पत्र क्र २८

camper लावुन कोणीतरी राहतेंय . अधेमधे छोटी छोटी खेड़ी. इन्वर्नेस हुन आइल ऑफ स्काई च्या रस्त्यावर चे हे दृष्य! समुद्र पण तसाच जरा शांत. डॉर्नी च्या पुढ़े एक भला मोठा पुल ह्या बेटाला मेनलँड शी जोड़तो....

कीर्ती वडाळकर
||4 min read

जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र २८ समुद्र सर्वदूर सुंदरच.आणि लोकप्रिय पण. मात्र परदेशात किनाऱ्यांची विशेष काळजी घेतात हे मात्र नक्की. एकुणच सार्वजनिक स्वच्छ्तेबाबत आपल्या पेक्षा परदेशी लोक जास्ती जागरुक असतात हे मात्र ख़रं. लंडन जवळ येताना नॉर्थ सी मधे उभारलेल्या अनेक पवनचक्क्या आपले लक्ष वेधुन घेतात. कॅले हुन डोवर ला त्या भल्या थोरल्या क्रूज़ मधुन जाताना भणाण वारा म्हणजे काय चीज़ असते ते चांगले कळते आणि इतक्या जास्ती पवनचक्क्या तिथे का आहेत ते कळते. स्कॉट्लंडचा आयरिश सी! मला क़ायम, समुद्र म्हणजे दमट हवा, खारे वारे आणि जरासे गरमच वातावरण असे वाटायचे. मग इतकी थंडी वाज़तेय तर हां नक्की समुद्रच आहे न? असा प्रश्न पडावा अशी छान थंड हवा. रम्य परिसर. डोंगरावर बर्फ़. आणि ख़ाली समुद्र. दूरदूर पर्यंत मनुष्य वस्ती दिसेना. मधेच कुठेतरी camper लावुन कोणीतरी राहतेंय . अधेमधे छोटी छोटी खेड़ी. इन्वर्नेस हुन आइल ऑफ स्काई च्या रस्त्यावर चे हे दृष्य! समुद्र पण तसाच जरा शांत. डॉर्नी च्या पुढ़े एक भला मोठा पुल ह्या बेटाला मेनलँड शी जोड़तो. इतका सुंदर नजारा!! आणि ते बेट पण फारच सुंदर. नेमका रविवार असल्याने सुट्टीची शांतता. ख़रंतर इतके लांब आहे ते बेट पण खुपच छान. दुपारि चार ला सूर्यास्त होऊ लागला. आणि आकाश सोन्याने भरुन गेले. डोंगराआडुन समुद्राकडे झेपावणारा तो सोन्याचा गोळा आणि हवेत वाढत जाणारा गारवा!! बाली चे रीसॉर्ट अगदी समुद्रकिनारी. समुद्राची विविध रुपे दिवसाच्या विविध प्रहरी दिसणार. बालीमधे पण खुपसे किनारे बघितले, अगदी टीपिकल समुद्रकिनारे! खुपशी खाण्याची दुकाने, हस्तकलेच्या वस्तुंचे बाज़ार, लहान मूलांचि खेळणी, एख़ादे मंदिर आणि समोरच पसरलेला अथांग सागर! कधी भरती च्या उसळणाऱ्या लाटानी किनारे भिज़वणारा तर कधी ओहोटि मधे सगळ ओढुन नेणारा. पटाया च्या कोरल रीफ़ वर मस्त डूंबत होतो तेव्हाच सुनामी आली. पण अगदी उलटया दिशेला . आणि आश्चर्य म्हणजे अगदी आदल्यादिवशी श्रीलंकेच्या ज्या किनारी होतो तो किनारा आणि ते हॉटेल पूर्णपणे साफ़ झाले होते, बरीच हानी झाली होती तिथे. पहिल्यांदा श्रीलंकेला गेलो. अतिशय सुंदर बीच रिसोर्ट होते. भरतीच्या लाटा अगदी अंगणात उसळत होत्या. इतके मोठे आणि सुंदर!! सूर्यास्त बघायला त्यांनी स्पेशल कार्यक्रमच ठेवला होता. थंड हवा, गरम कॉफ़ी, हलकेसे संगित आणि चविष्ट पदार्थ सोबतीला. वा!! सूर्य पण थांबला तर?? अमेरिकेचा पश्चिम किनारा. पॅसिफिक महासागराचे सौंदर्य आणि भव्यता अनुभवत अनेक किनारे फिरलो. डोक्यातले सगळे कांदे बटाटे हलतील असा भयानक वारा, अनेक ठिकाणी थंड हवा. ते महाकाय सिल आणि बरेचसे इतर प्राणी नी पक्षी. सांटाक्रूज़ चा सगळा भाग फिरताना असेच खुप सिल. ४० वर्षापूर्वी त्यांनी संवर्धन सुरू केले आणि खुप मोठे काम केले. त्या सिल साठी मोठमोठे प्लॅटफॅार्म उभारलेत. त्यावर ते प्राणी पहुडलेले असतात, आवाज़ करत. लांब समुद्रात मधेच एखादा व्हेल मासा कोलांटिउड़ी मारतो. सीगल्स उड़त जातात. कुठे पेलिकन्स तर कुठे हेरॅान्स. हाफ़ मून बे ला किनारा , डोंगर असे जोडीने आहेत. घोंगावत येणाऱ्या समुद्राच्या लाटा त्या डोंगराला क़ोरत जातात . निरनिराळे आक़ार तयार करत. किनारे सगळे स्वच्छ!! पॉईंट रेज. पॅसिफिक महासागरातले एक टोक. डोंगर आणि समुद्र यांचा सुंदर मिलाफ. तिथे अनेक ठीकाणे आहेत बघण्यासारखी. आपण डोंगरावर, ख़ाली सागर आणि वर आकाश. १८७० मधे बांधलेले एक लाईट हाऊस आहे. जगाच्या त्या टोकावर चक्क मराठी शब्द ऐकु आले. आमच्यासारख़ेच तिथे फिरायला आलेले. प्रत्येक ठिकाणी थोड़ेफ़ार चालत ,चढ़त उतरत , जावे लागतें. पण मज़ा येते. चिमनी रॉक एक अशीच जागा. आपल्या कास ची आठवण यावी अशी. खुप विविध प्रकारची रानफुले उमललेली. आधी त्यांची माहिती देणारे बोर्ड पण. विविध रंगी, छोटी छोटी फुले!! रंगित गालिचा अंथरला होता अगदी. तिथुन जवळच एका पॉईंट वर खुप सारे elephant सील्स पसरलेले होते. लांब दूरवर व्हेल मासे पण . रस्त्यात बरेच इल्क पण दिसतात. हा लॉंग बे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. हनोई हुन हां लॉंग बे च्या डॉक वर पोचलो. क्रूज़ म्हटले की आपल्या नज़रेसमोर भले थोरले महाकाय जहाज़ येते. पण इथले क्रूज़ खुप सुंदर होते. एका मध्यम आक़ाराच्या जहाजावर अर्धा भाग अति अद्ययावत अशा खोल्या आणि अर्धा भाग रेस्तराँ, सीट आउटस . टॉप डेक तर सुंदर सजवलेले. संध्याकाळची पार्टी तिथेच होती. मोजक़या खोल्यामधुन एक फ़्रेंच , एक डच , एक सिंगापुरचे , एक आम्ही, अशी ४ कुटुंब, २ ब्रिटिश ज्येष्ठ नागरिक, एक ऑस्ट्रेलीयन आजोबा असा मोजक्या लोकांचा ग्रुप होता. समुद्रात फिरायला गेलो. कयाकिंग वगेरे करुन आलो. संध्याकाळ च्या पार्टी ला वर गेलो तर काय आश्चर्य! तो दीवाळीचा दिवस होता. डेक सुंदर सजवला होता. बरेचसे खाद्यपदार्थ आणि पेय मांडले होते. आम्ही पोचलो तशी सगळयानी एक सुरात आम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मी पण काही भारतीय मिठाई नेली होती . त्या फ़्रेंच कुटुंबप्रमुख़ाचा वाढदिवस होता. त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला ज़ेव्हा एक त्याच्या नावाचा केक आला. धमाल नुसती मग. छोट्या छोट्या टेकडयामधुन जहाज जातेय आणि समुद्राच्या साक्षीने सण साजरा होतोय. मालदीव. पाचूची असंख्य बेटे. नितळ, स्वच्छ, पारदर्शक पाण्याचे लांबचलांब किनारे. अगदी आतपर्यंतचे सगळे स्वच्छ दिसते. निरनिराळया रंगांचे मासे, प्रवाळ बघायला मिळते. शुभ्र पांढरी वाळु. असंख्य शंखशिंपले. अगदी विमानातून सुद्धा इतका सुंदर नजारा दिसतो. अथांग समुद्राच्या अधे मधे छोटे छोटे बेटांचे पुंजके. स्वर्गीय नजारा. मात्र प्रचंड वाढती लोकसंख्या आणि घरांसाठीची सततची वाढती मागणी ह्यामुळे साग़रात भराव घालून जागा तयार केली जातेय. असेच चालु राहिले तर काय होईल त्या रत्नाकराचे?

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments