पत्र क्र ३४

प्राणी पक्षी बघायला जायचं म्हणजे आफ्रिका खंड अतिशय उत्तम जागा. त्यातले अनेक देश असे आहेत की जिथे केवळ त्या तिथल्या जंगलांमुळे त्यांची इकॉनॉमी टिकून आहे. अनेक जंगल अनेक प्रकारचे वेगवेगळे प्राणी पक्षी...

कीर्ती वडाळकर
||4 min read

जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र ३४ प्राणी पक्षी बघायला जायचं म्हणजे आफ्रिका खंड अतिशय उत्तम जागा. त्यातले अनेक देश असे आहेत की जिथे केवळ त्या तिथल्या जंगलांमुळे त्यांची इकॉनॉमी टिकून आहे. अनेक जंगल अनेक प्रकारचे वेगवेगळे प्राणी पक्षी आणि ते बघण्याची मजाही काही औरच. असंच युगांडाच्या जिंजा गावाजवळ नाईल नदीच्या उगमापाशी अतिशय सुंदर अशी जागा आहे. खूप पक्षी तिथे बघायला मिळतात. खरं म्हणजे सुरूवातिला शंका आली की नाईल नदी इथे कुठे आली? म्हणजे आपण लहानपणी पासून असं शिकलोय कि नाइल नदी ही इजिप्तची जीवनदायिनी आहे. युगांडा ला पोचल्यापासून नाईल बद्दल त्यांच्या तोंडून खूप वेळा ऐकलं. शेवटी विचारलं की ही कुठली नाईल आहे जी तुमच्या इथे आहे? तर ही व्हाईट नाईल युगांडाची आणि ब्लु नाईल इथिओपिया च्या लेक ताना मधून उगम पावते . सुदान ची राजधानी खार्टूम जवळ दोघींचा संगम आहे. तिथून पुढे मात्र ही एकच नाईल , पुढे ईजिप्त मधून भूमध्य समुद्राला मिळेपर्यंत. जगातील सर्वात लांब नदी. नाईल नदीभोवती युगांडाची सगळी अर्थव्यवस्था फिरत असते. तिचा उगम जिंजा जवळच्या विक्टोरिया लेक मधुन आहे. आपल्याला किनाऱ्यापासून थोडं लांब घेऊन जातात तिथे त्या भल्या मोठ्या सरोवरातून नदी वाहू लागते. त्या ठिकाणी त्यांनी "नाईल नदीचा उगम" असा बोर्ड लावलेला आहे . नाईल तिथुन दुथडी भरून वाहायला लागते, आजूबाजूचा सर्व परिसर शिंपत, सुजलाम सुफलाम करत. अकरा देशांमधून ती वाहते . बोटीने निघालो. किनाऱ्या पासूनच तुम्हाला खूप प्रकारचे पक्षी दिसायला लागतात. सगळे आफ्रिकन पक्षी आणि आम्ही तर ते सगळे पक्षी बघून खरोखर खूप हरखून गेलो. विविध प्रकार त्यातला कावळा मला प्रकर्षाने आठवतो जरा मोठ्या आकारा चा आणि थोडा पांढरा भाग त्याच्यामध्ये होता मानेजवळ. हा कावळा आहे का कुठला पक्षी असं मी आणि आमच्या बरोबरचे एक पक्षीप्रेमी सीनियर होते, आम्ही चर्चा केली. पण तो कावळाच होता. मग कळलं की आफ्रिकन पाईड क्रो असं त्याला म्हणतात. तेव्हापासून प्रत्येक पक्षाच नाव शोधायचा छंदच आम्हाला लागला कारण बरेचसे पक्षी इथल्यापेक्षा वेगळे पण पाहिले . किंगफिशर म्हणजे आपला खंड्या हे नाव घेतल्याबरोबर आपल्या डोळ्यापुढे एक अतिशय सुंदर रंगीत असा पक्षी येतो. लांब चोचीचा पाण्यात सूर मारून मासे पकडणारा. प्रकर्षाने लक्षात राहतात ते त्याचे विविध रंग आणि त्याची लांब चोच . इथे मात्र आम्हाला जे पक्षी दिसत होते त्यांचा आकार तर तोच . चोच पण तशीच लांब होती पण रंग मात्र राखाडी आणि त्यांच्यावर काळे ठिपके. कळेना याला किंगफिशर म्हणावं का नाही? मग पुन्हा आम्ही शोध काढला आणि कळलं की तो आफ्रिकन पाईड किंगफिशर होता. त्याआधी केवळ पुस्तकातूनच बघितला होता. कदाचित दिसला असेलही कुठे पण लक्षात नाही आला. इथे मात्र हे पक्षी असंख्य होते त्यामुळे त्यांचे अस्तित्व जाणवले. त्यानंतर आणखी एक पक्षी दिसला, डार्टर. त्याच्या तलवारी सारख्या मानेचा तो अतिशय छान वापर करतो. हाही आपल्या भारतातल्या डार्टर पेक्षा जरा वेगळा होता. काळा रंग , आकारही जरा मोठा . एकूणच तिथले सगळे पक्षी आकाराने आपल्या इथल्या पक्षांपेक्षा मोठे वाटत होते. जिंजाला जवळजवळ दोन-अडीच तासाचा वेळ त्या विक्टोरिया लेक पासून उगम पावलेल्या नाईल नदीतले विविध पक्षी निरीक्षण करण्यात कसा गेला कळलेच नाही. एका ठिकाणी झाडाखाली पक्ष्यांच्या विष्टेने सगळी जागा पांढरी झालेली दिसत होती आणि तिथे घोरपडी सुद्धा होत्या. मोठे मोठे storks विक्टोरिया लेक मधून मासे पकडून खात होते. पक्षी मजेत आजूबाजूला विहरताना दिसत होते आणि तिथूनच निघून नाईल नदी दुथडी भरून वाहत होती. हे सगळे दृश्य अतिशय मनमोहक होतं . आफ्रिकेतले बरेच पक्षी तिथे दिसले. अजून एक जागा मला आठवते. एंटेबी पासून , व्हिक्टोरिया लेक मध्ये साधारण ४५ मिनिटांचा बोटीने प्रवास करून नगाम्बा बेटावर आम्ही गेलो होतो. तिथे नामशेष होत चाललेल्या चिंपांझी माकडांचे जतन करण्याचा प्रयत्न चालू आहे. चिंपांझींचे केंद्र करण्यापूर्वी इथे फारसे जंगल शिल्लक उरले नव्हते. हे केंद्र सुरु केले आणि अनेक पक्षी प्राणी पण तिथे आले. इतर जंगला मधून, शिकाऱ्यांनी ही माकडे खूप मारली. आजही मारतात. पण असल्या हल्ल्यांमधून वाचलेले पण आई वडील गमावलेले, किंवा जखमी वगैरे चिंपांझी इथे आणून त्यांची देखभाल करतात. माकड कसले माणसंच ती जणू. सगळ्या गोष्टी त्यांना समजत होत्या . आम्ही तिथे गेल्यावर आता आपल्याला ही लोक काहीतरी खायला देणार म्हणून जंगलात गेलेले ते चिम्पान्झी सगळे धावत परत आले. त्याना इतकी चांगली समज होती. सरळ आपल्याला खायला मागत होते. कदाचित टुरिस्ट लोकांनी त्यांची ही सवय बिघडवली असावी असं वाटतं. तिथे त्यांचं सगळं केंद्र बघून झालं आणि त्या बेटावर फिरत असताना समोरच्या एका झोपडी कडे लक्ष गेलं. तसं ते निर्जन बेट होतं . एका झोपडीच्या बाजूला एका झाडावर असंख्य पिवळे छोटे-छोटे सुगरण पक्षी दिसले. तो त्यांचा विणीचा हंगाम होता. इतके सुंदर पिवळे सुगरण पक्षी बघायला खूप छान वाटलं. आणि तेही असंख्य. डोळ्याचे पारणे फेडणार असं ते दृश्य होतं. असेच अनेक छोटे छोटे सुगरण पक्षी प्रभास पाटण लाही बघितले होते, त्याची आठवण झाली. इतक्या सुंदर पक्षांना त्या रम्य ठिकाणी येऊन घर बांधण्याचा मोह न झाल्यासच नवल. इतरही अनेक पक्षी त्या बेटावर होते आणि युगांडा सरकारने चिंपांझीं बरोबर त्या पक्षांची ही जणू काही सोयच केलेली होती. आफ्रिकन फिश ईगल पण पंख साफ करताना झाडाच्या टोकावर बसलेला दिसला. ते पाईड किंगफिशर , कावळे, तर सगळीकडे होतेच. विविध प्रकारचे बगळे, करकोचे, तितर तर होतेच पण घोरपडी पण बऱ्याच होत्या. एक साप पण दिसला. पाणपक्षी पण विविध. सगळ्या पक्षांमध्ये ते सुगरण पक्षी मात्र प्रकर्षाने लक्षात राहिले.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments