पत्र क्र ३१
पक्षी आणि निसर्ग !! अतुट जोड़ी. दोन्ही एकत्र भेटल्यावर काय बहार येते न! मुंसियारी ला पोचलो ते सकाळचे अकरा वाजुन गेले होते. घाटातल्या प्रवासाचा त्रास होत होता. तर थोडा आराम करु असा विचार करत पंचकूली...
जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र ३१ पक्षी आणि निसर्ग !! अतुट जोड़ी. दोन्ही एकत्र भेटल्यावर काय बहार येते न! मुंसियारी ला पोचलो ते सकाळचे अकरा वाजुन गेले होते. घाटातल्या प्रवासाचा त्रास होत होता. तर थोडा आराम करु असा विचार करत पंचकूली शिखरे बघत , हॉटेलच्या मागच्या अंगणात बसलो होतो. दुसऱ्या टोकाला नज़र गेली तर काही हुप्पू डौलात चालत होते गवतावर, कीड़े टिपत. दुपारून महेश्वर आणि तामर कुंडावर पक्षी बघायला जाणारच होतो, आता उत्साह वाढला. ग़ावापासून जराशाच अंतरावर असलेली ती कुंड. ट्रेकिंग साठी जातात तिथे. फारसा कठीण रस्ता नाही. मजेत जाता येतं. एकीकड़े बर्फाच्छादित पंचकुली शिखरे आणि आजुबाजुला अनेक प्रकारची झाड़े. त्यात लपलेले अनेक सुंदर पक्षी. किती विविध रंग आणि आवाज़!! ती जागा पण अगदी भारावुन टाकत होती. छोटे छोटे वेगवेगळे पक्षी बघत कुंडाच्या ही पुढ़े गेलो. तिथे हिमालयन मोनाल नावाचा रंग़ित, डौलदार पक्षी काही सेक़ंदच दिसला आणि डोळयाचे पारणेच फिटले. मला ती संध्याकाळ प्रकर्षाने लक्षात राहीली. डोंगर चढून वर आलो होतो. असंख्य पक्षी किलबिलाट करत होते. दूरवर मन्दिरात चालु असलेला गायत्री जप पूसटसा ऐकु येत होता. इकड़े सूर्याला घरी ज़ायची घाई होती. सर्व हिमशिखराना सोन्याची अंघोळ घालून तो जायच्या तयारित होता आणि थोड्या थंड पण शांत वातावरणात, गायींच्या ग़ळयातील घंटा किणकिणत होत्या. श्रीकृष्ण न आठवला तरच नवल. ध्यान करायला अगदी समर्पक जागा!! पक्षी निरीक्षण करायला अजुन एक अफ़लातुन जागा म्हणजे सातताल. नैनीताल पासून काही अंतरावर आहे. आम्ही तर तिथेच राहत होतो. पहाटेपासूनच पक्षीमय व्हायचो. एक बाजुला तलाव आणि त्या समोरच आमची राहायची जागा. दुसरीकडे जंगल. चालत निघा आणि बघतच चला. मुख्य रस्ता सोड़ून आत जंगलात उतरलो. सुंदर नीळया पक्षांचा थवा उडला. तिथे पाण्याचा ओहळ आहे. त्यात काही सुकलेल्या काड्या अडकवून ठेवल्या होत्या. थोड्याच वेळात अनेक रंगाचे पक्षी त्यात अंघोळ करताना दिसू लागले. थोड्या अंतरावर हौशी आणि व्यावसायिक फोटोग्राफ़र्स आपआपल्या कॅमेरात तो अपूर्व सोहळा टिपत होते. जसजसा दिवस वर येऊ लागला, पाण्यावर जत्राच भरली . खुप प्रकारचे पक्षी. पुढ़े चालत निघालो. स्वर्गीय नर्तक नावाचे डौलदार पक्षी क़ित्ती होते तिथे! सुतार पक्षी पण वेगवेगळया प्रकारचे आणि रंगांचे. तीतर तर किती रंगित. खंड्या पण अनेक प्रकारचे. काही पक्षी हे तिथलेच तर काही पाहुणे मंडळी! तिथला गाइड जीव तोडुन नावें सांगत होता. बाप रे, किती लक्षात ठेवणार? कुणाची घरटी दाखवायचा, कुणाची पिल्ल. कुठलासा पक्षी त्याला दिसला की आम्हाला दिसेपर्यंत अगदी बेचैन व्हायचा. खुप पक्षी!! सकाळची सहा सात तासाची भ्रमंति तर मस्त झाली. डोळया पुढ़े अनेक रंगांचे पक्षी नुसते रुंजी घालत होते. कानात खुप शांततेला भंग करणारा किलबिलाट. दुपारुन पुन्हा तीच मज़ा अनुभवली. अजुन वेगळे पक्षी. मात्र सकाळचा ओहळ ओस पडला होता. नाही म्हणायला एखाद दूसरा कोणी येत होता. तो मात्र संपूर्ण ओहळ आपला च आहे ह्या ख़ुशित अंघोळ करताना वाटत होता. संध्याकाळ झाली. परतीच्या वाटेंवर दोन मोठठया लाल रंगाच्या , झुबकेदार शेपटीच्या, मुंगूसासारख्या दिसणाऱ्या , जरा मोठया खारी समोरुन गेल्या. अंधार पड़ु लागला होता त्यामुळे नीटस कळल नाही. पण होते देखणे. परत आलो. उद्या पण जाऊ म्हणत उत्साहात झोपलो. सकाळीच निघालो , पण आज काही तरी वेगळेच वाटत होते. मोठमोठे कॅमेरे वाले व्यावसायिक आणि काही हौशी निरीक्षक रस्त्याच्या कडेला उभे होते. काही वनरक्षक सांगत होते,”आज कोणालाही जाता येणार नाही, एक बिबट्या दिसलाय तिथे पलिकड़े” कालचे पक्षी आठवत आलो परत मग काय करणार न?
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.