पत्र क्र २९
झाड़ापानांची, निसर्गाची खुप आवड असल्याने जंगलची भटकंति पण खुप ठिकाणी केली. अनेक निसर्गरम्य जागा त्यामुळे बघता आल्या. बरेचदा , खुप प्राणी दिसतात म्हणुन भयानक उन्हाळा पण सहन केला त्यासाठी. ऐन एप्रिल...
जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र २९ झाड़ापानांची, निसर्गाची खुप आवड असल्याने जंगलची भटकंति पण खुप ठिकाणी केली. अनेक निसर्गरम्य जागा त्यामुळे बघता आल्या. बरेचदा , खुप प्राणी दिसतात म्हणुन भयानक उन्हाळा पण सहन केला त्यासाठी. ऐन एप्रिल महिना. कान्हा च्या जंगलात चांगले ४,५ दिवस मुक्काम. पहाटे बाहेर पडणे तसे सुसह्य होते. दहा, म्हणजे परतीच्या वेळपर्यंत ऊन तापायला लागले असणार. खरी परीक्षा दुपारि दोन ला बाहेर पड़ताना असायची. जंगलात ग़ेल की वाघ दिसलाच पाहीजे असा अनेकांचा समज असतो. आणि वाघाच्या नादात बाकी जंगल हरवुन बसतात. ते गाइड लोक पण मग वाघ दाखवायचा आटोकाट प्रयत्न करतात. पहिल्या दिवशी त्याप्रमाणे चांगले तीन वाघ दिसले. त्याला सांगीतले ,”बाबा आम्ही फ़क्त वाघ नाही तर हे जंगल बघायला आलो आहोत”. तो पण ख़ुश झाला. आणि दुसऱ्या दिशेनी जंगलात मस्त फिरवले, इतके पैलु दाखवले जंगलाचे! प्रत्येक वाघाचा आपला प्रदेश असतो. एका अशाच वाघाने त्याच्या भागात आम्ही त्याच्या प्रदेशात घुसल्याचा निषेध नोंदवत गाड़ी च्या पुढ़े , दमदार पावले टाकत घाटरस्ता उतरायला सूरवात केली. गाइड म्हणाला, “हां असा अनेक तास गाड़ी अड़वु शकतो”. बाप रे आता काय? पण मागे दुसऱ्या गाड़ीचा आवाज़ आला आणि त्याने दरित उड़ी मारली. मागच्या गाड़ीतल्या लोकाना तो अजीबात दिसला नाही. नवेगाव, नागझिरा, ताड़ोबा पण असेच खुप उन्हात बघितले. विविध प्राणी मात्र नक्कीच दिसले. एके ठिकाणी माकड़ांचा कळप होता. जवळच एक नळ होता. त्यातला एक जण ख़ाली आला आणि त्याने चक्क नळ उघड़ला आणि सगळयानी येउन पाणी प्यायले. पण नळ बंद करता येतो कुठे? सगळा कळप दूर गेल्यावर गाइड ने उतरुन बंद केला मग . पन्ना ला पण सुंदर जंगल. बिबटया प्रथम तिथे बघितला. अगदी पहाटे पाच डिग्री तापमानात, जंगलात शिरलो आणि समोरच वन्य मांजर. अतिशय लाजाळु प्राणी. टोकदार त्रिकोणी कान, तपकिरी राखाडी रंग, अंगावर ठिपक़े. अतिशय चपळ. दिवसा दिसणे केवळ अशक्य. रात्रीच काय तो तिचा संचार असतो. बराच वेळ ती समोर होती. रणथंभोर ला त्या बिचाऱ्या वाघाच्या मागे लोक इतके वेड्यासारख़े लागतात, जीव नकोसा होत असेल त्याला. ती सगळी गर्दी बघून मन उतरलेच. त्याला लांब निघुन जायला जागा पण नव्हती ठेवली. अशा अति उत्साही लोकांचे काही तरी करायला हवे. आणि बाकी प्राणी मला एकदम माणसाना सरावलेले वाटले. हरिण सुद्धा एक तुच्छ कटाक्ष टाकुन चरायला लागायचे. सारीस्काचे जंगल त्यामानाने शांत. कमी लोक येतात म्हणुन असेल. तिथे अगदी जंगल भाग सूरु होतो तिथेच राहत होतो. पहाटेच खुप मोर अंगणात बघून हरखून गेलो. त्यांच्या पाठोपाठ खुपशी हरणे पण. त्यांना इतके जवळ बघायला मज्जा आली. पन्ना हुन जवळच केन घड़ियाल पार्क आहे. रस्ता अतिशय वाईट. अर्ध्यातुन परत जावे का? काय इतके असेल तिथे? असे विचार सतत येत होते. पण मुलानी ऐक़ले नाही. जाऊच आपण. गेलो खड्डे, खड़ी पार करत. ख़ाली गाड़ी ठेउन थोड़े चढ़ून जावे लागतें. आणि वरून दिसणारा नजारा काय वर्णावा? हिरवे दिसणारे पण स्वच्छ पाणी. पाणी आणि वारा हयांच्या माऱ्याने डोंगराची झिज होउन सुंदरसे आकार तयार झालेत. त्यातुन नदीचे पाणी वाहत असते. त्यावर मगरी, सूसरी संथपणे पोहत असतात. बोटीने पण मस्त, नदीत फिरता येते. आणि दोन्ही बाजुच्या डोंगर कपारितुन वास करत असलेले अनेक पक्षी बघायला मिळतात. अतिशय रम्य आणि सुंदर पार्क. तिथुन खजुराहो चा रस्ता पण खुप रम्य आहे. जिम काँर्बेट मधे हत्तीवरून फिरताना ज़ेव्हा लांब जंगली हत्ती दिसले, हां हत्ती घाबरुन उलटा च फिरला. त्याला आवरताना माहूताला नाकी दम आला. वाघ दिसला तर मात्र हां शेर, आणि स्वतःच्या जातभाई पुढ़े शेळी! मुद्दुमलाई च्या जंगलातली भटकन्ती पण अविस्मरणीय. डिसेम्बर ची थंडी. आणि घनदाट जंगल. त्यातून जाणारा रस्ता. ते resort पण छान होते. जंगली कुत्रे तिथे प्रथम बघितले. आणि वन्य हत्ती पण. दोन्ही प्राणी कळपातुन विहार करणारे. जंगली हत्ती मात्र भीतिदायक़ ह. मोठया संख्येने येणार. आणि कुणाचींही पर्वा न करता जाणार, काय तुमचे नुक़सान होईल ते तुमचे नशिब. रायपुरजवळचे बारनवापारा जंगल लक्षात राहिले ते दोन गोष्टींसाठी. अस्वल आहेत तिथे. आणि गाइड त्या अस्वलाच्या मागावर इतका फिरवत होता, पण तो पठठ्या काही दिसेना. पाउलखुणा दिसत होत्या, अगदी अत्ताच केलेली विष्ठा दिसली, झाड़ावर नखांचे ओरखड़े दिसले , इतकेच काय तर त्याने नुकतेच उठवलेले मधाचे पोळेपण दिसले, पण तो बाबा काही दर्शन देइना. जंगल पण दाट होते. शेवटी चार तास फिरल्यावर नाद सोडला. तिथे जे रिसॅार्ट होते ते फ़ार सुंदर होते. संपूर्ण लाकडी. लाकडी खांबावर खोल्या होत्या. म्हणजे लाकडी ज़िना चढून ज़ायचे. अगदी ज़मीनीलगत , ख़ाली काही नाही. आधी छानच वाटले. दुपारच्या शांतवेळी टकटक टकटक असा सततचा आवाज़ येत होता. जाउन बघतो तर काय, दोन सुतार पक्षी दोन खांबाना उकरत होते. सगळा खांब उकरला तर वरचा डोलारा ऊरेल का? तेवढ्यात resort चा माणुस त्यांना हाकलायला आला, म्हणे त्यांच्यावर फ़ार लक्ष ठेवावे लागतें. पण त्यांचा काय दोष? तुम्हीं त्यांच्या अधिवासात अतिक्रमण केलेत, ते तरी कुठे जातील?
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.