्धा एक मोठी घोरपड दिसली . कासव सुद्धा होते. आफ्रिकन विल्डबीस्टस सुद्धा होते. हेच ते प्राणी जे मसाईमारा तुन मारा नदी ओलांडून पलीकडे सेरेंगेटी ला जातात हजारोंच्या संख्येने . आफ्रिकन म्हशी या महाकाय असतात. त्यासुद्धा इथे बघायला मिळाल्या . जिराफासारखा कधीच जंगलात न बघितलेला प्राणी झेब्रा पण दिसून गेला. बिग फाईव्ह म्हणून ओळखले जातात ते पाचही प्राणी बघायला मिळाले. जिराफ प्रथमच दिसले होते , हत्ती पण होते. पाणघोडे बघितले . म्हशी सुद्धा दिसल्या . एक तो सिंह काय राहायला होता हो बघायचा. हा तो दोन शिंगी आफ्रिकन गेंडा पण दिसलाच. बरेच प्राणी बघून झाल्यावर संध्याकाळ झाली होती . शांत बसलो अंगणात . तसं हॉटेलच्या माणसांनी सांगितलं ,"संध्याकाळ नंतर अंगणात बसायला आम्ही परवानगी देत नाही कारण तुमच्या बाल्कनीतून तुम्ही आता बघा थोड्याच वेळात या सर्व परिसरात अनेक प्रकारचे प्राणी तुम्हाला फिरताना दिसतील "आम्ही बाल्कनीत जाऊन बसलो आणि खरंच थोड्याच वेळात दोन गेंडे, त्यांच्याबरोबर मागोमाग हत्ती आणि शेवट पाणघोडे सुद्धा आले. हे पाणघोडे दिवसभर पाण्यात डुंबतात आणि रात्री थोडा वेळ बाहेर येऊन खूप गवत चरून जातात. ते फार वेळ पाण्याबाहेर राहत नाहीत . आणि अशा पाण घोड्यांचा मोठा कळप अंगणात फिरत होता. अर्थात ते हॉटेल नदीच्या काठाच्या अगदी जवळ होतं त्यामुळे हे सगळे प्राणी त्या हॉटेलच्या अंगणातून सतत ये-जा करत होते. दुसऱ्या दिवशी पहाटेच पुन्हा जंगलात फिरायला निघालो. मित्राने आधीच सांगितलं होतं," फार काही दिसत नाही ,आपण नुसते फिरून येऊ " हरकत नाही फिरायला नक्कीच आवडेल असं म्हणेपर्यंत महाकाय हत्ती आमच्या गाडीच्या मागेच लागला. त्याला कशाची भीती वाटली कोण जाणे , की त्याच्या छोट्या पिल्लाला पळवण्यासाठी आम्ही आलोय असे वाटले, मात्र सगळेच घाबरलो. गाडीचा वेग वाढवून आम्ही कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. जिराफ तर होतेच. त्यांची ही पिल्लं बघायला खूप छान वाटतं. पुढे एके ठिकाणी गाडीने जोरात ब्रेक दाबला . समोर मोठी सिहिण ! आणि लांबून आम्ही त्या सिंहीणी चे काय चालू आहे ते बघत होतो तोवर हळूच बाजूनी एक छोटास पिल्लू डोकावलं. इतक गोड दिसत होतं ते . आई पुढे निघाली तशी ते पिल्लू पण तिच्या मागे रस्ता पार करायला लागलं . मागोमाग अजून एक पिल्लू आलं. त्या पाठोपाठ अजून एक असे चार चार सिंह एकदम बघून आमची ही ट्रीप सफल झाली असं आम्हाला वाटायला लागलं . मित्र पण फार खूष झाला म्हणाला, ' आजवर एकदाही मी इथे सिंह बघितला नव्हता". आफ्रिकेतली जंगल म्हणजे सवाना टाईपचे असतात. त्यात खूप दाट झाडी कमी असते. लांब लांब पर्यंत मोकळं पठार असतं . त्यामुळे हे मोठे प्राणी खूप लांबून सुद्धा दिसू शकतात. त्यांनी एक मजा सांगितली की दुसऱ्या ठिकाणाहून ताडगोळे खाऊन हत्ती आले आणि त्यांच्या विष्ठेतून इथे त्याची अनेक झाडं तयार झाली . एक वेगळाच पक्षी येथे बघितला आफ्रिकन ग्राउंड हॉर्नबिल. कोंबडी पेक्षा बराच मोठा. त्यांची जोडी अगदी गाडीच्या बाजूनी जाताना पाहिल. खूप आश्चर्य वाटलं. जमिनीवरच राहणारे फारसे न उडणारे असे हे पक्षी . पूर्ण काळा रंग लालसर चोच आणि गळ्यात पिवळा बो . अशा सुंदर पेहरावात , रस्त्याच्या कडेने डौलात जाणारी ती जोडी आजही डोळ्यापुढे आहे.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.