पत्र क्र २५

अनोखी शांतता अनुभवायला मिळते. अनेक ठीकाणच्या नद्या अनेक छान अनुभव देउन गेल्यात. लंडन म्हटल की डोळया समोर थेम्स येतेच. हे शहर वसलेच आहे तिच्याभोवती. एखाद्या नदीचा भरपूर व्यावहारिक उपयोग केलेला थेम्स...

कीर्ती वडाळकर
||3 min read

जगाच्या पाठीवर … कधीतरी कुठेतरी पत्र क्र २५ आपल्या सारखी नदी आई नसली तरी परदेशीसुद्धा नदीच्या भोवतीच सर्व अर्थचक्र फिरत असते. टुरिस्ट लोकांना उगम दाखवून, अलिशान क्रूज़ मधे फिरवुन वगेरे आकर्षित केले जाते. भारतात फिरताना मला प्रत्येक नदी खुप जवळची वाटते. नदी दिसली की मनात कुठेतरी अनोखी शांतता अनुभवायला मिळते. अनेक ठीकाणच्या नद्या अनेक छान अनुभव देउन गेल्यात. लंडन म्हटल की डोळया समोर थेम्स येतेच. हे शहर वसलेच आहे तिच्याभोवती. एखाद्या नदीचा भरपूर व्यावहारिक उपयोग केलेला थेम्स च्या बाबतीत दिसतो. प्रसिद्ध लंडन ब्रिज तर आहेच पण त्याशिवाय अनेक पुल थेम्स वर बांधलेत. थेम्सच्या काठाने नूसते फिरताना सुद्धा खुप छान वाटते. तो मोठ्ठा लंडन आय पण थेम्स च्या काठावर. नदी आणि शहराचे मनोहारी दर्शन घड़वणारा. नवीन झलेला एमिरेट्स रोपवे पण नदीचे वेगळेच दर्शन घडवतो. आणि उंच अशा वॉकी टॅाकी इमारतीवरून पण थेम्स चे सुंदर दर्शन होते. थेम्स जशी लंडन मधुन वाहते तशीच पॅरीस मधुन वाहणारी सेन नदी. संध्याकाळी क्रूज़ वरून सुंदर शहर दर्शन करताना तिथे बांधलेले अनेक पुल दिसले आणि आजुबाजुच्या। ऐतिहासिक इमारती पण! ऱ्हाइन नदी पण अशीच, आपल्या खळाळत्या प्रवाहाने अनेक सुंदर दृश्य दाखवणारी! जिंजा ग़ावाच्या जवळ विक्टोरिया तलावातुन नाईल नदीचा उगम होतो. संपूर्ण युगांडा तिच्या वर अनेक गोष्टिंसाठी अवलंबून आहे. तिच्या काठावर सुंदरसे रिसोर्ट होते. इतके शांत आणि प्रशस्त! फ़क्त नाईल , नाईल आणि नाईल!! सूर्य घेउन जाणारी नाईल आणि भल्या पहाटे सूर्य आणून घालणारी नाईल!! नीरव शांतता पसरवणारी आणि स्वतःच्याच मस्तित अखंड वाहणारी! अनेक पशु पक्षाना घर देणारी. जिंजा नंतर मर्चीसन पार्क ला गेलो. तिथे तर ही नाईल इतकी सुंदर दिसते. बोटिने मर्चीसन धबधब्या कडे ज़ाताना असंख्य पक्षी, मगरी, पाणघोड़े , हत्ती वगेरे दिसतात. आणि प्रत्यक्ष त्या धबधब्याचे रूप बघायला त्याच्या समोरच्या खड़कावर जाउन बसु देतात काही वेळ, मस्तच वाटते. नदीचा उत्तम वापर बघायचा तर तो सिंगापुरला. १९७७ ते १९८७ अशी दहा वर्षे लावुन अतिशय स्वच्छ करुन तशिच ठेवलेली सिंगापुर नदी आणि इतर ४ नद्या. मरीना तलाव कींवा ह्या नद्यांचा इतका सुरेख आणि कल्पकतेने वापर केलाय. दरवेळी काहीतरी नवीन केलेले बघायला मिळते. अगदी पहिल्यांदा , डिझेलच्या धुर ओकणाऱ्या बोटीतुन , कौतुकाने तो पाणी फेकणारा सिंह दाखवायला नेले होते. आणि नंतरच्या प्रत्येक ट्रिप मधे काही तरी भव्य आणि नवीन. गार्डन्स बाय द बे अशीच एक अफ़लातून जागा . मरीना बे सँड्स पण . तिथेच सेमिनार होता त्यामुळे तो सगळा भाग अलिकडच्या ट्रिप मधे खुप फ़िरुन घेतला. नदी किनारी केलेले थिएटर, सजावट, चालायला सुंदर वाटा, ते आर्टसायन्स म्यूझियम आणि रात्री होणारा दिव्यांचा खेळ , सगळच नेत्रदीपक!! बँकाँक ची चाओ फ़्राया पण तिच्या तरंगत्या मार्केट्स साठी प्रसिद्ध. पण तिथे फारच गर्दी असते. सकाळी लवकर गेलो म्हणुन जरा बघायला बरे वाटले, पण दूपारून खुप गर्दी असते म्हणे. बँकाँक म्हणजे मुंबई ची थोड़ी सुधारित आवृत्ति , गर्दी च्या बाबतीत! वीयट्नाम आणि कम्बोडिया ला साथ देणारी मेकांग नदी . खुपसे जनजीवन तिच्यावर अवलंबून आहे . तिबेट मधुन निघुन , मायनामर, लाओ, कंबोडिया आणि मग वीयट्नाम मधे साउथ चायना सी ला मिळते. ह्या नदीच्या भव्य पात्रातुन किती वेळा प्रवास केला. तिच्या सुपिकशा त्रिभुज प्रदेशात छोट्या नावेतुन जातानाचा अनुभव केवळ अवर्णनीय!! त्या नदी पात्रात रोज़ सकाळी बोटिंवरचे तरंगते मार्केट भरते. सुंदर रसरशीत फळांचे. अगदी लवकर जावे लागतें ती मज़ा बघायला. आपल्या बोटीला त्यांची बोट अड़कवतात, एक आकडा टाकुन, आणि हे घ्या ते घ्या अशी गळ घालत बसतात. सूर्य वर आला की संपला वेळ त्यांचा! सगळयात छान तर कंबोडिया च्या प्नोमप्नेह (Phnom Penh) ला वीयट्नाम च्या चाउ डॉक हुन केलेला बोटिचा प्रवास. दिड दोन किलोमीटर रुंदीचे भव्य पात्र आणि भरधाव जाणारी ती स्पीडबोट!! Siem reap जवळ पण हिच मेकांग नदी. इतके भव्य पात्र! एक अख्ख गाव पाण्यावर बोटित वसलय. ही बोट म्हणजे शाळा तर ती बोट म्हणजे दवाखाना! आणि इकडच्या बोटित हॉटेल तिच्या बाजुच्या बोटित मार्केट, धमाल नुसती! ह्या नदीत काही मोठे आणि चविष्ट मासे मिळतात. त्यामुळे मासेमारी पण मोठा उद्योग आहे. त्या माशांचे ब्रिडिंग सेंटर पण तरंगते! मासे तर विकतातच, पण मगरी पण विकतात. बोटीचा एक भाग जरा बंदिस्त करुन त्यात खुप मगरी सोडल्या होत्या. कोणी ऑर्डर दिली की लगेच काढ़ून , मारुन , भाजून देणार. तसेच साप पण. चुकुनच त्या भाग़ात गेले ……. आता आठवले तरी काटा येतो ……..

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments