पत्र क्र ३०

पक्ष्यांची एक वेगळीच दुनिया असते. आपल्या आपल्या दुनियेत ते व्यस्त असतात. मानवाचे अतिक्रमण ते जराही सहन करत नाहीत. इतकासा जीव तो बिचारा, किती कष्टाने जगवतो स्वतःला! पक्षी निरीक्षण आम्हाला सर्वस्वी...

कीर्ती वडाळकर
||3 min read

जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र ३० पक्ष्यांची एक वेगळीच दुनिया असते. आपल्या आपल्या दुनियेत ते व्यस्त असतात. मानवाचे अतिक्रमण ते जराही सहन करत नाहीत. इतकासा जीव तो बिचारा, किती कष्टाने जगवतो स्वतःला! पक्षी निरीक्षण आम्हाला सर्वस्वी आवड़ते. पाण्यात सूर मारुन मासा पकडणारा खंड्या लहानपणी पहिले नागझिऱ्याला बघीतला. लांब चोचित पकडलेला मासा झाड़ावर बसून निवान्त खाल्ला त्याने. वड़िलांनी त्याचे नाव सांगीतले आणि एक धड़ा मिळाला, सर्व पक्षी चिमण्या कींवा कावळे नसतात, प्रत्येकाला आपले नाव, ओळख,रंग, आकार, आवाज़ असतो. तेव्हापासून पक्षी निरीक्षणाचा एक नादच लागला. खुप सुंदर आणि विविध रंग आणि आक़ाराचे पक्षी! पक्षी बघायला विशिष्ट जंगलात तर जातातच पण कुठेही ते दिसतात, साधारण उगवती आणि मावळतीला तर हमखास, कुठे एखादा वेडा राघु चोचीने पंख साफ़ करताना दिसेल तर कुठे एखादा बुलबुल मंजुळ बुलबुलाट करताना दिसेल. लाईट च्या तारा त्यांच्या विशेष आवड़त्या. ओरिसाला रेल्वेने जात होतो. पहाटेच एका तलावाजवळून गाड़ी जात असताना खुप पक्षी दिसले. इतकी सुंदर पहाट होती ती. नंतर चिल्का सरोवराची सफ़र करताना कित्ती पक्षी बघितले , मधेच उड्या मारणारे असंख्य डॉलफ़िन्स पण. खुप मज्जा येत होती. कुठल्याही जंगलात गेलात की गाइड लोक बराच प्रयत्न करतात पक्षी दाखवायचा. आपणही चौफेर बघत रहावे, नक्की कोणीतरी नज़रेस पडेल. मध्यप्रदेश मधे फिरताना भारतीय निलपंख खुप दिसतात. त्यांच्या बहुरंगी पंखानि गिरक़या घेताना काय मस्त दिसतात. कोकणात हेदवीच्या मंदिराजवळ पहिल्यांदा धनेश बघितला अगदी जवळून . छोटेखानी रंग़ित खंड्या पण. धनेश पक्षांची खरी मज़ा दांडेलित. संध्याकाळी काली नदीच्या पुलावर नुसते उभे होतो. इतके धनेश आजुबाजुच्या झाड़ांवर अलगद उतरत होते. त्यांचे smooth landing बघायला खुप छान वाटत होते. तिथल्या resort च्या खिड़कीतुन पण असंख्य पक्षी दिसत होते, फ़ार कुठे जायलाच नको. एका लेक्चर साठी जात होते. मनात तिथली तयारी सुरु असताना अचानक रस्त्याच्या कड़ेला सुंदर अबोली फ़्लेमिंगोंचा थवा दिसला. मी तर हरखुनच गेले. चौकशी केली तर भिगवण तिथुन जवळच होते. तेव्हा पासून कितिदा गेलो तिथे. दर वेळी नवीन अनुभव. एकाच दिशेने संथ चालत जाणारे मधेच ख़ाली चोंच करुन काहीतरी खाणारे असंख्य फ़्लेमिंगोज.सोबत इतरही अनेक पक्षी. फ़ार आधी शिवडीला, ओहोटिच्या वेळी रांग लावुन पण फ़्लेमिंगोज बघितलेत आणि आता ते नवीमुंबई ला पण खुप दिसतात. पन्नाला खुप गिधाडे बघितलि. मोठठया दरितुन लांब पंख पसरुन विहरणारी. डोंगराच्या कपारित घरटे करुन पिल्ल वाढ़वणारी. अगदी नयनरम्य दृश्य! पक्षांच्या मागावर नांदूर मधमेश्वर ला गेलो. जांभळया रंगाची पाणकोंबडी पंख फड़फडवत पाण्यावरून चालताना अशी रुबाबदार दिसते न. सारस पक्षी तर बघतच रहावेत असे. लांबुन पण ओळखु येणार त्यांच्या उंचीमुळे. तिथे अनेक प्रकारचे स्टॉर्क्स, बदकं पण दिसतात. पक्षांचे थवेच्या थवे अनुभवले तिथे. रंगनथिट्टु ला पक्षी बघायला कोण गर्दी! अरे देवा, हयात काय मज़ा येणार? जरा खटटुच झालो होतो. पाण्यातुन सफ़र करुन पाणकावळे वगेरे बघून झाले. मग जरा पुढ़े चालत गेलो. गर्दी मागे टाकत. मग खुप शांतपणे पक्षी बघता आले. पक्षी बघायला सर्वात सुंदर जागा म्हणजे भरतपुर. गेटजवळच सायकल भाड़याने घ्यावी आणि बघत बघत निघावे. किती पक्षी दिसतिल हयाचि गणना च नाही. सर्व बाजुंनी , दूरवर पक्षीच पक्षी. तलवारीसारखी मान असणारा डार्टर जवळच पंख साफ़ करत होता. सुंदरसे सारस नाच करत होते. थोड्या अंतरावर खुपसे पाणकावळे . एका झाड़ाच्या ढोलीतुन मान बाहेर काढ़णारे पोपटाचे पिल्लं, आईची वाट बघत होते. आलीच ती तितक्यात. चोचीत खाऊ घेउन. तो अपूर्व सोहळा ड़ोळयात साठवला. पुढ़े झाड़ाशी एकरूप झालेले घुबडाचे कुटुंब. केवळ डोळयाच्या हालचालीवरून त्यांचे अस्तित्व कळत होते. बाकी अगदी झाड़ाच्या रंगाचे. किती प्रकारचे पक्षी बघितले बापरे! कुठे सातभाई, कुठे शिंपी, कुठे टिटवी, कुठे पेलिकन, विविध रंग, आवाज़ आणि फड़फड़ !! तिथे एका ठिकाणी अजगर आहेत खुप. पण ती जागा बरीच लांब आहे. गेलो तिथवर. जाताजाताच गाइड ने थांबवले, ते बघा म्हणे. एका झाड़ाच्या ढोलीत अजगर शिरत होता. तितक्यात खुप ओरडत पोपट कुठुनसे जमले. अजगर शांत पणे ढोलीत शिरला, आत अंडी असावीत. काही वेळाने बाहेर आला. अंडी फ़स्त करुन. बाहेरच्या पोपटांचा आक्रोश ऐकवत नव्हता……

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments