पत्र क्र ३२

इंटरनेट प्रकरण नवीनच होते तेव्हाची गोष्ट. एखादी नवीन वस्तु आणली की आपण कसे पूर्णवेळ तिचा खेळ करत असतो, तसेच मी ही करत होते. ओरिसा दौरा ठरला होता. अरे वा, चला आपल्या नेट वर काय बर माहिती मिळतेय, बघु...

कीर्ती वडाळकर
||2 min read

जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र ३२ इंटरनेट प्रकरण नवीनच होते तेव्हाची गोष्ट. एखादी नवीन वस्तु आणली की आपण कसे पूर्णवेळ तिचा खेळ करत असतो, तसेच मी ही करत होते. ओरिसा दौरा ठरला होता. अरे वा, चला आपल्या नेट वर काय बर माहिती मिळतेय, बघु या , करत शोध लावायला सूरुवात झाली. नेहेमीचे पूरी, कोणार्क वगेरे करुन अजुन काय बघता येइल? काही अभयारण्य? सिमलिपाल बंद असणार होते. नंदनकानन बघु या, चिल्का ला जाणारच होतो. आणि एक नाव चमकले, भीतरकणिका!! त्याची माहिती तर चांगली वाटली. ज़ायचे कसे ते काही दिलेले नहते. म्हटल, तिथे पोचुनच बघु. पूरी ला काही जणांना विचारले, कोणालाच माहिती नव्हते. एक जण तयार झाला, शोधत जाऊ म्हणाला. निघालो विचारत, राजनगर हून जवळच आहे इतके माहित होते. पण रस्ता संपला , पुढ़े सगळा समुद्र आला, तरी राजनगर येइना. तिथे विचारत होतो तर एकाला माहिती होती. म्हणाला, मागे जा, अमुक ठिकाणी वळा, तिथुन वन खात्याचे ऑफ़िस शोधा, तिथे माहिती मिळेल. तासाभराच्या शोधकार्यानंतर ते ऑफ़िस सापडले. तोवर संध्याकाळ झाली होती. अतिशय खेड़े. काहीच सोयी दिसत नव्हत्या. तिथे लाईट पण नव्हते. त्या ऑफ़िस मधे जे साहेब होते, ते , आम्ही थेट मुंबईहुन आलोय ऐकुन उडालेच. घरी गेलेल्या क्लर्क ला परत बोलवुन, मेणबत्तीच्या उज़ेडात, त्यांनी परवानगी चे पत्र टाइप करायला लावले. तोवर आम्ही बाहेर उभे, आणि आम्हाला बघायला गावकरी जमलेले. अंधार पडु लागला तर भिती वाटायला लागली, ही माणसे फसवणार तर नाहीत? ते पत्र देउन, पुढच्या ठिकाणी टेलिफ़ोन ने संदेश पाठवुन, साहेबांनी सांगीतले की बस अजुन २४ किलोमीटर ज़ायचे , तिथे गुप्ती गाव आहे. चला सुटलो करत निघालो. अंधार. रस्ता म्हणजे नुसते खड्डे. २४ किलोमीटर ला चांगले २ तास लागले. गुप्ती चे ऑफ़िस गाठले. तिथे कळले की इथून पुढ़े बोटिने दिड तास ज़ायचे आहे. बाप रे!! रात्रीचे नऊ वाजून गेले होते. सामान सगळे नाही नेऊ शकणार तुम्हीं, थोड़ेच घ्या. ड्रायवर ईथेच थांबेल. तुम्हीं निघा. अंधारात बोट वल्हवत ते दोघे आम्हाला घेउन निघाले. ख़र सांगते, इतके घाबरलो होतो. मधेच कुठे ही माणसे आपल्याला पाण्यात ढकलून देतिल तर? उगाच आलो. कसले ते पक्षी , मगरी अन कासवं, काही तरी उद्योग झाला. असे म्हणत देवाचे नाव घेत बसलो. अकरा वाज़ता मुक्कामाची जागा आली. बोटीतुन उतरलो तर हरणांचा कळप स्वागताला. सकाळ तर इतकी सुंदर होती. जंगलात मस्त फेरफटका मारला. बोटिने पुढ़े गहिरामाथाला जाउन आलो. ऑलिव रीडली जातीची कासवं तिथे अंडी देण्यासाठी खुप लांबचा प्रवास करुन येतात. तिथल्या त्या छोट्याशा बेटावर राहुन मगरींवर शोधकार्य करणारे श्री हेमंत पाणिग्रही भेटले. खुप फिरलो त्यांच्या बरोबर, भरपूर गप्पा पण मारल्या. खुपशा मगरी बघीतल्या. आणि दलदल तुडवत जाउन , झाड़ाच्या टोकांवर घरटे करुन प्रजनन करणारे असंख्य पक्षी पण बघितले. किती प्रकारचे पक्षी होते तिथे, ख़रच! रात्रीच्या अंधारात भयावह वाटणारा परिसर आता रम्य वाटत होता. काल पश्चात्ताप होत होता, आज आनंद! इतका सुंदर प्रवास क़ायमचा स्मरणात राहिला. पण आता चित्र पालटले आहे म्हणे. अनेक हॉटेलं, रीसॉर्ट्स, वगेरे झाले आहेत. आणि सतत गर्दी असते. बरं झालं आम्ही आधीच जाउन आलो ते…..

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments