पत्र क्र २७
जसा अरबी समुद्र सुंदर तसाच बंगालचा उपसागर!! हा निळा तर तो हिरवा! तिथेही खुप किनारे फिरलो. कोणार्क जवळ असाच एक सुंदर किनारा. सपाट ज़मीन एकदम नव्वद अंशात खोल वळते. ती जागा खुप धोकादायक. पूरीच्या...
जगाच्या पाठीवर … कधितरी कुठेतरी पत्र क्र २७ जसा अरबी समुद्र सुंदर तसाच बंगालचा उपसागर!! हा निळा तर तो हिरवा! तिथेही खुप किनारे फिरलो. कोणार्क जवळ असाच एक सुंदर किनारा. सपाट ज़मीन एकदम नव्वद अंशात खोल वळते. ती जागा खुप धोकादायक. पूरीच्या किनाऱ्यावर ची सुदर्शन पटनायक हयांची सुंदर सुंदर शिल्पे आज ही आठवतात . पुरीला फ़ार पहाटे उठुन सूर्योदय बघायला गेलो. तिथला किनारा तर छानच आहे. त्यादिवशी पटनायक ह्यांनी भले थोरले सूर्याचेच शिल्प साकारले होते. सूर्य तेच बघायला वर येतोय असे भासत होते. हिरव्या भासणाऱ्या त्या समुद्रातुन केशरी गोळा वर येत होता. काय रंगकाम होते!!! चेन्नईला पण हाच बंगाल चा उपसागर. एक गोष्ट नेहेमी जाणवते, आपल्या सगळयाना समुद्र, किनारा आवडतो. तिथे फिरायला, थोड़ा वेळ घालवायला खुप मज़ा येते पण शहरी वस्ती जवळ किनारे केविलवाणे वाटतात. रामेश्वरम ला पामबन चा पुल , ती रेल्वे आणि सुंदर किनारा. तो पुल उघड़बंद होताना बघणे केवळ अप्रतिम! पुद्दुचेरी ला पण शहरी किनारा. खाऊ गल्ली, दुकाने वगेरे मिरवणारा. तरी तो समुद्रच हो, खुप आल्हाददायक. सगळयात अविस्मरणीय समुद्र कन्याकुमारीचा! अरबी समुद्राची निळाई, बंगाल च्या उपसागराची हीरवाई आणि हिंद महासागराचा काळपट रंग , तीन दिशांनी दिसतात. एकीकडे विवेकानंद स्मारक !! आणि सूर्योदय , सूर्यास्त आणि चंद्रोदय!! किती सुंदर जागा . तीन समुद्रांची मज़ा एकत्र. विशाखापट्टण ला सूर्य प्रथम उगवतो म्हणतात. आमचे हॉटेल तर किनाऱ्यावरच होते. पहाटे लवकर उठून सूर्याचे स्वागत करायला गेलो. किनाऱ्यावर कोणीच नाही. आम्हीच केले मग त्याचे स्वागत!! तिथला ऋषिकोंडा बीच. सूर्यकिरण पाण्यातुन पड़ून खालची रेती चांदीसारखी चमकते. अगदी चांदी पसरलीय की काय असेच वाटते. तिथल्या कैलासगिरी वरून समुद्राचा अप्रतिम नजारा दिसतो, लांबच लांब स्वच्छ किनार विशाखापट्टणम चा अजुन एक सुंदर किनारा. आर के म्हणजे रामकृष्ण बीच. तिथे जवळच असलेल्या रामकृष्ण मिशन च्या इमारतीवरून त्याला रामकृष्ण बीच हे नाव पडले. क्वचितच असे कुठे असेल की एखाद्या संस्थेच्या नावावरून किनारा ओळखला जातो. खुप लांबच लांब आहे तो किनारा पण डॉल्फ़िनस नोज़ भाग़ात रामकृष्ण मिशन इमारती जवळच्या भागाला दिलेली भेट विशेष लक्षात राहिली. तिथे जास्ती दिवस मुक्काम असल्याने बऱ्याच जागा बारकाईने बघायला मिळाल्या. आर के बीच वर सुंदरसे मत्स्यालय आहे. दुर्गा देवी चे सुंदर मंदिर आहे. अनेक मोठमोठया मूर्ति आहेत. ऐतिहासिक वस्तुंचे विशाखा संग्रहालय आहे. नौसेनेचा सुवर्ण इतिहास सांगणारे स्वर्णज्योति संग्रहालय तर फ़ारच छान. “ शं नो वरुण:” हे नौसेनेचे ब्रिद कसे ठरले आणि मा राष्ट्रपति सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांनी त्यावर केलेले भाष्य भारावून टाकते. बाकी पण नौसेनेचीं खुप माहिती वाचायला मिळते. किती खड़तर काम नौसेनिक करत असतात ते जाणून उर अभिमानाने भरुन येतो. INS कुरुसुरा नावाचे, पाणबुडी चे संग्रहालय तर कीनाऱ्यावर वाळुतच ती पाणबुडी रोवून केलेय. आत जातानाच लक्षात येते की आत राहणे म्हणजे किती कठिण काम. अत्यंत अरूंद जागा. एक़ेक़ाला काही चौरस इंच मिळतात झोपायला. रेल्वेचे बर्थ कितीतरी मोठे त्यापेक्षा. ज़ेवणखाण तर फ्रिज मधुन साठवलेले. सूर्यप्रकाश अनेक दिवस दिसणारच नाही. अत्यंत खड़तर जीवन. पाणबुडीतुन बाहेर आलो तरी आतले आठवत राहते. समुद्राच्या साक्षीने ते संग्रहालय बघायला खुप छान वाटते. हे संग्रहालय उभारायला किती समर्पक जागा निवडलीय न?
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.