पत्र क्र २६
ते समुद्रातले खेळ वाले पण आले. आधी तर ते सगळे किनारे इतके सुनसान असायचे. एकदा खुप पाऊस आला . तर कुठे आसरा दिसतो का बघितले आणि एक टपरी दिसली, थोड़ा वेळ बसलो. पाऊस थाम्बला. बाहेर आलो तर कळल ती टपरी...
जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र २६ अथांग, अनंत, असा समुद्र!! क़ायम सगळयाना भुरळ घालतो. कितीतरी रूप बघितलित त्याचि आजवर. रविवारी फिरायला कींवा आलेल्या पाहुण्याना समुद्र दाखवायला कितीदा तरी अलीबाग़, अक्षी, नागांव, किहिम, मुरुड, रेवदंडा अशा सुंदर किनाऱ्याना भेंटी दिल्या. ज़ेव्हा हे किनारे अगदी निर्जन होते, फ़ारसे कोणी तिथे जात नव्हते तेव्हा तर सगळा किनारा आपल्यासाठी रिझर्व असावा असे वाटायचे. उंचउंच सुरूच्या बनात घरून नेलेला डबा खायला काय मज़ा यायची. हळुहळु चित्र पालटले. बर्फ़ाचे गोळेवाले , शहांळ वाले, मग इतर वस्तु वाले गर्दी वाढ़ु लागली. कुठेतरी ते समुद्रातले खेळ वाले पण आले. आधी तर ते सगळे किनारे इतके सुनसान असायचे. एकदा खुप पाऊस आला . तर कुठे आसरा दिसतो का बघितले आणि एक टपरी दिसली, थोड़ा वेळ बसलो. पाऊस थाम्बला. बाहेर आलो तर कळल ती टपरी दहावे वगेरे विधि करण्यासाठी बांधली होती, थोड़े पुढ़ेच स्मशान होते. चरकलोच. पण किनारे इतके सुंदर होते. सूर्यास्त बघायला खुप छान वाटायचे. गर्दी वाढायला लागली तशी आम्ही अजुन अजुन पुढ़े जाउन समुद्र अनुभवला. अनेक ठिकाणी पाण्यात जाता येत नाही तरी नुसते लाटांचा खेळ बघत बसायला पण शांत वाटते. क़ोकणातल्या समुद्राची मज़ा औरच. बहुतेकदा, घराच्या मागच्या बाजूलाच समुद्र. आणि घरामागे एक टाके कींवा छोटी मोरी. समुद्रातुन भिजून आले की साफ़सफ़ाई साठी. वेळासला छोटी छोटी क़ासव पिल्ले दूडुदूडु समुद्राकडे जाताना बघणे म्हणजे अभूतपूर्व!! अनेक किनारे फिरताना समुद्र प्रत्येक ठिकाणी नवीनच वाटतो. ज़ेव्हा कोळी लोक मासे पकड़ून परत येतात आणि किनाऱ्यावर ती ,” रापण” उतरवतात, अगदी बघण्यासारख़े असते. मोठया बोटीतुन ते किनारा गाठतात. भल्यामोठया जाळयातुन आणलेले मासे ख़ाली उतरवतात. मग त्याचे वर्गीकरण करतात. काही लोक बोली लावून विकत घेतात. काही उरलेले वाटे करतात. आणि मजेत घरी जातात. आणि एक दोन चुकार मासे इकड़े तिकडे पडलेले, त्या जाळयात अडकलेले, पळवायला कावळे आणि मांजरी पण गर्दी करतात. ते कोळी लोक पण आठवणीने देतात त्यांना. हा सगळा कार्यक्रम बघायला इतके पहाटे उठलो होतो. आमचे हॉटेल किनाऱ्यावरच होते देवगड मिठबाव च्या जवळ! द्वारकेहुन साबरमती , सोमनाथ रस्ता काय सुंदर आहे! बराच काळ समुद्राच्या साथीने आपण जात रहातो. द्वारकेजवळ भारताचे पश्चिम टोक बघायला गेलो. आणि तिथे सूर्य शेवटी बुड़तो म्हणे!! खळाळत्या अरबी समुद्राच्या नितळ निळाईत गुडुप होणारा तो सोन्याचा गोळा!! हेदवीला भरतिच्या वेळी घळीतून तूफ़ान उसळणारा, दिव ला शांत असणारा, कोकणात कुठे प्रेमळ भासणारा तर कुठे रौद्र! स्वच्छ निळा ! मात्र गोव्यात एकदा तेलाचे जहाज फुटल्याने तेलाचा तवंग पसरुन पूर्ण काळा झालेला होता. सिंधुदुर्ग ला बरोबर युगांडा चा मित्र आणि त्याची बायको होते. त्यांना घेउन तिथले अनेक किनारे फिरलो कारण त्यांना समुद्रावर फिरायचे होते. आडगावचे लोक इतके कुतूहलाने बघत, बोलायला येत, आणि त्यांच्याबरोबर फ़ोटो पण काढ़ून घेत. एक जण तर मला म्हणाला, “हां पण कोली असा का? दर्यावर जाउन जाउन काला पड़लोय” गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ अरबी समुद्र मस्तच दिसतो, कितितरी किनारे मऊसूत वाळुत चाललोय, सूर्यास्त बाघितलेत. केरळच्या अलेप्पीजवळचा असाच एक किनारा. तिथे पाण्यात नव्हते जाऊ देत तर सूर्यास्ताचे दृश्य बघायला थांबलो. आणि अचानक लक्षात आले पांढऱ्याशुभ्र वाळुवर अगदी तसेच पांढ़रेशुभ्र , छोटेछोटे असंख्य खेकडे होते, मग कसला बघताय सूर्यास्त? पळता किनारा थोड़ा झाला!
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.